अमरीश पुरी यांनी 'मोगॅम्बो'मधून सगळ्यांना 'खुश' कसं केलं? एका खलनायकात असा दडला होता हिरो

फोटो स्रोत, MADHAV AGASTI
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी
ते 1987 साल होतं. शेखर कपूर यांचा 'मिस्टर इंडिया' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपट सुपरहिट झाला होता, प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला होता.
मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या चित्रपटाच्या हिरोपेक्षा चित्रपटाचा खलनायकच लोकांच्या जास्त लक्षात राहिला होता. खलनायकच सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. तो खलनायक म्हणजे, मोगॅम्बो... अर्थातच अमरीश पुरी.
मोगॅम्बो या पात्रानं आणि 'मोगॅम्बो खुश हुआ' या संवादानं आबालवृद्धांना वेड लावलं.
अमरीश पुरी यांनी अत्यंत ताकदीनं साकारलेलं 'मोगॅम्बो' हे पात्र बॉलीवूडच्या इतिहासातील एक मैलाचा दगड मानलं जातं.
बालाजी विठ्ठल यांनी 'प्युअर इविल द बॅडमॅन ऑफ बॉलीवूड' हे पुस्तक लिहिलं आहे.
या पुस्तकात बालाजी लिहितात, "चित्रपटात खलनायकाची जितकी रुपं असू शकतात, तितकी सर्व मोगॅम्बोच्या भूमिकेत ती सर्व उमटली होती. मात्र महिलांवरील हिंसा त्याला आवडत नव्हती. सर्वांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मोगॅम्बोची लकब अगदी लहान मुलांसारखी होती."
"त्याच्या माणसांना हिटलरच्या शैलीत 'हेल मोगॅम्बो' म्हणायला लावणं आणि प्रत्येक गुन्ह्यानंतर 'मोगॅम्बो खुश हुआ' ही पंचलाइन म्हणणं, यामुळे प्रेक्षकांच्या नजरेत त्याचा दुष्टपणा कमी झाला होता. प्रेक्षक त्याच्या या शैलीवर, हावभावावर टाळ्या वाजवत होते."

फोटो स्रोत, RAJEEV PURI
अमरीश पुरींचा जन्म पंजाबमधील नवांशहरमध्ये झाला होता. त्यांनी सिमल्यातील बीएम कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं होतं.
पन्नासच्या दशकात ते मुंबईत आले. त्यांचे दोन भाऊ मदन पुरी आणि चमन पुरी मुंबईत आधीपासूनच चित्रपटांमध्ये काम करत होते.
अमरीश पुरी त्यांच्या ट्रेडमार्क हॅट, रुंद खांदे, उंचपुरी मजबूत शरीरयष्टी आणि रुबाबदार आवाजासाठी प्रसिद्ध होते. त्यांना अभिनयाची पहिली संधी भारतीय नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या अल्काझी यांनी दिली.
अमरीश पुरींचे मित्र एस. पी. मेघनानी त्यांना अल्काझींना भेटण्यासाठी घेऊन गेले होते.

फोटो स्रोत, MADHAV AGASTI
अमरीश पुरी यांनी 'द ॲक्ट ऑफ लाईफ' हे आत्मचरित्र लिहिलं आहे.
त्यात त्यांनी लिहिलं आहे, "अल्काझी यांनी पाच मिनिटांतच माझ्या हाती एक स्क्रिप्ट दिली. त्यामुळे माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला. मला माहित होतं की मी लांब दालनात असलेल्या त्यांच्या टेबलाकडे जात असताना ते माझ्यावर लक्ष ठेवून होते."
"त्यांनी मला विचारलं की नाटकांमध्ये मला रस आहे का? मी हो म्हणताच, ते खाली वाकले आणि त्यांनी एक स्क्रिप्ट काढली. त्याच क्षणी त्यांनी मला सांगितलं की मी आर्थर मिलर यांच्या 'अ व्यूह फ्रॉम द ब्रिज' या नाटकातील मुख्य नायकाची भूमिका करणार आहे."
त्यानंतर अमरीश पुरी यांनी मागे वळून पाहिलं नाही.
'सखाराम बाईंडर'मुळे मिळाली प्रसिद्धी
नंतर अमरीश पुरी यांनी सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांच्या 'सखाराम बाईंडर' या प्रसिद्ध नाटकात काम केलं. त्यातून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली.
हे नाटक एका अविवाहित पुस्तक बांधणाऱ्याची म्हणजे बाईंडरची कथा होती. तो एका बेघर महिलेला घरी आणतो आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवतो.
या नाटकात अमरीश पुरी यांना काही अश्लील शब्दांचा वापर करायचा होता.
एका महिलेचं शोषण करणाऱ्या एका व्यक्तीच्या अशा कामाला योग्य कसं ठरवलं जाऊ शकतं? असं म्हणत या नाटकाला प्रचंड विरोध झाला होता.
अमरीश पुरी यांनी लिहिलं आहे, "महाराष्ट्रासारख्या नाटकांची समृद्ध परंपरा असणाऱ्या लोकांनी या नाटकाला अश्लील मानलं, या गोष्टीचं मला प्रचंड आश्चर्य वाटलं होतं. ही खूप दुर्दैवी गोष्ट होती."
"कारण आपल्याला सर्वांना माहित आहे की प्रत्यक्ष आयुष्यातील अनुभव कितीही कुरुप आणि धक्कादायक असला, तरी रंगमंचावर तो कलेच्या थरांमधून सादर केला जातो."

