मुंबई इंडियन्सचे सलग पराभव, हार्दिक पंड्या जसप्रित बुमराहला का मागे ठेवतोय?

    • Author, विधांशु कुमार
    • Role, क्रीडा पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

टी-20 मालिकेत सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्सचा एकच सामना असा काही रंगला होता, ज्यात विक्रमी 38 षटकार आणि 523 धावा काढण्यात आल्या होत्या.

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात दोन्ही संघांकडून उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली. या सामन्यात अनेक विक्रम रचले गेले.

सर्वांत जलद 100 धावा, सर्वांत जलद 200 धावा, संघातील सर्वोत्तम स्कोअर, एकाच सामन्यात सर्वाधिक धावा, एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार असे अनेक विक्रम रचलेल्या या सामन्यात दोन गोष्टींची सर्वाधिक चर्चा झाली. एक म्हणजे हैदराबादच्या हेनरिक क्लासेनची फलंदाजी आणि मुंबईच्या हार्दिक पंड्याची कॅप्टनसी.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकात 3 गडी गमावून 277 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि 24 चेंडूत 62 धावा काढल्या.

अभिषेक शर्माने त्याच्यापेक्षाही चांगला गेम करत केवळ 23 चेंडूत 63 धावा काढल्या. मारक्रमनेही 42 धावांचं योगदान दिलं, पण सनरायझर्स हैदराबादला भिडणारा फलंदाज हेनरिक क्लासेन होता. हेनरिक क्लासेनने 34 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकारांसह 80 धावा काढल्या.

याआधी क्लासेनने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 8 षटकार मारून हैदराबादला जवळपास विजय मिळवून दिलाच होता. या दोन उत्कृष्ट खेळीनंतर क्लासेनचे खूप कौतुक झालं होतं.

सनरायझर्स हैदराबादच्या विक्रमी 277 धावांना प्रत्युत्तर देताना मुंबई इंडियन्सने चांगली सुरुवात केली, पण त्यांना हे मोठं लक्ष्य गाठता आलं नाही आणि त्यांनी 31 धावांनी सामना गमावला

क्लासेन नंबर एकवर

या सामन्यात समलोचन करताना केविन पीटरसनने म्हटलंय की, मी क्लासेनसारखी खेळी यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. मी टीव्हीवर गेल किंवा डिव्हिलियर्सला खेळताना पाहिलं होतं. पण माझ्या डोळ्यांसमोर अशी खेळी कधीच पाहिली नव्हती.

समालोचक हर्षा भोगले म्हणाले की, मी जे पाहतोय त्यावर माझा विश्वास बसत नाहीये. मुंबईसारख्या संघाविरुद्ध 277 धावा करणं अविश्वसनीय आणि चाहत्यांसाठी जबरदस्त आहे.

पण क्लासेनची सर्वांत चांगली प्रशंसा केली ती वीरेंद्र सेहवागने. त्याने एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, "सनरायझर्सने जबरदस्त फलंदाजी केलीय. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, मार्करम या सर्वांनीच चांगली खेळी केलीय, पण क्लासेनच्या खेळीला तोड नाही. कदाचित तो या फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे."

सेहवागने क्लासेनला टी-20 मधील नंबर वन फलंदाज म्हटलंय, तर इंग्लंडचा माजी कर्णधार मॉर्गननेही समालोचन करताना क्लासेनचं कौतुक केलं आणि म्हटलंय की, तो ज्या प्रकारची फटकेबाजी करतो ते पाहता तो जगातील काही अव्वल फलंदाजांपैकी एक आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने देखील हेनरिक क्लासेनला सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हटलंय.

बुमराहबाबत फंड्याचा निर्णय

क्लासेनच्या खेळीचं कौतुक होत असताना दुसऱ्या बाजूला चर्चा सुरू होती हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदाची.

यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेत पंड्याला नवा कर्णधार बनवलंय. पण हा निर्णय का घेण्यात आलाय याविषयी चाहत्यांना प्रश्न पडलाय.

मुंबई इंडियन्सच्या पहिल्याच सामन्यात हार्दिक पांड्याला प्रेक्षकांनी दाद दिली आणि हैदराबादमध्येही असंच वातावरण पाहायला मिळालं.

पण मैदानावर भरभरून दाद रोहित शर्मासाठी देण्यात आली. सोशल मीडियावरही हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावरून जोरदार टीका करण्यात आली.

