बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 47.62% मतदान

फोटो स्रोत, X/@CEOBihar
बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या दुसऱ्या टप्प्यात 20 जिल्ह्यांतील 122 जागांसाठी मतदान सुरू आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत 47.62 टक्के मतदान नोंदवले गेले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, किशनगंज जिल्ह्यात सर्वाधिक 51.86% मतदान झाले आहे, तर मधुबनी जिल्ह्यात सर्वात कमी 43.39% मतदान नोंदवले गेले आहे.
या आधी, पहिल्या टप्प्यात 6 नोव्हेंबर रोजी 121 जागांसाठी मतदान झाले होते. त्या टप्प्यात 65% पेक्षा अधिक मतदान झाले होते.

फोटो स्रोत, X/@ECISVEEP
केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं की बिहार निवडणुकीत 17 नवीन गोष्टी अंमलात आणल्या जात आहेत ज्या नंतर संपूर्ण देशभरात लागू केल्या जातील.
त्यांनी सांगितलं की मतदान केंद्राच्या अगदी बाहेर मतदार आपला मोबाइल जमा करू शकतील, जो त्यांना मतदानानंतर परत मिळेल.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एकूण एकूण मतदारांची संख्या अंदाजे 7.43 कोटी आहे. यामध्ये अंदाजे 3.92 कोटी पुरुष, 3.50 कोटी महिला आणि 1,725 ट्रान्सजेंडर मतदारांचा समावेश आहे.
यांपैकी 14 लाखांहून अधिक असे मतदार आहेत जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार बिहारमध्ये एकूण 90,712 मतदान केंद्रं तयार करण्यात आली आहेत. त्यापैकी 76,801 ग्रामीण भागात आणि 13,911 शहरी भागात आहेत.
प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी 818 मतदार असतील. सर्व मतदान केंद्रांवर 100 टक्के वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये 1,350 मॉडेल मतदान केंद्रं, 1,044 महिला संचलित केंद्रं, 292 दिव्यांग मतदारांच्या व्यवस्थापनाची केंद्रं आणि 38 युवा संचलित केंद्रांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Santosh Kumar/Hindustan Times via Getty Images
याआधी रविवारीही (5 ऑक्टोबर) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पटणामध्ये पत्रकार परिषद घेतली.
त्यांच्या सुरुवातीच्या वक्तव्यात मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार म्हणाले की एसआयआर प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांआधी निवडणूक आयोगानं एसआयआर सुरू केलं. याच्या टायमिंगवरून विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले, तर निवडणूक आयोगाने ही फक्त मतदार यादी दुरुस्त करण्याची प्रक्रिया असल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान, बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. विविध राजकीय पक्षांमध्ये वाटाघाटींवर खल सुरू आहे, तर भारतीय निवडणूक आयोगाने एसआयआरची (सखोल मतदार पडताळणी) आकडेवारीही जाहीर केली आहे.
या आकडेवारीनुसार बिहारमध्ये आता 7.42 कोटी मतदार आहेत.

बिहार विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ 22 नोव्हेंबर 2025 रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे राज्यात नोव्हेंबरपर्यंत निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्याचाच भाग म्हणून 6 आणि 11 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होईल आणि 14 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
मागील विधानसभा निवडणूक (2020) कोरोनाच्या संकटामुळे 28 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांत घेण्यात आली होती.
भारतामध्ये कोरोना महामारीच्या काळात ही पहिलीच मोठी निवडणूक होती आणि यासाठी अनेक नियम आणि मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या होत्या.

बिहार राज्यात 2020 च्या निवडणुकीनंतर एनडीए सरकार सत्तेवर आलं. परंतु, ऑगस्ट 2022 मध्ये नितीश कुमार यांनी भाजपशी असलेलं नातं तोडून त्यांनी महाआघाडीशी (इंडिया आघाडी) हातमिळवणी केली.
भाजप आणि जेडीयू यांच्यातील संबंध इतके ताणले गेले होते की, नितीश कुमार यांनी ते एकवेळ मरणं पसंत करतील पण भाजपसोबत कधीही जाणार नाही, असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं.
तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही नितीश कुमार यांच्यासाठी एनडीएचे दरवाजे कायमचे बंद झाले असल्याचं म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Santosh Kumar/Hindustan Times via Getty Images
पण राजकारणात काहीही आणि कधीही कायमचं सत्य नसतं, आणि परिस्थिती पुन्हा एकदा बदलली.
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडी तयार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये नितीश कुमार यांच्याकडे महत्त्वाचे नेते म्हणून पाहिलं जात होतं.
पण जानेवारी 2024 मध्ये ते पुन्हा एकदा एनडीएमध्ये सहभागी झाले आणि राष्ट्रीय जनता दलापासून (आरजेडी) त्यांनी फारकत घेतली.
2015 च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयू आणि आरजेडी एकत्र लढले आणि बहुमत मिळवून त्यांनी सरकारही स्थापन केलं. परंतु, 2017 मध्ये ही आघाडी तुटली.

बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला 122 जागांची आवश्यकता आहे.
बिहारमध्ये सध्या जेडीयू, भाजप आणि त्यांच्या घटक पक्षांचं एनडीए सरकार सत्तेवर आहे. तर आरजेडीचे तेजस्वी यादव हे बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत.
बिहार विधानसभेत सध्या भाजपचे 80 आमदार, आरजेडीचे 77, जेडीयूचे 45 आणि काँग्रेसचे 19 आमदारा आहेत.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (मार्क्ससिस्ट-लेनिनिस्ट) (लिबरेशन) 11, हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे (सेक्युलर) 4, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (मार्क्सवादी) 2, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे 2, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीनचे 1 आणि 2 अपक्ष आमदार आहेत.

