एक जोडीदार की अनेक? अशी आहे स्त्री-पुरुषांच्या नातेसंबंधाची ऐतिहासिक कहाणी

    • Author, क्राऊड सायन्स कार्यक्रम
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

मानवी नातेसंबंधांची रूपरेषा काळानुसार बदलत गेली आहे. एकाच जोडीदारावर प्रेम करावं, की अनेकांशी नातं ठेवावं, हा प्रश्न अनेकांच्या मनात पुन्हा पुन्हा येत असतो.

मनुष्य निसर्गतः लवचिक आहे. उत्क्रांतीशास्त्र, मेंदूतील रसायनशास्त्र आणि विविध संस्कृतींच्या अभ्यासातून हे स्पष्ट होतं की त्याच्या नातेसंबंधांच्या पद्धती सामाजिक, भावनिक आणि आर्थिक गरजेनुसार वेळोवेळी घडत गेल्या आहेत.

अशा जगात जिथे डेटिंग ॲप्स अमर्यादित पर्याय देतात आणि त्यामुळं नातेसंबंधांची लेबलं विकसित होत राहतात, अशावेळी मानव नैसर्गिकरित्या एकपत्नीत्व मानणारा आहे की नाही हा प्रश्न नेहमीपेक्षा अधिक महत्त्वाचा वाटतो.

लंडनमध्ये राहणारी रोमानियन अलिना, पॉलीमरी (सर्व संबंधित व्यक्तींच्या संमतीनं एकाच वेळी एकाहून अधिक जवळच्या नात्यांमध्ये असण्याची प्रथा) अनुभवल्यानंतर, स्वतःलाही हाच प्रश्न विचारू लागली.

"अलीकडेच माझी भेट एका अशा व्यक्तीशी झाली, जी नेहमी पॉली असते," ती स्पष्ट करते. "माझ्या मनात प्रश्न आला की, आपण समाज म्हणून एकपत्नीत्वावरच का थांबलो?"

आपल्या उत्क्रांतीचा मार्ग समजून घेण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्या सर्वात जवळच्या प्राण्याचा म्हणजेच प्राइमेट्सचा आणि त्यांच्या प्रजनन पद्धतींचा अभ्यास करणं.

"गोरिला हे बहुपत्नी (पॉलीजिनस) प्रजातीचे असतात. एक नर अनेक मादींशी संबंध ठेवतो," असं यूकेमधील ब्रिस्टल विद्यापीठातील उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ डॉ. किट ओपी सांगतात. "त्यामुळे समूहातील सर्व अपत्यांची आई वेगवेगळी असते, पण वडील एकच नर असतो."

पण ही प्रजननासाठी प्रभावी रणनीती नाही, असं डॉ. ओपी स्पष्ट करतात, कारण यामुळे बालहत्येचं (भ्रूणहत्या) प्रमाण जास्त वाढतं.

"बालहत्या हा गोरिलांच्या आयुष्यातील एक अतिशय भयानक पैलू आहे," असं ते म्हणतात. "जेव्हा एखादा नर गोरिला अशा बाळांना मारतो, ज्याच्याशी त्याचं काही नातं नसतं, तेव्हा ती बालहत्या असते, जेणेकरून त्या मादीची प्रजननक्षमता लवकर परत येईल आणि तो तिच्यासोबत संबंध ठेऊ शकेल. कदाचित आपण अनुकरण करावी अशी ही उत्क्रांतीची रणनीती नाही."

मादी बोनोबोस अनेक नरांशी संयोग करतात जेणेकरून पित्याचं नेमकंपण ठरू शकणार नाही आणि त्यामुळे बालहत्या टाळता येईल.

परंतु इतर माकडांमध्ये मानवांशी अधिक जवळचा संबंध आहे. जसं की चिंपांझी आणि बोनोबोस- मादींनी एक वेगळी उत्क्रांती युक्ती विकसित केली आहे.

मादी अनेक पुरुषांसोबत संभोग करते, पितृत्व गोंधळात टाकलं जातं आणि त्यांच्या संततीला इजा होण्याची शक्यता कमी होते.

मानवांनी कदाचित अशाच प्रकारच्या प्रणालीपासून सुरुवात केली होती; अनेक नर आणि अनेक मादींचे संभोग गट. परंतु, सुमारे दोन दशलक्ष वर्षांपूर्वी, परिस्थिती बदलली.

