नेहरूंच्या उपस्थितीत 64 वर्षांपूर्वी झालेल्या भावनगर अधिवेशनात कोणते ठराव मंजूर झाले होते?

    • Author, आर्जव पारेख
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन 8 आणि 9 एप्रिलला अहमदाबादमध्ये होतं आहे.

गुजरातमधील काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये विशेष उत्साह निर्माण करणारी ही गोष्ट आहे. कारण काँग्रेसचं गुजरातमधील शेवटचं अधिवेशन 1961 मध्ये झालं होतं.

1960 मध्ये भाषावार प्रांतरचनेनुसार गुजरात राज्याची स्थापना झाल्यानंतर ते अधिवेशन झालं होतं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गुजरातमधील ते काँग्रेस पक्षाचं पहिलंच अधिवेशन होतं.

गुजरातमधील सौराष्ट्र भागातील भावनगर या छोट्या शहरात त्या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं.

गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार प्रदीर्घ काळ होतं. मात्र गेल्या 30 वर्षांपासून काँग्रेस गुजरातमधील सत्तेपासून दूर आहे. जवळपास 64 वर्षांनंतर गुजरातमध्ये राष्ट्रीय अधिवेशन होत असल्यामुळे पक्षासाठी हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे.

मात्र ज्यावेळेस भावनगरमध्ये काँग्रेस पक्षाचं अधिवेशन झालं होतं, त्यावेळेस कसं वातावरण होतं? काँग्रेस पक्षाची स्थिती त्यावेळेस कशी होती? अधिवेशनासाठी भावनगर हेच ठिकाण का निवडण्यात आलं होतं?

अधिवेशनाला कोणत्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती? त्या अधिवेशनात कोणते महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले होते? या सर्व मुद्द्यांचा आढावा या लेखात घेऊया.

1961 मध्ये भावनगरच्या अधिवेशनात काय झालं होतं?

6 -7 जानेवारी 1961 ला भावनगरमधील सध्याच्या सरदारनगर परिसरात काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं. जे कार्यकर्ते त्यात सहभागी झाले होते, त्यांच्या मते हा सर्व कार्यक्रम सात दिवस चालला होता.

त्यात दोन दिवसांच्या राष्ट्रीय अधिवेशनाबरोबर इतरही अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

काँग्रेसच्या त्या 66 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष नीलम संजीवा रेड्डी होते. स्वागत समितीचे अध्यक्ष ठाकोरभाई देसाई होते. तर सरचिटणीसपदी जी. राजगोपालन आणि सादिक अली होते. अधिवेशनाचे कोषाध्यक्ष महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते.

80 वर्षांचे काँग्रेस कार्यकर्ते सतीशभाई चावडा हे त्या अधिवेशनला उपस्थित होते. त्यावेळेस ते तरुण होते.

ते म्हणतात, संपूर्ण शहरात बातमी पसरली होती की, 'नेहरू चाचा येत आहेत... नेहरू चाचा येत आहेत.' भावनगरच्या विमानतळावर पंडित जवाहरलाल नेहरूंचं स्वागत करण्यासाठी महाराजा कृष्ण कुमारसिंह गेले होते.

सतीशभाई पुढे सांगतात, "महाराजा फार क्वचित सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसत असत आणि त्यांची एक प्रकारची क्रेझ होती. जीपमध्ये ते काश्मिरी टोपी घालून जवाहरलाल नेहरूंच्या शेजारी उभे होते."

"रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी इतकी प्रचंड गर्दी केली होती की चालण्यासाठीदेखील जागा शिल्लक राहिली नव्हती. त्या तुलनेत सध्याच्या राजकीय नेत्यांच्या सभा काहीच नाहीत."

सतीशभाई पुढे म्हणतात, "काँग्रेसनं भावनगरच्या जवाहर मैदानात (आता ते गढेडिया मैदान म्हणून ओळखळं जातं) एक प्रदर्शन भरवलं होतं. वेगवेगळ्या राज्यांमधील प्रतिनिधींनी तिथे स्टॉल लावले होते. दररोज हजारो गावकरी स्थानिक बसनं प्रवास करून तिथे येत असत."