राज्यात यावेळीही प्रमुख लढत ही एनडीए विरुद्ध महाआघाडी यांच्यातच होईल असं बोललं जात आहे.
एनडीएमध्ये जेडीयू, भाजप, एलजेपी (आर), जीतनराम मांझी यांचा हम (सेक्यूलर) आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चासारख्या पक्षांचा समावेश आहे.
तर महाआघाडीत आरजेडी, काँग्रेस, सीपीआय, सीपीआय (माले), विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी), जेएमएम आणि राष्ट्रीय एलजेपीचा समावेश आहे.
असदुद्दीन ओवैसींचा पक्ष एआयएमआयएम या दोन्ही आघाडीचा भाग नाही. 2020 च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने पाच जागा जिंकल्या होत्या, पण नंतर त्यांच्या चार आमदारांनी आरजेडीमध्ये प्रवेश केला होता.

फोटो स्रोत, Santosh Kumar/Hindustan Times via Getty Images

आत्तापर्यंत एनडीएने आणि महाआघाडीने जागा वाटपाची आकडेवारी जाहीर केलेली नाही. दोन्ही प्रमुख आघाड्यांमधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही.
जागा वाटपाबाबत अनेकदा चर्चेच्या बैठका झाल्या आहेत, मात्र अजून ठोस निर्णय झाल्याचे दिसत नाही. दोन्ही गटांतील छोटे पक्ष आपल्यासाठी 'सन्माननीय जागा' हवा असल्याचा आग्रह करत आहेत.
नितीश कुमार यांच्या प्रकृतीबाबतच्या बातम्या, जेडीयूमध्ये उत्तराधिकारीबाबत चर्चा, प्रशांत किशोर यांची एंट्री आणि चिराग पासवान यांच्या निवडणूक लढवण्याच्या बातम्यांमुळे यंदाची निवडणूक दिवसेंदिवस आणखी रंजक होताना दिसत आहे.
नितीश कुमार यांच्यापासून वेगळं होऊन प्रशांत किशोर यांनी आपला स्वतःचा पक्ष काढला. त्यांना बीबीसीनं किती जागा जिंकण्याचा विश्वास आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले होते की, त्यांचा पक्ष एकतर सत्तेत असेल किंवा पूर्ण जमिनीवर.
त्यांचा पक्ष सर्व 243 जागांवर उमेदवार उभा करेल आणि बेरोजगारी, स्थलांतर आणि शिक्षण यांसारख्या विषयांवर निवडणूक लढवेल.
याशिवाय बिहारमध्ये आणखी एका नवीन पक्षाचा उदय झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी आरजेडी अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आपला मोठा मुलगा तेजप्रताप यादव यांना त्यांच्या फेसबुक पोस्टनंतर पक्षातून काढून टाकलं होतं. आता त्यांनी आपला नवीन पक्ष तयार केला असून त्याचं नाव त्यांनी 'जनशक्ति जनता दल' असं ठेवलं आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए विकासाचा दावा करत निवडणुकीत उतरलं आहे. राज्याचा सर्व प्रकारे विकास केल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. तरुणांना रोजगार तसंच मुली आणि महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
तर महाआघाडी रोजगार, पेपर लीक आणि एसआयआर सारख्या मुद्द्यांवरून सरकारला एनडीएची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडून तरुणांना सरकारी नोकऱ्या आणि रोजगारासह इतर आश्वासनं दिली जात आहेत.

फोटो स्रोत, Santosh Kumar/Hindustan Times via Getty Images
तेजस्वी यादव यांच्यासह 'मत अधिकार यात्रा' करत असताना राहुल गांधींनीही अनेकदा एसआयआर आणि 'मत चोरी'चा मुद्दा उपस्थित केला आहे.
तर भाजप आणि जेडीयू याला नैराश्यातून केलेलं राजकारण म्हणत आहे. महाआघाडीची सत्ता आली तर राज्याचा विकास थांबेल असा त्यांचा आरोप आहे.

बिहारमध्ये विधानसभा निवडणुका 1952 पासून सुरू झाल्या. तेव्हापासून 2020 पर्यंत बिहारमध्ये 17 वेळा विधानसभा निवडणुका झाल्या आहेत.
फेब्रुवारी 2005 मध्ये झालेल्या निवडणुकीत सरकार स्थापन करण्यात अपयश आल्यानं ऑक्टोबरमध्ये पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या.

स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या म्हणजेच 1951 च्या निवडणुकीत अनेक पक्ष मैदानात उतरले होते. पण तेव्हा काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष होता.
त्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने 322 पैकी 239 जागा जिंकल्या होत्या.

फोटो स्रोत, http://postagestamps.gov.in/
1957 च्या निवडणुकीत, काँग्रेस 312 पैकी 210 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
1962 च्या निवडणुकीत, काँग्रेसने 318 पैकी 185 जागा जिंकत बहुमत मिळवलं. त्यानंतर 50 जागा मिळवत स्वतंत्र पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आला होता.
श्रीकृष्ण सिन्हा बिहारचे पहिले मुख्यमंत्री बनले होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











