You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अंडर-19 महिला विश्वचषक : 'स्टार परफॉर्मर' ठरलेल्या भारताच्या 'या' 3 रणरागिणींबद्दल जाणून घ्या
मलेशियात सुरु असलेल्या महिला अंडर-19 क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट राखून पराभव केला आहे. कर्णधार निकी प्रसादच्या नेतृत्वात भारतीय संघाने हा विश्वचषक आपल्या नावे केला आहे.
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार कायला रेनेकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर अक्षरशः नांगी टाकली.
दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ फक्त 82 धावा करू शकला. आफ्रिकेच्या चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. लेग स्पिनर गोंगाडी त्रिशाने भारताकडून सर्वाधिक विकेट घेतल्या.
तिने 4 ओव्हरमध्ये फक्त 15 धावा देत 3 विकेट घेतल्या. पारुणिका सिसोदिया, आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्माने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेकडून मिके व्हॅन वुर्स्टने सर्वाधिक 23 धावा केल्या. मात्र, गोंगाडी त्रिशाच्या गोलंदाजीवर ती स्टम्प आउट झाली. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार कायला रेनेके 21 बॉल्समध्ये फक्त 7 धावा करू शकली.
दक्षिण आफ्रिकेने ठेवलेल्या 83 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने फक्त एक विकेट गमावली.
सलामीला उतरलेली जी कमालिनी 8 धावा करून बाद झाल्यानंतर सानिका चाळके आणि गोंगाडी त्रिशाने भारताला विश्वचषक मिळवून दिला.
अ गटात पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर संपूर्ण स्पर्धेत आक्रमक फलंदाजी केलेल्या गोंगाडी त्रिशाने अंतिम सामन्यातही निराशा केली नाही.
त्रिशाने 33 बॉल्समध्ये 8 चौकार खेचत 44 धावा केल्या. सानिका चाळकेने 22 बॉल्समध्ये 26 धावा करून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिकेला बजावली.
19 वर्षांखालील महिलांच्या भारतीय क्रिकेट संघाने क्वालालंपूरच्या बायुमास ओव्हलवर झालेल्या अंतिम सामन्यात हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
भारतीय संघाने सुपर सिक्समध्ये बांगलादेश आणि स्कॉटलंडवर मात करण्यापूर्वी साखळी फेरीत वेस्ट इंडिज, मलेशिया आणि श्रीलंका संघांचा पराभव करून सर्व सामने जिंकले होते.
दुसरीकडे ग्रुप सीमध्ये अव्वल स्थानी राहिलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने साखळी फेरीत न्यूझीलंड, सामोआ आणि नायजेरियाचा पराभव केला होता.
सुपर सिक्समध्ये दक्षिण आफ्रिकेने आयर्लंडचा पराभव केला होता तर अमेरिकेच्या संघाविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट राखून पराभव केला होता.
संपूर्ण स्पर्धेतील भारतीय संघाची कामगिरी
भारतीय संघाने याआधी 2023मध्ये देखील हा विश्वचषक जिंकला होता. 2025मध्ये तीन डावखुऱ्या गोलंदाजांनी भारतीय संघाकडून चमकदार कामगिरी केली. वैष्णवी शर्मा, आयुषी शुक्ला आणि पारुणिका सिसोदिया या तीन गोलंदाजांनी अनुक्रमे 17, 14 आणि 10 विकेट घेतल्या.
विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत वैष्णवी आणि आयुषी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर पारुणिका चौथ्या स्थानी राहिली.
या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये गोंगाडी त्रिशाने अव्वल क्रमांक पटकावला आहे. तिने एकूण 305 धावा केल्या. त्रिशा 2023च्या विश्वचषकात सुद्धा सहभागी झाली होती.
याशिवाय वेगवान गोलंदाज शबनम शकील आणि सोनम यादव यांनी देखील 2023 च्या स्पर्धेत भाग घेतला होता. गोंगाडी त्रिशाने स्कॉटलंडच्या विरोधात नाबाद 110 धावांची खेळी केली. याशिवाय प्रत्येक सामन्यात तिने चांगली सुरुवात करून दिली.
