पायाला भिंगरी लावून 'संविधानाचा जागर' करणाऱ्या राजवैभवची गोष्ट, नोकरी सोडून का निवडला हा मार्ग?

    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी
    • Reporting from, पुणे

"आम्ही भारताचे लोक असं लिहिलेली संविधानाची उद्देशिका तुम्ही वाचली आहेत का? शाळेच्या पुस्तकात आहे ना?"

शाळेबाहेरच्या मैदानावर सातवी-आठवीच्या रांगेत बसलेल्या मुलांशी राजवैभव शोभा रामचंद्रचा संवाद सुरू होतो. मुलं अर्थातच मोठ्ठयाने उत्तर देतात, 'हो'.

राजवैभवचा पुढचा प्रश्न येतो, "मग त्यात किती वाक्य आहेत सांगा?"

आधीचा गोंगाट आणि उत्साह क्षणात शांत होतो. बारीक आवाजात वेगवेगळी उत्तरं यायला लागतात.

मग त्यातला एक जण म्हणतो, 'एक'.

हे बरोबर उत्तर दिल्याचा धागा पकडून राजवैभवचा पुढचा संवाद सुरू होतो. त्यातल्या शब्द आणि अर्थांबद्दल.

एका एका शब्दाबद्दल चर्चा करता करता 'धर्मनिरपेक्षता म्हणजे काय' यावर चर्चा येते आणि मग मुलांमधलाच एक जण निवडून त्याला जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केलं जातं.

हे जिल्हाधिकारी नेमकं कुठे धर्म पाळू शकतात आणि कुठे नाही याबद्दल चर्चा होते. घरात धर्म पालनाचा अधिकार सगळ्यांनाच आहे, पण तो सरकारी कार्यालयात येऊ शकत नाही, असा निष्कर्ष निघतो आणि धर्मनिरपेक्षतेचा अर्थ उलगडतो.

असा संवाद हा आता राजवैभवच्या रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे. कधी शाळांमध्ये, कधी व्याख्यानातून, कधी बागांमधून हा संवाद सुरू रहातो. हा संवाद साधणारा राजवैभव स्वत:ची ओळख 'संविधान संवादक' अशी सांगतो.

गेली काही वर्षे तो स्वत:ची ही ओळख जाणीवपूर्वक घडवत गेला आहे. राजवैभव कोल्हापुरातील राधानगरीमधल्या सोन्याची शिरोली गावचा. वडील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते म्हणून अनेक वर्षे काम करत होते.

घरची परिस्थिती बेताचीच. अशात राजवैभव शिकून इंजिनिअर झाला. आधी राधानगरी आणि नंतर कोल्हापूरमध्ये शिक्षण झालेल्या राजवैभवचं आपण नक्की काय करायचं आहे हे मात्र, कॅालेज पूर्ण होण्यापूर्वीच ठरलं होतं. याला निमित्त ठरलं ते डॅा. नरेंद्र दाभोलकरांची भेट.

दाभोलकर-पानसरेंची हत्या आणि सामाजिक कामाचा संकल्प

राजवैभव सांगतो, "सामाजिक काम करायचं आहे याची जाणीव घरातूनच तयार होत होती. वडील सामाजिक आणि राजकीय काम त्यांनी थांबवलं. मी कॅालेज करत असताना गारगोटीत व्याख्यान व्हायचं डॅा आंबेडकर व्याख्यानमाला. तिथं डॅा. नरेंद्र दाभोलकर आले होते. त्यांच्याशी दोन मिनिटांची भेट झाली होती. फार मोठी भेट नव्हती."

"त्यानंतर 20 ऑगस्ट 2013 ला डॅाक्टरांचा खून झाला. त्यानंतर कार्यक्रम झाला होता कोल्हापुरात. तेव्हा उपस्थित लोकांच्या आळवलेल्या निर्धाराच्या मुठी मला आठवतात. तेव्हा कॅाम्रेड पानसरे आणि निखील वागळे उपस्थित होते. त्यानंतर 2015 ला गोविंद पानसरेंचा खून झाला आणि महाराष्ट्रातले बरेच तरुण कार्यकर्ते या चळवळीकडे यायला लागले. त्याचा मी भाग होतो."

