You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संयुक्त राष्ट्राच्या यादीत 'दहशतवादी' असलेला 'तो' तालिबानी नेता भारतात का येतोय?
- Author, प्रेरणा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी यांची या वर्षीच्या जानेवारी महिन्यात भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासोबत दुबईमध्ये भेट झाली होती.
2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर दोन्ही देशांमध्ये झालेली ही सर्वात उच्चस्तरीय चर्चा होती.
गेल्या 22 एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये जेव्हा हल्ला झाला, तेव्हा अमीर खान मुत्तकी यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला होता.
या घटनेच्या काही दिवसांनंतरच मे महिन्यामध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर आणि अमीर खान मुत्तकी यांच्यात फोनवर चर्चा झाली.
त्यानंतर आता 5 महिन्यांनंतर दोघांचीही दिल्लीत भेट होणार आहे.
भारतातील प्रमुक इंग्रजी वृत्तपत्र असलेल्या 'द हिंदू'च्या एका वृत्तानुसार, मुत्तकी यांना परराष्ट्र मंत्री म्हणून संपूर्ण प्रोटोकॉल पाळून सन्मान दिला जाईल.
त्यांचा पाहुणचार सरकारी अधिकारी करतील आणि 10 ऑक्टोबरला दिल्लीमधील हैदराबाद हाऊसमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत त्यांची भेट होईल.
असिस्टंट प्रोफेसर विनय कौडा हे 'अफगाणिस्तान-पाकिस्तान, काऊंटर-टेररिजम आणि काऊंटर इंसरजेंसी' यासारख्या विषयांवर संशोधन करत आहेत. ते राजस्थानमधील 'सरदार पटेल युनिव्हर्सिटी ऑफ पोलीस, सिक्योरिटी अँड क्रिमीनल जस्टीस'मध्ये कार्यरत आहेत. ते 'इंटरनॅशनल अफेअर्स अँड सिक्योरिटी स्टडीज' विषय शिकवतात.
ते सांगतात की, अमीर खान मुत्तकी हे तालिबानच्या अशा वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत, ज्यांनी काळानुसार आपली राजकीय भूमिका आणि भाषाशैली दोन्हींमध्येही बराच बदल केला आहे.
पुढे त्यांनी सांगितलं, "एक काळ असा होता की जेव्हा मुत्तकी हे तालिबानचे वैचारिक प्रचारक होते. मात्र, आज ते संघटनेचा एक असा चेहरा बनलेले आहेत, जो आंतरराष्ट्रीय संवाद, मुत्सद्दीपणा आणि धोरणात्मक समन्वयाची गरज काय आहे, याची जाण ठेवतो.
कोण आहेत अमीर खान मुत्तकी?
इस्लामिक अमीरात ऑफ अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, अमीर खान मुत्तकी यांचा जन्म 7 मार्च, 1970 रोजी अफगाणिस्तानातील जारघुन गावामध्ये झाला होता.
हे गाव अफगाणिस्तानातील हेलमंड प्रांतातील नाद अली जिल्ह्यात आहे.
या गावातील एका मशिदीमधूनच त्यांनी सुरुवातीचं शिक्षण घेतलं.
मात्र, 1978 मध्ये जेव्हा अफगाणिस्तानमध्ये सत्तापालट झाला आणि देशात कम्यूनिस्टांची राजवट आली तेव्हा त्यांच्या पाठिंब्याने तत्कालीन सोव्हिएत युनियननं आपलं सैन्य अफगाणिस्तानला पाठवलं. तेव्हा वयाच्या नवव्या वर्षीच मुत्तकी हे पाकिस्तानात गेले होते.
तिथे त्यांनी अफगाण विस्थापितांसाठी चालवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या शाळांमध्ये धार्मिक आणि पारंपारिक शास्त्रांचा अभ्यास केला.
सुरुवातीच्या काळात, मुत्तकी हे हेलमंडमधील कम्युनिस्ट राजवटीविरुद्ध मुजाहिदीन किंवा इस्लामिक लढवय्यांच्या जिहादमध्ये खूप सक्रिय होते.
सोव्हिएत सैन्य आणि मुजाहिदीन यांच्यातील युद्ध 1979 ते 1989 पर्यंत चाललं. अखेर सोव्हिएत सैन्याने माघार घेतली.
