वजन कमी करण्याची औषधं घेणं थांबवल्यावर शरीरात काय बदल होतात?

- Author, रुथ क्लेग आणि होली जेनिंग्ज
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"ते एखाद्या स्विचसारखं आहे, जे सुरू होताच तुम्हाला लगेचच प्रचंड भूक लागल्यासारखं वाटतं."
तान्या हॉलने अनेक वेळा वजन कमी करण्याचं औषधं घेणं थांबवण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा ती इंजेक्शन घेणं थांबवते, तेव्हा तिला 'फूड नॉइज' म्हणजे सतत खात राहण्याचा विचार परत येतो.
वजन कमी करण्याचे इंजेक्शन्स, किंवा जीएलपी-1एलने अनेकांसाठी असं काम केलं आहे जे 'डाएट' कधीच करू शकलं नाही. पोट भरलेलं असतानाही 'काहीतरी खा' असं सतत सांगणारा तो मनातला आवाज आता बंद झाला आहे.
आपण वजन कमी करू शकू असं ज्यांना कधीही वाटलं नाही, त्या लोकांना या औषधांनी एक नवीन शरीर, नवीन दृष्टीकोन आणि अनेकांना तर पूर्णपणे एक वेगळं जीवन दिलं आहे.
पण ही औषधं तुम्ही कायमस्वरूपी घेऊ शकत नाही, हो ना? खरं सांगायचं तर, हाच एक मोठा प्रश्न आहे, याबाबत कोणालाच नक्की माहिती नाही.
ही नवीन औषधं आहेत, जी जीएलपी-1 या नैसर्गिक हार्मोनप्रमाणेच काम करतात, जे भूक नियंत्रित करतं. याचा दीर्घकाळ वापर केल्यावर होणारे दुष्परिणाम आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत.
युनायटेड किंगडममध्ये अंदाजे 15 लाख लोक स्वतः पैसे देऊन हे इंजेक्शन घेत आहेत, त्यामुळे दीर्घकाळ औषध घेणं हे त्यांनाही परवडणारं नाही.
पण जेव्हा तुम्ही औषध घेणं थांबवण्याचा प्रयत्न करता, तेव्हा नक्की काय होतं? इथं आपण दोन महिलांचे अनुभव पाहूयात, त्यांच्या कथा वेगळ्या आहेत पण उद्देश समान आहे- वजन कमी करणं आणि ते टिकवून ठेवणं. याबाबत त्यांचा अनुभव कसा होता हे आपण जाणून घेऊया.
'सुरुवातीला दुष्परिणामही जाणवले'
"असं वाटलं जणू डोक्यातलं कुठलतरी बटणच दाबलंय आणि कुणीतरी सांगतंय की 'सगळं काही खाऊन टाक, खा खा, तू बऱ्याच दिवसांपासून काहीच खालेल्लं नाहीस, तुला आता हे खायला मिळायलाच हवं."
तान्या, एका मोठ्या फिटनेस कंपनीत सेल्स मॅनेजर आहे, तिने सुरुवातीला 'वेगॉव्ही' औषध घेतलं, कारण तिला स्वतःला सिद्ध करायचं होतं. ती जाड होती म्हणजे तिचं वजन जास्त होतं, तिला स्वत:बद्दल 'न्यूनगंड' होता. आपल्या वजनामुळे इंड्रस्टीत आपल्या मताला किंमत दिली जात नाही, असंही तिला वाटायचं.
जर ती बारीक किंवा सडपातळ असती तर लोकांनी तिला गांभीर्याने घेतलं असतं का?
शेवटी, तिची ही शंका खरी ठरली असं ती म्हणते. जेव्हा तिने इंजेक्शन्स घ्यायला सुरुवात केली, तेव्हा लोक तिच्याकडे येऊन तिचं वजन कमी झाल्याबद्दल अभिनंदन करू लागले. तिला अधिक आदराची वागणूक मिळत असल्याचं जाणवलं.

फोटो स्रोत, Tanya Hall
मात्र, उपचारांच्या सुरुवातीच्या काही महिन्यांत तान्याला झोप न येणं, सतत मळमळणं, डोकेदुखी अशा समस्या जाणवल्या. तिचे केसही गळू लागले. जे थेट औषधामुळे नसेल, पण झपाट्याने वजन कमी होण्याचा तो एक संभाव्य दुष्परिणाम असू शकतो.