पहिल्याच सामन्यात वैष्णवीने पाच धावा देऊन पाच विकेट्स घेतल्या आणि त्यानंतर तीन वेळा तीन विकेट्स घेतल्या. तिने या स्पर्धेत एक हॅट्रिक देखील केली आहे.
आयुषीची सर्वोत्तम कामगिरी स्कॉटलंडविरुद्धच्या सुपर सिक्स सामन्यात होती, ज्यामध्ये तिने चार विकेट्स घेतल्या. त्याशिवाय, त्याने मलेशियाविरुद्ध तीन विकेट्स घेतल्या.
पारुणिकाने कामगिरी उपांत्य सामन्यात आणि स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी केली ज्यामध्ये तिने 3-3 विकेट्स घेतल्या. भारतीय संघाच्या बहुतांश खेळाडूंनी या स्पर्धेत चांगली कामगिरी केली.
भारताच्या स्टार परफॉर्मर त्रिशा, वैष्णवी आणि आयुषी कोण आहेत?
आंध्र प्रदेशातील भद्राचलम येथे जन्मलेल्या त्रिशाने वयाच्या दुसऱ्या वर्षापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
गोंगाडी त्रिशा नऊ वर्षांची असताना ती हैदराबादच्या अंडर-16 संघाकडून खेळत होती. त्यानंतर तिने लवकरच 23 वर्षांखालील संघात स्थान मिळवलं. त्यानंतर तिने साऊथ झोन म्हणजे दक्षिण भारताचे प्रतिनिधित्व केले.
ईसपीएन क्रिकइन्फो (ESPNcricinfo) ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "मला माझ्या वडिलांकडून क्रिकेटबद्दल कळलं, त्यावेळी मला क्रिकेट म्हणजे काय हे फारसं समजत नव्हतं."
फक्त त्रिशाच नाही तर सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज बनलेल्या वैष्णवी शर्मानेही खूप कमी वयात आपली प्रतिभा दाखवली होती.
तिचे वडील नरेंद्र शर्मा, जे ग्वाल्हेरच्या जीवाजी विद्यापीठात ज्योतिषशास्त्राचे प्राध्यापक होते, त्यांनी वैष्णवी चार वर्षांची असताना तिला क्रिकेटच्या मैदानात आणलं. वैष्णवीचे वडील ज्योतिषशास्त्रात पीएचडी करणारे ग्वाल्हेरमधील पहिले व्यक्ती होते.
नरेंद्र शर्मा यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, "ताऱ्यांचा अभ्यास केल्यावर मला जाणवलं की ती खेळासाठी बनली आहे. आणि क्रिकेट हाच तिचा खेळ आहे."
"ती चार वर्षांची असताना मी तिला क्रिकेट शिकवायला सुरुवात केली. आम्ही तिला उन्हाळी क्रिकेट शिबिरांमध्ये घेऊन जाऊ लागलो. त्यानंतर आम्ही तिला तानसेन क्रिकेट अकादमीमध्ये ठेवले, जिथून तिने ग्वाल्हेर जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून खेळायला सुरुवात केली."
तिला फिरकी गोलंदाजीची प्रेरणा कुठून मिळाली हे स्पष्ट करताना, नरेंद्र शर्मा म्हणाले की, त्यांनी तिला प्रथम दूरवरून आणि नंतर दोन पावलांवरून धावण्यास भाग पाडून तिची चाचणी घेतली.
त्यांनी लिहिलं आहे की, "ती फक्त दोन पावले धावत असताना चांगली कामगिरी करत होती. आमची मुलगी 8-10 वर्षांची असताना, जीडीसीए स्पर्धेत तिची कामगिरी उत्कृष्ट होती. तिचा खेळ बघून तेथील अधिकारी प्रभावित झाले. सर्व फलंदाजांनी तिच्याविरुद्ध संघर्ष केला. इतर बहुतेक खेळाडू तिच्यापेक्षा 3-4 वर्षांनी मोठे होते. 18 वर्षांच्या वैष्णवीने 2017 साली वयाच्या 11 व्या वर्षी मध्य प्रदेशकडून 16 वर्षांखालील संघात पदार्पण केलं."
