You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'ऑस्कर' भारताच्या पदरात, 'द एलिफंट व्हिस्परर्स' डॉक्युमेंट्रीची बाजी
कार्तिकी गोन्सालवेस आणि गुनीत मोंगा यांच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या डॉक्युमेंट्रीला यंदाच्या ऑस्कर्समध्ये बेस्ट डॉक्युमेंट्री ऑन शॉर्ट सब्जेक्ट हा पुरस्कार मिळाला आहे.
95 व्या ऑस्कर समारंभात या पुरस्काराची घोषणा झाली.
‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ही या कॅटेगरीत पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय फिल्म ठरली.
या आधी भारताला दोनदा – द हाऊस दॅट आनंदा बिल्ट आणि अॅन एनकाऊंटर विथ फेसेस या दोन डॉक्युमेंट्रीजसाठी अनुक्रमे 1969 आणि 1979 ला नामांकनं मिळाली होती.
ही डॉक्युमेंट्री मदुमलाई अभयारण्यातल्या रघू नावाच्या एका अनाथ हत्तीच्या पिल्लाची कहाणी सांगते.
बोम्मन आणि बेल्ली हे आदिवासी कुटुंब त्याची काळजी घेतं. मानव-प्राणी यांचं भावविश्व हळूवारपणे या डॉक्युमेंट्रीत उलगडून दाखवलं आहे.
गुनीत मोंगा यांनी ट्वीट करून आनंद व्यक्त केलाय. दोन महिलांनी हे करुन दाखवलंय, असंही त्या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहेत.
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दीपिका
ऑस्कर सोहळ्यात नाटू नाटू गाण्यावर परफॉर्मन्स झाला. परफॉर्मन्सच्या आधी दीपिका पादुकोण मंचावर आली आणि तिने प्रेक्षकांन या गाण्याबद्दल सांगितलं.
दीपिका म्हणाली की, “सगळ्या जगातले लोक नाटू नाटू गाण्यावर थिरकलेत आणि जर तुम्हाला या गाण्याबद्दल अजून माहिती नसेल तर या सादरीकरणानंतर तुम्हाला नक्कीच कळेल.”
दीपिकाने असंही म्हटलं की भारतीय प्रोडक्शनमध्ये बनलेलं हे पहिलं गाण आहे ज्याला ऑस्कर नामांकन मिळालं आहे.
दीपिकाच्या ऑस्कर लुकचं सोशल मीडियावर कौतुक होतंय.
अनेक जण म्हणत आहेत की दीपिका ऑस्करच्या मंचावर एक सूत्रसंचालक म्हणून गेली ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.
नाटू नाटू गाण्यावर झालेल्या सादरीकरणालाही ऑस्कर सोहळ्यातल्या प्रेक्षकांची पसंती मिळाली. लोकांनी उभं राहून टाळ्याही वाजवल्या.
दिग्दर्शक शौनक सेन यांची 'ऑल दॅट ब्रिद्स' या डॉक्युमेंट्रीला सुद्धा ऑस्कर पुरस्काराचं नामांकन होतं. मात्र, याच कॅटेगरीत असलेल्या 'नवाल्नी' या डॉक्युमेंट्री फिचर फिल्मला पुरस्कार मिळाला.