पोप फ्रान्सिस : युरोपबाहेरचे पहिले धर्मगुरू, साधेपणा आणि उदारमतवादी होती मुख्य ओळख

फोटो स्रोत, EPA
पोप फ्रान्सिस यांचं आज (21 एप्रिल) निधन झालं. कासा सँटा मार्टा या व्हॅटिकनमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 88 वर्षांचे होते.
कार्डिनल होर्गे मारिओ बेर्गालियो यांची 2013 मध्ये बेनेडिक्ट सोळावे यांचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाली होती. त्यांना पोप फ्रान्सिस म्हटलं जातं. पोपपदी येणारे युरोपबाहेरचे ते पहिले व्यक्ती होते.
पोप फ्रान्सिस हे रोमन कॅथलिक चर्चचं नेतृत्व करणारे पहिले लॅटिन अमेरिकन आणि पहिले जेसुइट होते.
जेव्हा त्यांची 266 व्या पोपपदी निवड झाली. त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पोप म्हणून निवड होताना फ्रान्सिस हे 76 वर्षांचे होते. अभ्यासकांना एखाद्या तरुण व्यक्तीची निवड होईल अशी अपेक्षा होती.
त्यांच्या निवडीच्या वेळी, त्यांना चर्चच्या रुढीवादी आणि सुधारक दोन्ही गटांकडून मोठा पाठिंबा मिळाला होता. कारण लैंगिक विषयांवर त्यांची मतं पारंपारिक होती, आणि सामाजिक विषयांबाबत ते उदारमतवादी मानले जात होते.
त्यांच्या समर्थकांना त्यांची साधी वागणूक आणि क्यूरिया (व्हॅटिकन प्रशासन) मध्ये सुधारणा करण्याचा त्यांचा उत्साही निर्धार आवडला होता.
व्हॅटिकन बँकतील भ्रष्टाचार उखडून टाकण्याची त्यांची भूमिका, चर्चमधील बाल लैंगिक शोषणाच्या प्रकरणांशी संबंधित विषयांवर उपाययोजना करण्याचे त्यांचे प्रयत्नही पसंत पडले होते.
पोपपदाच्या चार वर्षांनंतर झालेल्या सर्वेक्षणात पोप फ्रान्सिस यांनी कॅथलिक आणि इतर धर्मीयांमध्येही चांगली लोकप्रियता मिळवल्याचे दिसून येते. त्यांना ट्विटरवर तब्बल 15 मिलियन्सपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
परंतु प्रत्येक मुद्द्यांवर थेट भाष्य करण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे व्हॅटिकनमध्ये आणि बाहेरही त्यांच्या विरोधकांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली.
पोप फ्रान्सिस यांची भूमिका
बीबीसी रोमचे प्रतिनिधी डेव्हिड विली यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी त्यांची पोपपदी निवड झाली होती. त्या सकाळी ते साध्या वाहनांच्या ताफ्यात रोमन बॅसिलिकामध्ये प्रार्थना करण्यासाठी व्हॅटिकन सिटीमधून बाहेर पडले होते.
व्हॅटिकनकडे परत जात असताना ते इटलीच्या राजधानीच्या मध्यभागी असलेल्या एका हॉटेलमध्ये थांबले. नंतर त्यांनी आपलं बिलही आग्रहानं हॉटेल मालकाला दिलं. त्याचवेळी त्यांनी आपला पोपपदाचा कार्यकाळ कसा असेल याची चुणूक दाखवली.
आतापर्यंतचे सर्व पोप हे व्हॅटिकन सिटीतील भलंमोठं पेंट हाऊस अपार्टमेंट वापरत असत. परंतु, पोप फ्रान्सिस यांनी ते पेंट हाऊस नाकारलं आणि स्वतःसाठी गेस्ट हाऊसमधील छोटंसं घर निवडलं.
त्याचबरोबर खास उन्हाळ्यात वापरात येणारं कॅसल गँडोल्फोकडेही त्यांनी पाठ फिरवली.
त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेत परवलीचा शब्द असलेल्या मुक्त-बाजार या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चर्चने समलिंगी लोकांबद्दल मत बनवण्यापेक्षा त्यांची माफी मागितली पाहिजे असं वक्तव्य केलं.
त्याचबरोबर त्यांनी युरोपीय स्थलांतरितांसाठीच्या बंदी केंद्रांची तुलना कुख्यात अशा 'कॉन्सन्ट्रेशन कॅम्प'बरोबर केली.
पण निरीक्षकांच्या मते, पोप हे पूर्णपणे उदारमतवादी आहेत, असं म्हणणं चुकीचं ठरेल. "फ्रान्सिस हे जुन्या विचारांचे देखील आहेत," असं रोमन कॅथलिक संबंधित न्यूज वेबसाइट क्रक्सचे संपादक जॉन ऍलन ज्युनियर यांनी 2016 मध्ये लिहिलं होतं.
ते पुढं म्हणाले की, "त्यांनी चर्चचं अधिकृत धार्मिक पुस्तक असलेल्या कॅटेकिझममधील साधा स्वल्पविरामही बदलला नाही.
त्यांनी महिला पाद्रींना नकार दिला, समलिंगी विवाहाला नाही म्हटलं, गर्भपाताला सर्वात भयानक गुन्हा म्हणाले, गर्भनिरोधकावरील बंदीचं समर्थन केलं. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वादग्रस्त मुद्द्यांवर बोलताना त्यांनी स्वतःला 'चर्चचा निष्ठावान पुत्र' म्हणून संबोधित केलं."
व्हॅटिकन प्रशासनात सुधारणा आणण्यासाठी त्यांनी उचललेली कठोर पावलं आणि पुनर्विवाहानंतरच्या मुद्द्यांवर चर्चची भूमिका नरम करण्याची त्यांची तयारी यामुळं त्यांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांमध्ये वाढ झाली.
त्यांच्या मतांशी सहमत नसलेल्या कार्डिनल्सना बदलण्यामध्येही त्यांनी कधी संकोच बाळगला नाही.
नम्र जीवनशैली
होर्गे मारिओ बेर्गालियो यांचा जन्म 17 डिसेंबर 1936 रोजी ब्यूनस आयर्समध्ये इटालियन वंशाच्या कुटुंबात झाला. त्यांच्या अधिकृत व्हॅटिकन चरित्रानुसार, त्यांना 1969 मध्ये जेसुइट म्हणून नियुक्त केलं गेलं. नंतर त्यांनी अर्जेंटिना आणि जर्मनीमध्ये शिक्षण घेतलं.
तरुणपणी संसर्गामुळं त्यांचं एक फुफ्फुस काढावं लागलं होतं.