तर वैष्णवी शर्माचे प्रशिक्षक लवकेश चौधरी म्हणतात की, ती आर्म बॉल खूप चांगला फेकते आणि अगदी अचूक गोलंदाजी करते.
ते म्हणाले, "ती विकेट-टू-विकेट गोलंदाजी करते आणि एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. ती ग्वाल्हेरमध्ये आंतर-क्लब स्तरावर वरिष्ठ मुलांमध्ये खेळते. या वर्षी मध्य प्रदेशने राष्ट्रीय विजेतेपद पटकावलं तेव्हा ती वरिष्ठ संघाचा भाग होती."
17 वर्षांच्या आयुषीच्या आयुष्यात क्रिकेट अत्यंत योगायोगाने आलं. तिचे वडील लालजी शुक्ला इंदूरमध्ये पंडित आहेत, ते धार्मिक कार्य करतात.
ते सांगतात की सुमारे 8-9 वर्षांपूर्वी, माजी भारतीय महिला क्रिकेटपटू संध्या अग्रवाल (ज्यांच्या बहिणीचे निधन झाले होते) यांच्यासोबत इंदूरहून उज्जैनला एका विधीसाठी प्रवास करत असताना, त्यांच्या मनात पहिल्यांदा आयुषीला क्रिकेट खेळवण्याची कल्पना आली.
ते म्हणतात, "आम्ही बोलत होतो आणि संध्याने विचारले - 'पंडितजी, तुम्हाला किती मुलं आहेत?'" मी म्हणालो- 'मला तीन मुलगे आणि एक मुलगी आहे. मी त्यांना सांगितलं की माझी मुलगी फक्त नऊ वर्षांची आहे. तर त्या म्हणाल्या 'तुम्ही तुमच्या मुलीला क्रिकेट का खेळवत नाही?'. मी म्हणालो- 'मला क्रिकेटबद्दल फारशी माहिती नाही. मी क्रिकेट बघतो पण ते खेळायचं कसं हे मला माहित नाही.' त्यांनीच मला आयुषीला क्रिकेट अकादमीत दाखल करण्यास सांगितले होते."
आयुषीचे वैयक्तिक प्रशिक्षक देवाशिष निलोसे म्हणतात की ती एक उत्कृष्ट फलंदाज आहे आणि एक चांगली क्षेत्ररक्षक देखील आहे. ते म्हणतात की "ती ज्या कोणत्या संघात खेळते त्या संघाला संतुलन राखण्यास मदत होते."
ते म्हणाले, "चार-पाच वर्षांपूर्वी जेव्हा ती माझ्याकडे आली तेव्हा ती खूप लहान होती. तीन वर्षांत तिने तिच्या खेळात खूप सुधारणा केली आहे. ती 17 वर्षांची आहे, पण तिची परिपक्वता खूप जास्त आहे. तिच्यात विविधता आहे. आणि ती अगदी अचूक गोलंदाजी करते. ती फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करण्याच्या तिच्या क्षमतेने प्रत्येक संघात संतुलन आणते."
आयुषीच्या इंदूरमधल्या देवगुराडिया येथे असलेल्या घरापासून तिची अकादमी 12 किलोमीटर अंतरावर आहे.
आयुषीने तिथे जाण्यासाठी तब्बल दीड वर्षे रोज 24 किलोमीटर सायकल चालवली आहे.
पारुणिका सिसोदिया ही 19 वर्षीय खेळाडू एकमेव आहे जिच्या घरी क्रिकेटची पार्श्वभूमी आहे.
तिचे वडील दिल्लीत क्रिकेट प्रशिक्षक म्हणून काम करतात . पारुणिका स्वतः एक टेनिसपटू होती आणि टेनिसमध्ये 12 वर्षांखालील मुलींच्या गटात ती टॉप 30 मध्ये पोहोचली होती. यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये टेनिस प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, ती दररोज तिच्या वडिलांना भेटायला जायची, जे त्याच कॉम्प्लेक्समध्ये नवोदित क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देत होते.