"याचं कारण हवामान बदल होते," असं डॉ. ओपी सांगतात.

"सब-सहारन आफ्रिकेत, जिथे आपले पूर्वज राहिले होते, तिथे हवामान कोरडे झाले आणि मोठ्या भागावर सव्यान्या (गवताळ प्रदेश) पसरला. सुरूवातीच्या मानवांना शिकांरीपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी मोठ्या समूहात राहावं लागलं.

मोठ्या आणि जटील समूहांशी सामना करण्यासाठी मेंदू मोठे झाले आणि त्यामुळे दुध देण्याचा कालावधीही वाढला."

पण मोठ्या समूहांमध्ये खूप नर असल्यामुळे पितृत्वाचा गोंधळ निर्माण करणं कठीण झालं.

"तसेच, मादींना त्यांच्या अपत्यांची काळजी घेण्यासाठी त्या नरांपैकी एकाची मदतीची गरज होती. त्यामुळे ते एकनिष्ठतेकडे किंवा एकपत्नीत्त्वाकडे वळले."

एकपत्नीत्व किंवा एकनिष्ठता हे सर्वोत्तम धोरण आहे का?

डॉ. ओपी यांच्या मते, हा बदल एकपत्नीत्व "उत्तम" असल्यामुळे नव्हे, तर तोच एकमेव व्यवहार्य पर्याय होता म्हणून आवश्यक होता.

मोठा मेंदू असलेल्या आणि हळू विकसित होणाऱ्या मानवी बाळांचं पालनपोषण करणं ही गरज असल्यामुळे, एकपत्नीत्व हा मानवांसाठी सर्वात व्यवहार्य पर्याय ठरला.

मोठ्या मेंदूच्या आणि हळूहळू विकसित होणाऱ्या मानवी बाळांचं संगोपन करणं हे प्रचंड पालकत्व गुंतवणूक मागणारं असतं, जे एखाद्या आईसाठी एकटीनं सांभाळणं शक्य नसतं.

जरी संशोधन सुचवतं की, सुरुवातीच्या मानवांनी एकपत्नीत्वासाठी उत्क्रांती केली होती, तरी एकपत्नीत्व निवडणारं अनेक लोक एका जोडीदाराशी प्रामाणिक राहण्यासाठी संघर्ष करतात.

"अशा काही प्रजाती आहेत, ज्या संपूर्ण आयुष्यात एकाच जोडीदारासोबत राहतात आणि फसवणूक करत नाहीत, पण अशा प्रजाती फारच दुर्मीळ आहेत," असं डॉ. ओपी सांगतात.

"आपल्या सर्वात जवळच्या नात्यांत मोनोगॅमस प्रजाती म्हणजे गिब्बन्स. पण गिब्बन्स इतर जोड्यांपासून वेगळे असतात आणि त्यांच्या जंगलातील छोट्याशा भागात कोण येतंय आणि कोण नाही हे नियंत्रित करणं कदाचित नर आणि मादी दोघांसाठी सोपं असतं," असं ते सांगतात.

"पण जेव्हा तुम्ही माणसांप्रमाणे मोठ्या बहुपुरुष-बहुमहिला गटात असता, तेव्हा हे नियंत्रित करणं म्हणजेच तुमचा जोडीदार फसवतोय की नाही हे पाहणं, खूपच कठीण होतं."

या दृष्टिकोनातून पाहिल्यास, एकपत्नीत्व ही नैसर्गिक प्रवृत्ती कमी आणि जगण्यासाठी स्वीकारलेली एक युक्ती अधिक आहे, जी स्वतःमध्येच काही त्रुटी (अंगभूत दोष) घेऊन आलेली आहे.

'नातं जोडण्याचं रसायन'

तर, जेव्हा आपण प्रेमात पडतो किंवा निष्ठावान राहण्यासाठी संघर्ष करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये काय घडतं?

सारा ब्लुमेन्थल, अमेरिकेतील एमोरी विद्यापीठातील न्यूरोसायन्स पीएचडीची विद्यार्थिनी. ती प्रेरी व्होल्सचा अभ्यास करते. हे छोटे, रेशमी केसाळ प्राणी आहेत जे मानवांसारखंच दीर्घकालीन जोडप्यांचं नातं प्रस्थापित करण्यासाठी ओळखले जातात.

