हॉट योगा ते डॉग योगा, भारताचा वारसा जगभरात असा झाला लोकप्रिय

योगा- प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, गुलशनकुमार वनकर
    • Role, बीबीसी मराठी

दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. वाराणसी ते वॉशिंग्टन, आज सगळीकडे योग केला जातो. कदाचित तुम्हीसुद्धा करत असालच.

अगदी प्राचीन काळापासून केली जाणारी ही क्रिया मुख्यत्वे मानसिक आणि अध्यात्मिक शांततेची, संतुलनाची आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून ओळखली जाते.

पण योग ही कला जगभरात इतका लोकप्रिय कशी झाली? योगाचं आजचं हे भव्य जागतिक रूप नेमकं कशामुळे झालं?

योगाचा जन्म

प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये पतंजली ऋषींना योगाचे जनक म्हटलं गेलंय. त्यांनीच इसवीपूर्वी दुसऱ्या ते तिसऱ्या शतकात ‘योगसूत्र’ लिहिल्याचं म्हटलं जातं.

पण योगाचा प्रचार, प्रसार हा जगभरात टप्प्याटप्प्यानेच झाला. स्वामी विवेकानंद ते अय्यंगर ते बिक्रम ते रामदेव बाबा, वेगवेगळ्या युगात वेगवेगळ्या लोकांनी योग जगभरात पोहोचवला. आणि त्या-त्या काळानुसार आणि तेव्हाच्या सांस्कृतिक परिस्थितींनुसार योगाची व्याख्या आणि व्याप्ती बदलत गेली.

अँड्रिया जैन अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठात धार्मिक अभ्यासाच्या प्रोफेसर आहेत. त्यांनी Selling Yoga – From Counterculture to PopCulture आणि Peace Love Yoga – The Politics of Global Spirituality अशी काही पुस्तकंसुद्धा लिहिली आहेत.

योगाचा पाश्चात्त्य देशांमध्ये प्रचार प्रसार होण्यामागची सांस्कृतिक कारणं त्या समजावून सांगतात.

“योग, म्हणजे आपण आज जे आधुनिक योग पाहतो, त्यात योगासनं आणि श्वसनप्रक्रियेवर भर देण्यात आलाय. याचा शोध तर भारतातच लागला होता.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

“योगाभ्यासात बऱ्याच अध्यात्मिक आणि धार्मिक व्याख्या आहेत. लोकांना वाटतं की योगामुळे आपल्यात काही क्रांतिकारी बदल घडू शकतात, ज्यामुळे आपण बरे होऊ शकतो किंवा आपली जीवनशैली सुधारू शकते. लोकांची अपेक्षा असते की योग त्यांना सुख, सौंदर्य आणि संतुलन देईल. हे शब्द तुम्हाला योग करणाऱ्या गटांमध्ये वारंवार ऐकायला मिळतात, आणि यामुळेच ते योगाकडे आकर्षित होतात,” असं त्या सांगतात.

पण लोक फक्त या शब्दांकडे नाही तर यामागच्या हजारो वर्षांच्या इतिहासाकडे आणि त्याच्या धार्मिक पार्श्वभूमीकडेही आकर्षित होतात. पण योग फक्त एकाच धर्माशी निगडित नाही. त्याचा उल्लेख वेगवेगळ्या धर्मांमध्ये आढळतो.

जैन सांगतात, “सुरुवातीला तीन मोठ्या विचारसरणी होत्या... एक जैनांची. त्यांच्या श्रद्धेनुसार जगातील सर्व भौतिक आणि मानसिक कृतींचा त्याग केल्याने कर्मांचं कर्ज चढत नाही.

“दुसरे होते ते बौद्ध. त्यांच्या तत्त्वांमध्ये सर्व आसक्ती आणि लोभ त्यागण्याबद्दल लिहिलंय. म्हणजे एक अशी मानसिक अवस्था गाठायची, ज्यात कुणी कामना अनुभवणार नाही किंवा कामनेला बळी पडणार नाही.

