अनाया बांगर : 'ट्रान्स खेळाडूंविषयी धोरण वैज्ञानिक आधारावर ठरवावं', BCCI आणि ICC ला पत्र

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

ट्रान्स महिला आणि क्रिकेटर अनाया बांगरनं तिचे वैद्यकीय रिपोर्ट्स आणि एका शास्त्रीय संशोधनाचा अहवाल जाहीर केला आहे आणि बीसीसीआय तसंच आयसीसीनं ट्रान्स क्रिकेटर्सविषयी धोरणावर पुनर्विचार करावा अशी मागणी केली आहे.

ट्रान्स महिलांविषयी बीसीसीआयनं कोणती वेगळी धोरणं मांडलेली नाहीत. पण 2024 मध्ये आयसीसी आणि मग अलीकडेच इंग्लंड क्रिकेट बोर्डानं ट्रान्स महिलांना महिलांच्या क्रिकेटमध्ये खेळण्यावर जवळपास बंदी घातली आहे.

हे नियम मानवी अधिकारांच्या विरोधात आहेत आणि ट्रान्स खेळाडूंच्या करियर तसंच मानसिकतेवर यामुळे वाईट परिणाम होतो आहे, असं मत अनायानं मांडलं आहे.

अनाया ही माजी क्रिकेटर संजय बांगर यांची मुलगी आहे. तिनं अलीकडेच बीबीसी मराठीशी बोलताना ट्रान्स महिला बनण्यापर्यंतच्या तिच्या प्रवासाविषयी सांगितलं होतं.

या प्रवासादरम्यान तिच्यात वेगवेगळ्या शारिरीक मानकांवर आधारीत जे बदल झाले आहेत, त्यांची नोंद मॅन्चेस्टर मेट्रोपोलिटन विद्यापीठातील संशोधक ब्लेर हॅमिल्टन यांनी ठेवली आहे.

जानेवारी 2025 ते मार्च 2025 मधल्या निरीक्षणांवर आधारीत वैज्ञानिक अहवाल आता अनायानं जाहीर केला आहे.

अनायाची ताकद, हिमोग्लोबिनचं प्रमाण, ग्लुकोजची पातळी आणि सर्वांगीण कामगिरीची शारीरिक क्षमता हे सर्व निकष सिसजेंडर म्हणजे जन्मानं महिला असलेल्या खेळाडूंइतके किंवा त्यांच्यापेक्षा कमी पातळीवर असल्याचं यात म्हटलं आहे.

या अहवालावर आयसीसी आणि बीसीसीआयकडून अजून प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. पण दोन्ही बोर्डांना तिनं पत्र लिहिलं असून या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपण तयार असल्याचं अनायानं म्हटलं आहे.

आयसीसीची ट्रान्स खेळाडूंविषयीची भूमिका

ट्रान्स महिलांना महिला खेळाडूंना खेळू द्यावं की नाही, हा मुद्दा क्रिकेटमध्ये गेला काही काळ पुन्हा चर्चेत आला आहे.

सप्टेंबर 2023 मध्ये कॅनडाची डॅनिएल मॅकगाहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारी पहिली ट्रान्स महिला ठरली होती. काहींनी त्याचं स्वागत केलं तर काहींनी त्यावर टीका केली होती.

त्यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौंसिल म्हणजे आयसीसीनं ट्रान्स महिलांसाठी नवे नियम लागू केले.

त्यानुसार एखाद्या ट्रान्स महिलेनं जर प्युबर्टी म्हणजे पौगंडावस्थेतून जाण्याआधी लिंगबदल शस्त्रक्रिया किंवा उपचार घेतले असतील, तरच त्या ट्रान्स महिलेला आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये खेळता येणार आहे.

नऊ महिने सल्ला मसलत केल्यावर हा निर्णय घेतल्याचं आयसीसीनं तेव्हा म्हटलं होतं.

आयसीसीनं बंदी घातल्यावरही इंग्लंड क्रिकेट बोर्डासारख्या काही संघटनांमध्ये ट्रान्स महिलांना स्थानिक पातळीवर खेळता येणं शक्य होतं. पण मे 2025 मध्ये इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या धोरणांमध्येही बदल झाले.

इंग्लंडमध्ये आता केवळ जन्मतः ज्यांचं जेंडर महिला आहे, अशा व्यक्तींनाच महिला आणि मुलींच्या क्रिकेटमध्ये खेळता येणार आहे.

ट्रान्स महिलांना मिश्र आणि खुल्या क्रिकेटमध्ये खेळता येणार आहे, पण अशा स्पर्धा अपवादानंच आयोजित होतात. त्यामुळेच या निर्णयाकडेही ट्रान्स महिलांवरची क्रिकेटची बंदी अशा नजरेतून पाहिलं गेलं.

