बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएच्या विजयाची आणि महाआघाडीच्या पराभवाची 5 कारणं

- Author, अभिजीत कांबळे
- Role, संपादक, बीबीसी मराठी
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए युतीला 202 जागांवर विजय मिळाला, तर विरोधी महाआघाडीला फक्त 35 जागांवर विजय मिळवता आला. एनडीएत भाजपला 89 जागा, जेडीयूलाला 85 जागा आणि एलजेपीला (रामविलास पासवान) 19 जागा मिळाल्या. दुसरीकडे महाआघाडीत राजदला 25, तर काँग्रेसला केवळ 6 जागा मिळाल्या.
या पार्श्वभूमीवर नेमकं असं काय घडलं की, एनडीएला बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळाली?
राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि काँग्रेसची महाआघाडी कुठे कमी पडली?
एनडीएच्या विजयाची आणि महाआघाडीच्या पराभवाची 5 कारणं जाणून घेऊयात.
1. जातीय समीकरणं
बिहारच्या राजकारणात जातीय समीकरणांना सर्वाधिक महत्व राहिलेलं आहे. 'सोशल इंजिनिअरिंग' बिहारच्या निवडणुकीत परवलीचा शब्द बनून जातो. या निवडणुकीत नितीशकुमार आणि भाजप जातीय समीकरणं आपल्या बाजूनं ठेवण्यात यशस्वी ठरल्याचं दिसत आहे.
2025 च्या या विधानसभा निवडणुकीत अतिमागासवर्गीय म्हणजे ईबीसी जाती काय करणार याची बरीच चर्चा होती.
गेल्या अनेक निवडणुकांपासून हा ईबीसी मतदार प्रामुख्यानं नितीशकुमारांच्या पाठीशी राहिला आहे. खरं तर, ईबीसींचा पाठिंबा हे नितीशकुमारांच्या निवडणुकीतील यशाचं एक महत्वाचं कारण मानलं जातं. म्हणूनच या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महाआघाडीनं ईबीसींना आपल्या बाजूने खेचण्याचा जोरदार प्रयत्न केला.
मुकेश सहनींना सोबत घेऊन आणि त्यांना उपमुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले, तसेच जाहीरनाम्यामध्ये ईबीसींसाठी विशेष घोषणा जाहीर केल्या.

फोटो स्रोत, ANI
पण महाआघाडीचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. ईबीसी नितीशकुमार यांच्या पाठीशीच राहिल्याचं दिसतंय. बीबीसीच्या बिहार प्रतिनिधी सिटू तिवारी सांगतात, "ईबीसी जाती एनडीएसोबतच राहण्यामागं ईबीसींचा यादव समाजाच्या वर्चस्वाला असलेला विरोध हे महत्वाचं कारण मानलं जातं."
"जर आपण आरजेडीला सत्ता दिली, तर यादव समाजाचे वर्चस्व प्रस्थापित होईल अशी भीती ईबीसींमध्ये असल्याचं मानलं जातं."
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे आरजेडीने जरी ईबीसींना सोबत आणण्यासाठी प्रयत्न केले असले, तरी त्याचे प्रतिबिंब तिकीट वाटपात दिसले नाही. तिकीट वाटपात आरजेडीकडून यादव उमेदवारच मोठ्या प्रमाणात देण्यात आले. यामुळे या निवडणुकीत आरजेडीची भिस्त प्रामुख्यानं 'मुस्लीम-यादव' समीकरणापुरतीच मर्यादीत राहिलेली दिसतेय आणि त्यातील काही मतदान एनडीए किंवा एमआयएमकडे गेलेलं दिसत आहे.
हाच मुद्दा हेमंत देसाईदेखील मांडतात.
बीबीसी मराठीसोबत बोलताना ते म्हणाले, "महाआघाडीच्या बाततीत, आमचं कॉम्बिनेशन आता मुस्लीम-यादव यांच्यापुरतं मर्यादीत नाहीये, हे सांगण्यात आणि ईबीसी जातींना आपल्यामागे घेण्यामध्ये आणि त्यांची बांधणी करण्यामध्ये त्यांना संघटनात्मक अपयश आलेलं आहे. याउलट, एनडीएनं जातींचं मायक्रोमॅनेजमेंट केल्याचं दिसून आलं."
2. महिला मतदारांची निर्णायक भूमिका
महिला मतदारांची भूमिका या निवडणुकीतही महत्वाची ठरली. ईबीसींप्रमाणेच महिला मतदार हा नितीशकुमारांचा पाठीराखा मानला जातो. या निवडणुकीत महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर महिलांना लघुउद्योग किंवा व्यवसायासाठी 10 हजार रूपये देण्याची योजना नितीशकुमारांनी आणली आणि ती गेमचेंजर ठरेल, असे मानले जात होते.
