'एकाच घरातील 11 लोकांची आत्महत्या': अशा क्राईम सीरिजचा मनावर काय परिणाम होतो?

    • Author, चेरलान मोलान
    • Role, बीबीसी न्यूज, मुंबई

22 वर्षांची राखी सांगते, रात्रीच्या अंधारात निर्जन रस्त्यांवरून जाताना तिच्या अंगावर भीतीचा शहारा येतो. तिचा कोणी पाठलाग तर करत नाहीये ना, म्हणून ती सतत मागे वळून वळून पाहत असते.

राखी भारताच्या आर्थिक राजधानी, मुंबईत राहते. सायकॉलॉजी विषयाचा अभ्यास करणारी राखी सांगते, तिला क्राईम शो बघायला, गुन्हेगार कशा पद्धतीने विचार करतात हे बघायला आवडतं. पण हे बघून तिच्या सुरक्षेबद्दलही तिला काळजी वाटू लागते.

हल्ली क्राईम शो बघणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढत आहे. या शोचे पॉडकास्ट देखील स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

हे पॉडकास्ट शो भारतीय वंशाच्या गुन्हेगारांवर आणि त्यांच्या वाईट कृत्यांवर आधारित असतात. यातून देशाच्या गुन्हेगारीच्या इतिहासावर प्रकाश टाकला जातो.

'द इंडियन प्रिडेटर' सारख्या शो मध्ये सिरीयल किलरच्या गुन्ह्यांचा मागोवा घेण्यात आलाय. तर 'हाऊस ऑफ सिक्रेट्स: बुरारी डेथ्स' मध्ये दिल्लीतील एका कुटुंबातील 11 सदस्यांच्या मृत्यूमागील कारण आणि सिद्धांत शोधण्याचा प्रयत्न केलाय.

2012 मध्ये दिल्ली क्राईम नावाचा शो आला होता. ही सिरीज दिल्लीतील महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारावर आधारित होती. या सिरीजला एमी अवॉर्ड मिळाला आहे.

या सिरीज बघणाऱ्या प्रेक्षकांचं म्हणणं आहे की, यापूर्वी अशा सिरीज तयार होत नव्हत्या. मात्र आता भारतीय गुन्हेगार आणि त्यांच्या गुन्ह्यांशी संबंधित इतक्या सिरीज आल्या आहेत की त्याचा कोष तयार झालाय.

जेफ्री डॅमर किंवा टेड बंडी सारखे अमेरिकन सिरीयल किलर्स वाचत पाहत मोठी झालेली राखी म्हणते की तिला आता चार्ल्स शोभराज आणि जॉली जोसेफबद्दल फॅसिनेशन आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मालिका भारतासाठी नव्या नाहीत. 2000 च्या दशकात काही मसालेदार गुप्तहेर मासिकं प्रकाशित व्हायची. यात अनेकदा वास्तविक जीवनातील गुन्ह्यांपासून प्रेरित लिखाण असायचं. जसं की क्राईम पेट्रोल आणि सीआयडी सारखे टीव्ही शो असतील. पण या शोमध्ये असे काही डायलॉग, ग्राफिक्स असायचे की लोक घाबरण्याऐवजी हसायचे.

पण प्रेक्षकांच्या मते, आजच्या वेबसिरीज त्या तुलनेत जास्त आकर्षक आणि माहितीपूर्ण आहेत. यात गुन्हेगाराची पार्श्वभूमी, मानसिकता लक्षात घेऊन, त्याची केस वेगवेगळ्या अँगल मधून दाखवली जाते.

सीमा हिंगोरानी एक थेरपिस्ट आहेत. त्या सांगतात की, गुन्ह्यांवर आधारित सिरीज या लोकांना व्यसन लावतात. यामुळे प्रेक्षकांच्या मेंदूमध्ये काही विशिष्ट रसायने उत्सर्जित होतात.

"यातून तुम्हाला थ्रीलिंग अनुभव मिळू लागतो."

या सिरीज मध्ये प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी भीषण दृश्य वापरतात. 'द बचर ऑफ दिल्ली' या माहितीपट मालिकेत मारेकरी शरीराला ठेचून मारत असल्याच्या दृश्य दाखवण्यात आली आहेत. शिरच्छेद केलेले मृतदेह, बांधून ठेवलेले लोक आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अस्पष्ट गोष्टी ब्लर करून दाखवल्या जातात.

या सिरीज मध्ये चंद्रकांत झा नामक स्थलांतरित कामगाराची गोष्ट दाखवली आहे. 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला त्याने अनेक गरीब स्थलांतरितांना ठार मारलं. हा किलर लोकांचे मृतदेह टोपल्यांमध्ये भरून तुरुंगाच्या बाहेर ठेवायचा. आणि सोबतच त्यात पोलिसांना शिव्या देणाऱ्या चिठ्ठ्या ठेवायचा.

दिग्दर्शिका आयेशा सूद सांगतात की, हिंसाचाराचं अशाप्रकारे चित्रण करायचं हा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता. पण प्रत्यक्षात हिंसा दाखविण्याऐवजी, प्रेक्षकांना जाणीव होईल अशा पद्धतीने शूट करण्यात आली.