"माझे केस मोठ्या प्रमाणात गळत होते," तिला आठवतं. पण वजनाच्या बाबतीत तिला हवे तसे परिणाम मिळत होते. "मी जवळपास 22 किलो वजन कमी केलं होतं."
आता 18 महिन्यांनंतर, जो एक छोटासा प्रयोग सुरू झाला होता, त्याचं रूपांतर आता पूर्ण जीवनशैली बदलात झालं आहे. तिने एकूण 38 किलो वजन कमी केलंय आणि तिने अनेकदा 'वेगॉव्ही' सोडण्याचा प्रयत्नही केला आहे.
पण प्रत्येक वेळी औषध थांबवल्यानंतर काही दिवसांतच ती इतकं खाऊ लागते की ती स्वतःच स्वतःला पाहून हादरून जाते.
आता असं असताना मग तिने औषध चालूच ठेवावं आणि त्यासोबत येणारे दुष्परिणाम सहन करावेत, की एका अनिश्चित अशा भविष्यात उडी घ्यावी? हा ही प्रश्न आहेच.
'... तर वजन वाढूही शकतं'
वेगॉव्हीची उत्पादक कंपनी 'नोवो नॉर्डिस्क'ने म्हटलं आहे की, उपचारांचे निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतले पाहिजेत आणि "यात दुष्परिणामांचाही विचार केला गेला पाहिजे."
वजन कमी करण्याची औषधे थांबवणं म्हणजे जणू 'एखाद्या कड्यावरून उडी मारण्यासारखं' वाटू शकतं, असं लाइफस्टाइल तज्ज्ञ डॉ. हुसेन अल-झुबैदी म्हणतात.
"मी अनेकदा असे रुग्ण पाहतो जे त्यांचं उद्दिष्ट गाठल्यानंतर थेट हाय डोसवरून औषध घेणं बंद करतात."
डॉ. अल-झुबैदी यांच्या मते हे एखाद्या 'हिमस्खलन किंवा त्सुनामी' सारखं असू शकतं. औषध थांबवल्यावर दुसऱ्याच दिवसापासून 'फूड नॉईज' परत येऊ शकतो.

ते म्हणतात की, आतापर्यंतच्या पुराव्यावरून असं दिसतं की, औषध थांबवल्यानंतर एक ते तीन वर्षांत लोकांचं 'वजन पुन्हा लक्षणीयरीत्या' वाढतं.
"तुम्ही जेवढं वजन कमी केलंय, त्यापैकी 60 ते 80 टक्के वजन पुन्हा वाढू शकतं."
एलन ओग्ली असं घडू नये म्हणून ठाम आहे. तिने वजन कमी करण्याचं औषध घेण्याचा निर्णय घेतला कारण तिचं वजन इतकं वाढलं होतं की, एका महत्त्वाच्या शस्त्रक्रियेदरम्यान 'माझा जीव गेला तरी चालेल' अशा आशयाच्या संमतीपत्रावर तिला सही करावी लागली होती.
'माऊन्जारो' सुरू करणं ही तिची 'स्वतःला सावरण्याची शेवटची संधी' होती, असं ती म्हणते.
"मी इमोशनल बिंज ईटर म्हणजे भावनेच्या भरात खूप खाणारी होते," असं ती सांगते.
"मी आनंदी असले तरी खूप खायचे, दुःखी असले तरी खायचे. कारण काहीही असो माझं स्वतःवर नियंत्रणच नव्हतं."
पण जेव्हा तिने इंजेक्शन्स घ्यायला सुरुवात केली, तेव्हा "ते सगळं एकदम बंद झालं."
'औषध बंद केल्यावर सल्ल्याची गरज'
'फूड नॉइज' नसलेल्या आयुष्यामुळे एलनला जेवणाशी तिचं नातं नव्याने मांडण्यासाठी वेळ मिळाला. तिने न्यूट्रिशनबद्दल (पोषण) वाचायला सुरुवात केली आणि एक सकस असा डाएट तयार केला जो तिच्या शरीराला ऊर्जा देईल.
औषध कमी करण्यापूर्वी ती 16 आठवडे औषध घेत होती, त्यानंतर तिने 6 आठवड्यांच्या कालावधीत हळूहळू डोस कमी केला. तिने 22 किलो वजन कमी केलं.