त्याचा एनडीएला या निवडणुकीत फायदा झाल्याचं दिसत आहे. बीबीसी हिंदीच्या प्रतिनिधी प्रेरणा यांनी बिहार निवडणुकीत वार्तांकन केले होते. महिला फॅक्टरचे विश्लेषण करताना प्रेरणा सांगतात, "महिला मतदारांची एक स्वतंत्र कॉन्स्टिट्यूयन्सी निर्माण करण्यात नितीशकुमार यशस्वी ठरले आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
"नितीशकुमारांनी बिहार राज्यात केलेली दारूबंदी, मुलींसाठी सायकली देण्याची योजना, महिलांसाठी विविध योजना यांचा प्रभाव महिला मतदारांवर पडलेला आहे. कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचंही महिला मतदारांचं म्हणणं आहे. त्यासोबतच या निवडणुकीत 10 हजारांच्या मदतीची योजना आणल्यानं महिला मतदारांवर त्याचा प्रभाव पडल्याचं दिसत आहे."
हेमंत देसाई सांगतात, "एनडीएनं जवळपास 31 हजार कोटी रुपये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून वाटलेले आहेत. महिलांना देण्यात आलेल्या पैशांचा एक हप्ता, तर निवडणुकीच्या काळातच दिला. त्याखेरिज, त्यांनी आणलेल्या वेगवेगळ्या योजना पाहता, अँटी-इन्कम्बन्सीची लाट तशी दिसतच नव्हती. कुणीही फार असंतोष व्यक्त करताना दिसत नव्हतं. जो काही असंतोष होता, तो थोपवण्यात त्यांना यश आलं, असं म्हणता येईल."
3. नितीशकुमारांची लोकप्रियता
एनडीएच्या यशात नितीशकुमार यांची लोकप्रियता हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. नितीशकुमार 20 वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत. इतक्या दीर्घकाळानंतर अँटी इनकम्बन्सी तयार होण्याची नेहमीच शक्यता असते. पण नितीशकुमारांविषयी अँटी इनकम्बन्सी ग्राऊंडवर दिसत नव्हती.
तेजस्वी यादव यांच्याबद्दल तरुणांमध्ये क्रेझ होतीच. पण ही क्रेझ नितीशकुमार यांच्या लोकप्रियतेवर मात करू शकली नाही.
'विकासबाबू' ही आपली प्रतिमा ठसवण्यात नितीशकुमार यशस्वी झालेले आहेत, हे या निवडणुकीतही स्पष्ट झाले. नितीशकुमार यांच्या प्रकृतीवरूनही प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते, पण त्यांनी निवडणूक प्रचारात अतिशय सक्रिय सहभाग नोंदवत त्या चर्चांना पूर्णविराम दिला.
गेल्या 20 वर्षांत नितीशकुमार स्वत:ची प्रतिमा सुशासन बाबू अशी तयार करण्यात यशस्वी झाले आहेत. 2005 नंतर कायदा-सुव्यवस्था आणि विकास या दोन मुद्द्यांवर आपण आमूलाग्र बदल केला आहे, हे मतदारांवर सखोलपणे ठसवण्यात नितीशकुमार यशस्वी झाले आहेत. मतदारांचा विश्वास कायम ठेवण्यात नितीशकुमार यशस्वी ठरले हा एक महत्वाचा फॅक्टर आहे.

फोटो स्रोत, Getty Images
नितीशकुमार यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या, याचं विश्लेषण ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे करतात.
ते सांगतात, "2024 च्या लोकसभा निवडणुकीत महिलांचे मतदान पुरुषांहून अधिक होते. नितीशकुमारांनी बरोबर याच घटकांवर लक्ष केंद्रीत केले. महिला, कोरे तरुण आणि दलित यांना खेचण्यासाठी रेवड्यांचा तुफान वर्षाव केला."
"बिहार राज्य मागास असले, तरी महिलांमधील जागृती चांगली आहे. दारुबंदीनंतर नितीश यांना महिलांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. पूर्वी मुलींना सायकली वाटल्याची पुण्याईही अजून थोडीफार शिल्लक आहे. थोडक्यात, हे सर्व महाराष्ट्राच्या लाईनवरच करण्यात आलंय. पुढे काय दिवाळे वाजायचे ते वाजो, आता निवडणूक जिंकणे हे सर्वात महत्वाचे आहे, हे ओळखून त्यांनी या बाबी केल्याचं दिसतात," असं ते सांगतात.
4. एनडीएतील समन्वय आणि एकजूट
राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएमध्ये विरोधकांच्या महाआघाडीच्या तुलनेत अधिक समन्वय दिसून आला. सार्वजनिक पातळीवर तरी मोठ्या प्रमाणात मतभेद किंवा बेबनाव एनडीएमध्ये दिसून आला नाही.
