अफगाणिस्तान - पाकिस्तानमधील तणावामागं मुत्ताकी यांची भारत भेट हे कारण आहे का?

अफगाणिस्तानच्या सीमाभागात पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यानंतर तालिबानच्या संरक्षण मंत्रालयानं, त्यांच्या सैन्यदलांनी शनिवारी (11 ऑक्टोबर) रात्री 'प्रत्युत्तराची कारवाई' केली असल्याचं स्पष्ट केलं आहे.

पाकिस्ताननं पुन्हा अफगाणिस्तानच्या हवाई सीमेचं उल्लंघन केलं तर त्याला 'कणखरपणे प्रत्युत्तर' दिलं जाईल, असा इशारा तालिबानच्या संरक्षण मंत्रालयानं दिला.

या प्रकरणी पाकिस्ताननं अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्यं केलेलं नाही. मात्र रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दोन्ही देशांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं सांगितलं की, शनिवारी (11 ऑक्टोबर) रात्री दोन्ही देशांच्या सीमेवरील अनेक ठिकाणी चकमकी उडाल्या. पाकिस्तानातील लष्करी सूत्रांनी बीबीसीकडे या चकमकींची पुष्टी केली आहे.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या ताज्या तणावामुळं या प्रदेशातील शांतता आणि स्थैर्याबाबत जाणकार चिंता व्यक्त करत आहेत.

जाणकारांच्या मते, या तणावाचं रुपांतर मोठ्या संघर्षात होण्याआधीच 'प्रभावशाली देशांनी पाकिस्तानवर दबाव' टाकण्याची गरज आहे.

दरम्यान, सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये अलीकडे संरक्षण करार झाला. त्याची चर्चा होत आहे. या करारानुसार या दोन्ही देशांपैकी एका देशावर जरी हल्ला झाला, तरीदेखील त्याला दोन्ही देशांवरील हल्ला मानलं जाईल.

सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं एक वक्तव्यं जारी केलं असून, त्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात सुरू असलेल्या चकमकी आणि दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

तसंच दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे. सौदी अरेबियानं, ते या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असं म्हटलं आहे.

काही जाणकारांच्या मते, पाकिस्ताननं कट्टरतावादाच्या मुद्द्यासंदर्भात तालिबानवर दबाव निर्माण करण्यासाठी काबूलवर हवाई हल्ला केला.

मात्र, यामुळे अफगाणिस्तानातील कट्टरतावाद रोखण्यात पाकिस्तानला यश येईल का? दोन्ही देशांमध्ये ड्युरंड लाईन हा एक वादाचा मुद्दादेखील आहे. यामुळे हा तणाव आणखी वाढतो.

ब्रिटिशांच्या राजवटीत अफगाणिस्तान आणि ब्रिटिश इंडियामध्ये जी सीमा निश्चित करण्यात आली ती अफगाणिस्तानला मान्य नाही.

ड्युरंड लाईन अस्तित्वात आल्यानंतर काबूलमध्ये सत्तेत आलेल्या प्रत्येक सरकारनं ही लाईन किंवा ही सीमा मान्य करण्यास नकार दिला आहे.

काबूलवर पाकिस्ताननं हल्ला करणं 'चुकीचं'

बीबीसीच्या प्रतिनिधी स्नेहा यांच्याशी बोलताना भारताच्या माजी राजदूत वीणा सीकरी म्हणाल्या की, या हल्ल्याद्वारे पाकिस्तान, तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भारत दौऱ्याबाबत अफगाणिस्तानवरची नाराजी व्यक्त करतो आहे.

त्याचबरोबर त्या म्हणाल्या की, पाकिस्तानचं हे पाऊल 'चुकीचं' आहे.

वीणा सीकरी यांच्या मते, "इस्रायलनं जेव्हा दोहावर हल्ला केला होता, तेव्हा पश्चिम आशियातील देशांसह आंतरराष्ट्रीय समुदायात खूप संताप होता. त्यामुळं पाकिस्ताननं काबूलवर हल्ला करण्याचा प्रश्नच येत नाही."

"पाकिस्ताननं काबूलवर हल्ला करून चुकीचं केलं आहे. याचा पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर नकारात्मक परिणाम होतो आहे."

त्या म्हणाल्या की, "अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात का आले, यावर पाकिस्तान एकप्रकारे अफगाणिस्तानबद्दल नाराजी व्यक्त करतो आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांनी संयुक्त वक्तव्यंदेखील जारी केलं."

सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात अलीकडेच एक संरक्षण करार झाला आहे. त्यामुळं पाकिस्तान-अफगाणिस्तान तणावावर सौदी अरेबिया कशाप्रकारची प्रतिक्रिया देईल? हा प्रश्न वीणा सीकरी यांना विचारण्यात आला.

त्यावर त्या म्हणाल्या की, सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमधील संरक्षणविषयक संबंध खूप जुने आहेत. दोन्ही देशांमध्ये झालेल्या या संरक्षण कराराला स्वतंत्रपणे पाहायला नको. याकडे एक 'आर्थिक देवाणघेवाणी'चा करार म्हणूनच पाहायला हवं.

"मला वाटत नाही की, सौदी अरेबिया असं कोणतंही पाऊल उचलेल. कारण भारत आणि सौदी अरेबियाचे चांगले संबंध आहेत. याशिवाय सौदी अरेबियाचे इतर देशांशी संबंध आहेत," असंही त्यांनी म्हटलं.

"सौदी अरेबियाच्या सरकारनं म्हटलंही आहे की, भारत आणि सौदी अरेबियामधील संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही," असंही सीकरी म्हणाल्या.

'पाकिस्तानवर दबाव' टाकण्याची आवश्यकता

अफगाणिस्तानातील अमेरिकेचे माजी राजदूत जल्मय खलीलजाद म्हणाले की, काबूलमध्ये पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तातून त्याला प्रत्युत्तर देण्याची मागणी होत आहे. अशा परिस्थितीत 'संघर्ष आणि अस्थैर्या'ची भीती निर्माण झाली आहे.

खलीलजाद म्हणतात की, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी आणि आयएसआयच्या प्रमुखांनी काबूलला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मला शंका वाटते की हे 'अफगाणिस्तान किंवा तहरीक-ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी) शी चर्चा करण्याच्या इच्छे'चं चिन्हं आहे का?

ते म्हणाले की, जर इमरान खान सत्तेतून गेले नसते तर टीटीपीशी करार होऊ शकला असता आणि पाकिस्तानातील हजारो लोकांचा जीव वाचू शकला असता.

अमेरिकेचे माजी राजदूत खलीलजाद म्हणाले की, "अजूनही पाकिस्ताननं डिप्लोमॅटिक मार्ग अवलंबण्यास उशीर झालेला नाही. अर्थात याची शक्यता कमीच दिसते."

खलीलजाद असंही म्हणाले की, मोठा संघर्ष रोखण्यासाठी प्रभावशाली देशांनी 'पाकिस्तानवर दबाव' टाकण्याची आवश्यकता आहे.

मायकल कुगलमन दक्षिण आशियाशी संबंधित मुद्द्यांचे विश्लेषक आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सध्याची परिस्थिती 'गुंतागुंतीची' आहे.

ते म्हणाले की, "अफगाणिस्तानात पाकिस्ताननं केलेला हल्ला आणि तालिबाननं प्रत्युत्तरादाखल केलेली कारवाई यामुळे परिस्थिती खूपच गुंतागुंतीची झाली आहे."

कुगलमन म्हणतात, "अफगाणिस्तानला ड्युरंड सीमारेषा मान्य नाही, हे लक्षात घेतलं आणि सद्यपरिस्थितीतील तणावाबाबत पसरत असलेल्या खोट्या माहितीकडे पाहिलं तर परिस्थिती खूप अस्थिर असल्याचं दिसतं."

हल्ल्यामुळे पाकिस्तानचा फायदा की नुकसान?

डॉ. दाऊद आझमी आंतरराष्ट्रीय विषयांचे जाणकार आहेत आणि बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसचे वरिष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी बीबीसी पश्तोमधील एका लेखात लिहिलं आहे की, याप्रकारच्या हल्ल्यांद्वारे पाकिस्तान टीटीपीच्या बाबतीत, अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारवर दबाव टाकू पाहतं आहे.

दाऊद आझमी म्हणतात, "पाकिस्ताननुसार टीटीपी अफगाणिस्तानात सक्रिय आहे आणि भारताकडून मिळत असलेल्या मदतीमुळे ते पाकिस्तानात हल्ले करत आहेत."

तालिबान सरकार मात्र हे आरोप फेटाळतं. पाकिस्तानमधील हल्ले हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं तालिबानचं म्हणणं आहे. त्याचबरोबर तालिबान सरकार या मुद्द्यावरही भर देतं की, पाकिस्तानला स्वत:च या समस्येवर उपाय शोधावा लागेल.

डॉ. आझमी यांनी लिहिलं आहे की, "पाकिस्तानमध्ये सुरक्षा दलांवर वारंवार हल्ले होत आहेत. त्यामुळे तिथले अधिकारी दबावात आहेत. ते त्यांच्या जनतेला दाखवू इच्छितात की, ते अफगाणिस्तानात हल्ले करून प्रत्युत्तर देत आहेत."