प्रेरी व्होल्सच्या मेंदूतील रिवॉर्ड सेंटर्समध्ये ऑक्सिटोसिन रिसेप्टर्सची पातळी उच्च असते

त्यांच्या नॉन-मोनोगॅमस वंशजांपेक्षा वेगळं, प्रेरी व्होल्सच्या मेंदूच्या रिवॉर्ड सेंटरमध्ये ऑक्सिटोसिन रिसेप्टर्सची पातळी जास्त असते.

ऑक्सिटॉसिन, ज्याला बहुतेकदा "कडल हार्मोन" म्हणतात. हा मेंदूत शारीरिक स्पर्श आणि नात्याच्या क्षणांमध्ये मुक्त होणारा एक न्यूरोकेमिकल आहे.

"जर आपण प्रयोगशाळेत प्रेरी व्होल्समधील ऑक्सिटोसिन सिग्नलिंग बिघडवलं, तर त्यांना मजबूत नातं तयार करता येणार नाही, आणि ते त्यांच्या जोडीदाराजवळ कमी वेळ घालवतील," असं ब्लूमेन्थल म्हणते.

डोपामाइन आपल्याला नवीनतेची इच्छा आणि बांधिलकी यामधील बदल समजावून सांगू शकतो.

माणसांमध्येही ऑक्सिटोसिन प्रणाली सारखीच असते, ज्यामुळे आपला मेंदू बंध (बाँडिग) तयार होणं हा आनंददायी अनुभव असतो.

पण आणखी एक रासायनिक पदार्थ, डोपामाइन. आपल्या नवीनतेच्या आकांक्षा आणि बांधिलकीच्या किंवा वचनबद्धतेच्या इच्छेत होणाऱ्या बदलांचं स्पष्टीकरण देऊ शकतो.

बंध किंवा बाँडिगच्या सुरुवातीच्या टप्प्यात, डोपामाइन मेंदूत भरून येतो, ज्यामुळे आकर्षण आणि खुल्या मनाने वागण्याची प्रेरणा मिळते. एकदा बंध तयार झाल्यानंतर, डोपामाइनचे स्वरूप बदलतात.

'ज्या महिलांना अनेक पती असतात'

जरी उत्क्रांतीवादी दृष्टीने एकपत्नीत्वाचा (मोनोगॅमीचा) पुरावा असला तरी मानवी संस्कृतींमध्ये नेहमीच नातेसंबंधांच्या विविध प्रकारांची मांडणी दिसून आली आहे.

अमेरिकेतील इलिनॉय शिकागो विद्यापीठातील मानववंशशास्त्रज्ञ डॉ. केटी स्टार्कवेदर यांनी संपूर्ण जगभरात 50 हून अधिक प्रकरणांचे दस्तऐवजीकरण केले आह, जिथे महिलेला एकापेक्षा जास्त पती आहेत, ज्याला पॉलीअँड्री म्हणतात.

हे जगभरात, आशिया मधील नेपाळ आणि तिबेटपासून ते आफ्रिका आणि अमेरिकेमधील भागांमध्ये पाहायला मिळतं.

पॉलीअँड्री, म्हणजे स्त्रीचे अनेक पती असणं, ही सांख्यिकदृष्ट्या पॉलीजिनीपेक्षा कमी दिसणारी आहे, ज्यामध्ये एक पुरुषाच्या अनेक पत्नी असतात.

पॉलीजिनीपेक्षा (एका पुरुषाच्या अनेक पत्नी) पॉलीअँड्री (एका स्त्रीचे अनेक पती) सांख्यिकदृष्ट्या दुर्मीळ आहे, तरीही स्टार्कवेदर हे अशक्य समजू नये असं सावधगिरीनं सांगतात.

"स्त्रियांना अनेक साथीदारांमुळे आर्थिकदृष्ट्या फायदा होऊ शकतो. जर तुमचा मुख्य पती मरण पावला किंवा खूप काळ गैरहजर राहिला, जसं काही मूळ उत्तर अमेरिकन गटांमध्ये होत असे. तर तुमच्याकडे पर्यायी योजना असणं खूप गरजेचं असायचं," असं त्या म्हणतात.