जागावाटपावरूनही थोडीशी धुसफूस दिसली, तरी ती खूप ताणली गेली नाही. भारतीय जनता पक्षाने इतर कोणत्याही निवडणुकीप्रमाणे आपली संपूर्ण ताकद पणाला लावून केंद्रीय पातळीवरचे नेते, इतर राज्यांचे मुख्यमंत्री यांना प्रचारात उतरवले होते.
भाजपचे केंद्रीय नेते बिहारमध्ये तळ ठोकून होते. नितीशकुमारांनी पावसामुळे हेलिकॉप्टर उडू शकणार नाही, हे पाहून एकदा तर सभेचे ठिकाण रस्त्यावरून कारने जाऊन गाठले.
भाजप, जेडीयू, लोक जनशक्ती पक्ष, हिंदुस्तान आवामी पार्टी यांच्यात समन्वय उत्तम होताच. सोबत मतांचे हस्तांतरणही झालेले दिसले. भाजप, जेडीयूची संघटनात्मक ताकदही एनडीएच्या पथ्यावर पडली.

यासंदर्भात बीबीसी हिंदीने निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव यांच्याशी चर्चा केली.
ते सांगतात, "मी हा निकाल पाहून हैराण यासाठी नाहीये कारण ही गोष्ट पहिल्या दिवसापासूनच स्पष्ट होती की, बिहारची ही निवडणूक एनडीएच्या बाजूनं आहे. याचं कारण हे आहे की, महाआघाडीच्या तुलनेत एनडीए ही एक मोठी युती होती आणि त्यामुळे कमीतकमी 5 टक्क्यांची आघाडी त्यांना पहिल्यापासूनच होती. दुसरं असं की एनडीएची सामाजिक गोळाबेरीजही मोठी आहे."
"बिहारची जातीय गणितं पाहिली तर महाआघाडीला एकूण 'जातीय गटातून' 40 टक्के मते मिळतात, तर एनडीएकडे किमान 50 टक्के मते आहेत. तिसरं म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून एनडीए आणि विशेषतः नितीश कुमार यांनी महिलांची मते त्यांच्या बाजूने मिळवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत," असंही ते नमूद करतात.
5. महाआघाडीत समन्वयाचा अभाव
एकीकडे एनडीए अधिक मजबूत दिसत असताना आरजेडी, काँग्रेस, डावे, व्हीआयपी यांच्यातील महाआघाडीतील धुसफूस, बेबनाव अगदी उघडपणे दिसत होता. जागावाटपावरून आरजेडी आणि काँग्रेसमधील मतभेद अगदी तुटेपर्यंत ताणले गेले होते.
काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांना पाठवून दोन्ही पक्षांच्या जागावाटपात समेट घडवून आणावा लागला. तरीही काही जागांवर सहमती न झाल्यानं आघाडीतील पक्षांनीच एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे केल्याचं दिसलंय.
या आघाडीत प्रामुख्यानं भिस्त आरजेडीवर होती आणि इतर पक्षांची राज्यव्यापी लक्षणीय ताकद नसल्यानं ही आघाडी एनडीएसमोर कमकुवत ठरल्याचं दिसतंय. प्रचारात जर पाहिले तर तेजस्वी यादव यांनी झंझावाती प्रचार केला, पण तुलनेनं काँग्रेसकडून राहुल गांधी यांचा प्रचार झंझावाती दिसला नाही. 'व्होट अधिकार यात्रे'तून राहुल गांधीं यांनी चैतन्य निर्माण केले होते. पण त्यानंतर त्यांचा प्रचार जोरकसपणे दिसला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
याशिवाय आणखी एक वेगळा मुद्दा ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात.
"ते सांगतात की, महाआघाडीच्या तुलनेत एनडीएनं खूप आधीपासूनच तयारी सुरू केलेली होती. त्यामुळे, त्यांची आधी सरशी झाली. राजद आणि काँग्रेसची युती नंतर झाली. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यासोबत मुकेश सहनींचा पक्ष, डावे पक्ष आणि आणखी काही छोटे पक्ष होते. 12 जागांवर मैत्रिपूर्ण लढतींमुळे एक वेगळा संकेत गेला."
"दुसरी गोष्ट म्हणजे मित्रपक्षांनी ज्याप्रकारे कामगिरी बजावायला पाहिजे होती, तिचा स्पष्ट अभाव दिसून आला. शिवाय, एनडीएनं समोरची आघाडी जंगलराजचं ओझं घेऊन आलेली आहे, हे त्यांनी वेळोवेळी ठसवलं. त्यामुळेही, त्याचा फटका महाआघआडीला बसलेला दिसतो आहे," असंही ते नमूद करतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)