“त्याशिवाय इतर काही विचारसरणी होत्या, ज्यांना नंतर हिंदू या गटात मोडलं गेलं. या धर्मात स्वतःचं मूळ आणि अस्तित्वाचा अर्थ शोधण्यावर जास्त भर होता.”

योगा-प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

पण मग नेमक्या कोणत्या विचारसरणीतून, तत्त्वांमधून योगाचा उगम झाला? अँड्रिया जैन सांगतात की योग या शब्दात आज अनेक अर्थ दडलेत, त्याच्या अनेक व्याख्या असू शकतात. अनेक तंत्रशुद्ध शारीरिक आणि श्वसनक्रियांचा एक समूह म्हणून त्या स्वतः योगाकडे पाहतात.

“याची सुरुवात सुमारे 2500 वर्षांपूर्वी झाली. अनेक प्राचीन शिलालेख आणि साहित्यांमध्ये अशा लोकांचा उल्लेख आढळतो, जे सर्व भौतिक, सामान्य सुखसोयी त्यागून, सर्व मोह-मायेकडे पाठ फिरवून एका योगीसारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. यात दीर्घकाळ उपवास करणं आणि ध्यानमुद्रेत बसण्यासारख्या गोष्टींचाही समावेश आढळतो,” असं त्या सांगतात.

म्हणजे योग हे कुठल्याही एका धर्मातून, विचारांमधून आलेलं असं शास्त्र नाहीय. तर यामागे अनेक शतकांचा इतिहास दडलाय. पण त्याचं आजचं रूप कुठे आणि कसं बदलायला सुरुवात झाली?

योग गुरूंचा उदय

योगा- प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

भारताने जगाला शून्य दिला, त्यामुळे जगाला आर्यभट्टाची ओळख झाली. पण योग हेसुद्धा भारतानेच जगाला दिलेलं एक शास्त्र आहे. मात्र याचं श्रेय कुठल्या एका व्यक्तीला किंवा संस्थेला दिलं नाही जात.

अँड्रिया यैन सांगतात की जगभरात योगाचा प्रसार टप्प्याटप्प्याने झाला. “योग गुरूंच्या लाटा एक-दोन वेळा जगाने पाहिल्या. 18व्या-19व्या शतकात जेव्हा प्रवासाची साधनं उपलब्ध होऊ लागली, तसे हे गुरू जगात प्रवास करू लागले.

“योगमहर्षी मानले जाणारे भारतीय गुरू अमेरिका, युरोप आणि आशियाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये गेले. तिथे त्यांनी योग शिकण्यात रस असलेल्यांना त्यांचे शिष्य बनवून घेतलं. इथूनच योगाचा प्रसार जगभरात होऊ लागला.”

त्या काळी योग हा फार क्रांतिकारी विचार होता. अँड्रिया सांगतात की हे असं काही नव्हतं जे तुम्हाला सहज कुठेही मिळू शकेल, कुठल्या ध्यान केंद्रात किंवा कुठल्या आश्रमात. पण योगाला एवढी प्रसिद्धी मिळण्याचं आणखी एक कारण होतं, की योग हे भारतीय संस्कृतीतून आलं होतं.

अँड्रिया जैन सांगतात की “खासकरून उत्तर अमेरिकेत असे अध्यात्मिक किंवा शारीरिक व्यायाम करणे, जे पाश्चात्त्य संस्कृतीत नाहीयेत, त्याकडे अनेकदा धर्मविरोधी गोष्ट म्हणून पाहिलं जायचं. अमेरिकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या काळी पारंपरिक ख्रिश्चन धर्म होता. पण त्याशिवाय तुम्ही दुसऱ्या कुठल्या गुरूचं म्हणणं ऐकणं, याला धार्मिक तणावाचं कारणही मानलं जायचं.”