कारण जगभरात फारच कमी ठिकाणी ट्रान्स व्यक्तींना पौगंडावस्थेत म्हणजे 18 वर्षांपेक्षा लहान वयात लिंगबदल शस्त्रक्रिया किंवा हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा पर्याय उपलब्ध आहे.

वर्ल्ड प्रोफेशनल असोसिएशन फॉर ट्रान्सजेंडर हेल्थच्या मते वयाच्या चौदाव्या वर्षी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीला सुरुवात करता येते आणि काही जेंडर रिअसाईनमेंट शस्त्रक्रिया 15 किंवा 17 व्या वर्षी करता येतात. पण त्या व्यक्तीनं वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेली नसल्यानं पालकांची परवानगी मिळावी लागते, जे अनेकदा अतिशय कठीण असतं.

"अशा अडचणींमुळे भारतासारख्या देशात 18 वर्षांखालील वयात HRT करता येत नाही. या सगळ्यात काहीतरी मार्ग निघायला हवा. माझ्यासारखे अनेकजण आहेत – कदाचित आणखी काही क्रिकेटर्स त्यांचं जेंडर लपवून खेळत असतील," असं अनायानं बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

ट्रान्स महिलांना महिलांच्या खेळात खेळू न देण्यामागे प्रामुख्यानं एक दावा केला जातो की, ट्रान्स महिलांच्या शरीराचा पौगंडावस्थेत पुरुष म्हणून विकास झाला आहे आणि त्यामुळे त्यांची शारीरिक ताकद जास्त असल्यानं त्यांना महिलांसोबत खेळवणं महिलांवर अन्याय करणारं ठरेल.

पण ट्रान्सजेंडर हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मते असं सरसकटीकरण चुकीचं आहे आणि उलट हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीनं ट्रान्स महिलांच्या शरीराचं नुकसानच होतं.

अनायानं आता त्याचाच पुरावा सादर केल्याचा दावा केला आहे.

"एखादा खेळाडू खेळण्यासाठी पात्र आहे की नाही? ही गोष्ट काही कालबाह्य मान्यतांच्या नाही, तर वैज्ञानिक तथ्यांच्या आधारावर ठरवली जायला हवी," असं ती सांगते.

या विषयावर अधिक शास्त्रशुद्ध चर्चा घडावी यासाठीच अनायानं संशोधनात सहभागी व्हायचं ठरवलं.

अनायाचा रिपोर्ट नेमकं काय सांगतो?

डॉ. ब्लेर हॅमिल्टन मॅन्चेस्टर मेट्रोपोलिटन विद्यापीठातील संशोधक आहेत आणि ते ट्रान्सजेंडर व्यक्तींचं आरोग्य आणि खेळातील कामगिरीवर संशोधन करतात.

अनायानं महिला म्हणून आपली खरी ओळख मिळवण्यासाठी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी सुरू केली, तेव्हा ती युकेमध्ये होती. वर्षभर या प्रक्रियेतून गेल्यावर अनाया ब्लेर हॅमिल्टन यांच्या निगराणीखाली वेगवेगळ्या वैद्यकीय आणि मानसिक तपासण्यांना सामोरी गेली. हा त्याचाच अहवाल आहे.

"ट्रान्स महिला बनताना, त्या प्रक्रियेचा माझ्या शरीरावर नेमका काय आणि किती परिणाम झाला आहे ते यात दिलं आहे. यात कुठलं मतप्रदर्शन किंवा कयास नाहीत तर डेटा, विस्तृत माहिती दिली आहे," असं अनाया सांगते.

अनायाच्या रिपोर्टनुसार,

  • तिच्या शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण, ग्लुकोजची पातळी आणि ताकद या सिसजेंडर महिला खेळाडूंमधील सामान्य पातळीएवढ्या किंवा त्यापेक्षा कमी आहेत.
  • हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीनंतर तिची सहनशक्ती (एंड्युरन्स) आणि स्नायूंची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे आणि सामान्यतः सिसजेंडर महिलांमध्ये जेवढी असते, तेवढी झाली आहे.

या अहवालावारून कुठलं राजकारण करण्याचा हेतू नसून, खेळातील समभाव आणि सर्वांचा समावेश यांचा विचार करताना तो विज्ञानाच्या आधारावर व्हावा, असा आपला उद्देश आहे असं अनायानं स्पष्ट केलं आहे.

बीसीसीआयला विनंती

आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष जय शाह यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या सचिवपदावर असताना क्रिकेटमध्ये जेंडर इक्वालिटी – लिंगाधारीत समतेच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. तसंच महिला आणि पुरुष खेळाडूंना समान मॅच फीचं धोरण अवलंबलं होतं.

पण बीसीसीआयनं LGBTQ+ समुदायावाषयी कोणती विशिष्ट धोरणं अथवा विधानं आजवर जाहीर केलेली नाहीत.

