You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आकाश दीप : क्रिकेटसाठी घरातून पळून बंगालला गेला, इंग्लंडविरुद्ध पदार्पणातच चमकला
- Author, विष्णु नारायण
- Role, बीबीसी हिंदीसाठी
बिहारची राजधानी पाटणापासून अंदाजे 180 किलोमीटर अंतरावर बड्डी नावाचं एक गाव आहे. कैमूर डोगरांच्या तराई परिसरातील रोहतास जिल्ह्यात हे गाव आहे.
याच गावात दगडमाती असलेल्या पिचवर खेळाची सुरुवात करणाऱ्या आकाश दीपची आज सगळीकडं चर्चा सुरु आहे.
रांचीमध्ये इंग्लंडच्या विरोधात पदार्पणाच्या सामन्यात खेळताना त्याची कामगिरी अगदी स्वप्नवत म्हणावी अशी झाली आहे.
त्यानंतर इंग्लंड क्रिकेट टीमच्या टॉप ऑर्डरला सुरुवातीलाच पॅव्हेलियनमध्ये परतवलं. पहिल्याच दिवशी तीन विकेट घेतल्या. पण आकाश दीपसाठी हा प्रवास ऐकायला वाटतो तेवढा सोपाही नव्हता.
'बड्डी' सारख्या गावातून येऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्याची ही कहाणी आहे. कारण इथं खेळासाठी मूलभूत सुविधा नाहीत किंवा तसं वातावरणही नाही. अशा परिस्थितीतून आकाश दीप आला आहे.
खरं म्हणजे या किंवा अशा छोट्या गावांमध्ये खेळाला फार महत्त्वं नसतं. उलट इथं तर 'खेलोगे-कूदोगे तो बनोगे खराब, पढ़ोगे-लिखोगे तो बनोगे नवाब' असं म्हटलं जातं.
आकाश दीपचे वडीलही इतरांसारखेच होते. ते स्वतः शिक्षक होते आणि मुलानं चांगलं शिक्षण पूर्ण करून नोकरी करावी अशी त्यांचीही इच्छा होती. पण आकाश दीपला क्रिकेटपटू बनायचं होतं त्यामुळं तो पश्चिम बंगालला पळून गेला.
तो रणजी सामनेही बिहारऐवजी पश्चिम बंगालकडून खेळला. जसा 'मुकेश कुमार' बिहार ऐवजी इतर राज्यांमधून रणजी सामने खेळला. त्यानंतर तिथं चमकल्यानंतर तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळू लागला.
पण जेव्हा राहुल द्रविडनं त्याला इंग्लंड विरोधातील कसोटी सामन्यासाठी पदार्पणाची कॅप दिली तेव्हा तो चर्चेत आला. त्यानं या संधीचं सोनं करण्यात जराही कसर सोडली नाही.
'फलंदाजी करताना गोलंदाजीकडं वळला'
आकाशचा भाऊ नितीन अगदी त्याच्या मित्रासारखा आहे.
त्यांनी म्हटलं की, "आकाश आणि मी लहानपणापासूनच एकत्र खेळायचो. दोघं एकमेकांच्या विरोधी संघात असायचो. आज सगळे त्यांच्या गोलंदाजीबद्दल बोलत आहेत. पण गाव खेड्यात खेळताना सगळ्यांना फलंदाजीच करायची असते.
आकाशही फलंदाज होता पण गोलंदाजीही वेगानं करायचा. त्यानं तर एका ओव्हरमध्ये 6 षटकारही मारले आहेत. गावात तर आम्ही साध्या चेंडूनंच खेळलो आहोत. वेग-वेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचो."
"साध्या चेंडूनं खेळतानाही आम्हाला कायम कधीतरी देशासाठी खेळता यावं अशी इच्छा असायची. अनेकदा लोक यावरून आमच्यावर हसायचेदेखील. काही दिवसांनी आमचे मार्ग बदलले. पण तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही अत्यंत मजबूत होता," असंही नितीन म्हणाले.
"वडील आणि भावाचं निधन होऊनही आकाश डगमगला नाही. मधल्या काळात कोरोनामुळं संघर्ष करावा लागला. पण तो मागं हटला नाही. आज संपूर्ण जिल्ह्याला त्याच्यावर अभिमान आहे. कितीही संघर्ष करावा लागला तरी प्रतिभा व्यक्तीला पुढं घेऊन जातेच, याचं आकाश उत्तम उदाहरण आहे."