"मात्र अशा हल्ल्यांमुळे पाकिस्तानला नकारात्मक परिणामांनादेखील तोंड द्यावं लागू शकतं."

यामुळे फक्त अफगाणिस्तानातील सर्वसामान्य नागरिकांमध्येच नाही, तर तालिबानच्या सैन्य दलांमध्ये देखील 'पाकिस्तानबद्दलचा द्वेष आणि संताप' वाढतो आहे, असंही ते म्हणाले.

त्यांच्या मते, "पाकिस्तानच्या या पावलांमुळं अफगाणी लोकांमध्ये पाकिस्तानविरोधात युद्धाची भावना वाढते. यामुळं पाकिस्तानी तालिबानसाठी अफगाण तालिबानच्या व्हॉलंटियर्सचा पाठिंबादेखील वाढू शकतो."

"दुसऱ्या बाजूला, जे अफगाण लोक तालिबान सरकारच्या विरोधात पाकिस्तानला सहकार्य करू पाहत होते, अशांसमोरील अडचणीही वाढतील."

डॉ. आझमी म्हणतात की, "तालिबान सरकार अफगाणिस्तानात पाकिस्तानी तालिबानबरोबरच्या सहकार्याचे दावे नाकारतं. मात्र पाकिस्ताननं केलेल्या अशा हल्ल्यांमुळे अफगाण आणि पाकिस्तानी तालिबान जवळ येऊ शकतात."

ते म्हणतात की, पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेले हल्ले हे भारतासाठी एखाद्या 'भेटवस्तू'सारखे आहेत.

"भारत आणि पाकिस्तानमध्ये आधीच तणाव आहे. आता अफगाणिस्तानबरोबर तणाव निर्माण झाल्यामुळे पाकिस्तानला एकाचवेळी दोन आघाड्यांवर दबाव आणि अस्थैर्याला तोंड द्यावं लागतं आहे," असं ते म्हणाले.

"यामुळे पाकिस्तानची डिप्लोमसी, सुरक्षा आणि अर्थव्यवस्था यांच्यासमोर अनेक आव्हानं निर्माण होतील."

हल्ल्याच्या टायमिंगची चर्चा

तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांच्या भारत दौऱ्यातील पहिल्या दिवशी पाकिस्ताननं काबूलवर हल्ला केला.

मुत्तकी यांच्या दिल्ली दौऱ्याच्या वेळेस झालेल्या या हल्ल्यांमुळे अफगाण विश्लेषकांमधील चिंता वाढली आहे. त्यांचं म्हणणं आहे की भारत आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रसज्ज शेजाऱ्यांमध्ये अफगाणिस्तान एक 'प्रॉक्सी संघर्षा'चं (छुपा संघर्ष) मैदान बनू शकतो.

अफगाणिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री डॉ. रंगीन ददफर स्पांता यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं आहे, "मुत्तीकी यांच्या दिल्ली दौऱ्याच्या आधीच मी म्हटलं होतं की, अफगाणिस्तानबाबत भारत आणि पाकिस्तानचं धोरण शांततेच्या दिशेनं नाही तर छुप्या शक्तींना पुढे नेण्याच्या दिशेनं आहे."

"पाकिस्तान आधी तालिबानचा भरवशाचा सहकारी होता. आता भारत सरकारच्या समर्थकांचा एक महत्त्वाचा भाग तालिबानला पाठिंबा देतो आहे. या लढाईत आमच्या लोकांवरच सर्वात जास्त परिणाम होतो आहे," असं त्यांनी म्हटलं.

अफगाणिस्तानतील पत्रकार बिलाल सरवरीही पाकिस्तानच्या हल्ल्याच्या वेळेकडे लक्ष वेधतात. ते म्हणाले की, पाकिस्तान ज्या ड्रोन हल्ल्यांचा आरोप करण्यात आला आहे, त्याच्या तुलनेत यावेळेचा हल्ला 'राजधानीच्या मध्यवर्ती भागात' झाला आहे.

त्यांनी एक्सवर लिहिलं की, "ही वेळ निवडून पाकिस्तान बहुथा एक थेट संदेश देऊ इच्छितो. पाकिस्तान अफगाणिस्तानातील त्याचा प्रभाव आणि अफगाणिस्तानबरोबर भारताची वाढत असलेली जवळीक यासंदर्भातील त्यांच्या अस्वस्थतेचे संकेत पाकिस्तान देत आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.