"ते प्रदर्शन रात्री 11:00 पर्यंत खुलं असायचं. त्या अधिवेशनामुळे भावनगर शहराला अर्थव्यवस्थेला चालना मिळाली होती."

आज 91 वर्षांचे असलेले बालूभाई पटेल हे देखील काँग्रेसच्या भावनगरच्या अधिवेशनला उपस्थित होते. त्यावेळेस ते सेवा दलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते.

ते म्हणतात, "आम्ही भावनगरमध्ये 12 दिवस राहिलो होतो. अधिवेशनासाठी एक आख्खं तात्पुरतं शहर वसवण्यात आलं होतं. मीसुद्धा त्या कामात सहभागी झालो होतो."

बालूभाई पुढे म्हणतात, "निवासाची व्यवस्था, शौचालयं, स्वयंपाकघरं, व्हीआयपींचं स्वागत आणि बैठका घेण्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. सेवा दलाच्या स्वयंसेवकांवर या सर्व कामांची जबाबदारी होती. कार्यक्रमाचं ठिकाण जवळपास 20 एकरांच्या परिसरात विस्तारलेलं होतं."

अधिवेशनाबद्दल बालूभाई आणखी सांगतात, "संपूर्ण देशभरातून काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अधिवेशनाला उपस्थित होते. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणीच रेल्वेचं एक तिकिट काउंटर उभारण्यात आलं होतं."

"अधिवेशनाच्या ठिकाणी तंबू असो, पार्टिशन असो की व्यासपीठ असो, जिथे जिथे कापड वापरले जाणार असेल तिथे तिथे फक्त खादीचा वापर केला जायचा. कारण तोपर्यंत काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते गांधीवादी मूल्यांशी खोलवर जोडलेले होते."

सतीश चावडा सांगतात, "सध्याच्या रूपानी आणि सरदारनगर परिसरापलीकडे त्यावेळेचं भावनगर विस्तारलेलं नव्हतं. त्यामुळे मोकळ्या जागेत मोठाले तंबू उभारण्यात आले होते. तिथे राज्यानुसार कार्यकर्त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती."

त्यावेळेस भारत आणि गुजरातमधील राजकीय परिस्थिती कशी होती?

महागुजरात चळवळीमुळे 1 मे 1960 ला गुजरात राज्याची स्थापना झाली. त्यानंतर आठ महिन्यांच्या आतच काँग्रेसचं अधिवेशन भावनगरमध्ये झालं होतं.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री सुरेश मेहता देखील बीबीसीशी बोलले. 1961 जेव्हा हे अधिवेशन झालं, तेव्हा सुरेश मेहता राजकारणात नवीनच होते. ते अद्याप जनसंघात गेले नव्हते.

ते म्हणाले, "देशाला स्वातंत्र्य मिळून फक्त 13 वर्षेच झाली होती. काँग्रेस पक्षावर अजूनही गांधीजींचा प्रभाव होता, मात्र पक्षाच्या अधोगतीची चिन्हं दिसू लागली होती."

सुरेश मेहता यांच्या मते, "काँग्रेस पक्षाची वाटचाल शिस्तबद्ध संघटनात्मक संस्कृतीकडून वैयक्तिक नेत्यांच्या वर्चस्वाकडे होत होती. मला वाटलं की काँग्रेसमधून गांधीजींची मूल्यं लोप पावत आहेत. त्यामुळे मला दु:ख झालं होतं. तो लोकशाहीमध्ये अजूनही तत्वं अस्तित्वात असण्याचा काळ होता."

84 वर्षांचे रमणिकभाई पांड्या भावनगरचे माजी महापौर आहेत. त्यांनी काँग्रेसमध्ये सात दशकं काम केलं आहे. ते म्हणतात, "असं म्हणता येईल की त्यावेळेस काँग्रेस सोडून इतर कोणताही राजकीय पक्ष नव्हता. असंही म्हणता येईल की सर्व नेते काँग्रेसचाच भाग होते."