फोटो स्रोत, Getty Images
अमरीश पुरी यांचे आणखी एक मार्गदर्शक आणि नाटकांच्या दुनियेतील गुरू म्हणजे सत्यदेव दुबे.
एकदा ते अमरीश पुरी यांची आठवण काढत म्हणाले होते, "अमरीश एकाच वेळी नोकरी आणि नाटकात काम करत होता. ते सोपं नव्हतं. तो त्याच्या वेळेचं योग्य नियोजन करायचा. त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती."
"वाढत चाललेल्या कुटुंबासाठी अतिरिक्त पैसे कमावण्याची आवश्यकता देखील होती. नाटकांमधून त्याला अजिबात पैसे मिळत नसत. शेवटी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी त्यानं नाटकांमध्ये काम करणं कमी केलं."
"मात्र तोपर्यंत त्यानं हिंदी नाट्यसृष्टीत इतर कोणत्याही अभिनेत्यापेक्षा जास्त योगदान दिलं होतं."
सत्यदेव दुबे यांनी अमरीश पुरी यांच्या नम्र स्वभावाबद्दल देखील त्यांचे विचार व्यक्त केले आहेत.
ते म्हणाले, "कोणत्याही कलाकाराला माझ्याकडून इतका ओरडा खावा लागला नसेल जितका अमरीशला माझ्याकडून खावा लागला. मात्र यामुळे तो कधीही निराश झाला नाही आणि कधीही त्याचा स्वाभिमान दुखावला गेला नाही."
"एका कार्यशाळेत मी त्याला म्हटलं होतं की महिलांमध्ये त्यांच्या समर्पणामुळे शिकण्याची क्षमता जास्त असते. मी पुढे असंही म्हटलं होतं की अमरीश हा नाट्यसृष्टीतून मला भेटलेली सर्वोत्तम महिला आहे."
श्याम बेनेगल यांनी उघडले चित्रपटांचे दरवाजे
अमरीश पुरी यांच्या अभिनयाची क्षमता ओळखून सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी, 'मंथन', 'निशांत' आणि 'भूमिका' या त्यांच्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये त्यांना संधी दिली.
त्याचा परिणाम असा झाला की श्याम बेनेगल आणि अमरीश पुरी ही समांतर सिनेमातील जोडी बनली.
विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे अमरीश पुरी यांनी त्यांचा पहिला चित्रपट केला, तेव्हा त्यांचं वय चाळीस वर्षांचं होतं.
श्याम बेनेगल एका मुलाखतीत म्हणाले होते, "अमरीशला नाटकात काम करताना पाहायचो. 'निशांत'मध्ये घेण्याआधी एक मित्र म्हणून त्याच्याशी माझा परिचय होता. 'निशांत'साठी मला एक अत्यंत प्रभावशाली व्यक्ती हवा होता."
"अमरीशच्या व्यक्तिमत्वात जो प्रभावीपणा होता, तो पडद्यावर दिसून आला. त्यानं इतका उत्कृष्ट अभिनय केला की त्याच्यात सुधारणा करण्याची गरजच पडली नाही."
ते म्हणाले, "अमरीशनं मंडीमध्ये एका फकीराची भूमिका केली. त्यानं उत्कृष्ट अभिनय केला. तरुण कलाकारांबरोबर त्याचा खूप उत्तम ताळमेळ असायचा. सरदारी बेगममध्ये स्मृति मिश्रा ही तरुण अभिनेत्री होती. ती खूप घाबरलेली होती. तिला योग्य अभिनय जमत नव्हता."
"त्यामुळे मी चिडून तिच्यावर ओरडत होतो. मात्र, अशावेळी अमरीशनं तिला खूप धीर दिला. तिचा आत्मविश्वास वाढवला."

फोटो स्रोत, Getty Images
स्वत: अमरीश पुरी यांनी मान्य केलं होतं की श्याम बेनेगल यांच्याबरोबर काम केल्यामुळे त्यांचं करियर फुललं.
आत्मचरित्रात अमरीश यांनी लिहिलं आहे, "चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या दृश्याबद्दल श्याम खूप स्पष्ट असतात. त्यांच्या योजनेत कोणत्याही प्रकारचा अडथळा त्यांना अजिबात चालत नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की ते सूचना स्वीकारत नाहीत आणि सुधारणांना प्रोत्साहन देत नाहीत."
"त्यांचं फक्त एवढंच म्हणणं असतं की त्यांच्या सूचनांमध्ये कोणताही बदल करण्याआधी त्यांना माहिती देण्यात आली पाहिजे."
"श्याम आणि गोविंद निहलानी, दोघांना माहित होतं की त्यांना माझ्याकडून काय हवं आहे. मला हे माहित आहे की ते मला पडद्यावर कसं सादर करतील. ते मला फक्त ठोस आणि अर्थपूर्ण भूमिकाच देतील. मी इतर कोणाबरोबर समांतर सिनेमा करूच शकत नव्हतो."
विजय तेंडुलकरांनी लिहिलेल्या अनेक नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये अमरीश पुरी यांनी काम केलं आहे.
त्यांनी अमरीश पुरी यांचं कौतुक करताना लिहिलं होतं, "मी पहिल्यांदा अमरीशला जेव्हा रंगमंचावर पाहिलं होतं, तेव्हा त्याच्या काम करण्याच्या गतीमुळे मी आकृष्ट झालो. त्याचा आवाज देखील रंगमंचाला अनुकूल होता. सखाराम बाइंडरमधील अभिनय तर त्यानं जीव ओतून केला होता."
"नाटकांनी त्याच्यातील अभिनेत्याला पैलू पाडले होते. त्यांचा अभिनय यांत्रिक नव्हता. 'सूरज का सातवाँ घोडा' या चित्रपटात तो त्याच्या अभिनयाची छाप तुमच्यावर सोडतो."
अमरीश पुरी यांनी दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्याबरोबर काम केलं होतं. गिरीश कर्नाड यांना त्यांनी 'तत्वज्ञानी नाटककारा'ची पदवी दिली होती.

फोटो स्रोत, Getty Images
गिरीश कर्नाड यांनी 'द लाइफ ॲट प्ले' नावानं आत्मचरित्र लिहिलं आहे.
त्यात अमरीश पुरी यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दल ते लिहितात, "अमरीश जेव्हा तालीम करत नसायचे, तेव्हा ते ग्रुपच्या बाहेर टेहळत राहायचे. सत्यदेव दुबे त्यांना प्रशिक्षण द्यायचे, दिग्दर्शित करायचे आणि वेळप्रसंगी ओरडायचे."
"मला जेव्हा 'काडू' चित्रपटात दिग्दर्शकाची संधी मिळाली, तेव्हा मी अमरीशना घेतलं. अमरीश यांना कन्नड भाषा येत नव्हती, ही गोष्ट चित्रपटासाठी मोठा अडथळा बनली."
"काही संवाद पाठ करण्यासाठी ते तासनतास प्रयत्न करायचे. मात्र कॅमेरा सुरू होताच विसरायचे आणि कपाळावर हात मारायचे."
गिरीश कर्नाड लिहितात, "मला संपूर्ण चित्रपटातील त्यांचे संवाद कमी करून फक्त सहा ओळींचे करावे लागले. त्याचा परिणाम असा झाला की एकप्रकारे ते चित्रपटातील मूकपात्र झाले. मात्र संवाद कमी असतानादेखील त्यांनी त्यांच्या अभिनयानं स्वत:ला चित्रपटात झोकून दिलं होतं."
काडू चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप मोठा हिट ठरला.
'तमस'मधील अविस्मरणीय भूमिका
दृश्यातील एखादा क्षण पकडण्याची अद्भूत क्षमता अमरीश पुरी यांच्यात होती.
त्यांच्याबरोबर राहिलेले आणि अनेक चित्रपटांमध्ये त्यांचे दिग्दर्शक राहिलेले गोविंद निहलानी सांगतात, "तमसमध्ये अमरीश यांनी अप्रतिम काम केलं आहे. त्यात त्यांनी एका वृद्ध शिखाची भूमिका केली आहे. हा शीख लढाऊ बाण्याचा असतो."
"एका दृश्यात ते त्यांच्या नातवाबरोबर आणि सूनबरोबर बसलेले आहेत. त्यांचा मुलगा तिथे नाही. हे दृश्य इतर कोणताही अभिनेता करू शकत नव्हता. त्या दृश्यात त्यांना अरदासच्या काही ओळ्या म्हणायच्या होत्या. त्यांनी अरदास पाठ तर केली, मात्र सत्संगमध्ये देण्यात येणारं भाषण पाठ करू शकले नाहीत."
"यावर उपाय म्हणून आम्ही एक बोर्ड लावला. त्यावर तो उतारा लिहिला जाऊ शकत होता. अमरीश यांनी तो पॅरा स्वत:च्या हातानं उर्दूमध्ये लिहिला. आम्ही बोर्ड वेगवेगळ्या कॅमेऱ्यांच्या पोझिशननुसार लावला होता. अमरीश यांनी एकाच टेकमध्ये तो शॉट दिला."

