सोनं सव्वा लाखांच्या पार, आगामी काळात सोन्याची किंमत वाढतच जाईल की कमी होईल?

सोन्याच्या किंमतीत सध्या जी तेजी आहे आणि ज्या पातळीवर त्या पोहोचल्या आहेत, तसं यापूर्वी कधीही झालं नव्हतं.

काही महिन्यांपूर्वी ज्यांना सोन्याचे दागिने विकत घेतले किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक केली, त्यांना आता पश्चाताप होतो आहे की, त्यावेळेस आणखी सोनं विकत घ्यायला हवं होतं.

ज्यांनी तसं केलं नाही, त्यांना आता प्रश्न पडतो आहे की सोन्याच्या किंमतीत अशीच वाढ होत राहील का?

त्यांना असंही वाटतं आहे की आता सोनं विकत घेतलं किंवा गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक केल्यास ते किती योग्य ठरेल.

सोन्याच्या किंमतीत सध्या जी तेजी दिसते आहे, ती पाहता असं वाटतं आहे की सोन्याची मागणी वाढतच चालली आहे. मग खरोखरंच प्रत्यक्षात सोन्याची मागणी वाढली आहे की यामागे आणखी काही कारण आहे?

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या ताज्या आकडेवारीनुसार, जगभरातील शिखर किंवा मध्यवर्ती बँका त्यांच्याकडील सोन्याच्या साठ्यात वाढ करत आहेत. गोल्ड ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये गुंतवणूक करण्याकडे जगभरातील गुंतवणुकदारांचा कल दिसून येतो आहे.

सप्टेंबर महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये विक्रमी गुंतवणूक झाली. जुलै-सप्टेंबर या तिमाहीचा विचार करता, गोल्ड ईटीएफमध्ये विक्रमी गुंतवणूक झाली आहे.

सोन्यातील तेजीबद्दल जाणून घेण्यापूर्वी गोल्ड ईटीएफ म्हणजे काय ते समजून घेऊया

गोल्ड ईटीएफ म्हणजे काय?

गोल्ड ईटीएफला तुम्ही डिजिटल सोनं म्हणू शकता.

हे म्युच्युअल फंडाप्रमाणेच असतं. त्यात 99.5 टक्के शुद्ध सोन्याची किंमत ट्रॅक केली जाते. यातील प्रत्येक युनिटची किंमत जवळपास एक ग्रॅम सोन्याइतकी असते.

तुम्ही ईटीएफची खरेदी-विक्री शेअर बाजारात करू शकता.

गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट अकाउंट आवश्यक असतं. कारण ईटीएफची खरेदी-विक्री शेअर बाजाराद्वारे होते.

तुम्ही शेअर्सप्रमाणेच शेअर बाजारात काही तासांमध्येच ईटीएफचे युनिट खरेदी करू शकता किंवा विकू शकता.

ज्यांना सोन्याच्या किंमतीवर बारकाईनं लक्ष ठेवायचं आहे, अशांसाठी गोल्ड ईटीएफचा पर्याय चांगला ठरतो. तसंच ज्यांना गुंतवणुकीवर स्वत:चं नियंत्रण हवं अशांसाठी ते योग्य असतं.

जर तुम्हाला डीमॅट अकाउंटव्यतिरिक्त आणि सोप्या पद्धतीनं सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर गोल्ड म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

गोल्ड ईटीएफमध्ये विक्रमी गुंतवणूक

भारतच नाही तर जगभरातील सर्वसामान्य गुंतवणूकदार ईटीएफच्या माध्यमातून सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत.

जुलै-सप्टेंबर या तिमाहीचा विचार करता, गोल्ड ईटीएफमध्ये जवळपास 26 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, या तिमाहीच्या कालावधीत अमेरिकेतील लोकांनी गोल्ड ईटीएफमध्ये 16 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. तर युरोपातून जवळपास 8 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे.

फक्त भारतातूनच 90.2 कोटी डॉलर म्हणजे जवळपास 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक ईटीएफमध्ये झाली आहे.

आशिया खंडाचा विचार करता, चीनमधून 60.2 कोटी डॉलर गुंतवणूक झाली असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 41.5 कोटी डॉलरच्या गुंतवणुकीसह ईटीएफमध्ये जपान तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ज्याप्रकारे लोक गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करत आहेत, ते लक्षात घेता हे स्पष्ट आहे की त्यांना वाटतं आहे की सोन्यातील तेजी कायम राहील आणि त्यांचा फायदा होईल.

जगभरातील गोल्ड ईटीएफमधील एकूण गुंतवणूक 472 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत त्यात 23 टक्क्यांची जोरदार वाढ झाली आहे.

हे लक्षात घेतलं पाहिजे की गोल्ड ईटीएफमधील गुंतवणुकीची ही रक्कम जगातील अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक आहे.

सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित आहे का?

तज्ज्ञांना वाटतं की सोन्यातील या तेजीमुळे त्यात गुंतवणूक करण्यामागे इतरही अनेक कारणं आहेत. उदाहरणार्थ ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरातील गुंतवणुकदार बुचकळ्यात पडले आहेत. रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. तर पश्चिम आशियामध्येही तणावाची परिस्थिती आहे.

डॉलरच्या मूल्यात घसरण होते आहे आणि गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत शटडाउन सुरू झाल्यामुळे डॉलरचं मूल्य आणखी घसरलं आहे.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं व्याजदरात 25 बेसिस पॉईंटची कपात केली आहे. जाणकारांना आशा आहे की या वर्षाच्या अखेरीपर्यंत व्याजदरात आणखी एक-दोन वेळा कपात होऊ शकते.

म्हणजेच यामुळे शेअर बाजारात चढउतारांचं चक्र राहू शकतं. अशा परिस्थितीत सोन्यातील गुंतवणुकीला सुरक्षित मानलं जातं आहे. त्यामुळेच सोन्यामधील तेजी कायम आहे.

मध्यवर्ती बँका वाढवत आहेत सोन्याचा साठा

सोन्यातील तेजीमागचं आणखी एक कारण आहे, जगभरातील मध्यवर्ती बँका सोन्याची खरेदी करत आहेत.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालात म्हटलं आहे की ऑगस्ट महिन्यात जगभरातील मध्यवर्ती बँकांनी 15 टन सोनं खरेदी केलं.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे कझाकस्तान, बल्गेरिया, अल साल्वाडोर सारखे देश सोने खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत आघाडीवर आहेत. भारत, चीन आणि कतार या देशांनीदेखील त्यांचा सोन्याचा साठा वाढवला आहे.

अर्थात सोन्याच्या साठ्याचा विचार करता, वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या वार्षिक आकडेवारीतून दिसतं की डिसेंबर 2024 पर्यंत अमेरिकेकडे 8133 टन सोन्याचा साठा होता. अमेरिका जगात पहिल्या क्रमांकावर होती.

तर 3,351 टन सोन्यासह जर्मनी दुसऱ्या, इटली तिसऱ्या आणि फ्रान्स चौथ्या क्रमाकांवर होता. 2280 टन सोन्याच्या साठ्यासह चीन पाचव्या क्रमांकावर होता.

भारताकडे 876 टन सोन्याचा साठा होता आणि या यादीत भारत सातव्या क्रमांकावर होता.

सोन्यामुळे गुंतवणुकादारांचं नुकसानदेखील झालं आहे का?

सोन्याबद्दल गुंतवणुकदारांमध्ये सध्या जे कमालीचं आकर्षण आहे, ते लक्षात घेता हा प्रश्नदेखील उपस्थित होतो की, सोन्यातील गुंतवणूक आता फायद्याची राहिलेली नाही का?

गेल्या 20 वर्षांच्या कालावधीतील सोन्याच्या किंमतीचा विचार करता, फक्त चार कॅलेंडर वर्षे असे आहेत, जेव्हा सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आणि गुंतवणुकादाराचं थोडं नुकसान झालं.

अर्थात हे नुकसानदेखील सिंगल डिजिट म्हणजे एक आकडी टक्क्यापर्यंतच मर्यादित होतं.

उदाहरणार्थ 2013 मध्ये सोन्याच्या किंमतीत 4.50 टक्क्यांची घसरण झाली होती. तर 2014 मध्ये 7.9 टक्के, 2015 मध्ये 6.65 टक्के आणि 2021 मध्ये सोन्याच्या किंमतीत 4.21 टक्क्यांची घसरण झाली होती.

नजीकच्या भविष्यात सोन्याच्या किंमतीत घसरण होईल का?

शेवटी महत्त्वाचा प्रश्न राहतो तो म्हणजे, सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ होईल का की आता सोन्याच्या किंमतीत घसरण सुरू होईल?

गोल्डमन सॅक्सनं त्यांच्या एका रिसर्चमध्ये अंदाज वर्तवला आहे की 2026 च्या मध्यापर्यंत सोन्याच्या किंमतीत आणखी 6 टक्क्यांची वाढ होऊ शकते.

अर्थात सोन्याच्या किंमतीचा नक्की ट्रेंड काय राहील याचं अचूक उत्तर क्वचितच एखाद्या तज्ज्ञाकडे असेल.

मात्र इतकं निश्चित आहे की ज्याप्रकारे गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक वाढली आहे, ते लक्षात घेता, गुंतवणुकादारांचा सोन्यावरील विश्वास आधीपेक्षा कितीतरी अधिक वाढला आहे, हे स्पष्ट दिसतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)