You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हजारो बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पूजा शर्मा, कोणत्या घटनेमुळे झाली सुरुवात?
- Author, शकील अख्तर
- Role, बीबीसी उर्दू
- Reporting from, दिल्ली
दिल्लीत राहणाऱ्या पूजा शर्मा त्यांच्या फ्लॅटमध्ये एका कोपऱ्यात बसून फोनवर बोलत आहेत. त्यांच्या फोनवरील संभाषणाचा विषय होता एक मृतदेह.
दक्षिण दिल्लीतल्या एका हॉस्पिटलमध्ये एका बेवारस मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम झालं होतं आणि आता पूजा यांना त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचे होते.
पूजा त्यांची अँब्युलन्स घेऊन दवाखान्यात पोहोचतात. तिथे औपचारिकता पूर्ण करतात आणि तो मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला जातो.
त्यानंतर पूजा तो मृतदेह घेऊन एका इलेक्ट्रिक स्मशानभूमीत जातात आणि तिथे धार्मिक विधींनुसार त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात.
पूजा दिवसातून अनेकवेळा वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये जाऊन हे काम करतात. बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणं हे त्यांचं रोजचं काम आहे.
27 वर्षांच्या पूजा शर्मा यांच्या मते, त्यांनी अशाच प्रकारे सुमारे पाच हजार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सापडलेल्या या बेवारस मृतदेहांची ओळख पटवायला कोणताही नातेवाईक किंवा वारस आलेला नसतो.
पूजा शर्मा म्हणतात की, किमान मृत्यूनंतर तरी या बेवारस मृतदेहांना सन्मान मिळावा, त्यांची कदर केली जावी, यासाठी त्या हे काम करतात.
त्या म्हणतात, "मृत व्यक्ती मुस्लिम असेल तर मी त्याचा मृतदेह कब्रस्तानमध्ये घेऊन जाते. ख्रिश्चन असेल तर त्या धर्माच्या स्मशानात नेते आणि जर तो मृतदेह एखाद्या सनातनी म्हणजेच हिंदूचा असेल तर त्याला स्मशानभूमीत घेऊन जाते. मी आजवर पाच हजारांपेक्षा जास्त बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केला आहे."
बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पूजा दिल्लीत एक अशासकीय संस्था (एनजीओ) चालवतात. शहरातील हॉस्पिटल्स आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना बेवारस मृतदेहांची माहिती मिळते, यासाठी त्या सतत त्यांच्या संपर्कात असतात. आणि अशा पद्धतीने जिथे गरज असेल तिथे त्या त्यांची रुग्णवाहिका घेऊन हजर होतात.
हे काम करण्याची प्रेरणा कुठून मिळाली?
पूजा सांगतात की, सुरुवातीला त्यांनी त्यांच्या आई-वडिलांकडून काही पैसे घेऊन किंवा मग स्वतःची पदरमोड करून हे काम केलं. त्या म्हणतात, "काही काळानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून माझं काम लोकांपर्यंत पोहोचलं. आणि मग लोकही मदत करू लागले. त्यांच्याच मदतीने मी एक रुग्णवाहिका खरेदी केली. ही रुग्णवाहिका मी बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी आणि गरिबांच्या मदतीसाठी समर्पित केली आहे."
पूजा म्हणतात की, हे काम करण्याची कल्पना त्यांना त्यांच्याच कुटुंबात घडलेल्या एका दुःखद मृत्यूनंतर सुचली. त्यांच्या सख्ख्या भावाच्या मृत्यूनंतर सगळी कामं करण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली होती.
त्या प्रसंगाबाबत सांगताना पूजा म्हणतात, "माझ्या मोठ्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर माझे वडील ज्या परिस्थितीत होते, ते पाहून सगळी काम मलाच करावी लागणार होती. त्या परिस्थितीत मी मोठी हिंमत दाखवून सगळी काम स्वतःच करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मला असं कळलं की, त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला घरी काहीच नव्हतं."
