नितीश कुमार पुन्हा एकदा झाले बिहारचे मुख्यमंत्री, दहाव्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

नितीश कुमार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नितीश कुमार
    • Author, कीर्ति दुबे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

गुरुवारी (20 नोव्हेंबर) सकाळी 11.30 वाजता पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर शपथविधी सोहळा झाला.

याआधी बुधवारी (19 नोव्हेंबर) जेडीयूच्या आमदार दलाच्या बैठकीत नितीश कुमार यांची नेता म्हणून निवड झाली होती. तर भाजपच्या आमदार दलाच्या बैठकीत सम्राट चौधरी यांची नेता आणि विजय सिन्हा यांची उपनेता म्हणून निवड झाली होती.

बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवल्यानंतर बुधवारी नितीश कुमार यांना एनडीएच्या विधिमंडळ सदस्यांच्या दलाचा नेता म्हणून निवडण्यात आले.

जेडीयूचे नेते उमेश सिंह कुशवाहा म्हणाले, "मुख्यमंत्री नितिश कुमार यांना सर्वानुमते एनडीएचे नेते म्हणून निवडण्यात आले आहे."

बैठकीनंतर बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जायसवाल म्हणाले, "मंत्रिमंडळाच्या स्थापनेचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. आधी आम्ही राजभवनात जात आहोत आणि सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहोत."

एलजेपी आरव्हीचे नेते चिराग पासवान म्हणाले, "आजच्या बैठकीत मुख्यमंत्री नितिश कुमार यांना एनडीए आमदार दलाचा नेता म्हणून निवडण्यात आले आहे. बिहारच्या जनतेने एनडीएच्या उमेदवारांवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांवर, नितिश कुमार यांच्या अनुभवावर आणि 'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट' या संकल्पनेवर विश्वास ठेवून प्रचंड विजय दिला आहे. त्यामुळे जनतेच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरण्याची जबाबदारी आमच्यावर आहे."

जीतनराम मांझी यांचा कालखंड सोडला तर नितीश कुमार जवळपास गेली 20 वर्षं बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपशी युती तोडून नितीश कुमार यांनी लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवली आणि त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मे 2014 मध्ये मुख्यमंत्रिपद सोडणाऱ्या नितीश कुमार यांनी फेब्रुवारी 2015मध्ये जीतनराम मांझी यांना पक्षातून काढून टाकलं आणि स्वतः 130 आमदारांसोबत राज भवनात पोहोचले. त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला.

लालूप्रसाद यादव यांच्या 15 वर्षांच्या कार्यकाळाविरोधात लढून सत्तेवर येणाऱ्या नितीश कुमारांना नंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळेस लक्षात आलं की, बिहारमध्ये कोणाच्यातरी सोबत गेल्याशिवाय सरकार बनवणं शक्य नाहीये.

त्यामुळेच जेपी आणि कर्पूरी ठाकूर यांच्या हाताखाली राजकारणाचे धडे गिरवलेले लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार एकत्र आले.

2013 मध्ये साली नितीश कुमार यांनी एनडीए सोडली ती नरेंद्र मोदी यांच्यामुळेच.

त्यावेळी भाजपने नरेंद्र मोदींना आपल्या निवडणूक प्रचाराचे प्रमुख बनवलं होतं. भाजप त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करेल याची कल्पना नितीश यांना नव्हती. नितीशकुमारांना हे अजिबात आवडलं नाही.

मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये राहिलो तर आपले मुस्लीम मतदार दुरावतील, असं नितीशकुमारांना वाटत होतं. 2013 च्या आधी म्हणजेच 2010 च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदींना बिहारमध्ये प्रचार करू दिला नव्हता. 2005 च्या बिहार विधानसभा निवडणुकीतही नितीश यांनी असंच केलं होतं.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या पक्षाने बिहारमध्ये स्वबळावर निवडणूक लढवली होती पण दोन जागाच निवडून आल्या.

2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश यांनी आरजेडीसोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि मोठा विजय मिळवला. दोन वर्षांनंतर, नितीश पुन्हा एनडीएमध्ये सामील झाले आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने बिहारमध्ये 40 पैकी 39 जागा जिंकल्या.

2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष बिहारमध्ये तिसरा पक्ष बनला होता पण एनडीए सरकारमध्ये ते मुख्यमंत्री बनले. त्यानंतर 2022 मध्ये नितीश परत एकदा राजदसोबत आले. मात्र 2024 साली जानेवारीत ते पुन्हा भाजपसोबत गेले.

नितीश कुमार यांचं एकूणच राजकीय करिअर चढ-उतारांनी भरलेलं आहे.

इंजिनिअर बाबू ते सुशासन बाबूपर्यंतचा प्रवास

पटना शहराला लागून असलेल्या बख्तियारपूरमध्ये 1 मार्च 1951 ला नितीश कुमार यांचा जन्म झाला. त्यांनी बिहारच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. या काळात ते 'इंजिनिअर बाबू' म्हणून ओळखले जात होते.

जयप्रकाश नारायण यांच्या 'संपूर्ण क्रांती आंदोलना'च्या मुशीतून निघालेले नितीश कुमार बिहारच्या सत्ताकारणात जवळपास दीड दशक केंद्रस्थानी होते.

इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांचे मित्र आणि क्लासमेट असलेल्या अरुण सिन्हा यांनी आपल्या 'नितीश कुमारः द राइज ऑफ बिहार' या पुस्तकात लिहिलं आहे की, कॉलेजच्या दिवसात नितीश राज कपूरच्या चित्रपटांचे फॅन होते. या विषयावर मित्रांनी केलेली चेष्टा-मस्करीही त्यांना सहन व्हायची नाही.

नितीश कुमार : 7 दिवसांचं मुख्यमंत्रिपद ते 20 वर्षं बिहारच्या राजकारणावर पकड

फोटो स्रोत, Getty Images

नितीश कुमार यांना 150 रुपये स्कॉलरशिप मिळायची. त्यातून ते दर महिन्याला पुस्तकं आणि मासिकं खरेदी करायचे. त्याकाळातल्या इतर बिहारी विद्यार्थ्यांसाठी या गोष्टी स्वप्नवत होत्या.

मात्र एका स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा असलेल्या नितीश यांचा कल कायमच राजकारणाकडे होता.

सुरुवातीला लालू प्रसाद यादव आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या छत्रछायेत राजकारणाची सुरूवात करणाऱ्या नितीश कुमार यांचा राजकीय प्रवास 46 वर्षांचा आहे.

1995 साली समता पार्टीला केवळ सात जागा जिंकता आल्या. तेव्हा नितीश कुमार यांच्या लक्षात आलं की, राज्यात तीन पक्ष वेगवेगळं लढू शकत नाहीत. त्यानंतर मग 1996 साली त्यांनी भाजपसोबत युती केली.

हा तो काळ होता जेव्हा भाजपचं नेतृत्व अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे होतं. या युतीचा नितीश कुमार यांना फायदा झाला आणि 2000 साली के पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले. त्यांना हे पद केवळ सात दिवसांसाठी मिळालं, मात्र त्यांनी स्वतःला लालू प्रसाद यादव यांना सक्षम पर्याय म्हणून सिद्ध केलं.

महादलितांचं राजकारण

2007 मध्ये नितीश कुमार यांनी दलितांमध्येही सर्वांत मागास राहिलेल्या जातींसाठी महादलित असा वर्ग बनवला. त्यांच्यासाठी विविध सरकारी योजना राबविण्यात आल्या.

2010 साली घर, शिक्षणासाठी कर्ज आणि शाळेचा युनिफॉर्म देण्यासाठीही योजना राबविल्या गेल्या.

आज बिहारमध्ये सर्वच दलित जातींचा समावेश महादलित या वर्गात करण्यात आला आहे. 2018 साली पासवानांनाही महादलित दर्जा देण्यात आला.

खरंतर बिहारमध्ये दलितांचे सर्वांत मोठे नेते होते रामविलास पासवान. मात्र, तज्ज्ञ सांगतात की, दलितांसाठी ठोस काम हे नितीश कुमारांनी केलं होतं.

2020 मध्ये, नितीश कुमार यांनी ही त्यांची शेवटची निवडणूक असेल असे म्हटले होते, त्यावरुन आता चर्चा सुरु असून यावेळी मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2020 मध्ये, नितीश कुमार यांनी ही त्यांची शेवटची निवडणूक असेल असे म्हटले होते, त्यावरुन आता चर्चा सुरु असून यावेळी मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

नितीश कुमार हे 4 टक्के लोकसंख्या असलेल्या कुर्मी समाजातून येतात. मात्र, सत्तेत असताना त्यांनी नेहमीच अशा पक्षांसोबत युती केली, ज्यांच्याकडे एका विशिष्ट जातीची व्होट बँक असेल.

मग जेव्हा त्यांनी भाजपसोबत निवडणूक लढवली तेव्हा त्यांना भाजप समर्थक मानल्या जाणाऱ्या सवर्ण मतदारांची साथ मिळाली. त्यानंतर 2015 मध्ये यादव-मुस्लिम अशी व्होट बँक असलेल्या आरजेडीसोबत त्यांनी निवडणूक लढवली.

नितीश कुमार यांची प्रतिमा भलेही विनम्र आणि सौम्य असेल, पण जेव्हा राजकारण करायची वेळ येते तेव्हा इतर अनेक राजकारण्यांप्रमाणेच तेही कठोर होऊ शकतात.

याबाबत बोलताना मणिकांत ठाकूर सांगतात की, "त्यांनी शरद यादव आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत काय केलं हे सगळ्यांना माहीत आहे. जॉर्ज यांचे शेवटचे दिवस कसे गेले हे कोणापासून लपून राहिलं नाही."

महिलांसाठीच्या विविध योजना

आपल्या पहिल्याच कार्यकाळात नीतीश कुमार यांनी शाळकरी मुलींसाठी सायकल योजना, गणवेश योजना आणि प्रथम श्रेणीत दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना दहा हजार रुपये देण्याची योजना सुरू केली.