जेव्हा सोव्हिएत संघ अफगाणिस्तानातून आपलं सैन्य मागे घेत होता, तेव्हा त्या काळातच अफगाणिस्तानमध्ये तालिबान उदयास येत होता.
हा असा काळ होता जेव्हा अफगाणिस्तान यादवी युद्धाच्या विळख्यात सापडलेला होता. या काळात मुजाहिदीनचे वेगवेगळे गट आपापसात लढत होते.
'कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स' या वेबसाइटनुसार, अफगाण मुजाहिदीन किंवा इस्लामिक लढवय्यांच्या एका गटाने अमेरिकन आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्थांच्या पाठिंब्याने तालिबानची सुरुवात केली.
पाकिस्तानी मदरशांमध्ये शिकणारे पश्तून जमातीचे तरुणही या नव्या संघटनेत सामील झाले.
पश्तो भाषेत विद्यार्थ्यांना 'तालिबान' असं म्हणतात.
देशात 4 वर्षांपर्यंत मुजाहिद्दीनांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये सुरू असलेला संघर्ष आणि याच दरम्यान वाढत असलेले गुन्हे, भ्रष्टाचार आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर तालिबानला लोकांकडून समर्थन मिळू लागलं.
तालिबान सरकारचे पहिले सांस्कृतिकमंत्री, आता शिक्षणमंत्री
तालिबान अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवत होता.
1994 मध्ये, तालिबानचे सैनिक कंधारला पोहोचले आणि नंतर 1996 मध्ये राजधानी काबूल ताब्यात घेतली.
त्याच वर्षी, मुल्ला मोहम्मद उमरच्या नेतृत्वाखाली तालिबाननं अफगाणिस्तानला इस्लामिक अमिरात घोषित केलं.
मुत्तकीने या तालिबानी चळवळीत अत्यंत सक्रिय असा सहभाग नोंदवला.
1994 मध्ये तालिबानने कंधार ताब्यात घेतल्यानंतर, त्यांना तिथल्या रेडिओ स्टेशनचं महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आलं.
त्यांना तालिबान हाय काऊन्सिलचं सदस्यही बनवण्यात आलं.
1995 मध्ये मुत्तकी यांना कंधारच्या माहिती आणि सांस्कृतिक विभागाच्या डायरेक्टर जनरल पदाची जबाबदारी देण्यात आली.
बरोबर एका वर्षानंतर तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यानंतर, ते अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातीचे अधिकृत प्रवक्ते आणि माहिती आणि सांस्कृतिक विभागाचे मंत्री बनले.
2000 मध्ये त्यांची शिक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, 9/11 च्या हल्ल्यानंतर पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये अमेरिकेनं अफगाणिस्तानवर आक्रमण केलं आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशातील तालिबान राजवट संपुष्टात आली.
त्यानंतर तालिबानच्या काही नेत्यांनी पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला, तर काहींनी अफगाणिस्तानमधील दुर्गम भागात राहून 'गुरिल्ला जंग' अर्थात गनिमी कावा सुरू ठेवला.
दोहा करारातील भूमिका
न्यू यॉर्क टाईम्सने त्यांच्या एका वृत्तात मुत्तकींबद्दल लिहिलं, "2001 ते 2021 पर्यंत, म्हणजे दोन दशके तालिबान हा अफगाणिस्तानातील एक बंडखोर गट म्हणून सक्रिय राहिला. या काळात, मुत्तकी यांनी तालिबानची रणनीती आखली आणि तालिबानला प्रोत्साहन दिलं."
"नंतर ते सुप्रीम लीडर्सच्या मुख्य स्टाफमध्ये सामील झाले आणि कतारमधील तालिबानच्या राजकीय टीमचा एक भागही बनले. मुत्तकी यांनी तालिबानच्या 'इन्व्हीटेशन अँड गायडेन्स कमिशन'चंही नेतृत्व केलं. या कमिटीने अफगाणचे लष्कर आणि पोलीस कर्मचाऱ्यांना पराभव स्वीकारण्यास आणि त्यांचे नेतृत्व स्वीकारण्यास राजी केलं.
2018 मध्ये तालिबानने अमेरिकेशी चर्चा सुरू केली.
फेब्रुवारी 2020 मध्ये, दोहामध्ये दोन्ही बाजूंमध्ये एक करार झाला. या करारामध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपलं सैन्य मागं घेण्याचं वचन दिलं आणि तालिबाननेही अमेरिकन सैन्यावरील हल्ले थांबवण्याचंही मान्य केलं.
