You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तालिबान : काबूल ते दिल्ली, त्या 56 तासांची थरारक कहाणी
"आमच्यापैकी अनेकांना जवळपास 56 तासांसाठी काहीही खायला किंवा झोपायलाही मिळालं नाही. आमचा उद्देश भारतीय अधिकारी, नागरिक आणि सुरक्षारक्षकांना अफगाणिस्तानातून सुरक्षितपणे परत आणणं हा होता. ही आव्हानात्मक मोहीम होती," आयटीबीपीचे कमांडो राजशेखर यांनी काबूलमध्ये 15 आणि 16 ऑगस्टला राबवलेल्या बचाव मोहीमेबाबत बीबीसीला ही माहिती दिली.
राजशेखर हे आयटीबीपी (इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस) मध्ये 13 वर्षांपासून कार्यरत आहेत. आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यात मंडासा तालुक्यातलं चिन्नालंबुगम हे राजशेखर यांचं मूळ गाव आहे. अफगाणिस्तानात भारतीय दुतावासात दोन वर्षे ते तैनात होते.
ज्यावेळी काबूलसह संपूर्ण अफगाणिस्तान तालिबानच्या हाती गेलं, त्यावेळी राजशेखर भारतीय दुतावासाच्या कर्मचाऱ्यांना परत भारतात आणण्यासाठी राबवण्यात आलेल्या मोहिमेत सहभागी झाले होते.
ही संपूर्ण मोहीम नेमकी कशी राबवण्यात आली, याबाबत त्यांनी बीबीसीला फोनद्वारे माहिती दिली.
भिती
काबूलमध्ये परिस्थिती अत्यंत भयावह बनली होती. तरीही त्यांनी भारतीय दुतावासातील कर्मचाऱ्यांना परत आणण्याची मोहीम सुरू केली, असं राजशेखर यांनी सांगितलं.
"त्याठिकाणी सगळीकडं बंदुका आहेत. ते (तालिबान) सगळीकडं नियंत्रण मिळवत आहेत. अफगाणी आणि इतर देशांचे नागरिकही मृत्यूच्या सावटाखाली आहेत. भारतीय दुतावास काबूलमध्ये आहे. याठिकाणी काम करत असलेल्या अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांचा एकूण आकडा 220 च्या वर आहे," असं ते म्हणाले.
धोक्याची घंटा...
याठिकाणी निर्माण झालेली परिस्थिती पाहता भारत सरकारनं याठिकाणच्या दुतावासातील सर्व कर्मचाऱ्यांना परत आणण्याचा निर्णय घेतला.
"तालिबान कोणत्याही क्षणी काबूलमध्ये प्रवेश करण्याची शक्यता होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर भारतीय दुतावासातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून त्वरित मायदेशी परत येण्याच्या सूचना मिळाल्या. त्यानंतर दुतावासातील सर्व कर्मचाऱ्यांना दोन गटांत विभाजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या गटात 20 अधिकारी आणि त्यांच्या संरक्षणासाठी 25 सुरक्षारक्षक यांचा समावेश होता. पण तालिबान एवढ्या कमी वेळात इथं ताबा मिळवेल याची आम्हाला अपेक्षा नव्हती," असं ते म्हणाले.
15 ऑगस्टची रात्र
"काबूल कोणत्याही क्षणी तालिबानच्या ताब्यात जाण्याची शक्यता असल्यामुळं आम्ही 15 ऑगस्टच्या रात्री काबूल सोडण्याचा विचार करत होतो. आम्ही सगळ्या बुलेटप्रूफ गाड्या तयार ठेवल्या होत्या. या गाड्यांमध्ये साधारणपणे फक्त तीन लोक बसतात. पण आम्ही त्यात पाच ते सहा जणांना बसवलं. विमान तुर्कस्तानच्या एअर बेसवरून (हवाई तळ) रात्री 8.30 वाजता उड्डाण घेणार होतं. भारतीय दुतावासापासून त्याचं अंतर केवळ 6 किलोमीटर होतं. वाटेत दिसणारा प्रत्येकजण हा तालिबानींसारखा दिसत होता. सहा किलोमीटर अंतर कापण्यासाठी आम्हाला तासभर लागला. त्यानंतर हवाई तळावर 45 जण पोहोचले," असं राजशेखर म्हणाले.
