You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संभाजीनगर : '3 लाख द्या, उत्तरपत्रिका मिळवा'; तलाठी भरतीचं रॅकेट कसं उघडकीस आलं?
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरमध्ये तलाठी भरती प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार समोर आला आहे.
या परीक्षेदरम्यान, परीक्षा केंद्रातील कर्मचारी आणि इतर काही जणांनी मिळून परीक्षार्थींना उत्तरं पुरवल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.
या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून उर्वरित 4 जणांचा शोध पोलिस घेत आहेत.
पण, हे नेमकं प्रकरण कसं समोर आलं? तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार कसा केला जात होता? यामुळे सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या आणि त्यासाठी प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या तरुणांच्या मनात काय विचार सुरू आहेत? हे आपण या बातमीत जाणून घेणार आहोत.
असं समोर आलं प्रकरण
तलाठी भरती प्रक्रियेतील रॅकेटचं हे प्रकरण कसं समोर आलं, याविषयी माहिती देताना पोलिस उपायुक्त शिलवंत नांदेडकर सांगतात, “5 सप्टेंबर रोजी एमआयडीसी सिडको पोलिस स्टेशन हद्दीत आमचे काही अधिकारी कर्मचारी पेट्रोलिंग करत होते.
या पोलिस स्टेशनच्या हद्दीत आयऑन नावाचं एक सेंटर आहे. जिथं तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू आहे. आमचे कर्मचारी तिथं पोहतले असता त्यांना काही संशयित इसम आढळून आले."
"पोलिस कर्मचारी त्यांच्याकडे चेक करण्यासाठी गेले असता काही इसम तिथून पळाले आणि एक जण पोलिसांच्या हाती लागला. त्याचं नाव राजू नागरे आहे. त्याच्याकडे संपूर्ण चौकशी केली असता आणि त्याचे मोबाईल वगैरे चेक केले असता दिसून आलं की, काही प्रश्नपत्रिका त्याच्या मोबाईलवरती आलेल्या आहेत आणि तो काही उत्तरं आतमध्ये पाठवत आहे,” ते पुढे सांगतात.
राजूकडे एकूण 26 विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट पोलिसांना आढळून आले. 5 सप्टेंबरच्या दिवशी सकाळच्या सत्रात आयोजित केलेल्या तलाठी परीक्षेदरम्यान त्यानं एका परीक्षार्थीला उत्तरं पुरवल्याचं तपासात कबुल केलं आहे.
दुपारच्या सत्रात तो उत्तरं पुरवण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला अटक केलं आहे.
राजू नागरे हा 29 वर्षीय तरुण असून परीक्षांमधील गैरप्रकाराप्रकरणी त्याच्याविरोधात याआधीही गुन्हे दाखल झाले आहेत.
रॅकेट कसं काम करत होतं?
तलाठी भरती प्रक्रियेतील या गैरप्रकारात खुद्द परीक्षा केंद्रातील कर्मचारीच सहभागी असल्याचं समोर आलं आहे.
शिलवंत नांदेडकर सांगतात, “परीक्षा केंद्रातील दोन invigilator (पर्यवेक्षक) आणि एक महिला सफाई कर्मचारी हे परीक्षार्थीला उत्तर देण्याचं काम करत होते. या महिलेकडे मोबाईल असायचा. या महिलेला राजू नागरे किंवा त्याचे साथीदार उत्तरं आतमध्ये पाठवत होते.
"मग ती महिला बाथरुमध्ये जाऊन कागदपत्रावर उत्तरं लिहून पर्यवेक्षकाला आणून द्यायची. आणि मग पर्यवेक्षक ती चिठ्ठी संबंधित विद्यार्थ्याला द्यायचे. प्राथमिक चौकशीत या कर्मचाऱ्यांनी दोन-तीन विद्यार्थ्याला उत्तरं पुरवल्याचं ते सांगताहेत.”
पण, उत्तरं पुरवण्यासाठी या टोळीला प्रश्नपत्रिका नेमकी मिळायची तरी कुठून?
नांदेडकर सांगतात, “एखादा विद्यार्थी एखाद्या सेंटरवर जातो, त्यावेळी त्याच्याकडे स्पाय कॅमेरा टाईप एखादं छोटं उपकरण असतं. तिथून तो त्या संगणकावरील पेपर्सचे स्क्रीनशॉट संबंधित व्यक्तीला बाहेर पाठवतो.
"ते बाहेर आल्यानंतर टेलिग्राम किंवा व्हाट्सअपद्वारे त्याची उत्तरं वापस पाठवली जातात. ती संबंधित पर्यवेक्षकाला दिली जातात. आणि मग तो ती उत्तरं त्या त्या विद्यार्थ्याला देत असतो."
बाबा पोलिस आणि 3 लाख रुपये
या प्रकरणातील आरोपींच्या मोबाईलमध्ये ‘Baba Police’ नावानं एक नंबर सेव्ह आहे.
‘100 प्रश्नांच्या उत्तरासाठी 3 लाख रुपये अॅडव्हान्समध्ये घ्या’, असं आरोपी आणि बाबा पोलिस यांच्यातील व्हाटसअप चॅटिंग एमआयडीसी सिडको पोलिस स्टेशनचे पोलीस उप-निरीक्षक आत्माराम घुगे यांना तपासादरम्यान आढळलंय.
तसंच ज्या मोबाईलमधून हे चॅटिंग करण्यात आलं, त्यातील सिमकार्ड आरोपी विकी सोनवणे याच्या नावावर रेजिस्टर असून दत्ता नरोडे नावाचा व्यक्ती ते वापरत असल्याचंही तपासात समोर आलंय.