वजन कमी झाल्यावर तिला जाणवलं की ती जास्त व्यायाम करू शकते. आता जेव्हा तिला कंटाळा येतो किंवा उदास वाटतं तेव्हा खाण्याऐवजी ती धावायला जाते.
पण जेव्हा एलनने 'माऊन्जारो' घेणं थांबवलं, तेव्हा तिचं वजन हळूहळू वाढू लागलं, ज्यामुळे ती थोडी अस्वस्थ झाली.
डॉ. अल-झुबैदी म्हणतात की, "याचवेळी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. ब्रिटनच्या 'नाइस' या संस्थेनं शिफारस केली आहे की, औषध थांबवल्यानंतर रुग्णांना किमान एक वर्ष सल्ला आणि वैयक्तिक प्लॅन दिला जावा, जेणेकरून ते आपल्या जीवनात बदल करून वजन नियंत्रणात ठेवू शकतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निरोगी राहतील."

फोटो स्रोत, Ellen
पण तान्या आणि एलनसारख्या खासगी औषध खरेदी करणाऱ्यांसाठी अशा प्रकारच्या सपोर्ट किंवा मदतीची नेहमीच खात्री नसते.
गेल्या काही महिन्यांपासून तान्याचं वजन स्थिर आहे आणि तिला वाटतं की औषधाचा आता फारसा परिणाम होत नाहीये. पण औषध सोडणार नाही, असं ती म्हणते.
शेवटी ती अशा एका वजनावर पोहोचली आहे, जिथे तिला बरं वाटतं. प्रत्येक वेळी तिने औषध सोडण्याचा प्रयत्न केला की, वजन वाढण्याची भीती इतकी वाढते की तिला औषध पुन्हा सुरू करण्यासाठी काहीतरी कारण सापडतं.
"माझ्या आयुष्यातील पहिली 38 वर्षं मी ओव्हरवेट होते आता मी 38 किलोंनी कमी आहे," तान्या सांगते.
"काही वेळा असं वाटतं की, मी हे औषध घेणं सोडू शकत नाही, कारण यामुळे मला छान वाटतं आणि सगळं माझ्या ताब्यात असल्यासारखं वाटतं."
ती एक क्षण थांबते. "कदाचित उलटंही असू शकतं," ती विचार करते, "कदाचित ते औषधच आहे जे मला नियंत्रित करतंय."
'योग्य मदत न मिळाल्यास अडचणीची शक्यता'
डॉ. अल-झुबैदी स्पष्ट करतात, "हे सगळं 'एक्झिट स्ट्रॅटेजी' असण्याबद्दल आहे. प्रश्न असा आहे की, इंजेक्शन सोडल्यावर या लोकांचे अनुभव कसे आहेत?
त्यांना भीती वाटते की, औषध सोडताना योग्य मदत न मिळाल्यास अधिक अडचण होईल, कारण मुळातच समाजात मोठ्या प्रमाणात अन्नाबाबत गैरसमज आहे.
"लोक ज्या वातावरणात राहतात, ते आरोग्याला चालना देणारं असावं, वजन वाढण्याला नाही."
"लठ्ठपणा हे जीएलपी-1 हॉर्मोनच्या कमतरतेमुळे होत नाही," असे ते म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
काही बाबतीत वजन कमी करण्याचं औषध थांबवणं हे नशिबाचा खेळ खेळण्यासारखं आहे. तुमची जीवनशैली, तुम्हाला मिळणारी मदत, तुमची मानसिकता आणि वेळ या सर्व गोष्टींवर तुमचं भविष्य अवलंबून असतं.
तान्या अजूनही औषध घेत आहे आणि तिला या निर्णयाचे फायदे-तोटे पूर्णपणे माहीत आहेत.
एलनला वाटतं की, तिच्या आयुष्यातील तो अध्याय आता संपला आहे. तिने आता 51 किलोपेक्षा जास्त वजन कमी केलं आहे.
ती म्हणते, "'माऊन्जारो' नंतरचं आयुष्यही स्थिर असतं, हे लोकांना कळावं असं मला वाटतं."
माऊन्जारो बनवणारी कंपनी 'एली लिली' म्हणते की, "रुग्णांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे" आणि ते या संदर्भात सतत मॉनिटरिंग आणि माहिती पुरवण्याचं काम करत असतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