सतीशभाई चावडा पुढे म्हणतात, "लोकांचा फक्त काँग्रेसवरच विश्वास होता. जवाहरलाल नेहरूंची लोकप्रियता अतुलनीय होती."

काँग्रेसच्या अधिवेशनासाठी भावनगर हे ठिकाण का निवडण्यात आलं?

ठाकोरभाई देसाई, अधिवेशनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या मते, पक्षानं गुजरातमध्ये अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर गुजरात प्रदेश काँग्रेस समितीनं अधिवेशनासाठी भावनगरची निवड केली होती.

पी. के. लाहेरी निवृत्त आयएएस अधिकारी आणि गुजरातचे माजी मुख्य सचिव आहेत. त्यांचे वडील कानूभाई लाहेरी यांच्याबरोबर जेव्हा ते अधिवेशनला गेले होते, तेव्हा त्यांचं वय 16 वर्षांचं होतं. कानूभाईंनी त्या अधिवेशनात सक्रिय सहभाग घेतला होता.

पी. के. लाहेरी म्हणतात, "त्यावेळेस बलवंतराय मेहता हे भावनगरमधील प्रमुख राजकीय नेते होते. त्यांनी पंचायत राज वर एक अहवाल तयार केला होता आणि 1960 च्या दशकात अनेक राज्यांमध्ये पंचायत राजची अंमलबजावणी सुरू झाली होती."

"काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन भावनगरमध्येच व्हावं यासाठी बलवंतराय मेहता आग्रही होते."

गुजरातचे माजी मुख्यमंत्री सुरेश मेहता म्हणतात, "अधिवेशन भावनगरमध्ये भरवण्यात बलवंतराय मेहता यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पंडित नेहरू म्हणाले होते की लोकशाही तळागाळात पोहोचली पाहिजे. त्यातूनच पंचायत राजसंदर्भात बलवंतराय मेहता समितीची स्थापना झाली होती."

"भावनगरमध्ये लोकभारती सारख्या शैक्षणिक संस्था होत्या. भावनगरमधील लोक तत्वांसाठी कटिबद्ध आहेत हे सर्वज्ञात होतं. त्यामुळे अधिवेशनसाठी भावनगर हे एक आदर्श ठिकाणं झालं होतं. पुढे जाऊन भावनगरमध्ये अधिवेशन भरवण्याचा निर्णय योग्य ठरला."

लेखक आणि संपादक प्रकाश एन शाह म्हणतात, "भावनगरनं सौराष्ट्रमध्ये नेहमीच मध्यवर्ती भूमिका बजावली आहे. भावनगरचं स्वत:चं एक सांस्कृतिक महत्त्व आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात आणि प्रभाशंकर पट्टणी यांच्या काळात भावनगरनं काँग्रेसबरोबर सक्रियपणे सहभाग घेतला होता."

समाजशास्त्रज्ञ आणि महाराजा कृष्णकुमारसिंहजी भावनगर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक विद्युत जोशी यासंदर्भात माहिती देतात.

ते म्हणाले, "1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस दोन गटात विभागली गेली. राजकीय कार्यकर्ते काँग्रेस पक्षात सहभागी झाले तर भरीव सामाजिक काम करणारे कार्यकर्ते विनोबा भावे यांच्या सर्व सेवा संघात सहभागी झाले."

प्राध्यापक विद्युत जोशी पुढे म्हणतात, "त्यावेळेस उच्छरंगराय ढेबर हे सौराष्ट्रमधील काँग्रेसचे प्रमुख नेते होते. त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं होतं. अनेक रचनात्मक कामं सौराष्ट्रमध्येच सुरूच झाली होती. लोकांना व्यापक स्वरुपात असं वाटत होतं की काँग्रेसनं अशा उपक्रमांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे."