पोलिस उपायुक्त शिलवंत नांदेडकर सांगतात, “3 लाख रुपये किंवा जे काही असतील ते त्या विद्यार्थ्यांमध्ये डील झालेली असेल. विद्यार्थी ज्यावेळेस भेटतील त्यावेळेस आपल्याला समजून येईल की नेमकी किती रुपयांची यामध्ये डील झालेली आहे.”
“आम्ही जे परीक्षार्थी आहेत, त्यांची देखील चौकशी करत आहोत. यामध्ये जे विद्यार्थी आहेत ते अद्यापपर्यंत अटक करणे बाकी आहे. तसेच आरोपींचे साथीदार जिथून त्यांना पेपर मिळाला ते देखील अटक करणे बाकीचे आहे.”
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत राजू नागरे सहित विकी सोनवणे आणि परीक्षा केंद्रातील कर्मचारी शाहरुख शेख, पवन सिरसाट, बाली हिवराळे यांना अटक केलीय.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी या गट-क संवर्गातील 4 हजार 644 इतक्या पदांसाठीची भरती प्रक्रिया सध्या राज्यभर राबवण्यात येत आहे.
एकूण 3 टप्प्यात ही परीक्षा होणार असून परीक्षेचे दोन टप्पे पूर्ण झाले असून तिसरा टप्पा सध्या सुरू आहे. TCS या खासगी कंपनीमार्फत ही प्रक्रिया राबवली जात आहे. राज्यभरातल्या 10 लाख 41 हजार 713 इतक्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज दाखल केलेत.
‘मुलांमध्ये खूप निराशा आलीय’
छत्रपती संभाजीनगरच्या औरंगपुरा भागात स्पर्धा परीक्षा आणि सरळसेवा भरतीची तयारी करणारे अनेक विद्यार्थी राहतात.
तलाठी भरतीतील गैरप्रकारामुळे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मनोबल खचलंय.
इथं आमची भेट ऋषीकेश घोंगे या तरुणाशी झाली.
त्यानं दुसऱ्या टप्प्यात तलाठी परीक्षा दिली आहे. तिसऱ्या टप्प्यात परीक्षेत जो गैरप्रकार समोर आलाय, त्याविषयी विचारल्यावर तो म्हणाला, “प्रामाणिकपणे अभ्यास करणारे आम्ही विद्यार्थी असताना आम्हाला नैराश्य आलंय. तुम्ही आता रीडिंगमध्ये पाहिलं तर रीडिंगमध्ये कुणीच मुलं नाहीयेत. टोटल नैराश्य आलंय. कसा अभ्यास करणार?
"टाईमावर डायरेक्ट पेपर फुटताहेत. सेंटरच्या सेंटर मॅनेज होताहेत. तिथले कर्मचारी मॅनेज होऊ राहिले त्यांना. मग आम्ही कसं करायचं, कुणावर भरवसा ठेवायचा?"
“एक हजारे रुपये फी होती तलाठी परीक्षेसाठी. विद्यार्थ्यांनी फी कमी करण्यासाठी मागणी केली होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की, सीरीयस कँडिडेट पेपरला यावेत, म्हणून आम्ही फी जास्त ठेवतोय. तर मग हे सीरीयस कँडिडेट आहेत का? या प्रकारे तुम्ही परीक्षा कंडक्ट करताय का?" असा सवाल ऋषीकेश करतो.
तलाठी परीक्षेतील गैरप्रकारामुळे रीडिंग रुममधील अनेक खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. अनेक जण गावाकडे निघून गेल्याचं तिथं उपस्थित असलेले विद्यार्थी सांगत होते.
दादाराव गोराडे या दुसऱ्या एका विद्यार्थ्यानं म्हटलं, “माझ्या मित्राचा आज पेपर होता सर. त्याला मी फोन केला होता ऑल द बेस्ट म्हणण्यासाठी. तो म्हणला की, यार मी पेपरला जाऊन काय फायदा आहे? ऑलेरडी 10-10 लाखामध्ये किंवा 3-3 लाखामध्ये पेपर बाहेर येत असतील तर काही अर्थ नाही पेपरला जाऊन. तो खूप निराश होता सर.
“सरळसरळ 3 लाख द्या आणि पूर्ण पेपर बाहेर घ्या, असं वातावरण सध्या औरंगाबादमध्ये सुरू आहे त्यामुळे मुलांमध्ये खूप निराशा आलीय.”
‘90 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क असेल तर पेपर रिचेक करा’
आकाश मलदुडे यानेही तलाठी पदासाठीची परीक्षा दिली आहे.
तो म्हणाला, “90 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क ज्यांना पडेल, त्यांचा पेपर रिचेक व्हावा, त्यांचं सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात यावं. हीच आमची सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे.”
दरम्यान, या सगळ्या प्रकरणी आम्ही प्रशासनाची बाजू जाणून घेतली.
तलाठी परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी म्हटलं, “आम्ही याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा केली आहे. पोलिसांच्या स्तरावर या प्रकरणाची कारवाई सुरू आहे. TCS कंपनीनं पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजची माहिती दिली आहे. तपासानंतर ते आम्हाला कळवतील आणि मग पुढची कारवाई केली जाईल.”
“90 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळालेल्या परीक्षार्थींचे पेपर रिचेक करण्याची मागणी विद्यार्थी करत असतील, तर आम्ही ती सरकारकडे मांडू,” असंही रायतेंनी म्हटलंय.
महाराष्ट्र शासनाची तलाठी परीक्षा कायमच वादात सापडली आहे. कधी पेपरफुटीचे आरोप, तर कधी सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे परीक्षेला झालेला विलंब.
तलाठी भरतीतील या अशा प्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास उडत चाललाय. तो टिकवून ठेवणं हे सरकार समोरचं आव्हान असणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)