फोटो स्रोत, Bergoglio family

जेसुइट्स कोण आहेत?
- सोसाइटी ऑफ जीझस ही कॅथलिक चर्चची पुरुषांची एक संस्था आहे. याचे जगभरात 19000 सदस्य आहेत.
- 16 व्या शतकातील युरोपमध्ये मिशनरी संघ म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आली होती.
- ही मिशनरी संस्था नंतर इतकी शक्तिशाली झाली की 18व्या शतकाच्या अखेरीस दबावानंतर तिच्यावर बंदी घालण्यात आली. पण नंतर तिचे काम पुन्हा सुरु झाले.
- तज्ज्ञ संवादक म्हणून जेसुइट्सला ओळखलं जातं.


फोटो स्रोत, Getty Images
ते 1992 मध्ये बिशप झाले आणि 1998 मध्ये ब्यूनस आयर्सचे आर्चबिशप बनले. 2005 च्या कॉन्क्लेव्हमध्ये त्यांच्याकडे पोपपदाचे दावेदार म्हणून पाहिलं गेलं होतं.
कार्डिनल बेर्गालियो या नात्यानं, त्यांच्या उपदेशांचा अर्जेंटिनामध्ये नेहमीच प्रभाव पडला. त्यांनी अनेकदा समाजातील सर्व समावेशकतेवर भर दिला. या भूमिकेकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारांवर त्यांनी अप्रत्यक्षपणे टीकाही केली.
पोप हे त्यांच्या शांत आणि साध्या जीवनशैलीमुळं सावर्जनिक जीवनात सर्वांना आपलेसे वाटतात, असं फ्रान्सिस्का ॲम्ब्रोगेटी यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितलं. फ्रान्सिस्का या पोप फ्रान्सिस यांच्या आत्मचरित्राच्या सहलेखिका आहेत.
चर्चच्या स्थापनेसाठी एका जेसुइटला प्रमुखपदी नेमणे ही एक नवीन गोष्ट होती.

