पुतीन यांनी अमेरिकन पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीची जगभरात इतकी चर्चा का होतेय?

फोटो स्रोत, Reuters
- Author, बीबीसी मुंडो
- Role, .
फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पहिल्यांदाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी एका पाश्चात्य पत्रकाराला मुलाखत दिलीय. प्रसिद्ध अमेरिकन पत्रकार टकर कार्लसन यांना दिलेली पुतीन यांची मुलाखत गेल्या गुरुवारी (8 फेब्रुवारी) प्रसारित झाली.
कार्लसन यांच्या कार्यक्रमाला एप्रिल 2023 पर्यंत फॉक्स न्यूजवर सर्वाधिक रेटिंग होतं. पण या वृत्तवाहिनीने कारण नसताना त्यांना बडतर्फ केलं. आता टकर कार्लसन यांनी स्वतंत्र कंपनी स्थापन केली असून याचं प्रसारण एक्सवर केलं जातं.
इथे ते अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्यासारख्या उजव्या विचारसरणीच्या राजकारण्यांच्या मैत्रीपूर्ण मुलाखती प्रसारित करत असतात.
ताज्या मुलाखतीत त्यांनी पुतीन यांच्या युक्रेनसबंधी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. सोबतच रशियाने कीवविरुद्ध जी विशेष "लष्करी मोहीम" हाती घेतली होती, त्याचंही समर्थन केलं. नाटोच्या विस्तारामुळे रशियाला धोका निर्माण झाल्याचा युक्तिवादही याठिकाणी करण्यात आला.
मात्र, पोलंड किंवा कोणत्याही नाटो सदस्य देशांवर हल्ला करण्यात आपल्याला स्वारस्य नसल्याचं पुतीन यांनी यावेळी सांगितलं.
या मुलाखतीपूर्वी वाद निर्माण झाला होता. काही विश्लेषकांनी म्हटलं होतं की, अमेरिकेच्या येत्या अध्यक्षीय निवडणुकीत पुतिन यांचा अमेरिकन मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या रिपब्लिकन सिनेटर्समुळे युक्रेनला लष्करी मदत पॅकेज पास करण्यात अडचणी येत असल्याचं विश्लेषकांनी नमूद केलंय.
ट्रम्प यांनी वॉशिंग्टनने पाठवलेल्या अब्जावधी डॉलर्सच्या मदतीला विरोध केला आहे आणि तणाव कमी करण्याचा सल्ला दिला आहे.
यापूर्वी कार्लसन यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता, ज्यात असा आरोप करण्यात आलाय की 2022 पासून कोणत्याही पाश्चात्य पत्रकाराने पुतीन यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांची मुलाखत घेतलेली नाही.

फोटो स्रोत, Reuters
परंतु, त्यांच्या या दाव्यावर टीका होत आहे कारण बीबीसी रशियाचे संपादक स्टीव्ह रोसेनबर्ग यांच्यासह अनेक संस्थांशी संबंधित पत्रकारांनी त्यांना मुलाखतीसाठी वेळ मागितली होती, मात्र त्यांनी वेळ दिली नाही.
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटलंय की, कार्लसन यांनी मुलाखत घेण्याआधी अनेकांनी प्रयत्न केला होता. मात्र कोणालाही परवानगी देण्यात आली नाही.
आता, पुतीन यांच्या मुलाखतीतील सहा महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया.
1. 'पोलंड, लिथुआनिया किंवा इतर कोणत्याही नाटो देशावर हल्ला करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही'
यावेळी पुतीन म्हणाले की, 'लिथुआनिया, पोलंड किंवा इतर कोणत्याही नाटो देशावर हल्ला करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.'
युक्रेनवरील हल्ल्यामुळे बाल्टिक, पोलंड आणि इतर युरोपीय देशांवरही हल्ला होण्याची भीती निर्माण झाली आहे.
या भीतीमुळे रशिया आणि पश्चिमेकडील लढतीत तटस्थ असलेल्या फिनलंड आणि स्वीडनने नाटो सदस्यत्वासाठी अर्ज केलाय.
मुलाखतीत पुतीन यांनी पोलंडवर हल्ला होण्याची शक्यता नाकारली. ते म्हणाले, "जोपर्यंत पोलंड रशियावर हल्ला करत नाही तोपर्यंत रशिया हल्ला करणार नाही."