"वेगवेगळ्या गटांना एकत्र करण्यासाठी काँग्रेसनं सौराष्ट्रकडे लक्ष वळवलं आणि भावनगरची निवड केली. भावनगरमध्ये काँग्रेस पक्षाचा पाया मजबूत होता."

प्राध्यापक विद्युत जोशी सांगतात, "1956 मध्ये जमीन सुधारणा झाल्या आणि जमीनदारांना त्यांच्या जमिनी गमवाव्या लागल्या. त्यामुळे काँग्रेस विरोधात असंतोष वाढत गेला. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते."

"मात्र 1960 पर्यंत बंडखोर राजवटीचा काळ संपला होता. त्यामुळे भावनगरमध्ये अधिवेशन भरवून काँग्रेसला स्वत:चं स्थान भक्कम करता येईल आणि अशा घटकांना अधिक प्रभावी हाताळता येईल असा विचार होता."

काँग्रेसचे कार्यकर्ते सतीश चावडा पुढे म्हणतात, "भावनगरमधील अनेक नेते काँग्रेस पक्षात आघाडीवर होते. शहरात खादी वापरणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय होती. राज्य सोपवण्याच्या महाराजा कृष्ण कुमारसिंहजींच्या पहिल्या प्रस्तावाचादेखील एक परिणाम झाला."

अधिवेशन कसं झालं आणि अधिवेशनात कोणते प्रमुख ठराव मंजूर झाले?

91 वर्षांचे काँग्रेस कार्यकर्ते बालूभाई पटेल यांच्या मते, "काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये सर्वसाधारणपणे दोन गोष्टी असतात. देशभरातून आलेल्या प्रतिनिधींसाठी एक खुलं सत्र आणि एक एआयसीसीचं सत्र, जे फक्त एआयसीसीच्या सदस्यांसाठीच असतं. भावनगरमधील अधिवेशन हे खुलं सत्र होतं."

त्यांनी सांगितल्यानुसार, काँग्रेस पक्ष अधिवेशनात सर्वसाधारणपणे तीन प्रकारचे ठराव मांडतो.

  • संघटनात्मक : पक्षातील बदलांशी संबंधित ठराव
  • राजकीय :प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांविरोधातील रणनीतीशीसंबंधित ठराव
  • आर्थिक : देशाची अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संबंधावरील ठराव

अधिवेशनाच्या शेवटी दिवशी खुल्या सत्रात हे ठराव मांडले जातात. ठराव स्वीकारण्यापूर्वी त्यावर सविस्तर चर्चा केली जाते. अधिवेशनात एक विषय समितीदेखील असते. अधिवेशनात मांडल्या जाणाऱ्या ठरावांवर ही समिती सविस्तर चर्चा घडवून आणते.

भावनगर अधिवेशनात मंजूर करण्यात आलेले प्रमुख ठराव :

  • तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्याची स्वीकृती
  • राष्ट्रीय एकतेसाठीचा ठराव : सांप्रदायिकता, जातीयवाद आणि प्रादेशिकवादाविरोधात लढण्यासाठी वचनबद्धता.

आंतरराष्ट्रीय घडामोडींशी संबंधित ठराव:

  • युद्धविषयक तंत्रज्ञानातील प्रगती लक्षात घेऊन संपूर्ण आणि सामान्य नि:शस्त्रीकरणाला पाठिंबा.
  • फ्रान्सच्या लष्करी आक्रमणाचा निषेध
  • वसाहतवादी देशांविरोधातील युद्धाला नेटो सदस्य देशांनी दिलेला पाठिंबा मागे घेण्याची त्या देशांना विनंती.
  • गोव्यात बंदिवासात असणाऱ्या लोकांना मुक्त करण्याबाबत पोर्तुगालला कोणतेही प्रयत्न न केल्याचा निषेध
  • भारताच्या सीमा आणि प्रदेशाचं चीननं केलेलं उल्लंघन, जे भारत आणि चीन या दोघांच्या सह अस्तित्वाच्या तत्वांचं उल्लंघन होतं, त्याचा निषेध

याशिवाय, भावनगरच्या अधिवेशनात काँग्रेस पक्षाच्या घटनेत सुधारणा करण्यात आली.