नोकरी सोडून संविधानाचा जागर करण्याचा निर्णय घेतल्याचं राजवैभव सांगतो.

"कॅाम्रेड गोविंद पानसरेंचा खून झाल्यानंतर एक गोष्ट मी ठरवली होती की, आपण शिक्षण पूर्ण केलं तरी नोकरी करायची नाही. पूर्णवेळ या विचारांचा प्रचार प्रसार करायचा. मी नोकरी केली चार महिन्यांची, पण तिथं मन रमलं नाही. मी पूर्णवेळ हेच काम करायला लागलो. शाळेमध्ये कॅालेजमध्ये, वस्त्यांमध्ये जाऊन संविधानाचं काम करायला लागलो," असं राजवैभव सांगतो.

काम सुरू झालं तेव्हा संविधानाची जागृती करायची हे ठरलं होतं. त्यासाठी कामाच्या स्वरुपाचा विचार सुरू झाला आणि त्यातून त्यानं सुरुवातीला जी मांडणी केली ती मोठी आणि तांत्रिक स्वरुपाची असल्याचं राजवैभव सांगतो.

मांडणी करताना ते लक्षात आल्यानंतर याचं स्वरुप बदलायचं ठरलं आणि मग त्यानं संविधानाचा अभ्यास सुरू केला. एकीकडे संविधानाचा अभ्यास दुसरीकडे त्यावेळी घडलेल्या वाद चर्चा अशा स्वरुपाचा अभ्यास केला. त्यातून साकारला संविधान संवाद.

आपल्या कामासाठी संविधानाची निवड पण त्याने जाणीवपूर्वक केली. संविधान का याचं उत्तर देताना तो म्हणतो, "संविधानच का, तर आपल्याकडे विविध चळवळी काम करत आहेत. स्त्रियांच्या प्रश्नावर, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर. पण या सगळ्यावर काम करायचं म्हणलं तरी त्याचा पाया आणि उकल संविधानात आहे."

"संविधानाची समज निर्माण झाली, तर समता स्वातंत्र्य या मुल्यांच्या माध्यमातून या प्रश्नांकडे बघितलं जाईल. मुल्यांची समज निर्माण करणं हे महत्त्वाचं काम वाटायला लागलं. त्यामुळं संविधान संवादक म्हणून कामाला सुरुवात केली होती."

'संविधान संवाद' म्हणजे काय?

संविधान संवाद समितीच्या पत्रिकेवर अगदी सोप्या शब्दात ही संकल्पना स्पष्ट करण्यात आली आहे. भारतीय संविधानाचा प्रचार, प्रसार, अंगीकार, अंमलबजावणी आणि विधायक हस्तक्षेप यासाठीचा कृतीशील संवाद म्हणजे संविधान संवाद.

राजवैभवच्या मते संविधानाबद्दलचा संवाद म्हणजे कोणाला जाऊन काही सांगणं नव्हे, तर त्यांच्याशी बोलून त्यांना माहित असलेल्या गोष्टींबद्दल संवाद साधणं आणि गैरसमज दूर करणं. ते किचकट होऊ नये म्हणून वेगवेगळ्या स्वरुपाची निवड जाणीवपूर्वक करण्यात आली आहे.

यात लहान मुलं असतील, तर बडबडगीतं, मोठ्यांसाठी अभंग, पथनाट्य अगदी संविधानाभोवती किर्तनही रचण्यात आलं आहे. या साध्या सोप्या ओव्यांमधून संविधानाचा हा संवाद संवादकांमार्फत फुलतो आणि सोपं करून सांगितल्यानं लोकांनाही समजतो.

वयोगटाप्रमाणे आणि उपलब्ध वेळेप्रमाणं यासाठी त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांची निर्मिती केली आहे. अगदी दोन तासांच्या संविधान संवाद शाळेपासून ते दोन ते पाच दिवसांच्या संविधान संवाद शिबिरापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून हा संवाद घडत रहातो.