फोटो स्रोत, Reuters
मात्र, युक्रेनवर हल्ला होण्यापूर्वी अमेरिका आणि त्यांच्या गुप्तचर संस्थांनी रशिया हल्ला करेल, असे इशारे दिले होते. मात्र मॉस्कोने त्यावेळी या शक्यता नाकारल्या होत्या.
रशियाच्या अध्यक्षांनी नाटोमधील कोणत्याही देशावर हल्ला करण्याची शक्यता फेटाळून लावली असली तरी युक्रेनमधील रशियाने ताब्यात घेतलेला प्रदेश आपल्याकडेच राहील हे नाटो आघाडीला मान्य करावं लागेल असंही ते म्हणाले.
2. 'अमेरिकेला युद्ध संपवायचं असेल तर शस्त्र देणं बंद करावं लागेल.'
कार्लसन यांनी रशियाच्या अध्यक्षांना विचारलं होतं की, युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी थेट बोलण्याचा विचार केला होता का?
यावर पुतीन म्हणाले की, रशियन आणि अमेरिकन एजन्सींमध्ये बोलणी सुरू आहेत. पण जोपर्यंत 'अमेरिका युक्रेनला शस्त्र पाठवणं थांबवत नाही तोपर्यंत बोलण्यासारखं काही नाही.'
त्यांनी युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवणं ही 'राजकीय चूक' असल्याचं म्हटलंय.
ते म्हणाले, "खरं सांगायचं तर, आम्ही अमेरिकन नेतृत्वाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की युद्ध थांबवायचं असेल तर शस्त्रास्त्रांचा पुरवठा थांबवावा लागेल. मग युद्ध अगदी काही आठवड्यांत संपेल."
पुतीन यांची ही प्रतिक्रिया तेव्हा आली जेव्हा अमेरिकेच्या सिनेटने युक्रेनला 61 अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली. परंतु रिपब्लिकन प्रतिनिधी त्यास विरोध करत आहे.
यावर युक्रेन समर्थक म्हणतात, "जर रशियाने हल्ले करणं थांबवलं तर युद्ध संपेल. पण जर युक्रेनने स्वतःचं रक्षण करणं थांबवलं तर ते स्वतःच संपून जातील."
3. 'ते रशियाचा धोरणात्मक पराभव करू शकत नाहीत'
पुतीन यांनी शस्त्रास्त्र विकसित करण्याचा उल्लेख केलाय, ज्याचा त्यांनी रशियामध्ये प्रचार केलाय.
अमेरिकेने रशियासमोर आण्विक नि:शस्त्रीकरणाचा प्रस्ताव ठेवला होता, रशियाने तो धुडकावून लावला.
पुतीन म्हणाले की, रशियन लष्करी उद्योग इतर देशांच्या तुलनेत अत्याधुनिक हायपरसोनिक शस्त्रांच्या निर्मितीवर भर देत आहेत.
त्यामुळे पाश्चात्य राज्यकर्त्यांना चांगलंच समजलंय की, 'ते रशियाचा धोरणात्मक पराभव करू शकत नाहीत'
4. 'स्टॅलिनच्या इच्छेमुळे युक्रेनची निर्मिती झाली'
या मुलाखतीत पुतिन यांनी दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या सोव्हिएत संघाच्या इतिहासाविषयी माहिती दिली.
ते म्हणाले की, युक्रेन हा सोव्हिएत नेते लेनिन यांनी कल्पना केलेल्या सोव्हिएत संघाचा भाग होता.
ते म्हणाले की, युद्धाच्या शेवटी स्टॅलिनच्या नेतृत्वाखाली, युक्रेनला पोलंड आणि हंगेरीचे प्रदेश देण्यात आले. या भागात आजही हंगेरियन आणि पोलिश भाषिक लोक राहतात.
पुतीन म्हणाले, "स्टॅलिनच्या इच्छेमुळे युक्रेनची निर्मिती झालीय. ते एक कृत्रिम राष्ट्र आहे."