दोहामधील चर्चेचं नेतृत्व मुल्ला अब्दुल गनी बरादर यांनी केलं होतं आणि मुत्तकी त्यांचे सहकारी आणि प्रतिनिधी म्हणून तिथे उपस्थित होते.
विनोद सांगण्याची कला
विनय कौड स्पष्ट करतात, "2021 मध्ये तालिबान पुन्हा सत्तेत आल्यानंतर, मुत्तकी यांना अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. तेव्हापासून, ते विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर तालिबान राजवटीचं प्रतिनिधित्व करत आहेत. मग ते संयुक्त राष्ट्र असो, शांघाय सहकार्य संघटनेसारखे प्रादेशिक मंच असोत किंवा इराण, चीन, तुर्की आणि भारत यांसारख्या देशांशी द्विपक्षीय संवाद असोत, या सगळ्या ठिकाणी त्यांनी तालिबानचं प्रतिनिधित्व केलं आहे."
बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसचे मल्टीमीडिया एडिटर आणि लंडनमधील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजचे असोसिएट फेलो दाऊद आझामी म्हणतात की, मुत्तकी एक चांगला वक्ता आहेत आणि इतरांना आपलं म्हणणं पटवून देण्यामध्ये ते पारंगत आहेत.
ते सांगतात की, "मुत्तकी यांना विनोद करता येतो आणि ते अनेकदा त्यांचा वापर आपला मुद्दा मांडण्यासाठी आणि आपली भूमिका अधिक मजबुतीनं मांडण्यासाठी करत असतात."
UNSC मध्ये बंदी घातलेल्या 'दहशतवाद्यांच्या' यादीत समाविष्ट
2021 मध्ये, जेव्हा अफगाणिस्तानात तालिबान सरकार सत्तेत होतं, तेव्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं अमीर खान मुत्तकी यांचा समावेश बंदी घातलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत केला होता.
तेव्हा ते तालिबान सरकारमध्ये शिक्षण मंत्री होते आणि त्यांच्यावर तालिबानवर अल-कायदाला आश्रय देण्याचा आणि पाठिंबा देण्याचा आरोप होता.
मुत्तकी यांच्यासह सर्व वरिष्ठ तालिबानी नेत्यांना संयुक्त राष्ट्रांच्या 'दहशतवादी यादीत' समाविष्ट करण्यात आलं होतं.
मुत्तकी यांच्यावर सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून तीन निर्बंध लादले आहेत. पहिला, ते कोणत्याही देशात मुक्तपणे प्रवास करू शकत नाहीत. दुसरा, त्यांची मालमत्ता गोठवलेली आहे. तिसरा, त्यांना कोणतीही शस्त्रं किंवा लष्करी उपकरणं दिली जाणार नाहीत.
मात्र, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद समितीने मुत्तकी यांना भारत दौऱ्यासाठी प्रवास करण्यास सूट दिली आहे.
या दौऱ्यावर उपस्थित झालेत प्रश्न
मात्र, मुत्तकी यांच्या भारत भेटीबद्दल आणि इथे त्यांना मिळणाऱ्या आदरातिथ्याबद्दल अनेक लोक प्रश्न उपस्थित करत आहेत.
अफगाण पत्रकार हबीब खान यांनी 'एक्स' या सोशल मीडिया साइटवर लिहिलं, "डियर इंडिया, तालिबानी अधिकाऱ्यांना आदरतिथ्य बहाल करणं, हा अफगाण राष्ट्रासोबतचा विश्वासघात आहे. तसेच ही त्या शाळेत जाण्यास बंदी घालण्यात आलेल्या मुलींच्या तोंडावर मारलेली एक चपराक आहे. दहशतवाद आणि महिलांच्या अत्याचारावर आधारित राजवटीची प्रशंसा करू नका."
तालिबानच्या पहिल्या कार्यकाळाच्या सुरुवातीच्या काळात, तालिबानवर मानवी हक्कांचं उल्लंघन आणि सांस्कृतिक गैरव्यवहाराचे अनेक आरोप झाले होते.
दुसऱ्या राजवटीतही परिस्थिती तशीच आहे. मुलींसाठी शाळांचे दरवाजे बंद आहेत. मुलींनी किंवा महिलांनी लिहिलेल्या पुस्तकांवरही बंदी आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)