योगा प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

1960च्या दशकानंतर अमेरिका आणि युरोपने स्थलांतरावरची बंधनं उठवली, ज्यामुळे अनेक योगगुरू पुन्हा पाश्चात्त्य देशांमध्ये येऊ लागले. सुरुवातीला त्यांच्याकडेसुद्धा पाश्चात्त्य, ख्रिश्चन संस्कृतीचे विरोधक म्हणूनच पाहिलं गेलं.

पण नंतर या गुरूंनी तेव्हाच्या मार्केटमध्ये असलेल्या वेगवेगळ्या मागण्या हेरून त्यानुसार स्वतःचं ब्रँडिंग करायला सुरुवात केली. तो एक असा काळ होता जेव्हा माध्यमांच्या विकासामुळे जाहिरातबाजीसुद्धा वाढू लागली होती, आणि लोकही ग्राहक म्हणून याकडे आकर्षित होऊ लागले.

जैन सांगतात की तो काळ असा होता की ग्राहक असं काहीतरी शोधत होते, ज्यामुळे त्यांचं शरीर आणि आरोग्य चांगलं राहू शकेल आणि जे सहज उपलब्धसुद्धा असेल. लोकांना त्या काळी असं काहीतरी हवं होतं जे सोपं होतं, जे ते एखादं पुस्तक विकत घेऊन घरीच करू शकतील किंवा टीव्हीवर एखादा 30 मिनिटांचा प्रोग्राम पाहून. आणि अर्थातच असं काहीतरी, ज्यामुळे त्यांच्या राजकीय किंवा धार्मिक भावनांवर कुठलाही परिणाम होणार नाही. म्हणजे असं काहीतरी जे हिंदू, बौद्ध वा ख्रिश्चन, कुणीही करू शकेल.

आणि याच शक्यतांमधून जन्माला आले योगा स्टुडिओज.

योगा स्टुडिओमध्ये आपलं स्वागत

योगा- प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

भारतातली योगपरंपरा प्राचीन आहे. मात्र गेल्या काही दशकांमधल्या तांत्रिक आणि औद्योगिक घडामोडींमुळे यातसुद्धा उत्क्रांती पाहायला मिळाली आहे. आधी रेडिओवरून आणि नंतर टीव्हीवरूनही योगगुरू शिकवू लागलेत. आणि त्यासोबतच ठिकठिकाणी योग केंद्रे सुरू झालीयेत.

हंसाजी जयदेव योगेंद्र मुंबईच्या सांताक्रूझमध्ये एका योग केंद्राच्या संचालिका आहेत. त्यांच्यामते, “योग हे मानसशास्त्र, तत्त्वज्ञान आणि तंत्रज्ञानाचं एक विलक्षण मिश्रण आहे. आपण आपलं जीवन कसं जगावं, हे सांगणारं ते एक शास्त्र आहे. इथे भारतात लोक या योगाच्या शास्त्रानुसारच जगायचे.”

हंसाजी योगेंद्र सांगतात की जेव्हा एखादी गोष्ट बिझनेस बनते, तेव्हा लोक त्याकडे इतरांना आकर्षित करायला वेगवेगळी नावं ठेवतात. कुणी म्हणतं हॉट योगा, कुणी पावर योगा, किक बॉक्सिंग योगा, कुणी सेक्स योगा, कपल्स योगा. अशा मार्केटिंग द्वारे लोक आकर्षित होतातही आणि बिझनेस करणाऱ्यांची चांगली कमाई होते.

हंसाजी योगेंद्र त्यांच्या स्टुडिओमध्ये क्लासिकल योग शिकवतात, जो योगाचा सर्वांत जुना प्रकार मानला जातो. यात विद्यार्थी गुरुकुलमध्येच आपल्या गुरुंबरोबर येऊन राहायचे आणि जीवन कसं जगायचं, याचं प्रशिक्षण घ्यायचे.

योगा- प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

“या केंद्रातही आम्ही असंच योग शिकवतो, पण अशा लोकांना ज्यांना घरदार आहे, त्यांना आईवडिलांची काळजी घ्याचीय, त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे, त्यांना कामाला जावं लागतं. त्यांना स्वतःसाठी वेळ नसतो, पण त्यांनासुद्धा निरोगी, सुखी, समाधानी आयुष्य जगायचं असतं, जेणेकरून ते समाजासाठी काहीतरी चांगलं करू शकतील,” त्या सांगतात.

