मायग्रेनच्या रुग्णांना मिळू शकतो दिलासा, नवीन संशोधनाने आशा पल्लवित

डोकेदुखी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक छायाचित्र
    • Author, इथान गज आणि पीए मीडिया
    • Role, बीबीसी न्यूज

मायग्रेन ही एक गंभीर समस्या आहे. मायग्रेनमुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर परिणाम झाल्याची अनेक उदाहरणं आहेत.

ही अशी समस्या आहे की त्यावर एक रामबाण इलाज मिळेलच असे नाही.

पण आता एक संशोधन समोर आलं आहे. त्यानुसार, हा उपचार आतापर्यंतचा मायग्रेनवरील सर्वोत्तम उपचार ठरू शकतो अशी आशा संशोधकांना वाटते.

'ट्रिप्टान' समुहातील औषध हे मायग्रेनवर प्रभावी ठरू शकते असे संशोधकांना वाटते.

'ट्रिप्टान' समुहातील औषधांमुळे तुमची मायग्रेनच्या तीव्र वेदनेतून मुक्तता करू शकते असं या संशोधनातून समोर आलंय. ऑक्सफर्ड विद्यापीठात करण्यात आलेल्या या संशोधनात 89,000 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.

मायग्रेनवरील उपचारासाठी वापरात येणाऱ्या इतर 17 औषधांसोबत (oral medicine) या औषधाचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. हे संशोधन ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

इलेट्रिप्टान, रिझाट्रिप्टान, सुमाट्रिप्टान आणि झोल्मिट्रिप्टान हे चार प्रकारचे ट्रिप्टान सर्वाधिक परिणामकारक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

ज्या वेळी इतर वेदनाशामकं परिणाम करत नाहीत त्यावेळी रुग्णाला वेदनेतून आराम मिळावा यासाठी ट्रिप्टान समुहातील औषधी दिली जाते.

ट्रिप्टानमुळे सेरोटॉनिन हे रसायन मेंदूत स्रवते. ज्याठिकाणी तीव्र वेदना होत आहेत त्या भागातील वेदना कमी होण्याची क्रिया नंतर सुरू होते.

लाल रेष
लाल रेष

ज्यावेळी ट्रिप्टान समूहातील औषधींचा तुलनात्मक अभ्यास केला तेव्हा संशोधकांच्या असं लक्षात आलं की, इलेट्रिप्टान हे सर्वांत परिणामकारक आहे. इलेट्रिप्टानमुळे दोन तासांत आराम मिळू शकतो. त्या खालोखोल रिझाट्रिप्टान, सुमाट्रिप्टान आणि झोल्मिट्रिप्टान आहेत.

औषधांचे सेवन केल्यानंतर पुढील 24 तासांसाठी आराम मिळावा या दृष्टीने इलेट्रिप्टान आणि आयबुप्रोफेन या औषधी सर्वांत परिणामकारक असल्याचे संशोधनात आढळले आहे.

डोकेदुखी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक छायाचित्र

मायग्रेनच्या उपचारासाठी पर्याय म्हणून इतरही नव्या औषधींबाबत अभ्यास करण्यात आला. लासमिडिटान, रिमेजिपांट, उब्रोजिपांट यांचाही अभ्यास करण्यात आला. पण ही औषधी ट्रिप्टान इतकी परिणामकारक नसल्याचे लक्षात आले.

या शोधनिबंधाच्या प्रमुख लेखक अँड्रेया सिप्रियानी हे ऑक्सफर्ड विद्यापीठातील मानसोपचार विभागात प्राध्यापक आहेत. ते सांगतात की "प्लासिबोच्या तुलनेत ( या गोळ्यांमध्ये कुठलेही रसायन नसते. केवळ अभ्यासासाठी स्वयंसेवकांना देण्यात येते ) ही औषधी परिणामकारक आहेत. पण त्याचबरोबर आमच्या हे लक्षात आलं आहे की सध्या वापरात असलेल्या औषधींपेक्षा ट्रिप्टान औषधी जास्त चांगल्या प्रकारे काम करत आहे. ही नवीन बाब आहे."

"वैद्यकीय उपचार पद्धतींमध्ये अचूक औषध सूचवण्याच्या दृष्टीने हे संशोधन पथदर्शक ठरेल. तीव्र मायग्रेनवरील उपचाराच्या दृष्टीने या संशोधनाचा मार्गदर्शक म्हणून वापर होईल. तसेच यामुळे रुग्णांना खात्रीशीररीत्या सर्वोत्तम सुविधा आणि उपचार मिळण्याचे दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले जाईल," असे सिप्रियानी म्हणाले.

 अँड्रेया सिप्रियानी
फोटो कॅप्शन, ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधक अँड्रेया सिप्रियानी

युनायटेड किंगडममध्ये अंदाजे 1 कोटी लोकांना मायग्रेनची तक्रार असल्याचा अंदाज 'द मायग्रेन ट्रस्ट' या सेवाभावी संस्थेनी सांगितला आहे.

मायग्रेनची लक्षणं तीव्र डोकेदुखी, प्रकाशाप्रति संवेदनशीलता,अस्थिर दिसणे, मळमळ आणि उलटी अशी आहेत.

"ट्रिप्टानचा वापर मायग्रेनची तक्रार असलेल्या अनेकांसाठी परिणामकारक ठरला असला तरी अनेकांनी मात्र या उपचाराला प्रतिसाद दिला नाही," असं द मायग्रेन ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबर्ट म्युझिक यांनी म्हटले आहे.

"काहींना तर असह्य साइड इफेक्टसचा देखील अनुभव आला. ज्यांना हृदयाशी संबंधित तक्रारी आहेत त्यांचादेखील यात समावेश आहे. सततच्या वापरामुळे तुम्हाला या औषधाची सवय लागू शकते आणि त्यामुळे समस्या आणखी गंभीर बनू शकते," असा इशारा रॉबर्ट म्युझिक यांनी दिला आहे.

नॅशनल इंस्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर रिसर्च, ऑक्सफर्ड हेल्थ बायोमेडिकल रिसर्च सेंटर आणि लंडबेक फाउंडेशनने या संशोधनासाठी आर्थिक सहाय्य केले.

( बीबीसीसाठी मराठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन )