रायगडावर सापडलेलं यंत्र नेमकं काय आहे आणि ते कशासाठी वापरलं जायचं?

छत्रपती शिवाजी महाराज

फोटो स्रोत, Facebook/Yuvraj Sambhaji Chhatrapati

फोटो कॅप्शन, संभाजीराजे छत्रपतींनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी

रायगडावर सुरू असणाऱ्या उत्खननादरम्यान एका ऐतिहासिक वाड्याच्या जागेमध्ये प्राचीन यंत्रराज, सौम्ययंत्र सापडल्याचं युवराज संभाजी छत्रपती यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे जाहीर केले आहे. त्यांनीच त्याचे काही फोटोही शेअर केले आहेत.

या उपकरणाच्या वरच्या बाजूला काही अक्षरं कोरलेली आहेत. मध्यभागी एक कासव - सापसदृश दोन प्राणी कोरलेले आहेत.

रायगडावर सापडलेलं हे उपकरण - यंत्रराज म्हणजे Astrolabe. त्याचा वापर कसा होतो हे पाहण्यापूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी या उपकरणाबद्दल काय म्हटले ते आपण पाहू.

संभाजीराजे म्हणाले, "खगोलशास्त्रीय अभ्यास करून तत्कालीन अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने दुर्गराज रायगडाचे बांधकाम झाले होते, याबाबतचा महत्त्वपूर्ण पुरावा मिळून आला आहे. दुर्गराज रायगड येथे भारतीय पुरातत्त्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन प्रक्रियेमध्ये गडावर प्राचीन 'यंत्रराज' सौम्ययंत्र (Astrolabe) हे खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे.

"प्राचीन कालखंडापासून ग्रहताऱ्यांच्या अभ्यासासाठी, दिशांचा वेध घेण्यासाठी तसेच वेळ मोजण्यासाठी वापरण्यात येणारे महत्त्वाचे यंत्र म्हणजे 'Astrolabe'. याला 'यंत्रराज' या नावानेही ओळखतात. अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त, विषुववृत्त यांसारख्या गोष्टींचा अभ्यास करणे सोपे व्हावे म्हणून या यंत्राचा वापर केला जात असे. दुर्गराज रायगडाचे बांधकाम करीत असताना खगोलशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी या यंत्राचा वापर झाला असण्याची शक्यता आहे," असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

संभाजीराजे छत्रपतींनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

फोटो स्रोत, Facebook/Yuvraj Sambhaji Chhatrapati

फोटो कॅप्शन, संभाजीराजे छत्रपतींनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हे उपकरण नेमके कसे होते?

अ‍ॅस्ट्रोलेब म्हणजे काय आणि हे उपकरण प्रथम कुठे वापरण्यात आले हे आपण पाहू.

मध्ययुगापासून या अशाप्रकारच्या अ‍ॅस्ट्रोलेबचा वापर झाल्याचे दाखले - पुरावे आहेत. हे यंत्र साधारण 8 - 46 सेंटीमीटरचं आणि ब्रास वा लोखंडाचं घडवलेलं असायचं.

अ‍ॅस्ट्रोलेब

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अ‍ॅस्ट्रोलेबला संस्कृतमध्ये यंत्रराज - King of instruments म्हणतात.

मध्ययुग म्हणजे पाचव्या शतकापासून ते साधारण पंधराव्या शतकापर्यंतचा काळ...रोमन साम्राज्याचा अस्त झाल्यानंतरचा काळ.

ग्रीकांनी हे उपकरण शोधलं, अरब खगोलशास्त्रज्ञांनी याचा विकास केला आणि 12व्या शतकाच्या सुमारास ते युरोपात आलं.

त्या काळामध्ये वेळ पाहण्यासाठी, विविध नोंदी करण्यासाठीचं हे उपकरण होतं.

Facebook पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

Facebook पोस्ट समाप्त

अ‍ॅस्ट्रोलेबचे विविध प्रकार होते. पण planispheric astrolabe नावाचा प्रकार अधिक वापरला जात होता. एक प्रकारे खगोलीय नकाशा.

यात काय होतं तर चंद्र, सूर्य, तारे, नक्षत्रं यांच्या आकाशातल्या स्थानावरून पृथ्वीवरच्या लोकांना स्वतःचं भौगोलिक स्थान म्हणजे आपण नेमके कुठे आहोत - किती वाजले आहेत, याचं गणित करता येत होतं.

या उपकरणाचा अगदी वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जाई.

  • वेळ पाहण्यासाठी
  • अक्षांश - रेखांशानुसार आपलं स्थान ठरवण्यासाठी
  • दिशा ओळखण्यासाठी
  • पेरणी कधी करायची याचा अंदाज बांधण्यासाठी
  • भरती - ओहोटीच्या वेळा
  • सूर्य क्षितीजापासून किती उंचीवर आहे, याचं मोजमाप
  • ज्योतिष अभ्यास
  • इस्लामधर्मीय या यंत्राद्वारे मक्का कोणत्या दिशेला आहे याचा अंदाज घेण्यासाठी देखील वापर करत असत असं देखील सांगितलं जातं

या सगळ्यासाठी या अ‍ॅस्ट्रोलेबचा वापर केला जाई.

रायगडावर सापडलेलं यंत्रराज, सौम्ययंत्र

फोटो स्रोत, Facebook / Yuvraj Sambhaji Chhatrapati

फोटो कॅप्शन, रायगडावर सापडलेलं यंत्रराज, सौम्ययंत्र

कदाचित म्हणूनच याला संस्कृतमध्ये यंत्रराज - King of instruments म्हटलं गेलं असावं.

या उपकरणावर राशीचक्राशी संबंधित खुणा, दिवसाचे तास, दिवसांची नावं अशा गोष्टी कोरलेल्या असायच्या. या उपकरणावर लावता येण्याजोग्या वेगवेगळ्या चकत्या असत. या जागेनुसारच्या तपशीलानुसार केलेल्या असायच्या.

हे उपकरण - उभं टांगलेलं असायचं. त्याच्या एका बाजूला असणारा बाण फिरवून तो सूर्याच्या दिशेने रोखला जाई. त्यावरून वार - तारीख - वेळ कळत असे.

तर चकतीच्या दुसऱ्या बाजूला या रोखलेल्या बाणाच्या स्थितीनुसार वेळ, त्यावेळची आकाशातली नक्षत्रांची स्थिती, अक्षांश - रेखांशानुसार तुम्ही नेमके कोणत्या ठिकाणी आहात - हे कळत असे.

आकाशातल्या सूर्यावरून दिवसा वापर करता यायचा, तर रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या ग्रह - ताऱ्यांच्या मदतीने हे यंत्र वापरलं जाई.

म्हणूनच 15व्या शतकापर्यंत खलाशीही या अ‍ॅस्ट्रोलेबचा वापर करायला लागले होते.

पोर्तुगीज खलाशी बार्थोलोम डिएझ.

फोटो स्रोत, Roger Viollet Collection/Getty Images

फोटो कॅप्शन, केप ऑफ गुड होप शोधणारा पोर्तुगीज खलाशी बार्थोलोम डिएझ. लिस्बनच्या नेव्ही म्युझियममध्ये असणाऱ्या या चित्रात त्याच्या हातात अ‍ॅस्ट्रोलेब आहे.

ब्रिटनच्या रॉयल कलेक्शन ट्रस्टच्या माहितीनुसार भ्रमंती करणाऱ्या इराणी विद्वानांनी दक्षिण आशियामध्ये हे उपकरण आणलं. तुघलक सुलतानांच्या काळात - 1320–1410 दरम्यान दिल्लीमध्ये काही अ‍ॅस्ट्रोलेब उपकरणांची निर्मिती करण्यात आली. तर 16व्या शतकाच्या मध्यात मुघल सम्राटांनी लाहोरमध्येही अशी उपकरणं तयार केली होती.

1688–1743 या काळातले जयपूरचे महाराजा जयसिंग (दुसरे) यांनी अ‍ॅस्ट्रोलेबचा वापर मोठ्या प्रमाणात केला. आणि 1699–1743 दरम्यानच्या त्यांच्या सत्ता काळातच जयपूर हे यंत्रराजाची निर्मिती करणारं केंद्र बनलं होतं. 

महाराज जयसिंगांना खगोलशास्त्रात प्रचंड रस होता आणि त्यातूनच पुढे त्यांनी जयपूर - दिल्ली - मथुरा - उज्जैन आणि बनारस म्हणजे वाराणसी या पाच खगोल वेधशाळांची उभारणी केली. याच वेधशाळांना आज आपण जंतरमंतर म्हणून ओळखतो.

जयपूरचे महाराजा जयसिंग (दुसरे)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जयपूरचे महाराजा जयसिंग (दुसरे). यांनीच जंतरमंतरची निर्मिती केली

'रायगडावर शिवाजी महाराजांच्या पूर्वीही थोडीफार वस्ती होती पण ज्या भागात हे उपकरण सापडल्याचं सांगण्यात येतंय, त्याचं बांधकाम शिवाजी महाराजांच्या काळात झालं होतं. शिवाजी महाराजांनंतरही रायगडावर वस्ती होती. त्यामुळे या उपकरणाचा अभ्यास करून, त्यावर कोरलेल्या गोष्टींवरून हे किती जुनं आहे, कोणत्या काळातलं आहे, हे ठरवणं महत्त्वाचं आहे.' असं इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलंय.

जगातला सर्वात जुना अॅस्ट्रोलेब सापडला ओमानजवळच्या समुद्रात बुडालेल्या एका जहाजाच्या अवशेषात. हे उपकरण 1495 आणि 1500 दरम्यानचं आहे. पोर्तुगीज खलाशांचं हे Esmeralda जहाज होतं युरोपातून बोटीद्वारे पहिल्यांदा भारतात आलेल्या खलाशांच्या - वास्को द गामाच्या ताफ्यातलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)