पारंपरिक योगाच्या विचार करणाऱ्यांना वाटतं की याचा आयुष्यात प्रत्येक ठिकाणी वापर केला जाऊ शकतो. पण हंसाजी जयदेव योगेंद्र सांगतात की दुर्दैवाने आपल्याला शाळा-कॉलेजदरम्यान हे कधीच शिकवलं जात नाही की जीवन कसं जगावं, आयुष्यातले चढउतार कसे हाताळावे आणि दररोजच्या जीवनात आपल्यासमोर येणाऱ्या लहानमोठ्या प्रश्नांना किती आणि कसं महत्त्वं द्यावं.

“आपण नेहमीच गडबडीत असतो, सगळीकडेच. आपण कधीच शांतपणे, स्तब्धपणे बसून हा विचार कधीच करत नाही की आपण आपलं आयुष्य कसं जगलो.

“आपण कधीच शांतपणे विचार करतच नाही की जर एखादी परिस्थिती आपल्यावर पुन्हा ओढवली तर आपण काय करणार? हे सगळं योगामध्ये सांगण्यात आलंय, पण आपल्याला आयुष्यात हे कधीच कुणी सांगत नाही. त्यामुळे आपल्याला खरंच योग शिकायला हवं, एक व्यायाम म्हणून नाही तर एक जीवनशैली म्हणून,” असं हंसाजी योगेंद्र सांगतात.

पण जसजसं योग जगभरात पोहोचू लागलं, तसतसे त्याची वेगवेगळी रूपं पाहायला मिळू लागली.

योगाची बदलती रूपं

हॉट योगा- यात एका तापमान वाढवलेल्या, वाफेने भरलेल्या स्टुडिओमध्ये योगाचे वर्ग घेतले जातात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हॉट योगा- यात एका तापमान वाढवलेल्या, वाफेने भरलेल्या स्टुडिओमध्ये योगाचे वर्ग घेतले जातात.

जगभरात योगाला नवीन रूप देणाऱ्या त्याच लाटेत एक होते बिक्रम चौधरी. त्यांनी एका तापमान वाढवलेल्या, वाफेने भरलेल्या स्टुडिओमध्ये योगाचे वर्ग घ्यायला सुरुवात केली. यालाच नाव पडलं हॉट योगा.

अमेरिकेत त्यांनी ही कला प्रचलित केली आणि याला एक व्यावसायिक रूपही दिलं. अर्थात त्यांनी योगाचा हा प्रकार चोरल्याचाही त्यांच्यावर आरोप झाला.

बिक्रम यांनी त्यांच्या सर्वोत्कृष्ट शिष्यांना त्यांच्या नावाने बिक्रम योगा स्टुडिओ सुरू करण्यासाठी परवाने देण्यास सुरुवात केली. योगाच्या फ्रँचाईसी आणण्याचा प्रकार पहिल्यांदाच कुणी करत होतं.

याच दरम्यान त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोपही झाले. पण बिक्रम योगा किंवा हॉट योगाचा ट्रेंड सुरू झाला.

एला आणि फ्लर या युकेच्या ग्लॉस्टरशरमध्ये बिक्रम योगा शिकवतात. त्यांच्या योगा सेंटरमध्ये शिरताच सगळीकडे अगरबत्तीचा सुगंध दरवळलेला दिसतो, एका कोपऱ्यात फळांचा ज्यूसही विकला जातो तर दुसरीकडे एक स्पिन स्टुडिओ आहे. आणि त्याच्या पलीकडे एक मोठा योगा स्टुडिओ दिसतो.