सूद पुढे सांगतात की, "खरं म्हणजे हे कृत्य क्रूर होते आणि या प्रकरणाकडे मीडिया, पोलिस आणि जनतेने वर्षानुवर्षे दुर्लक्ष केलं. आपल्याला फक्त अशाच लोकांविषयी ऐकायचं असतं जे आपल्यासारखे आहेत. पण क्रूरता सगळ्या वर्गांमध्ये आहे हे लक्षात घ्यायला हवं. आणि हिंसा कोणत्याही वर्गात होवो, आपल्याला सतर्क राहणं आणि त्याविषयी जाणून घेणं आवश्यक आहे."

सूद म्हणतात की, भारतात क्राईमच्या सिरीज विषयांवर आधारित दाखवल्या जातात. या सीरिजमुळे आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात. जसं की गुन्हे नेमके कसे घडतात, सर्वांसाठी सुरक्षित वातावरण तयार व्हावं यासाठी काय करता येईल.

'द देसी क्राईम' नावाचा एक पॉडकास्ट भारत आणि दक्षिण आशियाई देशांमधील गुन्ह्यांवर प्रकाश टाकतो.

सकून त्यागी या क्राईम पॉडकास्टच्या चाहत्या आहेत.

त्या सांगतात की, या पॉडकास्टमुळे त्यांना स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल आणखीन जागरूक व्हायला मदत झाली. पीडित व्यक्ती यातून कशा पद्धतीने बाहेर पडते यावर त्यांचा फोकस असतो.

त्यांच्यासाठी हे पॉडकास्ट म्हणजे वास्तवातील परिस्थिती आहे. त्या दिल्लीत राहतात, जिथे क्राईम रेट सर्वात जास्त आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या ताज्या अहवालानुसार, 2021 मध्ये दिल्लीत दररोज दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाले.

त्या म्हणतात की, "ज्या गुन्ह्यांबद्दल तुम्ही ऐकता, ते गुन्हे ज्या ठिकाणी घडलेले असतात तिथं तुमचं सतत येणं जाणं असतं. म्हणून तिथे जाताना तुम्ही सतत भीतीच्या सावटाखाली राहू शकत नाही."

काही अभ्यासांमध्ये असं म्हटलंय की, अशा क्राईम सिरीज बघण्यात महिला वर्गाचं प्रमाण जास्त आहे. या सिरीज बघताना त्या पीडितेच्या ठिकाणी स्वतःला ठेऊन बघतात. असं का होतं? कारण पीडित पण महिला असते. आणि त्यामुळे आपल्या बाबतीतही असं घडू नये म्हणून महिला जास्त सतर्क असतात.

पण काही समीक्षकांना असं वाटतं की, असे शो आणि पॉडकास्ट तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचे असतात. त्यांचे रिसर्च देखील चुकीच्या पद्धतीने केलेले असतात.

मुंबईस्थित क्राईम रिपोर्टर श्रीनाथ राव सांगतात की, "अशा सिरीज मध्ये नैतिकतेचा देखील भडिमार केलेला असतो."

"या सिरिजचा पीडित किंवा गुन्हेगाराच्या कुटुंबावर कसा परिणाम होईल याचा अजिबात विचार केला जात नाही."

2021 मध्ये दिल्लीच्या बुरारी केसवर डॉक्यूमेंट्री तयार करण्यात आली होती. त्यावेळी सोशल मीडियावर या घटनेशी संबंधित अनेक मीम्स तयार करण्यात आले होते. आपल्या देशात प्रचलित असलेल्या बिघडलेल्या मानसिक आरोग्याच्या स्थितीवर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने ही डॉक्युमेंट्री बनवली होती. मात्र याचं झालेलं हसू पाहता त्याचा उद्देश सफल होऊ शकला नाही.

त्याच वर्षी सिरीयल किलर जेफ्री डॅमरची एक सिरीज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती. या सीरिजमुळे आपल्याला मानसिक त्रास झाल्याचा दावा पीडितेच्या कुटुंबीयांनी केला होता.

2019 मध्ये सिरीयल किलर आणि बलात्कारी टेड बंडीवर एक बायोपिक आला होता. यात झॅक एफ्रॉन सिरीयल किलरच्या भूमिकेत होता. त्याने यात टेड बंडीची प्रतिमा ग्लॅमराइझ केली होती. त्यामुळे झॅक एफ्रॉनवर कठोर टीका करण्यात आली होती.

हिंगोराणी म्हणतात त्याप्रमाणे, सत्य घटनांवर आधारित क्राईम शो लोकांमध्ये अस्वस्थता वाढवू शकतात किंवा त्यांना असंवेदनशील बनवू शकतात.

बऱ्याचदा गुन्हेगार त्यांच्यातला वाद सोडवण्यासाठी सक्षम नसतात. आणि बऱ्याचदा ते हिंसेचा अवलंब करतात. हे शो पाहणारी व्यक्ती नकळत अशी वागणूक आत्मसात करू शकते.

पण आयेशा सूद म्हणतात की, या सिरीजमुळे आपल्याला आजूबाजूला काय सुरू आहे हे समजतं.

त्या पुढे सांगतात "भीती ही एक अशी भावना आहे जी तुम्हाला तुमची काळजी घेण्यास आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यास प्रवृत्त करते."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)