You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच अमेरिकेच्या 'स्टेट व्हिजिट'वर, पण ही भेट वेगळी का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. तिथे ते अमेरिकन संसदेला संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान मोदींचा हा काही पहिलाच अमेरिका दौरा नाहीये. या आधीही ते अनेक वेळा अमेरिकेला गेले होते. मात्र, ही नरेंद्र मोदींची पहिलीच ‘स्टेट व्हिजिट’ आहे.
याचं आमंत्रण थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याकडून आलं आहे. 21 ते 24 जूनपर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यात बायडन हे मोदींचं स्वागत करतील, त्यांचे यजमान असतील.
पण ऑफिशियल स्टेट व्हिजिटचा अर्थ काय असतो? इतर दौऱ्यांच्या तुलनेत स्टेट व्हिजिट इतकी महत्त्वाची का मानली जाते?
ऑफिशियल स्टेट व्हिजिट म्हणजे काय?
परदेशी भूमीवर होणाऱ्या ऑफिशियल स्टेट व्हिजिटसाठी कोणत्याही देशाच्या प्रमुखांनी म्हणजेच ‘हेड ऑफ स्टेट’ने पुढाकार घेणं गरजेचं असतं.
अशा दौऱ्याकडे कोणत्याही व्यक्ती किंवा नेत्याचा दौरा म्हणून पाहिलं जात नाही. तो देशाचा प्रातिनिधीक दौरा समजला जातो.
अमेरिकेत होणाऱ्या ऑफिशियल स्टेट व्हिजिट या नेहमीच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या आमंत्रणावरूनच आयोजित केल्या जातात. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण पाठवलं आहे.
ऑफिशियल स्टेट व्हिजिटमध्ये काय काय असेल?
साधारणपणे यजमान देशाकडून पाहुण्या देशाच्या राष्ट्र प्रमुखांचं औपचारिक स्वागत केलं जातं. त्यांना जेवणाचंही आमंत्रण दिलं जातं.
पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेच्या ऑफिशियल स्टेट व्हिजिटची सुरूवात 21 जूनला होईल. या दिवशी ते न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाची सुरूवात करतील.
त्यानंतर 22 जूनला ते वॉशिंग्टनला पोहोचतील. तिथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन त्यांचं स्वागत करतील. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना 21 तोफांची सलामी दिली जाईल.
त्यानंतर पंतप्रधान मोदी अमेरिकन संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. 2016 सालीही त्यांनी अमेरिकन संसदेला संबोधित केलं होतं. अमेरिकन संसदेला दोन वेळा संबोधित करणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान असतील.
22 जूनच्या संध्याकाळीच राष्ट्रपती बायडन आणि त्यांची पत्नी जिल बायडन पंतप्रधान मोदींना ऑफिशियल डिनरला बोलावतील, त्यांचे यजमान असतील.
23 जूनला मोदी अमेरिकेच्या उप राष्ट्रपती कमला हॅरिस आणि परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांना भेटतील. पंतप्रधान मोदींसाठी लंचचं आयोजन केलं जाईल.
त्याच दिवशी पंतप्रधान मोदी वॉशिंग्टनमधल्या अनेक कंपन्यांचे सीईओ आणि अन्य महत्त्वाच्या व्यक्तिंना भेटतील. नंतर तर तिथल्या भारतीय वंशाच्या लोकांना भेटतील.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसोबत गेस्ट हाऊसमध्ये थांबतील पंतप्रधान मोदी
आपल्या या दौऱ्यात पंतप्रधान मोदी वॉशिंग्टनमधल्या ब्लेअर हाऊसमध्ये थांबतील. हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं गेस्ट हाऊस आहे.
त्यानंतर पंतप्रधान मोदी इजिप्तच्या ऑफिशियल स्टेट व्हिजिटसाठी रवाना होतील तिथे ते 24 जून आणि 25 जूनला थांबतील. पहिल्यांदाच इजिप्तच्या दौऱ्यावर जात असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तचे राष्ट्रपती अब्दुल फतेह अल्-सीसी यांची भेट घेतील.
पंतप्रधान मोदींच्या आधी 2009 साली तत्कालिन भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंह अमेरिकेच्या ऑफिशियल स्टेट व्हिजिटवर गेले होते.
परदेशी राष्ट्राध्यक्षाची प्रत्येक व्हिजिट स्टेट व्हिजिट असते का?
नाही, असं अजिबात नाहीये.
स्टेट व्हिजिट ही सर्व प्रकारच्या परराष्ट्र दौऱ्यांमध्ये पहिल्या स्थानावर येते. दोन देशांमधील संबंध सुधारण्याच्या दृष्टिने अशी भेट सर्वांत महत्त्वाची मानली जाते.
जर अमेरिकेतीलच दौऱ्यांची वर्गवारी करायची असेल, तर त्यांचा क्रम साधारणपणे असा असतो-
- पहिलं स्थान- ऑफिशियल स्टेट व्हिजिट
- दुसरं स्थान- ऑफिशियल व्हिजिट
- तिसरं स्थान- ऑफिशियल वर्किंग व्हिजिट
- चौथं स्थान- वर्किंग व्हिजिट
- पाचवं स्थान- गेस्ट ऑफ गर्व्हमेंट व्हिजिट
- सहावं स्थान- खाजगी व्हिजिट
या सर्व दौऱ्यांसाठीचे प्रोटोकॉलही वेगवेगळे आणि ठरलेले असतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)