पोप फ्रान्सिस यांच्याबद्दल थोडक्यात
- 17 डिसेंबर 1936 रोजी ब्यूनस आयर्समध्ये होर्गे मारिओ बेर्गालियो यांचा जन्म.1969 मध्ये जेसुइट म्हणून नियुक्ती.
- अर्जेंटिना, चिली आणि जर्मनीमध्ये शिक्षण घेतलं.
- 1998 मध्ये ब्यूनस आयर्सचे कार्डिनल झाले.

अर्जेंटिना, समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा पहिला लॅटिन अमेरिकन देश ठरला.
त्यावेळच्या अध्यक्षा क्रिस्टीना फर्नांडेझ डी किर्चनेर यांनी मोफत गर्भनिरोधक आणि कृत्रिम गर्भधारणेस प्रोत्साहन दिले.
त्यावेळी पोप फ्रान्सिस यांच्या विचारांची अर्जेंटिनात कसोटी लागली होती.
अर्जेंटिनातील लष्करी राजवट
1976-1983 च्या अर्जेंटिनाच्या लष्करी राजवटीत, जेव्हा त्यांनी देशाच्या जेसुइट्सचे नेतृत्व केलं तेव्हा त्यांची भूमिका हा वादाचा विषय ठरली होती.
बीबीसीच्या व्लादिमीर हर्नांडेझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेर्गालियो यांच्यावर 1976 मध्ये दोन अन्य पाद्रींना लष्कराकडे सोपवल्याचा आरोप आहे. कारण त्या पाद्रींनी त्यांनी ब्यूनस आयर्सच्या झोपडपट्ट्यांमध्ये केलेल्या सामाजिक कार्याला जाहीररित्या पाठिंबा देण्यास नकार दिला होता.
"डर्टी वॉर" काळापासून त्यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप करण्यात येतो. 1977 मध्ये पाच महिन्यांच्या गर्भवती असलेल्या एका महिलेचं अपहरण करून तिची हत्या करण्यात आली होती.
तिच्या लहान बाळाला शोधून काढण्यासाठी त्यांना मदतीची विनंती करण्यात आली. परंतु, त्यांनी यासाठी पाठपुरावा केला नाही, असा आरोप त्यांच्यावर केला जातो.
पोप फ्रान्सिस यांनी जंटा सरकारच्या (लष्करी अधिपत्याखालील राजवट) काळात चुकीच्या गोष्टी केल्याचे आरोप व्हॅटिकनने नाकारले आहेत.

फोटो स्रोत, Reuters
2011 मध्ये त्यांनी लष्करी राजवटीत मारले गेलेल्या अर्जेंटिनाच्या पाद्रींचा धार्मिक गौरव करण्याच्या दिशेनं पावलं उचलली होती. त्याचबरोबर त्यांनी 1976 मध्ये ब्यूनस आयर्समधील सेंट पॅट्रिक चर्चमध्ये मारले गेलेल्या पाच कॅथलिक धर्मगुरूंची संतपदासाठी शिफारस केली होती.
आणि पोप यांच्या विनंतीनुसार, व्हॅटिकनने अर्जेंटिनाच्या हुकूमशाहीच्या फायली पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी उघडल्या आहेत.
नोबेल शांतता पारितोषिक विजेते मानवाधिकार कार्यकर्ते अडोल्फो पेरेझ एस्किवेल, ज्यांना त्या राजवटीनं तुरुंगात टाकलं आणि छळलं त्यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं की, "काही बिशप्स सैन्याशी मिलीभगत करत होते, परंतु बेर्गालियो हे त्यापैकी नाहीत."
आता पोप फ्रान्सिस त्यांच्या नव्वदीच्या घरात आहेत, आणि त्यांच्या पूर्वसूरींच्या अनुभवानुसार पोप्सना मृत्यूपर्यंत त्यांच्या भूमिकेत राहण्याची आवश्यकता नाही. परंतु, प्रश्न असा निर्माण होतो की, ते स्वतः राजीनामा देण्याचा निर्णय घेतील का?
"जर माझी शक्ती कमी झाली, तर मीही तेच करेन!", असं त्यांनी म्हटलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