फोटो स्रोत, GOVIND NIHLANI
सुभाष घई हिंदी चित्रपटसृष्टीत शोमॅन म्हणून ओळखले जातात. सुभाष घई यांनी त्यांच्या 'क्रोधी' या चित्रपटात अमरीश पुरी यांना खलनायकाची भूमिका दिली होती.
सुभाष घई सांगतात, "मी जेव्हा 'विधाता' आणि 'सौदागर' हे चित्रपट बनवले. तेव्हा मला दिलीप कुमार यांच्यासमोर एका दमदार, प्रभावी अभिनेत्याची आवश्यकता होती. मी ते पात्र अमरीश पुरी यांना दिलं होतं. त्यांनी दोन्ही चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला."
"मी त्यांना असा अभिनेता मानतो, ज्यानं कधीही त्यांच्या दिग्दर्शकाला निराश केलं नाही. ते जेव्हा सेटवर असायचे, तेव्हा मैत्री बाजूला ठेवून दिग्दर्शकाकडे नेहमीच एक प्रशिक्षक म्हणून पाहायचे. 'यादें' चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस मी त्यांच्यावर ओरडलो होतो."
"मात्र त्यांनी त्या गोष्टीचं वाईट मानून घेतलं नाही. नंतर मला त्या गोष्टीची खूप लाज वाटली आणि मी जाऊन त्यांची माफी मागितली होती."
'गांधी' चित्रपटातील भूमिका
अमरीश पुरी यांनी सर रिचर्ड ॲटनबरो यांच्या प्रसिद्ध 'गांधी' या चित्रपटात देखील काम केलं होतं. त्यांना दक्षिण आफ्रिकेतील खान, या श्रीमंत व्यापाऱ्याची भूमिका देण्यात आली होती. हा व्यापारी गांधीजीना जे भारतासाठी हवं होतं, ते मिळवण्यासाठी मदत करतो.
सर रिचर्ड ॲटनबरो यांचा अमरीश पुरी यांच्यावर मोठा प्रभाव पडला होता.
अमरीश पुरी त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात, "गांधी चित्रपटाची पटकथा ॲटनबरो 16 वर्षे जगले. त्या कालावधीत त्यांनी पटकथेच्या एक एक शब्दाची अचूकतेनं मांडणी केली. चित्रीकरण सुरू होण्याच्या एक महिना आधी सर्वांना स्क्रिप्टची प्रत देण्यात आली होती."
"सर्व अभिनेत्यांकडून अपेक्षा असायची की सर्वजण जेव्हा सेटवर येतील तेव्हा त्यांना त्यांचे संवाद पाठ असले पाहिजेत. ॲटनबरो खूपच संयमी दिग्दर्शक आहेत. ते कॅमेऱ्याच्या बरोबर खाली बसायचे."
"ते इतक्या कोमल आवाजात साऊंड, ॲक्शन म्हणायचे की कधी-कधी तर त्यांचे शब्दच ऐकू यायचे नाहीत. अभिनेत्यांची एकाग्रता भंग होऊ नये म्हणून ते स्वत:चा आवाज खालच्या पट्टीत ठेवायचे."

