You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोदी दीड तास बोलले, मात्र अदानींबद्दल चकार शब्द काढला नाही...याचा अर्थ काय?
- Author, इकबाल अहमद
- Role, बीबीसी प्रतिनिधी
संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी अदानी प्रकरणावरून सरकारवर जोरदार टीका केली. मोदी-अदानी यांच्यातील संबंधांवर गंभीर आरोप केले.
राहुल गांधींचं म्हणणं होतं की, गौतम अदानी यशाच्या शिखरावर पोहोचण्यामागे त्यांची पंतप्रधान मोदींशी असलेली जवळीक कारणीभूत आहे. त्यानंतर सभापतींनी राहुल गांधींच्या भाषणातील काही भाग संसदीय कामकाजाच्या रेकॉर्डवरुन हटविण्याचे आदेश दिले. त्यामुळे राहुल गांधींचं संपूर्ण भाषण इथे देता येणार नाही.
त्यानंतर बुधवारी (8 फेब्रुवारी) राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर बोलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले. यावेळी राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर पंतप्रधान काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
यावेळी पंतप्रधानांनी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात सुमारे दीड तास भाषण केलं. मात्र त्यांनी अदानीशी संबंधित कोणत्याच गोष्टींची चर्चा केली नाही.
थोडक्यात, आपल्या भाषणात नरेंद्र मोदींनी अदानी संबंधित विषयाला बगल दिल्यामुळे नेत्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
स्वतः राहुल गांधी म्हणाले की, "मी यावर समाधानी नाहीये. पंतप्रधानांच्या बोलण्यावरून खरं काय ते समजतंय. जर (अदानी) मित्र नसते तर (पंतप्रधान) म्हणाले असते की, मी चौकशीचे आदेश देतो. पण मुद्दा केवळ चौकशीचा नाहीये. पंतप्रधान त्यांची (अदानी) सुरक्षा करत आहेत. सरकार अदानीचा बचाव करत आहे."
काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा यांनी ट्वीट करत म्हटलंय की, "विचारवतांने चार प्रश्न विचारले पण प्रचारकाला एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही."
शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्वीट करत म्हटलंय की, "अदानी समूहाचे प्रवक्ते आणि सेल्समन ऑफ द इयर पुरस्कार पंतप्रधानांना मिळायला हवा."
मोदींच्या राजकीय विरोधकांचं म्हणणं आहे की, ते हा मुद्दा कसा मांडणार आहेत ते आता स्पष्ट झालंय. पण अदानींशी संबंधित आरोपांना मोदींनी उत्तर का दिलं नाही? त्यांनी या प्रकरणावर मौन का बाळगलं? असे प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत.
भाजपच्या राजकारणाचा अभ्यास असणारे ज्येष्ठ पत्रकार विजय त्रिवेदी यामागची दोन कारणं सांगतात.
विजय त्रिवेदी यामागे टेक्निकल आणि रणनीती कारणं असल्याचं स्पष्ट करतात. ते सांगतात की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर, सरकार सहसा आपल्या कामकाजाचं तपशीलवार स्पष्टीकरण देतं. आणि मोदींनी देखील तेच केल्याचं विजय त्रिवेदी सांगतात.
यामागचं टेक्निकल कारण सांगताना त्रिवेदी म्हणतात, "राहुल गांधींनी लोकसभेत जे भाषण केलं त्याचा बहुतांश भाग लोकसभा अध्यक्षांच्या आदेशानुसार रेकॉर्डवरुन हटविण्यात आला. आता ज्या गोष्टी कामकाजाचा भागच नव्हत्या त्यावर पंतप्रधान काय म्हणून उत्तर देतील.
आणि ही फक्त टेक्निकल बाजू आहे असं नाही. तर यामागे असलेल्या रणनीतीविषयी त्रिवेदी सांगतात, राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देऊन पंतप्रधानांना त्यांना महत्व द्यायचं नव्हतं."
राहुल गांधी जेव्हा लोकसभेत बोलत होते त्यावेळी पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री यांपैकी कोणीही सभागृहात उपस्थित नव्हते.