काही प्रकरणांमध्ये, बहुविवाहाच्या व्यवस्थांनी अनुवांशिक फायदेही दिले.

"जिथे लोक वारंवार आजारी पडतात आणि त्यांना मरण्याचा धोका असतो, अशा वातावरणात तुमची अनेक मुलं असतील तर तुम्हाला चांगलं वाटेल. त्यांचं थोडंसं वेगळं अनुवांशिक स्वरूप असेल," असं स्टार्कवेदर स्पष्ट करतात. "ते त्यांच्या सध्याच्या वातावरणाशी थोडंसं अधिक जुळणारे असू शकतात."

पण एकपत्नीत्व नसणं याचीही काही आव्हानं असतात. अनेक नात्यांना सांभाळण्यासाठी वेळ, भावनिक ऊर्जा आणि समजुतीची गरज असते.

"तुम्ही पुरुष असाल किंवा स्त्री, अनेक पती/पत्नी सांभाळणं अत्यंत कठीण आहे. आर्थिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या हे कठीण असतं. मला वाटतं हीच मुख्य कारणं आहेत, ज्यामुळ एकपत्नीत्व अजूनही सर्वाधिक सामान्य लग्न प्रकार आहे," असं स्टार्कवेदर म्हणतात.

'याचं उत्तर हो आणि नाही... दोन्हीही'

अलीनासाठी तिच्या पूर्वीच्या नात्यात एकपत्नीत्व फारसं यशस्वी ठरलं नाही. आता एका बहुप्रेमी नात्यात असताना ती गुंतागुंतीच्या भावना हाताळत आहे.

"ईर्ष्या खूप कठीण आणि तीव्र असू शकते," असं त्या मान्य करतात. "पण माझ्यासाठी व्यक्तिगतपणे त्याचा बराचसा भाग ते तुमच्याशी प्रामाणिक नाहीत असं वाटल्यामुळे येतो, आणि एकदा का मला समजलं की ते प्रामाणिक आहेत, तर ईर्षेची भावना खूपच कमी होते."

काही लोकांसाठी, बहुपत्नीत्व (नॉन मोनोगॅमी) भावनिक स्वातंत्र्य आणि आर्थिक लवचिकता प्रदान करते.

त्यांचा जोडीदार सहमत आहे, "माझ्या मते, मत्सर हा फारसा मोठा मुद्दा नाही. अनेक आरोग्यदायी नाती टिकवून ठेवण्यासाठी लागणारा वेळ आणि प्रयत्न हेच खरं तर थोडं जास्त त्रासदायक ठरतं."

तरीही दोघं म्हणतात की, हे सगळं करण्यासारखं आहे. "इथं आधीपासून ठरवलेले नियम नसतात," अलीना सांगतात. "म्हणूनच तुम्हाला अशा गोष्टींबद्दल संवाद साधावा लागतो, जो कदाचित तुम्ही साधला नसता आणि त्यामुळे आमचं नातं अधिक मजबूत झालं आहे."

म्हणूनच, आपण नैसर्गिकरित्या एकपत्नी किंवा एकनिष्ठ आहोत का? याचं उत्तर हो आणि नाही, दोन्ही दिसतं.

संस्कृती आणि इतिहासाच्या विविध टप्प्यांमध्ये, मानवांनी आपल्या सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय गरजांनुसार नात्यांचे विविध मॉडेल्स विकसित केले आहेत.

काहींसाठी बहुपत्नीत्व हे भावनिक स्वातंत्र्य आणि आर्थिक लवचिकता देतं, तर इतरांसाठी एकनिष्ठता म्हणजे प्रेम हाताळण्याचा सर्वात सोपा आणि आटोपशीर मार्ग आहे.

"माणसं लवचिकतेसाठी उत्क्रांत झाली आहेत, आणि त्यात आपली नाती जुळवण्याचा आणि विवाह करण्याचा मार्गही येतो," असं केटी स्टार्कवेदर म्हणतात.

"आपण पृथ्वीवरील प्रत्येक प्रकारच्या वातावरणात राहतो, आणि ते आपल्या वर्तनातील लवचिकतेमुळे शक्य झालं आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)