पी के लाहेरी म्हणतात, "काही कारणांमुळे भावनगरमध्ये झालेलं अधिवेशन विशेष मानलं जातं. नेत्यांनी दहा वर्षांनंतर सरकारमधून बाहेर पडून पुन्हा पक्षाचं काम करावं या कल्पनेवर सर्वात आधी याच अधिवेशनात चर्चा झाली. या अधिवेशनात समाजवादी समाज रचनेवर देखील चर्चा झाली."

प्रकाश एन. शाह यांच्या मते, "नंतरच्या काळात कामराज योजना म्हणून समोर आलेल्या गोष्टीचा पाया भावनगरच्या अधिवेशनानं घातला."

प्राध्यापक विद्युत जोशी पुढे म्हणतात, "हिरालाल शाह नावाच्या व्यक्तीनं सौराष्ट्रमध्ये सिंचनाचं पाणी पुरवण्यासाठी, खंबातच्या आखातात 'गांधीसर' धरण बांधण्याचा प्रस्ताव भावनगर अधिवेशनात मांडला. हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला."

"नंतरच्या काळात, डॉ. अनिल काणे आणि त्यांच्या टीमनं या कल्पनेला 'कल्पसर' हे नाव दिलं."

भावनगरमध्ये काँग्रेस अध्यक्षांचं स्वागत कशाप्रकारे झालं?

भावनगरमध्ये अधिवेशन झालं तेव्हा नीलम संजीव रेड्डी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. भावनगरमध्ये एका उघड्या कारमध्ये त्यांची मिरवणूक काढण्यात आली.

भावनगरमधील सध्याच्या वोरा शेरी बाजारपेठेमधून खारगेट पर्यंत नीलम संजीव रेड्डी यांचा रोड शो गेला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मते, पंडित नेहरूंच्या स्वागताला ज्याप्रमाणेच गर्दी जमली होती, तशीच प्रचंड गर्दी नीलम संजीव रेड्डींचं स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा जमली होती.

अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून भाषण करताना नीलम संजीव रेड्डी यांनी काँग्रेसच्या मुख्य विचारसरणीबद्दल बोलले.

भाषणात नीलम संजीव रेड्डी म्हणाले, "काँग्रेसनं फक्त सरकारच्या कामापुरतंच स्वत:ला मर्यादित करून घेण्याची गरज नाही, तर पक्षाकडे इतरही जबाबदाऱ्या आहेत. काँग्रेसच्या विचारसरणीचा प्रसार करण्याबरोबरच आपल्यासमोर रचनात्मक आणि राष्ट्र उभारणीची अनेक कामं आहेत."

"त्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहभागी झालं पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या दशकभरात महत्त्वाच्या घटनांमुळे काँग्रेसच्या विचासरणीला आकार दिला आहे. त्यातून लोकशाहीसमोरील आव्हानांना सर्वोत्तम प्रतिसाद देण्यात आला आहे."

संजीव रेड्डी पुढे म्हणाले, "जर काँग्रेसची विचारसरणी प्रभावीपणे पुढे नेता आली नाही, तर खोट्या कल्पना, विचार आणि दिशाभूल करणारे दृष्टिकोन त्याची जागा घेतील. त्यामुळे देश आणि नुकत्याच विकसित होत असलेल्या आपल्या लोकशाहीला धोका निर्माण होईल."

"हे टाळण्यासाठी, आपण काँग्रेस पक्षातच शिस्त राखली पाहिजे. तसंच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ध्येयाची भावना निर्माण केली पाहिजे. जेणेकरून आपल्यासमोर असणारी उद्दिष्टं आपण उत्साहानं पार पाडू शकू."

नीलम संजीव रेड्डी यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्तीकेंद्रित राजकारणाचा आणि पक्षात अंतर्गत संघर्षाचा उदय झाल्याच्या गोष्टीकडे इशारा देखील केला. 1960 च्या दशकाच्या उत्तरार्धात पक्षात या गोष्टींचा विस्तार होण्यास सुरूवात झाली होती.