गेल्या सामन्याप्रमाणे यावेळीही पांड्याने टी-20मध्ये जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असलेल्या जसप्रीत बुमराहला पहिली संधी दिली नाही. त्याला 10 व्या षटकाच्या आसपास गोलंदाजी करण्याची संधी मिळाली, पण तोपर्यंत हैदराबादने सामना आपल्या ताब्यात घेतला होता. हैदराबादने 10.2 षटकांत 150 धावा पूर्ण केल्या होत्या.

पंड्याच्या या रणनीतीवर सनरायझर्स हैदराबाद तयार होतं. क्लासेनने त्याच्या खेळीनंतर सांगितलं की त्याच्या संघाला अंदाज होता की, बुमराहला मैदानात नंतरच उतरवलं जाईल. कारण त्यांना त्यांची षटकं क्लासेनसाठी वाचवून ठेवायची होती. त्यामुळे सलामीच्या सर्व गोलंदाजांना पराभूत करण्याची हैदराबादची रणनीती कामी आली.

या रणनीतीमध्ये हैदराबादला यश आलं. पण बुमराहला थांबवून ठेवण्याच्या निर्णयावर अनेक माजी क्रिकेटपटूंनी टीका केली.

हैदराबादचा डाव अर्ध्यावर आल्यावर माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक टॉम मूडी यांनी ट्विट करत म्हटलं की, "बुमराह कुठे आहे? खेळ जवळपास संपत आलाय आणि तुमच्या सर्वोत्तम गोलंदाजाने फक्त एकच षटक टाकलं आहे."

बुमराहने चार षटकात 9 च्या सरासरीने 36 धावा दिल्या. पंड्याने 4 षटकांत 46 धावा गमावल्या, तर बुमराहच्या जागी गोलंदाजीची सलामी देणाऱ्या 17 वर्षीय क्वेना माफाकाने 4 षटकांत 66 धावा दिल्या.

गेल्या सामन्यातही पंड्याने बुमराहला थांबवून ठेवलं होतं. थोडक्यात तो मागच्या सामन्यातून काहीच शिकला नसल्याचं दिसतंय.

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने हार्दिकच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

त्याने ट्विट करत म्हटलंय की, "हार्दिक पंड्याची कॅप्टन्सी अतिशय सामान्य आहे, किमान एवढं आपण म्हणूच शकतो. हैदराबादचे फलंदाज कहर खेळ खेळत असताना बुमराहला मैदानात न उतरवणं माझ्या समजण्यापलीकडे आहे."

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही पठाणप्रमाणेच मत व्यक्त केलंय.

त्याने मुंबई इंडियन्सला टॅग करत ट्विट केलंय की, "रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवणं हा सर्वांत विचित्र निर्णय आहे. हेनरिक क्लासेन हा अप्रतिम खेळाडू आहे. क्रिकेटच्या मधल्या फळीतील फलंदाजांच्या यादीत त्याचा समावेश होतोय.”

मुंबईचा डाव कसा होता?

सनरायझर्स हैदराबादच्या या खेळीनंतर मुंबईनेही त्याच ताकदीचं प्रत्युत्तर दिलं. रोहित शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, टिम डेव्हिड यांनी शानदार खेळी केली. 20 चेंडूत 24 धावा काढल्यानंतर हार्दिक पंड्या बाद झाला. त्याचा रनरेट खूप कमी होता.

सामन्यानंतर पांड्याला 277 धावसंख्येबद्दल विचारलं असता त्याने सांगितलं की, "त्याच्या गोलंदाजांनी कोणतीही चूक केलेली नाही आणि त्याने सामन्यात जे पाहिलं त्यासाठी तो आनंदी आहे. आम्ही दिलेलं उत्तर तेवढंच तडाखेबाज होतं. पण प्रत्येक पराभवानंतर आमच्यावरचा दबाव वाढत जाईल."

या विजयानंतर सनरायझर्स हैदराबादने गुणतालिकेत दोन गुणांची नोंद केली आहे. दोन्ही सामने गमावलेली मुंबई इंडियन्स गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.

मुंबईला स्लो स्टार्टर म्हटलं जातं, पण हे देखील तितकंच खरं आहे की दरवर्षी आयपीएलच्या संघांमधील विजयाचं अंतर कमी होत जातं. त्यामुळे मुंबई इंडियन्सला लवकरच विजयाची गरज आहे.

पांड्या फलंदाजी करत असताना केविन पीटरसन म्हणाला होता की,

"मुंबईने हा सामना जिंकला तर सर्व चाहत्यांची मनं जिंकण्याची त्यांच्याकडे मोठी संधी आहे. पण पंड्या 24 धावा करून बाद झाला आणि त्याला जिंकणं शक्य झालं नाही."

साहजिकच पंड्याला चाहत्यांची मनं जिंकण्यासाठी आणखीन काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.