सध्या दिल्लीच्या गार्गी कॉलेजमधील आरपी क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेली पारुणिका म्हणाली, "टेनिसनंतर मी माझ्या वडिलांकडे फिटनेससाठी जात असे आणि तिथेच मला क्रिकेटमध्ये रस निर्माण झाला. मग मी हळूहळू क्रिकेट खेळू लागले आणि मला क्रिकेटची आवड निर्माण होऊ लागली. मला जाणवले की मी त्यातून करिअर करू शकते."
तिचे वडील सुधीर म्हणतात, "तिला लॉन टेनिस खेळायला खूप आवडायचे. एक तासाच्या टेनिस क्लासनंतर ती माझ्या शेजारी येऊन बसायची. मी तिला सांगितलं की रिकामं बसण्याऐवजी तिने क्रिकेटमध्ये काहीतरी करावं."
अकादमीतील तिचे प्रशिक्षक अजय वर्मा म्हणतात की तिच्याकडे लहानपणापासूनच प्रतिभा होती.
ते म्हणाले, "जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिले तेव्हा मला वाटलं की तिच्याकडे एक अद्भुत प्रतिभा आहे. हवेत आणि खेळपट्टीवर तिचा वेग चांगला होता आणि तिच्या वयाच्या मानाने ती अतिशय वेगवान होती. फलंदाजांकडे तिच्या चेंडूला प्रत्युत्तर देण्यासाठी फार कमी वेळ होता. यामुळेच तिला ज्युनियर संघांमध्ये यश मिळू लागलं."
विश्वविजेत्या संघाची मराठी उपकर्णधार सानिका चाळके कोण आहे?
अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या मोनालिसा लेगोडीला खणखणीत चौकार खेचत भारताला विश्वविजेता बनवण्याचं काम एका मराठी खेळाडूने केलं. अंडर 19 भारतीय महिला संघाची उपकर्णधार सानिका चाळकेने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली.
सानिका चाळकेचं कुटुंब मुंबईच्या कांजूरमार्ग येथे राहतं. सानिकाचे वडील विनोद चाळके यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, "सुरुवातीला आम्ही डोंबिवलीत राहत होतो. सानिकाचे शालेय शिक्षण डोंबिवलीत झाले. आता आम्ही कांजुरमार्ग येथे राहत आहोत. सानिकाच्या क्रिकेट वाटचालीविषयी विनोद चाळके यांनी सांगितले, वयाच्या दहाव्या वर्षापासून सानिका राहत्या घर परिसरात क्रिकेट खेळायची. तेव्हापासून तिला क्रिकेटची आवड निर्माण झाली. सानिकाची आवड विचारात घेऊन तिला क्रिकेट प्रशिक्षण सुरू केले.
क्रिकेट खेळातील विविध डावपेच तिने आत्मसात करून स्वतामधील कौशल्ये विकसित केली. समर्पित भावाने ती क्रिकेट खेळत होती. त्यामुळे तिची क्रिकेट मुंबई संघात यापूर्वी निवड झाली. 16 वर्षाखालील, 19 वर्षाखालील गटात ती खेळली. अल्प वयात तिने क्रिकेट खेळातील महत्वाचे डावपेच आत्मसात केले. आता ती मुंबई क्रिकेट संघात खेळत आहे. 19 वर्षाखालील मुलींच्या वर्ल्ड कप टी-20 क्रिकेट स्पर्धेत तिची भारताची उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे."
मुलुंड-नाहूर येथील सनरूफ क्रिकेट मैदानावर क्रिकेट मंत्र अकादमीमध्ये सानिका क्रिकेटचा सराव करते. याशिवाय मुंबई संघात असल्याने तिथेही तिचा सराव सुरू असतो, असे वडील विनोद शेळके यांनी लोकसत्ताला सांगितलं होतं.
सानिका घाटकोपर येथील झुनझुनवाला महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. सानिका डावखुरी फलंदाज आहे. विश्वचषकात तिने एकूण 119
धावा केल्या. तिने स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात 29 धावा करून या स्पर्धेतली तिची सर्वोत्तम कामगिरी केली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)