विजय त्रिवेदींच्या म्हणण्यानुसार, ही भाजपची रणनीती होती का? हे सांगणं जरा अवघडच आहे. मात्र भाजप राहुल गांधींना गांभीर्याने घेत नाही, हा संदेश स्पष्ट आहे.
लोकसभेतील चर्चेदरम्यान ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी तिथं उपस्थित होत्या.
बीबीसी पॉडकास्टच्या चर्चेत त्या म्हणाल्या की, पंतप्रधान यावर काहीतरी बोलतील म्हणून सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र भाजप आणि पंतप्रधान अशा दोघांनीही अदानी या विषयापासून अंतर राखलं. आणि हा त्यांच्या रणनीतीचा भाग असावा.
भाजपच्या रणनीतीवर लक्ष ठेऊन असलेल्या ज्येष्ठ पत्रकार राधिका रामाशेषन यांचंही मत असंच काहीसं आहे. त्या सांगतात की, भाजप आणि मोदी सरकार अदानी प्रकरणावर काहीही बोलण्यास टाळाटाळ करताना दिसतात.
त्यांच्या मते, या प्रकरणात सेबी आणि आरबीआय जे काही करतील ते करू द्यायचं. पण पक्षाचा किंवा सरकारचा याच्याशी काहीएक संबंध नाही अशी भाजपची लाईन आहे. त्यामुळेच आपल्या भाषणात मोदींनी अदानींचा उल्लेखही केला नाही.
सभागृहात मोदींनी निवडणुकीचं भाषण दिलं का?
मोदींनी दोन्ही सभागृहात भाषण देताना शेतकरी, मोफत रेशन, पक्की घरे, स्वयंपाकाचा गॅस, लसीकरण, स्टार्टअप्स, महामार्ग, रेल्वे मार्ग, जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील विमानतळ या मुद्द्यांना हात घातला.
शिवाय भ्रष्टाचार, महागाई, अतिरेकी हल्ले अशा प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी विरोधकांना जबाबदार धरलं.
त्यामुळे हे मुद्दे उपस्थित करून मोदींनी एकप्रकारे 2024 च्या निवडणुकीचं बिगुल वाजवल्याचं काहींचं म्हणणं आहे. पण विजय त्रिवेदी या मुद्द्यांशी सहमत नाहीत.
ते म्हणतात की, "मोदी जेव्हा केव्हा भाषण करतात तेव्हा ते निवडणुकीच्या भाषणाप्रमाणेच वाटतं. मोदींच्या आधीचे सगळे पंतप्रधान अतिशय शांतपणे बोलायचे पण मोदींची शैली वेगळ्या पद्धतीची आहे."
विजय त्रिवेदी पुढे सांगतात की, "मोदी ओरेटरी (वक्तृत्व) शैलीत बोलतात. आपल्याला अशा पद्धतीची भाषणं ऐकायची सवय नाहीये. ही शब्दांची नाही, तर मोदींच्या ओरेटरीची कमाल आहे."
विजय त्रिवेदी सांगतात की, "मोदींनी या दोन्ही दिवशी कोणती नवी घोषणा केली नाही. ते जे आदल्या दिवशी बोलले तेच ते दुसऱ्या दिवशीही बोलले. त्यामुळे त्याला निवडणुकीचं भाषण म्हणणं पूर्णपणे चुकीचं ठरेल."
मात्र हे पण तितकंच खरं आहे की, एखादा नेता जेव्हा बोलत असतो तेव्हा तो निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच बोलत असतो.
विजय त्रिवेदींच्या म्हणण्यानुसार, मोदी आणि भाजपला वाटतं की ते येणाऱ्या 2024 च्या निवडणुका सुध्दा जिंकतील. त्यामुळे ते सध्या 2047 बद्दल बोलताना दिसतात. नीरजा चौधरी सुध्दा मान्य करतात की, 2024 च्या निवडणुकीत भाजपच जिंकणार असल्याचे संकेत मोदी आणि भाजपकडून दिले जातायत.