ते म्हणाले, "आगामी निवडणुकांमध्ये (1962), आपण कोण आहोत, आपण कशासाठी उभे आहोत आणि आपण कशासाठी लढत आहोत हे लोकांना सहजपणे समजण्याची आवश्यकता आहे."

"लोकांना आपली उद्दिष्टं स्पष्टपणे समजली पाहिजेत आणि आपल्या किरकोळ अंतर्गत मतभेदांमुळे त्यांचं लक्ष विचलित होता कामा नये."

जवाहरलाल नेहरू यांनी भावनगरच्या अधिवेशनाबद्दल काय लिहिलं आहे?

तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू भावनगर अधिवेशनात खूपच सक्रिय होते. बैठका, तळागातील कार्यकर्त्यांशी संवाद ते हजारोंच्या सभेत भाषण करण्यापर्यंत सर्वच बाबतीत त्यांनी अधिवेशनात महत्वाची भूमिका बजावली.

पी के लाहेरी म्हणतात, "जवाहरलाल नेहरूंसाठी एका स्वतंत्र कॉटेजची व्यवस्था करण्यात आली होती. फक्त त्यांना पाहण्यासाठी म्हणून मोठ्या संख्येनं लोक यायचे. अधिवेशनाच्या काळात पंडित नेहरूंची लोकप्रियता शिखरावर होती."

3 जून 1961 ला पंडित नेहरूंनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं. 'द सिलेक्टेड वर्क्स ऑफ जवाहरलाल नेहरू', खंड 69 मध्ये हे पत्र समाविष्ट करण्यात आलं आहे. या पत्रात नेहरूंनी देशातील वाढत्या सांप्रदायिक आणि जातीय तणावाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

या पत्रात जवाहरलाल नेहरूंनी लिहिलं आहे, "भावनगरमधील काँग्रेसच्या अधिवेशनादरम्यान, एक राष्ट्रीय एकात्मता समिती स्थापन करण्यात आली. ही समिती यासंदर्भातील मुद्द्यांवर काम करत असतानाच मध्य प्रदेशातील जबलपूर आणि सागर जिल्ह्यांमध्ये जातीय अशांततेच्या घटना घडल्या."

"1959 पासून यासंदर्भात मी अनेक प्रयत्न केले आहेत, मात्र अखेरीस भावनगरमधील अधिवेशनात या समितीचा ठराव मंजूर करण्यात आला."

नेहरूंनी ज्या राष्ट्रीय एकात्मता समितीचा उल्लेख केला होता, तिची स्थापना भावनगरमध्ये झाली होती.

या समितीचा ठराव मंजूर करताना काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी एकमतानं कोणतीही किंमत मोजून सांप्रदायिकता आणि जातीयवादाशी लढा देण्याचा निर्धार केला होता. इंदिरा गांधीना या समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं.

पंडित नेहरू यांनी मास्टर तारा सिंह यांना लिहिलेल्या पत्रातदेखील भावनगरच्या अधिवेशनाचा उल्लेख केला होता.

त्यात नेहरूंनी लिहिलं होतं, "पंजाब राज्याबद्दलचे माझे विचार मी वारंवार मांडले आहेत. तसंच भावनगरमधील माझ्या भाषणात मी त्यांचा पुनरुच्चार केला. तुम्ही मला तिथेही येऊन भेटू शकला असता."

काँग्रेस अधिवेशनांचे महत्त्व- तेव्हा आणि आता

1961 च्या अधिवेशनाच्या स्मरणार्थ, काँग्रेसनं "गुजरात: एक परिचय" या स्मरणपुस्तिकेचं प्रकाशन केलं. या पुस्तकाचं संपदान रामलाल पारिख यांनी केलं आहे.