आता हॉट योगा म्हणजे नेमकं काय? एला समजावून सांगतात, “आम्ही या स्टुडिओला प्रत्येक सेशनदरम्यान 40 डीग्री तापमानापर्यंत नेत असतो. दर काही वेळाने आम्ही हे बंद चालू करून प्रत्येकाच्या शरीराचं तापमान स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून लोक रिलॅक्स करू शकतील.

“शरीर गरम असल्याने तुमच्या स्नायू आणि शरीरातील अवयवांना चांगली लवचिकता मिळते. त्यामुळे तुमचे आतले अवयवसुद्धा व्यवस्थित ताणले जातात, ज्यामुळे निर्विषीकरणाला (detoxification) चालना मिळते. तुमच्या शरीरातून घामाद्वारे वेगवेगळी विषारी द्रव्यंही (toxins) बाहेर पडतात.”

एवढंच नव्हे तर एला आणि फ्लर यांनी त्यांच्या स्टुडिओमध्ये सोल सर्कस (Soul Circus) नावाचा एक महोत्सवही सुरू केलाय. यात इथे दिवसा हॉट योगा करायचा आणि संध्याकाळहून इथे ड्रम्सवर मनसोक्त डान्स करायचा.

हॉट योगा- यात एका तापमान वाढवलेल्या, वाफेने भरलेल्या स्टुडिओमध्ये योगाचे वर्ग घेतले जातात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हॉट योगा- यात एका तापमान वाढवलेल्या, वाफेने भरलेल्या स्टुडिओमध्ये योगाचे वर्ग घेतले जातात.

एला सांगतात की योगामध्ये बरीच उत्क्रांती झालीय आणि त्यांना तीच लोकांपर्यंत पोहोचवायची होती. “जर तुम्ही लोकांना सांगाल की या आमच्याकडे योगा करा, व्यायाम करा, ध्यानसाधना करा, निरोगी व्हा.. त्याशिवाय इथे येऊन जरा मज्जाही करू शकता, म्हणजे नाचा, एखाद ग्लास वाईनसुद्धा घेऊ शकता, जे खायचंय ते खाऊ शकता, कुणी तुम्हाला त्यासाठी जज नाही करणार. तर हेच स्वातंत्र्य अनुभवायला आम्ही हे फेस्टिवल सुरू केलं.”

आणि काही ठिकाणी योगासाठी तुम्ही तुमच्या कुत्र्यालाही घेऊन जाऊ शकता. मानी जहांगिरी यांचा अनुभव ऐका...

“आत्ता मी जमिनीवर लोळतेय, माझे हातपाय वर हवेत आहेत आणि त्यावरच उभा आहे माझा कुत्रा रॉबी. आता मी त्याला हळूहळू जमिनीवर आणणार आहे.... आणि बघा आता रॉबी मला चाटतोय.”

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

मानी जहांगिरी यांनी 1997 साली योग करायला सुरुवात केला, 1999 साली त्या योग प्रशिक्षक झाल्या आणि 2012 पासून त्यांनी ‘डोगा’ करायला सुरुवात केली.

आता डोगा म्हणजे डॉग योगा. डोगामध्ये खास कुत्र्यासोबत करायला विशेष आसनंसुद्धा डिझाईन करण्यात आली आहेत. तुम्ही कुत्र्यासोबत ती आसनं करू शकता, किंवा एकट्यानेच. आणि तुमचा कुत्रा तिथे इतर कुत्र्यांसोबत खेळूबागडू शकतो.

डोगा म्हणजे डॉग योगा. डोगामध्ये कुत्र्यासोबत करायला विशेष आसनंसुद्धा डिझाईन करण्यात आली आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डोगा म्हणजे डॉग योगा. डोगामध्ये कुत्र्यासोबत करायला विशेष आसनंसुद्धा डिझाईन करण्यात आली आहेत.

पण कुत्र्‍याला यातून काय मजा मिळत असेल?

मानी सांगतात की यातून “अनेकदा तर मानवापेक्षा कुत्र्‍याला हा योग करताना मजा येते, अगदी काहीही न करतासुद्धा. कारण जेव्हा ते त्यांच्या मालकाला, त्यांच्या लाडक्या मित्राला त्या योग स्टुडिओमध्ये रिलॅक्स करताना पाहतात, तेव्हा त्यांना शांततेची अनुभूती मिळते.”