ट्रान्स महिलांना महिलांच्या क्रिकेटमध्ये खेळू द्यावं की नाही, याविषयीही बीसीसीआयनं आपली भूमिका मांडलेली नाही. पण काळ बदलतो आहे, तसं बोर्डाला यावर विचार करावा लागेल, असं LGBTQ+ समुदायासोबत काम करणाऱ्या व्यक्तींना वाटतं.

अनायानंही तेच मत मांडत बीसीसीआयला विनंती केली आहे.

"भारतात आणि जगात क्रिकेटतच्या भवितव्यावर मोठा प्रभाव असलेली संस्था या नात्यानं बीसीसीआयला माझी विनंती आहे की त्यांनी या मुद्यांचा विचार करावा :

  • महिला क्रिकेटमध्ये ट्रान्स महिलांच्या समावेशावरची चर्चा सुरू करावी, जी वैद्यकशास्त्र, कामिगिरीचे आडाखे आणि नैतिक समभावाच्या आधारावर केली जाईल
  • प्रत्येक खेळानुसार हिमोग्लोबिनची पातळी, टेस्टॉस्टेरॉन सप्रेशनचा कालावधी आणि कामगिरीची तपासणी यावर पात्रतेचे आडाखे ठरवले जावेत.
  • तज्ज्ञ, खेळाडू, कायदेशीर सल्लागार यांच्या सहयोगानं धोरणं आखावीत, जी सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक असतील.

"मी हा रिपोर्ट आणि माझी कहाणी कोणाची सहानुभूती मिळवण्यासाठी जाहीर करत नाहीये. पण सत्यासाठी करते आहे. कारण सर्वसमावेशकतेचा अर्थ समभावाकडे दुर्लक्ष करणं असा होत नाही, तर त्याचा अर्थ पारदर्शकपणे आणि जबाबदारीनं (कामगिरीचं) मोजमाप करणं, असा आहे," असं अनाायनं नमूद केलं आहे.

बीसीसीआयने या बीसीसीआयकडून प्रतिक्रिया मिळेल, तेव्हा ही बातमी आम्ही अपडेट करू.

ऑलिंपिक आणि इतर खेळांची भूमिका

ट्रान्स महिलांना महिलांच्या खेळांत खेळू द्यायचं की नाही, याविषयी वेगवेगळ्या खेळांमध्ये वेगवेगळे नियम आहेत. बहुतांश ठिकाणी आजही ट्रान्स महिलांचा महिला खेळाडू म्हणून समावेशाला विरोध दिसते.

अमेरिकेत जानेवारी 2025 मध्ये डोनाल्ड ट्रंप यांनी एका अध्यादेशावर स्वाक्षरी केली होती, ज्यात ट्रान्स महिलांना खेळात महिलांच्या गटात खेळण्यास मनाई केली होती.

टेनिसची संघटना WTA नं ट्रान्स महिलांना महिलांच्या टेनिसमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे, मात्र त्यासाठी या व्यक्तींच्या शरीरातील टेस्टॉस्टेरॉनची पातळी किमान बारा महिने 10 nmol/L पेक्षा कमी असायला हवी. तसंच स्पर्धेच्या कालावधीतही ती या निकषाच्या आतच राहायला हवी, असा नियम केला आहे.

ब्रिटिश सायकलिंगमध्ये आता पुरुष आणि महिला अशी विभागणी न करता ओपन आणि महिला अशी विभागणी करतात. त्यामुळे नॉन-बायनरी आणि ट्रान्स जेंडर व्यक्तींना त्या गटात खेळता येणं शक्य झालं आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीनं 2004 सालीच ट्रान्स महिलांना महिलांच्या खेळात ऑलिंपिकमध्ये खेळू देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंदर्भात काही नियम ठरवण्यात आले होते.

त्यानुसार ट्रान्स महिलांनी लिंगबदल शस्त्रक्रिया केलेली असणं आणि त्यांनी कायदेशीररीत्या जेंडर बदलणं गरजेचं होतं. तसंच हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीनंतर किमान दोन वर्षांचा काळ गेल्यानंतरच त्यांना महिलांच्या खेळात खेळू द्यावं, अशा सूचना केल्या होत्या.

यात कायदेशीर मान्यतेचा आणि लिंगबदल शस्त्रक्रियेचा मुद्दा काही देशांत स्वीकारला जाणं कठीण असल्यानं 2015 साली या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आले आणि टेस्टॉस्टेरॉनच्या पातळीचा निकष कायम ठेवण्यात आला.

या नियमांनुसार 2021 मध्ये झालेल्या टोकियो 2020 ऑलिंपिकमध्ये न्यूझीलंडची वेटलिफ्टर लॉरेल हबार्डला खेळण्याची संधी मिळाली. हबार्ड ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेली पहिली ट्रान्स महिला ठरली. मात्र तिला एकही वजन उचलता आलं नाही आणि पदकही मिळालं नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)