या पुस्तकात मोरारजी देसाई यांनी लिहिलं आहे, "1938 पासून, 23 वर्षांच्या अंतरानंतर, पुन्हा एकदा काँग्रेसचं गुजरातमध्ये अधिवेशन होतं आहे. मात्र आता परिस्थिती लक्षणीयरीत्या बदलली आहे. आता फक्त भारतालाच स्वातंत्र्य मिळालेलं नाही, तर गुजरातदेखील वेगळं राज्य झालं आहे."

"गुजरात राज्याची स्थापना झाल्यानंतरच्या पहिल्याच वर्षी, काँग्रेसचं भावनगरमध्ये अधिवेशन होतं आहे. या प्रसंगी, तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, उद्योगपती, शिक्षक, विद्वान आणि लेखक, सर्वजण गुजरात राज्याच्या विकासासाठी विविध शक्यतांचा शोध घेत आहेत."

मोरारजी देसाई पुढे लिहितात, "गुजरातचं सार्वजनिक जीवन प्रामुख्यानं काँग्रेसच्या नेतृत्वाखाली घडलं आहे आणि काही विशिष्ट व्यवस्था तयार झाल्या आहेत. गुजरातचं सार्वजनिक जीवन आपण ज्या शिस्तीनं आणि सौहार्दानं विकसित केलं, त्यामुळे देशात गुजरातचं एक विशेष स्थान निर्माण झालं आहे."

"काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने याच कारणामुळे गुजरातमध्ये अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला. आपल्या शिस्तीला बळकटी देण्यासाठी आणि वैचारिक मतभेद परस्पर चर्चा आणि सामंजस्यानं दूर करण्याची परंपरा निर्माण करण्यासाठी या अधिवेशनाचं आयोजन गुजरातमध्ये करण्यात आलं."

मोरारजी देसाईंच्या लिखाणातून हे स्पष्टपणे दिसून येतं की त्या काळातील गुजरातमधील काँग्रेसचं अधिवेशन म्हणजे फक्त एका राजकीय पक्षाचं संमेलन नव्हतं, तर ती गुजरातच्या भवितव्यासाठी व्यापक वैचारिक, बौद्धिक चर्चा घडवून आणण्याची संधीदेखील होती.

ठाकोरभाई देसाई 1961 च्या या अधिवेशनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष होते.

त्यांनी या अधिवेशनाच्या महत्त्वाबद्दल लिहिलं आहे, "जिथे कुठे काँग्रेसचं अधिवेशन होतं, त्यातून अनेक क्षेत्रांमध्ये पुनरुज्जीवन घडतं. काँग्रेसचं उद्दिष्ट समाजाच्या सर्व घटकांचं प्रतिनिधित्व करण्याचं असल्यामुळे, पक्षाचं वार्षिक अधिवेशन हे फक्त पक्षाची बैठक किंवा संमेलनापलीकडे बरंच काही असतं."

काँग्रेसच्या 1961 च्या भावनगरमधील अधिवेशनाची गेल्या दोन दशकांमध्ये झालेल्या अधिवेशनांशी तुलना करता, ही बाब स्पष्ट होते की कालांतरानं, या अधिवेशनांचं रुपांतर लोकांच्या सखोल सहभागाच्या व्यासपीठांमधून एका राजकीय पक्षाच्या अंतर्गत बैठकीत किंवा संमेलनात झालं आहे.

ही अधिवेशनं पूर्वी ज्याप्रमाणे सर्वसामान्य लोकांना आकर्षित करायची, तशी ती आता करत नाहीत. एकप्रकारे सर्वसामान्य नागरिक, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अधिवेशनं यांच्यात एक दरी निर्माण झाली आहे.

आता, राहुल गांधी गुजरातमध्ये काँग्रेसचं पुनरुज्जीवन करण्याबद्दल बोलत असताना, प्रश्न उरतो की, काँग्रेस पुन्हा एकदा लोकांशी जोडली जाऊ शकते का? आणि राष्ट्र उभारणीच्या व्यापक, रचनात्मक ध्येयासाठी समर्पित होऊ शकते का?

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.