You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ब्रिटनच्या अफगाणिस्तानातील लष्करी मोहिमेदरम्यान 64 लहान मुलांचा मृत्यू
ब्रिटनने अफगाणिस्तानमध्ये जितक्या मुलांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं, त्यापेक्षा किमान चौपट अफगाणी मुलांच्या मृत्यूसाठी नुकसान भरपाई दिली आहे. अफगाणिस्तानातील लष्करी मोहिमेमध्ये आपल्या सैन्याकडून 16 अफगाणी मुलांचा मृत्यू झाल्याचं यापूर्वीच ब्रिटीश सरकारने सार्वजनिकरित्या मान्य केलं होतं. मात्र आतापर्यंत त्यांनी 64 मुलांसाठी नुकसानभरपाई दिली आहे. ही सर्व मुलं 2006 आणि 2014 दरम्यान अफगाणिस्तानात राबविल्या गेलेल्या लष्करी मोहिमेमध्ये मारली गेली होती.
चॅरिटी अक्शन ऑन आर्म्ड व्हॉयलन्स (एओएव्ही) कडून माहिती मागितली गेल्यानंतर फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशनच्या (माहितीचा अधिकार) वतीने हे नवीन आकडे सांगण्यात आले आहेत. हवाई हल्ले आणि गोळीबारामुळे सर्वाधिक मृत्यू झाले होते. एओएव्हीच्या मते, ब्रिटीश सैन्य दलांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या सामान्य नागरिकांची अधिकृतरित्या नोंदवलेली संख्याही कमी असू शकते. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयातील दस्ताऐवजांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या अनेकांची नोंद ही केवळ मुलगा किंवा मुलगी एवढीच करण्यात आली आहे. त्यांच्या वयाची नोंद नाहीये आणि कोणत्या परिस्थितीत मृत्यू झाला हेही नमूद केलं नाहीये. चॅरिटीच्या मते मृत मुलांचा आकडाही जवळपास 135 पर्यंत असू शकतो. एओव्हीचं म्हणणं आहे की, या 135 जणांमध्ये काही वयस्कर व्यक्ती असू शकतात. पण अफगाणिस्तानमधली तरूण लोकसंख्या पाहता 18 वर्षांहून कमी वय असलेल्यांचीच मृतांमधली संख्या अधिक असू शकते.
yब्रिटिश सरकारसमोर 881 मृत्यू झाल्याचा दावा केला गेला, पण भरपाई मात्र केवळ एक चतुर्थांश लोकांनाच मिळाला. 2009मध्ये हेलमंदमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात आठ अफगाण कुटुंबातील लोकांचा मृत्यू झाला होता. त्यांपैकीच एक जणांना नुकसानभरपाई मिळाली आहे. एका व्यक्तीने आपला पुतण्या, त्याच्या दोन पत्नी आणि पाच मुलांच्या मृत्यूसाठी भरपाई मागितली होती. या व्यक्तीला 144 दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्याकाळाच्या हिशोबाने 8 हजार 260 डॉलर्सची नुकसानभरपाई देण्यात आली. आज जर भारतीय दरात पाहिलं तर ही रक्कम जवळपास 6 लाख 70 हज़ार इतकी होते.
ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने 2006 ते 2014 च्या दरम्यान 289 अफगाणी नागरिकांच्या मृत्यूची भरपाई म्हणून एकूण 6 लाख़ 88 हज़ार पौंड दिले होते. एओएव्हीनुसार नुकसान भरपाई मागणाऱ्यांना आधी फोटो, जन्माचा दाखला आणि संबंधित प्रमाणपत्रं जमा करावी लागतात. त्यांपैकी काही जणांना तर ब्रिटीश सैनिकांसमोर जाऊन आपले तालिबानसोबत कोणतेही लागेबांधे नसल्याचं सिद्ध करावं लागलं होतं. माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानात मृत्यूमुखी पडलेल्यांना एकसारखी नुकसान भरपाई मिळत नाही. काही प्रमाणात तर मालमत्तेचं झालेलं नुकसान, जनावरांचा मृत्यू यासाठी अधिक मोबदला मिळाला होता आणि कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूसाठी कमी.
एका निवेदनात ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं की, युद्धादरम्यान कोणत्याही गैरलष्करी व्यक्तीचा मृत्यू हा त्रासदायकच असतो. विशेषतः जेव्हा यामध्ये मुलं आणि एखाद्या कुटुंबातील व्यक्ती बळी पडतात. ब्रिटनचं सैन्य सामान्य नागरिकांना कमीत कमी नुकसान होईल यासाठी प्रयत्न करतं, पण दुर्दैवानं ते पूर्णपणे टाळता येऊ शकत नाही. मात्र एओएव्हीचे इयन ओवर्टन मृतांच्या आकडेवारीमध्ये असलेल्या पारदर्शकतेच्या अभावावर टीका करतात. संरक्षण मंत्रालयाकडून माहिती मिळवण्यासाठी लोकांना अनेक वर्षं लागली होती. अमेरिका तसंच ब्रिटनच्या लष्करी मोहिमेत मारल्या गेलेल्या सामान्य लोकांच्या मृत्यूच्या चौकशीवर मानवाधिकार संघटना आणि संस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
ब्रिटेनच्या संरक्षण मंत्रालयाने सीरिया आणि इराकमधील इस्लामिक स्टेटविरुद्धच्या लष्करी अभियानादरम्यान केवळ एकाच सामान्य व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं स्वीकारलं होतं. तिकडे अमेरिकन परराष्ट्र मंत्री लॉइड ऑस्टिन यांनी काही दिवसांपूर्वीच सामान्य नागरिकांच्या मृत्यूची चौकशी करण्याच्या पद्धतींवर पुनर्विचार करण्याची घोषणा केली होती. गेल्या वर्षी काबुलमधून बाहेर पडताना अमेरिकन सेनेच्या एका एअर स्ट्राइकनंतर त्यांनी हा आदेश दिला होता. सुरुवातीला अमेरिकेनं दावा केला होता की, त्यांनी कट्टरपंथीयांवर हा हल्ला केला होता. मात्र तिथे असलेल्या पत्रकारांनी सांगितलं होतं की, मरणाऱ्यांमध्ये सामान्य नागरिक असल्याचे पुरावे होते. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं की अमेरिकेत होत असलेल्या पुनर्विचार प्रक्रियेवर त्यांची नजर आहे, पण ब्रिटन आपल्या पद्धतीत काही बदल करणार का याबद्दल काहीच भाष्य केलं नाहीये.