राहुल विरुद्ध मोदी
राहुल गांधी यांनी नुकतीच कन्याकुमारी ते श्रीनगर अशी सुमारे 3500 किलोमीटरची 'भारत जोडो यात्रा' पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी संसदेत पंतप्रधानांवर हल्लाबोल केला.
त्यामुळे राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात 'वॉर ऑफ परसेप्शन' सुरू आहे का? अशी चर्चा आहे. जर तसं असेल तर कोण कोणावर भारी पडेल.
विजय त्रिवेदींच्या म्हणण्यानुसार, "भारत जोडो यात्रा आणि संसदेतील त्यांच्या दमदार भाषणानंतर समर्थकांमध्ये राहुल गांधींचं रेटिंग नक्कीच वाढलंय. पण त्याचा भाजपवर आणि विशेषतः नरेंद्र मोदींच्या समर्थकांवर काही परिणाम झाल्याचं दिसत नाही."
विजय त्रिवेदी म्हणतात, "राफेल डील, पेगासस आणि आता अदानी या तीन मुद्द्यांवर विरोधकांनी आणि विशेषतः राहुल गांधींनी मोदींविरुद्ध रान पेटवलं. पण या तिन्ही मुद्द्यांमुळे आतापर्यंत मोदींच्या प्रतिमेवर कोणताही परिणाम झालेला नाही."
ते सांगतात की, राहुल गांधी आणि विरोधकांनी हे मुद्दे संसदेबाहेर काढून रस्त्यावर आणायला हवेत. सतत या मुद्द्यांवर बोलल्यास काहीतरी परिणाम जाणवेल.
मोदी सरकारला घेरलं...
नीरजा चौधरी सांगतात त्याप्रमाणे या मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला घेरल्याचं दिसतंय.
त्या म्हणतात की, "मला वाटतं की, अदानी प्रकरण हे मोदींसाठी नऊ वर्षांमधील सर्वात मोठं चॅलेंज आहे. आणि याचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ते या प्रकरणापासून चार हात लांब राहत असल्याचं दिसतं."
राधिका रामाशेषन यांच्या म्हणण्यानुसार, लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांचं भाषण रेकॉर्डवरून हटविण्याचे आदेश जरी दिले असले तरी लोकांमध्ये एक मॅसेज गेलाय.
त्यामुळे मोदी सरकार आणि भाजपला कधी ना कधी अदानींशी संबंधित आरोपांवर उत्तर द्यावं लागेल, असं त्या सांगतात.
त्या सांगतात, "अदानी हा मुद्दा फक्त इंटरनॅशनल मीडियाच उचलून धरतोय असं नाही. अदानीसोबत व्यवसाय करणाऱ्या परदेशातील बँकाही त्यांचे करार रद्द करतायत. भारतात झालेल्या घोटाळ्यामुळे पहिल्यांदाच जागतिक स्तरावर परिणाम झाला आहे."
राधिका पुढे सांगतात की, "मोदी संसदेत त्यांच्या सरकारच्या कामाबद्दल इतकं बोलले कारण त्यांच्यावर दबाव आहे. स्वतःच्या आणि सरकारच्या बचावासाठीच ते इतकं बोललेत."
त्यांच्या मते, येणाऱ्या दिवसांत भाजप जनतेमध्ये असा प्रचार करेल की मोदी सरकार भारतातील जनतेसाठी खूप काही करत आहे, पण विरोधक त्यांच्यावर चिखलफेक करत आहेत. लोकप्रिय पंतप्रधानांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
राधिका यांच्या म्हणण्यानुसार, "राहुल गांधींनी त्यांचं म्हणणं ठामपणे मांडलंय आणि लोकांमध्ये त्याची चर्चा आहे. त्याच तुलनेत भाजपची रणनीती फारशी प्रभावी दिसत नाही."
पण नीरजा चौधरी यांनी दिलेलं स्पष्टीकरण याठिकाणी चपलख बसेल, "लोक म्हणतायत त्याप्रमाणे खूप दिवसांनी संसदेत जिवंतपणा आलाय."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)