'आकाशच्या नावावर मोफत जेवण'
आकाशच्या कामगिरीबाबत त्याच्याबरोबर खेळणारा त्यांचा पुतण्या (किशन) यानंही बीबीसीला माहिती दिली.
"एकदा आमच्या गावाचा (बड्डी) संघ झारखंडला गढवा जिल्ह्यात मॅच खेळण्यासाठी गेला होता. मीही त्या संघात होतो. सामना संपल्यानंतर जेव्हा आम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो, तेव्हा हॉटेल मालकानं आमच्याकडून पैसे घेतले नाही."
"आम्ही कारण विचारलं तर ते म्हणाले की, ते काका (आकाश दीप) चे चाहते आहेत. आम्हालाही चांगलं वाटलं की, लोक एवढ्या दूरपर्यंत आम्हाला ओळखतात. पण ते काकामुळं आम्हाला ओळखत होते."
वडिलांची इच्छा होती सैन्यात जावे
आकाश दीपचे मोठे काका रामाशीष सिंह म्हणाले की, "माझा मुलगा (नितिन) आणि आकाश अभ्यास किंवा खेळायला एकत्र असायचे. आकाश शारीरिक दृष्ट्या मजबूत होता. त्याचे वडील (रामजी सिंह), स्वतः शिक्षक आणि तेही शारीरिक शिक्षण विषयाचे होते.
"मुलानं सैन्यात नोकरी करावी अशी आकाशच्या वडिलांची इच्छा होती. पण त्याला क्रिकेटची प्रचंड आवड होती. त्याने त्यादिशेनं प्रयत्न सुरू ठेवले आणि आज त्याचा परिणाम सर्वांसमोर आहे. संपूर्ण पंचक्रोशित त्याचा आनंद आहे."
पहिल्या तीन विकेट वडिलांना अर्पण
रांची टेस्टच्या पहिल्या दिवसाच्या खेळानंतर आकाश दीपनं माध्यमांशी बोलताना सांगितलं की, त्यानं 2015 मध्ये वडील आणि भावाला गमावलं. आज वडील असते तर ते खूप आनंदी असते. तिन्ही विकेट त्यानं वडिलांना अर्पण केल्या.
इंग्लंडच्या टीमच्या विरोधातील अशा प्रकारची कामगिरी प्रोत्साहन देणारी तर आहेत. पण त्याचबरोबर ही मोठ्या जबाबदारीची जाणीवही आहे. यात आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं तो म्हणाला.
आकाशची गोलंदाजी पाहिल्यानंतर त्याच्या पुतण्या आर्या आणि आरुही गावात परतल्या.
"काका खूप मेहनत घेतात. कितीही अडचणी आल्या तरी आपल्या ध्येयापासून दूर जायचं नाही हे त्यांच्याकडून शिकायला हवं. ते आम्हाला नेहमी म्हणतात की, जग फार मोठं आहे. जग पाहायचं असेल तर अभ्यास करावा लागेल. कोणतंही काम अधिक चांगल्या पद्धतीनं करावं लागेल," असं आर्या म्हणाली.
आकाश दीपची कामगिरी आणि तीन विकेट मिळाल्यानंतरच्या भावनांबाबत बोलताना आर्या म्हणाली की, "मॅचच्या आधी आणि नंतरही आम्ही त्यांच्याशी बोललो. नो बॉलवर विकेट मिळाली नाही तर आम्हालाही निराशा झाली. पण सामन्यानंतर सगळ्यांच्याच नजरा आमच्यावर होत्या. आम्हाला वाटलं की आम्ही सेलिब्रिटी बनलो आहोत."
"शाळा आणि परीक्षा असल्यानं आम्हाला परत यावं लागलं. नसता आम्ही पाच दिवस तिथं राहिलो असतो. पण आम्ही काकाला आणखी दोन विकेट घ्यायच्या असं सांगून आलो. आज आजोबा असते तर खूपच आनंदी असते. काकांनी देशासाठी खेळावं अशी त्यांची इच्छा होती. काका आणि गावाचंही सगळीकडं नाव होत आहे. काकांना गाव आणि घर खूप आवडतं. ते कुठंही गेले तरी परत गावाला येतात," असं आरुही म्हणाली.
ज्या राज्याच्या क्रिकेट टीमला अनेक दशकांपासून रणजी ट्रॉफी खेळता आली नाही. जिथं आंतरराष्ट्रीय काय पण साधंही एकही मैदान नाही, अशा राज्यातील खेळाडूनं अशाप्रकारे शिखरापर्यंत पोहोचणं हे सोपं नाही.