आमिर खानने त्याच्या मुलीसोबत घेतलेली जॉईंट थेरेपी हा काय प्रकार आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
“वडिलांशी कधी बोलणंच होत नाही, त्यांना मी सांगितलेलं कधी पटतच नाही.”
“पूर्वी आमच्या भावा-बहिणींचे संबंध चांगले होते पण आता अंतर पडलंय.”
“सासू-सुनांमध्ये कुरबुरी होतात, पण आमच्या मनात अढी घर करून बसलीये.”
दोन व्यक्ती, मग भले त्यांचं एकमेकांशी कोणतंही नातं असो, अंतर येतं, संवाद तुटतो, एकमेकांविषयी मनात अढी बसते.
मी गेली कित्येक वर्षं माझ्या मित्राशी/बहिणीशी/भावाशी/नातेवाईकांशी बोलले नाहीये, बोललो नाहीये अशी वाक्यं अनेकदा आपल्या कानावर पडतात.
आईशी पटत नाही, वडिलांशी पटतं नाही, एका घरात आहेत पण संवाद नाही. समोरासमोर आले तरी नको होतं अशीही उदाहरणं माझ्या पाहाण्यात आहेत.
दिवसागणिक हे संबंध आणखी बिघडत जातात. यावर काहीच उपाय नाही का?
फॅमिली थेरेपी, किंवा जॉईंट थेरेपी हा एक उपाय असू शकतो. याची आठवण आता होण्याचं कारण म्हणजे आमिर खान नेटफ्लिक्स इंडियावर विवेक मूर्ती यांना दिलेल्या एका मुलाखतीत तो आणि त्याची मुलगी इरा हे जॉईंट थेरेपी घेत असल्याचं म्हटलं आहे.
मुळातच थेरेपी किंवा मानसोपचारतज्ज्ञांकडे जाणं आपल्याकडे अजूनही कमीपणाचं समजलं जातं. त्यांच्याकडे जाणं ठार वेडेपणाचं लक्षण असंही समजतात.
पण तरीही त्यातल्या त्यात मान्य काय तर घटस्फोटापर्यंत पोचलेल्या दाम्पत्यांचं काउन्सिलिंग की बुवा त्यांचे संबंध सुधारावेत, त्यांच्यात संवाद व्हावा आणि घटस्फोट होऊ नये.

फोटो स्रोत, Getty Images
पण आयुष्यातली इतर नाती सुधारण्यासाठी, त्यात संवाद व्हावा, मतभेद कमी व्हावे म्हणून कोणत्याही प्रकारची थेरेपी घेण्याचं आपल्याला सुचतच नाही.
अर्थात ते सुचण्यासाठी असं काही असतं हेही माहिती असायला हवं.
म्हणूनच हा लेखप्रपंच की बुवा ही फॅमिली थेरेपी किंवा जॉईंट थेरेपी काय असते.
फॅमिली थेरेपी हा टॉक थेरेपीचा (बोलून मार्ग काढण्याची पद्धत, यात औषधं दिली जात नाहीत) एक प्रकार आहे.
यात एका कुटुंबाला किंवा कुटुंबातल्या काही व्यक्तींना एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तज्ज्ञ मदत करतात.


या थेरेपीचा हेतू हा असतो की कुटुंबातल्या दोन किंवा अधिक सदस्यांमधला संवाद सुधारावा, त्यांचे नातेसंबंध सुधारावेत आणि त्यांचा एकमेकांप्रति असलेला राग किंवा द्वेष कमी संपावा.
बऱ्याचदा ही थेरेपी त्यावेळी वापरली जाते जेव्हा एकतर एक व्यक्ती आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या गोष्टींसाठी कुटुंबाला किंवा कुटुंबातल्या काही गोष्टींना जबाबदार धरत असते, कुटुंबातल्या काही विशिष्ट सदस्यांच्या वागण्याने त्या व्यक्तीला त्रास होत असतो किंवा त्या व्यक्तीच्या वागण्याने संपूर्ण कुटुंब वेठीला धरलं जात असतं.
अशावेळी सगळ्यांनी एकत्र बसून प्रश्नांवर तोडगा शोधणं आवश्यक असतं, पण नातेसंबंध एवढे ताणलेले असतात की बोलायचं म्हटलं तरी त्यात आशयघन संवाद कमी आणि आरोप-प्रत्यारोपच जास्त होतात.
त्यामुळेच काऊन्सिलरकडे जाऊन ही थेरेपी घ्यावी लागते.