नंतर बारावी परीक्षा प्रथम श्रेणीत पास केल्यास 25 हजार रुपये आणि पदवी पूर्ण केल्यास 50 हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्याची तरतूद केली. त्यासह पहिल्या कार्यकाळातच नीतीश कुमार यांनी महिलांना पंचायत निवडणुकांमध्ये 50 टक्के आरक्षण दिलं.

पोलीस भरतीतही महिलांना 35 टक्के आरक्षण देण्यात आलं आणि यंदाच्या निवडणुकीत जर त्यांचं सरकार स्थापन झालं तर राज्य सरकारी योजनांमध्येही महिलांना 35 टक्के आरक्षण दिलं जाईल, असं आश्वासन दिलं.

परंतु, पंचायतींमध्ये 50 टक्के आरक्षण देऊनही बिहारमध्ये महिलांचं राजकीय प्रतिनिधित्व अजूनही खूपच कमी आहे.

नितीश कुमार

फोटो स्रोत, Getty Images

बिहार विधानसभा निवडणूक 2025

2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीतही महिला मतदारांची भूमिका महत्वाची ठरली. या निवडणुकीत भाजप-जदयु-लोक जनशक्ती पक्ष या प्रमुख पक्षांच्या एनडीए युतीनं विरोधी महाआघाडीचा पराभव करत मोठा विजय मिळवला.

राज्यातील 243 जागांपैकी एनडीएने 202 जागांवर विजय मिळवला आहे. यात, भाजपने सर्वाधिक 89 जागा जिंकल्या. तर, मित्रपक्ष जनता युनायटेड दलने 85 जागा जिंकल्या.

ईबीसींप्रमाणेच महिला मतदार हा नितीशकुमारांचा पाठीराखा मानला जातो. या निवडणुकीत महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर महिलांना लघुउद्योग किंवा व्यवसायासाठी 10 हजार रूपये देण्याची योजना नितीशकुमारांनी आणली आणि ती गेमचेंजर ठरेल, असे मानले जात होते.

त्याचा एनडीएला या निवडणुकीत फायदा झाल्याचं दिसत आहे. बीबीसी हिंदीच्या प्रतिनिधी प्रेरणा यांनी बिहार निवडणुकीत वार्तांकन केले होते. महिला फॅक्टरचे विश्लेषण करताना प्रेरणा सांगतात, "महिला मतदारांची एक स्वतंत्र कॉन्स्टिट्यूयन्सी निर्माण करण्यात नितीशकुमार यशस्वी ठरले आहेत."

फेअरवेल निवडणूक

ज्येष्ठ पत्रकार संतोष सिंह आणि प्राध्यापक राकेश रंजन यांच्यामते नितीश कुमार यांना सहानुभूतीची मतं मिळाली आहे.

संतोष सिंह म्हणतात, "ही निवडणूक नितीश कुमार यांची फेअरवेल निवडणूक होती आणि बिहारच्या वोटर्सनी मतदानाद्वारे आपल्या नेत्याला सुंदर निरोप दिला आहे."

तर राकेश रंजन म्हणतात, "लोकांमध्ये अशी भावना होती की ही नितीश कुमार यांची शेवटची निवडणूक असू शकते. महिलांचं नितीश कुमारांशी विशेष नातं आहे, आणि म्हणून त्यांनी नितीश कुमार यांना निरोप दिला आहे."

जेडीयू कार्यालयाबाहेरील पोस्टर
फोटो कॅप्शन, जेडीयू कार्यालयाबाहेरील पोस्टर

प्राध्यापक राकेश रंजन म्हणतात, "नितीश कुमार यांनी जरी जास्त जागा जिंकल्या असल्या तरी त्यांच्या तुलनेत भाजप पुढे निघून गेल्याचं दिसून येतं. त्यामुळे मंत्रिमंडळातील अनेक खाती जी नीतीश कुमार स्वतःकडे ठेवत होते, त्यावर आता त्यांना तडजोड करावी लागेल."

त्यांच्याकडे राजदशी युती करण्याचा जो पर्याय नेहमीच उपलब्ध होता तो आता जवळजवळ नाहीसा झाला आहे. त्यामुळे असे म्हटले जात आहे की राजद कमकुवत होणे आणि भाजप मजबूत होणे ही जेडीयू किंवा नितीश कुमार यांच्यासाठी चांगली बातमी नाही.

आरजेडीसोबत जाण्याचा पर्याय जो त्यांच्याकडे कधीकाळी उपलब्ध होता, तो तो जवळजवळ संपलाच आहे. यावरुन दिसून येतं की, राजद कमकुवत होणं आणि भाजप मजबूत होणं ही जदयू किंवा म्हणावं तर नितीश कुमार यांच्यासाठी काही चांगली बातमी नाही."

ते पुढे म्हणतात, "राजदसोबत जाण्याचा पर्याय, जो त्यांच्याकडे नेहमी उपलब्ध असायचा, तो जवळजवळ संपलाच आहे. त्यामुळे असं म्हटलं जातं की राजदचं कमकुवत होणं आणि भाजपचं मजबूत होणं—हे जेडीयू किंवा म्हणावं तर नीतीश कुमार यांच्यासाठी काहीही चांगली बातमी नाही."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)