फोटो स्रोत, Getty Images
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग यांनीदेखील अमरीश पुरी यांना 'इंडियाना जोन्स' या त्यांच्या चित्रपटात खलनायकाची भूमिका दिली होती.
सुरुवातीला 'इंडियाना जोन्स' चित्रपटाची पटकथा अमरीश पुरी यांना आवडली नव्हती. मग त्यांनी ॲटनबरो यांना फोन करून त्यांचा सल्ला घेतला होता.
ॲटनबरो यांनी अमरीश पुरींना सांगितलं होतं, "मूर्खपणा करू नकोस. मी स्टीव्हन यांना जगातील सर्वात महान चित्रपट निर्मात्यांपैकी एक मानतो. जर स्टीव्हन यांनी तुला बोलावलं असेल तर त्यांच्या मनात तुझ्यासाठी नक्कीच काहीतरी असेल. हा माणूस साध्यासोप्या कथेमध्ये देखील प्राण फुंकतो."
अमरीश पुरी यांनी ॲटनबरो यांचा सल्ला ऐकला.
नंतर अमरीश पुरी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं, "स्पिलबर्ग एखाद्या साध्या विषयालादेखील आश्चर्यकारक बनवू शकतात. ते इतके प्रचंड परिश्रम करतात की एका चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना ते किमान दोन चित्रपटांच्या स्क्रिप्टवर काम करत असतात."
"दोन वर्षे लावून जोपर्यंत ते स्क्रिप्टमध्ये व्यापक संशोधन, अभ्यास करत नाहीत, तोपर्यंत त्या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करत नाहीत."
घड्याळं आणि बूट गोळा करण्याचा छंद
अमरीश पुरी यांच्याबद्दल म्हटलं जातं की त्यांनी भारतात टकलाचं रुपांतर फॅशनमध्ये केलं.
कधीकाळी त्यांच्या डोक्यावर दाट केस होते. 'दिल तुझको दिया' या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश कुमार यांनी 'दादा'च्या भूमिकेसाठी मुंडण करण्यासाठी अमरीश पुरी यांचं मन वळवलं.
त्यांना सांगण्यात आलं की चित्रपट दीड महिन्यात तयार होईल. मात्र चित्रपट पूर्ण होण्यास दीड वर्ष लागलं.
या कालावधीत अमरीश पुरी यांना त्या केशविरहित डोक्याची सवय झाली. त्यानंतर त्यांनी कधीही डोक्यावर केस वाढवले नाहीत. मात्र सूर्याच्या उष्णतेचा त्रास झाल्यावर ते हॅट घालायचे.
हळूहळू ती हॅट त्यांची ओळख आणि ट्रेडमार्क बनली. मग त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या हॅट गोळा करण्यास सुरुवात केली.
हॅटव्यतिरिक्त त्यांना बूट आणि घड्याळं गोळा करण्याचाही छंद होता.
अमरीश पुरी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे, "माझ्या मापाचे बूट मिळणं खूप कठीण आहे. त्यामुळेच एकदा मी आग्र्याला गेलो असताना बुटांचे एकदम 65 जोड विकत घेतले."
"मात्र तो स्टॉकदेखील लवकरच संपला. चित्रीकरणाच्या वेळेस जर मला एखादा बूट आवडला, तर मी निर्मात्याला तो मला भेट देण्यास सांगतो."

फोटो स्रोत, Getty Images
लोकांच्या हावभावांचं निरीक्षण करण्याची त्यांना सवय होती.
अमरीश पुरी यांचे पुत्र राजीव पुरी यांनी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं, "कारमधून जाताना ते लक्ष द्यायचे की पोलीस हवालदारचा युनिफॉर्म कसा आहे, तो कसा घातला आहे आणि त्याचे बूट किती जुने आहेत. 'गर्दिश' चित्रपटात त्यांनी ही भूमिका उत्तम वठवली होती."
अमरीश पुरी यांनी एकूण 316 चित्रपटांमध्ये काम केलं. श्याम बेनेगल यांचा 'नेताजी सुभाष चंद्र बोस, द फॉरगॉटन हिरो' हा चित्रपट अमरीश पुरी यांचा शेवटचा चित्रपट होता.
अमरीश पुरी यांना रक्ताचा कर्करोग झाला होता. 12 जानेवारी 2005 ला वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
फार थोड्या चित्रपट कलाकारांना संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. 1979 मध्ये या महान कलाकाराला रंगमंचावरील त्यांच्या योगदानासाठी त्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