फोटो स्रोत, Getty Images
युनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टर मधील इतिहासकार मॅथ्यू लेनोईर म्हणतात की, युक्रेनला 1918 पूर्वीचा इतिहास नाही हे जरी खरं असलं तरी आता ते एक राष्ट्र बनलंय आणि 19 व्या शतकाच्या मध्यात त्याच्या सांस्कृतिक आणि भाषिक एकात्मतेची प्रक्रिया सुरू झाली.
5. 'रशियन तुरुंगात असलेल्या अमेरिकन पत्रकाराची सुटका शक्य'
हेरगिरीच्या आरोपाखाली रशियाच्या तुरुंगात असलेले 'द वॉल स्ट्रीट जर्नल'चे पत्रकार इव्हान गेर्शकोविच (32) यांच्या सुटकेबाबत पुतीन म्हणाले की, 'आमच्या भागीदारांनी सहकार्य केलं असतं तर सुटका शक्य होती.'
ते म्हणाले, "याबाबत चर्चा सुरू आहे. मला वाटतं त्याप्रमाणे काहीतरी तडजोड नक्कीच होईल."
गेर्शकोविचला गेल्या वर्षी 29 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. ते दोषी आढळल्यास त्यांना 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

फोटो स्रोत, Getty Images
कार्लसनने पुतीन यांना विचारलं की, या पत्रकाराला तुम्ही ताबडतोब सोडणार का? यावर पुतीन म्हणाले की, "आम्ही त्याला अमेरिकेला घेऊन जाऊ."
रशियन गुप्तहेर वदिम क्रॅसिकोव्हचा संदर्भ देताना पुतीन यांनी म्हटलं की, कैद्यांची अदलाबदली केल्यास हे शक्य आहे. तो सध्या जर्मनीच्या तुरुंगात आहे. 2019 मध्ये बर्लिनमध्ये जॉर्जियन लष्करी अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.
6. 'अमेरिकेने नाटोचा विस्तार न करण्याचे आश्वासन दिले होते'
पुतीन यांच्या मते, अनेक नेत्यांनी असं वचन दिलं होतं की ते नाटोचा विस्तार होऊ देणार नाहीत. सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर अशा संघटनेची गरज नाही.
रशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी 1993 मध्ये म्हटलं होतं की, नाटोचा पूर्वेकडील विस्तार बेकायदेशीर आहे.
माजी रशियन परराष्ट्र मंत्री येवगेनी प्रिमाकोव्ह यांनी देखील असाच युक्तिवाद केला होता. ते म्हणाले होते की, वॉर्सा करार मोडणारा कोणताही देश नाटोमध्ये सहभागी होणार नाही असं त्यांना आश्वासन मिळालं होतं.
मात्र लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील आंतरराष्ट्रीय इतिहासाच्या प्राध्यापक क्रिस्टीना स्पोहर यांच्या म्हणण्यानुसार, बर्लिनची भिंत पडण्याच्या वेळी मॉस्कोने पूर्व जर्मनीतून आपले 380,000 सैन्य मागे घेण्याचे कबूल केले होते.
त्यावेळी जॉर्ज एच डब्ल्यू बुश यांच्या मंत्रिमंडळातील परराष्ट्र सचिव जेम्स बेकर यांनी येवगेनी प्रिमाकोव्ह यांना सांगितलं होतं की, नाटोचं सैन्य एक इंचही पूर्वेकडे सरकणार नाही. पण हे पूर्व आणि पश्चिम जर्मनीच्या संदर्भात होतं.

फोटो स्रोत, Reuters
असे प्रश्न जे पुतिन यांना विचारलेच नाहीत
टकर कार्लसन यांनी पुतीन यांना या मुलाखतीत फारच कमी प्रश्न विचारले. पण ही मुलाखत ज्या पद्धतीने पार पडली, ते पाहता पुतीन यांना खूप आनंद झाला असावा.
पुतीन यांनी युक्रेनचा इतिहास, सोव्हिएत संघाचे विघटन आणि नाटोच्या विस्ताराबाबतच्या त्यांच्या तक्रारींबद्दल बरंच काही सांगितलं.
युक्रेनवरील हल्ल्याबाबत त्यांनी काही युक्तिवादही मांडले. परंतु त्यांच्या मुलाखतीत ते प्रश्न विचारलेच नाहीत जे त्यांना विचारायला हवे होते.
टकर कार्लसन यांनी पुतीन यांना युक्रेनमधील रशियन सैन्याने केलेले युद्धगुन्हे, युक्रेनियन मुलांना सक्तीने रशियाला पाठवणे, राजकीय विरोधकांची हत्या किंवा तुरुंगात डांबलेले विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी याबद्दल कोणतेही प्रश्न विचारले नाहीत.
या मुलाखतीत पुतीन यांनी अप्रत्यक्षपणे एक सूचना केली ती म्हणजे, रशियन तुरुंगात कैद असलेल्या अमेरिकन पत्रकाराची रशियन गुप्तचर संस्थेच्या वदिम क्रॅसिकोव्हसोबत देवाण-घेवाण करून सुटका केली जाऊ शकते.