पूजाने सांगितलं की, "परंपरागतपणे फक्त एक पुरुषच अंत्यसंस्कार करू शकतो. पण मला काहीच समजत नव्हतं म्हणून मी स्वतः सगळी काम करण्याचा निश्चय केला. आणि अंत्यसंस्काराच्या सगळ्या परंपरा आणि नियमांच्या पुढे जाऊन मी मोठ्या हिमतीने माझ्या भावाचे अंत्यसंस्कार केले."
वैयक्तिक दुःख आणि कठीण काळात कोणाचीही साथ नसल्याच्या अनुभवाचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. पूजा सांगतात की, त्यावेळी माझ्या मदतीला त्यावेळी कुणी आलं नाही, तर अशा लोकांचं काय होत असेल? ज्यांचं या जगात कुणीही नाही?
त्या प्रसंगानंतर पूजा यांनी बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्याचं काम हाती घेतलं. ज्या लोकांचे कुणीही वारस नाहीत, ज्यांना विचारणारं कुणीही नाही अशा लोकांच्या मृत्यूनंतर त्यांचा आधार होण्याचं पूजा यांनी ठरवलं.
लोकांच्या समजुती तोडण्याचं आव्हान
हे काम करण्याचा निश्चय तर केला, पण पूजा सांगतात की हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. या कामात त्यांना अनेक अडचणी आणि आव्हानांना सामोरे जावे लागले.
त्या म्हणतात की त्यांच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्नही केला गेला. वर्षानुवर्षे चालत आलेल्या रूढी-परंपरा मोडीत काढल्याबद्दल त्यांच्यावर टीकाही करण्यात आली.
पूजा यांनी बीबीसीला सांगितलं की, "लहानपणी आम्ही ऐकलं होतं की, महिला स्मशानभूमीत जात नाहीत. हे काम करून मी समाजाची विचारसरणी बदलण्याचा, रूढी परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न करत होते. पण माझ्या समाजाला ते सहन होत नव्हतं. त्यांना असं वाटायचं की, एक महिला ही सगळी कामं का करत आहे."
मात्र, समाजसेवेच्या भावनेतून त्या समाजाचा खंबीरपणे सामना करू शकल्याचं सांगतात. त्या म्हणतात की, हळूहळू त्यांचा विरोध करणाऱ्यांची संख्या कमी होत गेली आणि त्यांचं समर्थ करणाऱ्यांमध्ये वाढ होत गेली.
हिंदू धर्मात अशी परंपरा आहे की, मृत्यूनंतर केवळ पुरुषच मृतदेहावर अंत्यसंस्कार करू शकतात. पूजा यांनी ही प्रथा मोडीत काढली.
पूजा म्हणतात, "मी वाचायला सुरुवात केली. मी वेद वाचले, धर्मग्रंथ वाचले आणि इतर धर्मांची पुस्तकेही वाचली. ती पुस्तके वाचल्यानंतर मला कळले की, महिला अंत्यसंस्कार करू शकत नाही, असं कुठेही लिहिलेलं नाही."
बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं हे काम खूप अवघड आहे, पण या कामाचा आणि त्यामागील समाजसेवेच्या भावनेचा पूजा यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही खोलवर परिणाम झाला.
पूजा शर्मा म्हणाल्या, "जेव्हा मी हे काम सुरू केले, तेव्हा माझ्या आजूबाजूच्या लोकांनी माझ्याशी बोलणं बंद केलं. त्यांना वाटायचं की, माझ्या मागे कुणाच्यातरी आत्मा चालत आहेत."
"माझ्या घरातील सदस्यांना सांगण्यात आलं होतं की, तुमच्या मुलीचं लग्न होणार नाही. लोक म्हणायचे की, मी ज्या घरात जाईन ते घर उध्वस्त करेन. एवढंच काय माझ्या लहानपणीच्या मैत्रिणी देखील माझ्याशी बोलायच्या नाहीत."
पण या सगळ्या अडचणी पूजा यांना त्यांच्या मार्गावरून हटवू शकल्या नाहीत.
पूजा सांगतात, "हे जग मोकळेपणाने जगण्यासाठी आहे. मी कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येक धर्माच्या लोकांची सेवा करत आहे याचा मला आनंद आहे. माझ्यासाठी सर्वजण समान आहेत. जर आपण सर्वांनी मिळून काम केले आणि एकमेकांना साथ दिली, तर हे जगही सुंदर होईल."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)