तुम्हाला हे ऐकायला काहीतरी भन्नाट पण तितकंच विचित्र वाटत असेल. असं खरंच होऊ शकतं का?

मानी जहांगीर सांगतात, “मी याचा शास्त्रीय अभ्यास केलाय की आपण असं का करतो. योग करताना कुत्रा सोबत असेल तर लक्ष विचलित होणं साहजिक आहे, पण जर तो तुमचा लाडका कुत्रा आहे तर ते लक्ष विचलित होणं काही वाईट नसतं.

“तुम्हीच विचार करा ना, जर असं नसतं तर डॉग योगा, आई आणि बाळाचं एकत्र योग, अशा संकल्पना का जन्माला आल्या असत्या? आईचं तिच्या बाळावर इतकं प्रेम असतं, की ती त्याचा लाड करणं काही कमी नाही करत. तसंच कुत्र्यांच्याही बाबतीत असतं. ते क्यूट असतात, ते आपल्यावर प्रेम करतात आणि म्हणूनच आपल्या योगमध्येही कुत्री असतील तर काय वाईट? हे फक्त प्रेम आहे.”

पण जर हे विचित्र वाटत असेल तर तुम्हाला सांगतो, योगाची जगभरात चॅम्पियनशिपसुद्धा होते. आता तुम्ही म्हणाल हे काय?

2016 साली जागतिक योग चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या अल्मान्या कोलंबो सांगतात, “या चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक स्पर्धकाला तीन मिनिटांचं एक योग क्रिया सादर करावी लागते. त्यात वेगवेगळी योगासनं असू शकतात आणि त्या आधारावर तुम्हाला गुण दिले जातात. तुमचा हा तीन मिनटांचा परफॉर्मन्स खरंतर तुम्ही नियमितपणे करत असलेल्या योगाचाच सारांश असतो, कारण तिथेसुद्धा तुमचं संतुलन, लक्ष केंद्रित करण्याची तुमची क्षमता आणि तुमची शक्ती, सारंकाही तेच असतं.”

खरंतर योग म्हटलं की स्वतःच्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी करण्याची एक क्रिया. अशात योगाची अशी कॉम्पिटिशन करणं कितपत योग्य आहे, असं विचारल्यावर त्या सांगतात, “लोक खरंच या कॉम्पिटिशनकडे जरा तिरस्कारानेच पाहतात. कारण योग खरंतर दुसऱ्यांशी तुलना करून नाही केलं जात. ते तुम्ही स्वतःसाठीच करत असता. पण ते करत असतानाच, तुम्ही इतरांनाही प्रेरित करत असता.”

आंतरराष्ट्रीय योग दिन

योगाची हीच लाट आज जगभरात पसरलीय. कुठे हवमान बदलाचा सामना करायला योग केला जातोय, तर कुठे तुरुंगांतल्या कैद्यांमधला तणाव कमी करायला.

फक्त आरोग्य आणि विज्ञान नव्हे तर राजनैयिक संबंधांसाठीही योगाचा वापर केला जातोय.

योगा- प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

2014 मध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून योगाच्या प्रसाराला गती मिळाली. 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्राने एक ठराव संमत केला, आणि भारताने जगाला दिलेल्या या देणगीचं महत्त्व ओळखून, वर्षातला सर्वांत मोठा दिवस 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करायचा निर्णय घेतला.

तेव्हापासून दरवर्षी जगभरात याच दिवशी हा दिवस साजरा केला जातो. युद्धनौकांपासून ते आयफल टॉवरपर्यंत आणि अगदी International Space Stationमध्येही या दिवशी योगासनं करून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातात. वर्षातला सर्वांत मोठा दिवस म्हणून सूर्याला नमन करून या दिवशी योगाभ्यास आठवणीने केला जातो.

हेही वाचलंत का?