You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'गोळी लागली तेव्हा माझा हात वडिलांच्या डोक्यावर होता'; मृत्यू झालेल्या संजय लेलेंच्या मुलाने सांगितली संपूर्ण कहाणी
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत हल्ला झाला त्याठिकाणी उपस्थित असलेल्या अनुष्का मोने आणि हर्षद लेले यांनी त्यादिवशी (22 एप्रिल) नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. हल्लेखोरांच्या 'शूट अॅट साईट'ची मागणी मृतांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या सशस्त्र हल्ल्यात महाराष्ट्रातील इतरही काही पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये प्रामुख्याने पुणे, पनवेल, नागपूर आणि डोंबिवली या ठिकाणच्या पर्यटकांचा समावेश आहे.
'गोळीबार झाला तेव्हा माझा हात वडिलांच्या डोक्यावर होता'
संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले म्हणाला, "त्यांनी सगळ्यांना खाली बसायला सांगितलं. मग विचारलं की हिंदू कोण आहे आणि मुस्लीम कोण आहे असं त्यांनी विचारलं. गोळीबार झाला तेव्हा माझा हात वडिलांच्या डोक्यावर होता. माझ्या हाताला काहीतरी जाणवलंं, उठून पाहीलं तर बाबांचं डोकं पूर्ण रक्ताने माखलेले होते."
"त्यांनी माझ्या वडिलांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर स्थानिक लोकांनी आम्हाला जीव वाचवण्यासाठी तिकडून जाण्यास सांगितलं. तिथे वरती जायला घोड्याने तीन तास लागतात. तिकडे गाडी जात नाही. ते सगळे घोडेवाले तिकडे आले आणि जसे जमेल तसे ते लोकांना खाली घेऊन जात होते."
"आमचा घोडावाला तिकडे पोहचला होता आणि त्याने आईला पाठीवर उचलून खाली नेलं. उरलेले लोक चालत उतरत होते, आम्हाला चालत उतरायला चार तास लागले."
"गोळीबार दुपारी झाला, त्यानंतर साडेपाचच्या सुमारास आम्ही खाली पोहोचलो. सातच्या सुमारास तिघांचा मृत्यू झाला हे मला सांगण्यात आलं. रात्रभर आम्ही जागे होतो. त्यानंतर मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी मला नेण्यात आलं. दुसऱ्या दिवशी आम्ही स्थानिक पोलीस कंट्रोल रूममध्ये गेलो. तिथे काही लोकांशी बोलल्यावर कळलं की एका चार वर्षांच्या मुलाला देखील लागलं आहे."
'जिथे हल्ला झाला तिथे एकही सुरक्षा कर्मचारी नव्हता'
हर्षल लेले म्हणाला, "हल्ला झाला त्यावेळी आम्ही जमिनीवर झोपलेलो होतो. त्यामुळे ते किती लोक आहेत हे नीट दिसत नव्हतं. मी ज्या दहशतवाद्याला बघितलं त्याच्या डोक्यावर गोप्रो कॅमेरा लावलेला होता. हल्ल्यानंतर तिथे असलेल्या लोकांनी आम्हाला मदत केली. सगळे सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांनी मदत केली."
"जिथे हा हल्ला झाला तिथे सुरक्षेची कसलीही व्यवस्था किंवा सैनिक नव्हते. तिथे 100 पेक्षा जास्त पर्यटक होते, जास्तही असू शकतात. हा संपूर्ण गोळीबार पाच ते दहा मिनिटं झाला."
अतुल मोने यांच्या पत्नी अनुष्का मोने यांनी सांगितलं, "आम्ही 1 ते 1.30 च्या सुमारास तिकडे पोहचलो होतो. सगळे आनंदी होते. ऊन होतं म्हणून आम्ही पाणी पिण्यासाठी गेलो. शूटींगचा आवाज आला. आम्हाला वाटलं की पर्यटन स्थळ आहे तर काही गेम्स असतील म्हणून लक्ष दिलं नाही."
"अचानक गोळीबार सुरू झाल्यानंतर सगळे घाबरलेले होतो. सगळे विचारू लागले की, हिंदू कोण आणि मुस्लीम कोण आहे? त्यांना कुणीही उत्तर दिलं नाही. तिथे कुणीही वेगळं झालं नाही. आमच्यातले एकजण म्हणाले की का असं करत आहेत? तर त्यांना गोळ्या घातल्या."
"माझे पती (अतुल मोने ) बोलले की, 'गोळ्या घालू नका, आम्ही काही करणार नाही.' तर त्यांनाही गोळ्या घातल्या. हिंदू कोण आहे असं विचारल्यावर आमच्या जिजूंनी हात वर केला त्यांना शूट केलं. आमच्यासमोर तिघांनाही त्यांनी शूट केलं. आमच्या घरातले कर्ते पुरुष होते ते."
"ते लोक गेल्यानंतर आम्हाला काहीच करता आलं नाही. तिथले लोक म्हणत होते की, तुम्ही तुमचा जीव वाचवून तिथून निघून जा."
"दहशत पसरवता असं ते दहशतवादी म्हणत होते. सरकारने यावर काहीतरी करावं आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे."
मृतांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिल्यानंतर आता पुन्हा पत्रकारांनी आणि कुणीही आम्हाला प्रतिक्रिया विचारायला येऊ नये अशी विनंतीही केली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)