फोटो स्रोत, Getty Images
निकीता सुळे या मुंबईत क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून काम करतात. त्या म्हणतात, “मुळात भारतासारख्या देशात कुटुंबप्रधान संस्कृती आहे, म्हणजे एकाच वेळी आपला अनेक व्यक्तींशी संबंध येत असतो, त्यांच्यात भावनिक, आर्थिक, सामाजिक गुंतवणूक असते. त्यामुळे अशा फॅमिली थेरेपीची खरं तर आपल्या देशात सर्वात जास्त गरज आहे.”
त्या पुढे म्हणतात, “कारण आपल्याकडे भावना, त्या भावनांचा निचरा यावर संवाद करण्याची पद्धतच नाही. आपण जेवायला काय केलंय, पैशांचं काय, टीव्हीवर काय झालं यावर बोलू. कुटंबात एकाच वेळी अनेक जण दुखावलेले असतात. त्यावर चर्चा करून, तज्ज्ञाची मदत घेऊन गोष्टी सुटू शकतात, पण घरच्या गोष्टी बाहेर कशा नेणार म्हणून लोक टाळतात.”
क्लीव्हलंड क्लीनिक या मानसोपचाराबद्दल माहिती आणि सल्ले देणाऱ्या वेबसाईटनुसार फॅमिली थेरेपीत कुटुंबातले वेगवेगळे सदस्य एकत्रितरीत्या किंवा गटागटाने तज्ज्ञांशी बोलू शकतात. यात मुलं आणि आईवडील, भावंड, किंवा अगदी तीन पिढ्या एकत्र येऊन आपल्या प्रश्नांवर उत्तरं शोधू शकतात.
या वेबसाईटवर पुढे म्हटलंय की या थेरेपीमुळे काही गोष्टींमध्ये फायदा होऊ शकतो जसं की
- घरात कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या अपराधी भावनेतून बाहेर कसं निघायचं, किंवा एकमेकांना दोषी मानलं जात असेल तर काय करायचं.
- वृद्ध आईवडील, त्यांची मध्यमवयीन मुलं आणि तरुण नातवंड यांच्यात संवादसेतू कसा बांधायचा.
- आईवडील विभक्त होत असतील तर मुलांवर परिणाम होतो, अशा वेळी काय करायचं.
- आणि जर घरात कोणी मानसिक रूग्ण असेल, किंवा मानसिक आजारांशी झुंजत असेल तर कुटुंबियांनी काय करायचं हे सगळं या थेरेपीतून शिकता येतं.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ ओंकार जोशी शिर्डीमध्ये सायकॅट्रिस्ट आहेत. त्यांच्याकडे येणारे पेशंट सहसा ग्रामीण भागातले असतात. ते शुभार्थी आणि शुभंकर असे दोन शब्द वापरतात. ज्याला मानसिक आजार आहे तो शुभार्थी आणि जो काळजी घेणारा आहे तो शुभंकर.
“समजा घरात डिप्रेशनचा शुभार्थी आहे किंवा स्किझोफ्रेनियाचा शुभार्थी आहे ज्याचं वागणं खूप बिघडलं आहे. अशा वेळेस तो बऱ्याच वेळेस तयार नसतो काऊन्सिलिंगला. मग आपण कुटुंबासोबत काम करतो, की त्यांनी त्याला कसं हँडल करायचं. त्याचा आजार कुटुंबाला समजून सांगणं हाही फॅमिली थेरेपीचा एक भाग असतो,” ते म्हणतात.
पण ही फॅमिली थेरेपी, कुटुंबांने एकत्रितरीत्या काउन्सिलरकडे जाणं कितपत घडतं? आमचे संबंध बिघडलेत आणि ते सुधारण्यासाठी आम्हाला मदत हवीय असं लोक मान्य करतात का?
“लोक मान्यच करत नाहीत की त्यांना थेरेपीची गरज आहे. अगदी आठच दिवसांपूर्वी माझ्याकडे एक आई मुलगी आल्या होत्या. आई सत्तरीची आणि मुलगी चाळीशीतली. मुलगी उच्चशिक्षित, मोठ्या पदावर काम करणारी. तिचा घटस्फोट झाला आणि त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. आईचं म्हणणं होतं तिने दुसरं लग्न करावं. यावरून त्यांची सतत भांडणं होत होती आणि इतकी टोकाला पोचली होती की आई मेली तरी मला काही हरकत नाही असं मुलीने म्हणून टाकलं. त्या उच्चशिक्षित मुलीला हे मान्यच नव्हतं की तिला मदतीची गरज आहे. काय प्रॉब्लेम आहे तो आईला आहे, तिला शिकवा असा तिचा खाक्या होता. मुळात मुलीच्या डिप्रेशनवर उपचार करण्याची गरज होती. त्यानंतर फॅमिली थेरेपी करून त्यांच्यात संवाद साधता आला असता. पण हाच प्रॉब्लेम आहे की लोक मान्यच करत नाहीत त्यांना थेरेपीची गरज आहे, तर कुटुंबासोबत एकत्र थेरेपी हा तर फार लांबचा विषय.”