याशिवाय ज्यांना संविधान मुळापासून समजून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन संविधान संवादाचा कोर्सही चालवला जातो. याबरोबर शाहू विचार प्रदर्शन, संविधान दालन निर्मिती असे अनेक उपक्रम संविधान संवाद समिती तर्फे राबवले जातात.

सुरुवात जरी एकट्यानं झाली असली, तरी पुढे समविचारी मित्र मैत्रिणींच्या मदतीनं आणि ज्यांना हे काम करण्यात रस आहे अशा सोबत्यांच्या मदतीनं संविधान संवादकांची एक मोठी टीम आता राज्यभर उभी राहिली आहे. प्रत्येक ठिकाणी या संवादकांच्या माध्यमातून हे काम चालते.

संवादाच्या कामात काही ठिकाणी विरोधाचाही सामना

काम संवादाचं असलं तरी काही ठिकाणी विरोधाचाही सामना राजवैभवला करावा लागला आहे. त्याच्या सोबत संविधानाचे धडे गिरवणारे आणि देणारे या सगळ्यांनाच असे अनुभव आल्याचं राजवैभव सांगतो.

तो म्हणतो, "ज्यांची स्वप्नं आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय ते भगतसिंग, भगतसिंगांच्या सोबतीनं बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, फुले, सावित्रीमाई यांचा वारसा आहे. यांचे वारस आम्ही स्वत:ला समजत असू तर घाबरण्याचं कारण नाही."

"काही वेळा असे प्रसंग येतात. सोशल मीडियावर ज्यांचे चेहरे दिसत नाहीत, अशा लोकांकडून काही वेळा कमेंट बॅाक्समध्ये किंवा इनबॅाक्समध्ये शिव्या दिल्या जातात. मात्र, आम्हाला काही फरक पडत नाही त्याचा किंवा आम्ही पडू दिलेला नाही. विशेषत: असं झालं की ज्यावेळी विरोध झालाय त्यावेळी आमचं काम जोमानं वाढलेलं आहे."

याच संवादात संविधानाची ताकदही गवसल्याचं राजवैभव नमूद करतो. तो सांगतो, "पुण्याच्या एका गावाजवळ भटकी मुलं होती. त्यांच्या पालावर मी गेलो होतो. तिथं मी मुलांना सांगितलं तुमच्या घराच्या भिंतीवर संविधानाची प्रास्ताविका पाहिजे. पटकन एक मुलगा म्हणाला, दादा आमच्या घराला भिंतीच नाहीत."

"मला काय बोलायचं सुचत नव्हतं. आमचा संवाद सुरू राहिला. भटकी मुलं होती. तो मुलगा म्हणला की, आम्हाला शाळेत घेतलं जात नाही कपडे नीट नाहीत म्हणून. मग मी त्याच्याकडून आर्टिकल 21-क पाठ करून घेतलं. ती मुलं पुन्हा शाळेत गेली. 21-क नावाचं आर्टिकल पुन्हा मॅडमला सांगितलं. मॅडम म्हणाल्या की, तुम्ही उद्यापासून नव्हे, आजपासूनच शाळेत बसा. एक आर्टिकल आपल्या जगण्याची दिशा बदलू शकतं."

वैयक्तिक आयुष्यात संविधानानं काय दिलं हे सांगताना तो म्हणतो, "संविधान माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांसाठीच जगण्याचा अविभाज्य घटक आहे. आणि ती मूल्यव्यवस्था आहे. फक्त 1949 साली नाही, तर त्या आधीही होती. ती पुस्तकरुपात आणण्याचं काम 1949 मध्ये झालंय. संविधानाने मला एक तर देशाचं मालक बनवलं आहेच. पण आज मी जे काही राजवैभव शोभा रामचंद्र असं लिहिल्यावर गुगलला जे काही येतंय, ते येण्याचं कारण संविधान आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)