"45 जण तुर्कस्तानच्या हवाई तळावर पोहोचले आणि त्याठिकाणी त्यांनी 15 ऑगस्टची संपूर्ण रात्र घालवली. त्यानंतर 16 तारखेला पहाटे 3 वाजता भारतीय विमान दाखल झालं. पहिल्या ग्रुपला एअरबेसला सोडल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा काबूलकडे निघालो. पण, आता बहुतांश काबूलवर तालिबानचा ताबा झाला होता. आम्ही तुर्कस्तानच्या हवाई तळावर असताना तालिबाननं 15 ऑगस्टच्या रात्री काबूलवर आक्रमण केलं. आम्ही दुतावासात पोहोचलो, त्यावेळी तिथं तालिबाननं वेढा घातलेला होता," असं राजशेखर म्हणाले.
तालिबान्यांनी अडवलं
"दुसऱ्या गटातील सर्वांना आम्हाला हवाई तळावर न्यायचं होतं. आम्ही पहिल्या गटाला हवाई तळावर नेल्यानंतर तालिबाननं दुतावासाला वेढा घातला होता. दुसऱ्या गटाला मात्र जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. कर्फ्यू लावलेला असून आम्ही जाऊ शकत नाही, असं तालिबानकडून सांगण्यात आलं. त्यामुळं आम्ही दुसऱ्या गटाला वेगळ्या मार्गाने घेऊन हवाई तळाकडे निघालो. पण रस्त्यातच तालिबाननं आम्हाला अडवलं. त्यामुळं आम्ही पुन्हा दुतावासात आलो," असं राजशेखर म्हणाले.
तणाव वाढला..
राजशेखर म्हणाले, तालिबाननं हवाई तळाकडं जाण्यापासून अडवणूक केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये ते भारतात सुरक्षितपणे पोहोचू शकतील की नाही, याबाबत भीतीचं वातावरण निर्माण झालं. दुतावासानं हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं सर्वांना बाहेर काढायचं होतं, असं सांगितलं. पण हेलिपॅड उपलब्ध नसल्यामुळं ते शक्य होऊ शकलं नाही.
"कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढत चालली होती. आम्ही आमच्या कुटुंबीयांशीही बोललो. तेदेखील प्रचंड चिंतेमध्ये होते. नेमकं काय चाललं आहे, हेही कळत नव्हतं. वेळ जात होता तशी परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली होती. 16 ऑगस्टच्या सकाळी भारतीय दुतावासाच्या अधिकाऱ्यांनी तालिबानशी चर्चा केली आणि आम्हाला भारतात जाण्याची परवानगी द्यायला हवी, असं सांगितलं. पण त्यांना ते मान्य झालं नाही. अखेर चर्चांच्या अनेक फेऱ्यांनंतर तालिबाननं आम्हाला जाण्याची परवानगी दिली," असं राजशेखर म्हणाले.
अखेर घरी पोहोचलो
दुसऱ्या गटाला अडवल्यानंतर आमच्यामध्ये 16 ऑगस्टपर्यंत तडजोडीसाठी चर्चा सुरू होती.
"अखेर 17 ऑगस्टच्या पहाटे 3 वाजता आम्ही तुर्कस्तानच्या हवाई तळावर पोहोचलो. तालिबानी आम्हाला पोहोचवण्यासाठी आले होते. त्या दिवशी सायंकाळी आम्ही दिल्लीला पोहोचलो. इथं पोहोचेपर्यंत आमचा अस्वस्थपणा कायम होता. जेव्हा आम्ही दिल्लीला पोहोचलो, त्यावेळी आम्ही मोकळा श्वास घेतला," असं राजशेखर म्हणाले.
कोरोना संकटकाळातील नियमानुसार सध्या हे सर्व लोक दिल्लीत विलगीकरणात आहेत.
अफगाणिस्तानातील स्थिती
तालिबानींना राजधानी काबूलमध्ये प्रवेश करण्यासाठी कोणत्याही विरोधाचा सामनाही करावा लागला नाही. त्यांनी अमेरिकेला लोकांचं स्थलांतर थांबवण्यास सांगितलं. त्यानंतर अफगाणिस्तान सोडण्याची इच्छा असलेले हजारो लोक हे काबूलच्या विमानतळावर सोमवारपासून गर्दी करत आहेत.
भारतानं अफगाणिस्तानात हजारो कोटींच्या डॉलरच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. काबूलच्या दुतावासाबरोबरच एकेकाळी भारताचे चार वाणिज्य दुतावास होते.
याठिकाणचं बंद झालेलं अखेरचं वाणिज्य दुतावास मझार-ए-शरीफमध्ये होतं. आठवडाभरापूर्वी ते बंद करण्यात आलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तालिबाननं या शहरावर ताबा मिळवला होता. अफगाणी सैन्यानं काही वेळातच तिथं पराभव मान्य केला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)