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळे जो कोणी थेरेपीला आधी येईल त्या व्यक्तीपासून तज्ज्ञ सुरूवात करतात. आधी काही क्लिनिकल टेस्ट असतात, ज्याला सायकोमेट्रिक टेस्ट असंही म्हणतात, त्या केल्यानंतर आलेल्या व्यक्तीच्या मानसिक अवस्थेचं एक पूर्ण चित्र मिळतं.
“त्या व्यक्तीचा स्वभाव कसाय, तिच्या वेगवेगळ्या गोष्टींवर प्रतिक्रिया असतात, ती अंतर्मुख आहे की बहिर्मुख हे सगळं कळतं. या टेस्ट करून त्या व्यक्तीचे गुणदोष त्या व्यक्तीसमोर ठेवायचं. थेरेपीमध्ये आम्ही दुसऱ्याला नाही शिकवत, त्या व्यक्तीला शिकवतो की तू काय करू शकतेस. तुला काय केल्याने मदत मिळेल,” डॉ जोशी पुढे म्हणतात.
जनरेशनल ट्रॉमावर उत्तर
जनरेशनल ट्रॉमा ही पण सायकोलॉजीमधली संकल्पना आहे. सासूने सुनेला जसं वागवलं, तसंच ती पुढे सासू झाल्यावर तिच्या सुनेला वागवणार. किंवा वडील जर लहान लहान गोष्टींवरून चिडत होते, मारत होते तर मुलगा बाप झाल्यावर तेच करणार. एक पिढीच्या मनावर आघात झालेले असतात, पण त्यावर उत्तर शोधण्याऐवजी ते आघात नकळतपणे पुढच्या पिढीवर केले जातात.
“जनरेशनल ट्रॉमावर एकच उत्तर आहे ते म्हणजे फॅमिली थेरेपी. तो ट्रॉमा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणार यासाठी फॅमिली थेरेपी महत्त्वाची. कारण वागण्याची एक पद्धत, त्यामागचे विचार आपल्या भुतकाळातल्या अनुभवांवरून तयार झालेले असतात. वडील चिडखोर असतील तर मुलाला वाटतं की वडील असेच वागतात, मग तो स्वतःच्या मुलांशी तसाच वागतो. आपली विचार करण्याची पद्धत चुकीची आहे हे कोणीतरी सांगायला हवं आणि बरोबर प्रोसेस काय. आपला जनरेशनल ट्रॉमा बरा करून पुढच्या पिढीशी कनेक्ट कसं करायचं हे या थेरेपीतून कळतं,” पुण्यातल्या थेरेपिस्ट श्रुतकिर्ती फडणवीस म्हणतात.
थेरेपीतून पुढे मार्ग कसा निघतो?
एकदा कुटुंबातले संबंध कशामुळे बिघडलेत हे शोधण्याचा तज्ज्ञ प्रयत्न करतात. बऱ्याचदा असं होतं की एखादी गोष्ट घडलेली असते, तिचा राग वर्षानुवर्ष मनात साठलेला असतो. ती गोष्ट लोक विसरू शकत नाही.
“अशावेळी आम्ही एक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरेपी वापरतो. म्हणजे जे काय झालंय ते एक्सेप्ट करा आणि इथून पुढे चांगलं करायचं आहे असा निर्धार करा. गोष्टी सोडून द्यायला शिकवतो आम्ही, पण त्याचबरोबर आता पुढे काय करायचं याचे रस्ते शोधण्यासाठीही मदत करतो,” श्रुतकिर्ती म्हणतात.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा डॉ. जोशी मांडतात. “आपण काय सहन करू शकतो याचं लिमिट ठरवायचं. की बुबा याच्यापुढे जे घडेल ते मी सहन करणार नाही.”

फोटो स्रोत, Getty Images
श्रुतकिर्तीही असंच मत मांडतात. “बाऊंड्री सेटिंग, किंवा समोरच्याला आपली मर्यादा ठरवून देणं हा प्रकारच नाहीये आपल्याकडे. सुरूवातीला वाटतं की काय स्वार्थी लोक आहे, पण नंतर नंतर नाती सुधारतात. कारण एकमेकांकडून अपेक्षा पण मर्यादित राहातात.”
पण सगळे तज्ज्ञ हे एकमताने मान्य करतात की फॅमिली थेरेपीबद्दल जेवढी जागरूकता समाजात असायला हवी तेवढी नाही.
निकीता सुळे म्हणतात, “आपल्याला हा विचार बाजूला ठेवावा लागेल की घरातले प्रश्न बाहेर तिऱ्हाईताला का सांगायचे. तुम्ही ज्यांच्याकडे थेरेपी घ्यायला जाता ते तज्ज्ञ लोक असतात, ते तुम्हाला जज करत नाहीत, उलट मार्ग काढायला मदत करतात. पण जर मदत न घेता मनातल्या गोष्टी तशाच घुसमटत ठेवल्या तर मग वाद, भांडणं वाढत जातात आणि तुमच्या पूर्ण आयुष्याला व्यापून टाकतात.”
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











