कोव्हिडच्या भीतीने आईने मुलासह घेतलं कोंडून, 3 वर्षांनी झाली सुटका

फोटो स्रोत, ANI
कोरोनाच्या साथीचे ढग भारतावरुन आता विरले असले तरी या साथीचे काही सामाजिक, मानसिक, कौटुंबिक परिणाम आजही दिसून येत आहेत.
कोरोना काळात विलगीकरण तसेच सामाजिक संपर्कासंदर्भात काही नियम करण्यात आले होते. या आजाराचा धसकाही लोकांनी घेतला होता.
मात्र दिल्लीजवळ गुरुग्राम येथे घडलेल्या घटनेने मात्र सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत.

फोटो स्रोत, ANI
गुरुग्राम येथिल एका महिलेने स्वतःला आणि आपल्या मुलाला घरातच कोंडून घेतले होते. त्यांची आत सुटका करण्यात आली आहे.
या बाबतीत माध्यमांशी बोलताना बालकल्याण समितीच्या सदस्य उषा सोळंकी म्हणाल्या, “चक्करपूर येथील एका रहिवाशाने याबद्दलची माहिती दिली होती. आपल्या पत्नीने मुलासह या घरात कोंडून घेतलंय आणि ती त्याला आतही येऊ देत नाहीये आणि मुलाला बाहेरही पाठवत नाहीये. अशी तक्रार त्याने केली होती.”

फोटो स्रोत, ANI
त्यानंतर ही तक्रार नोंदवण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आणि या फ्लॅटवरती पोलीस गेले. त्या महिलेने स्वतःला आणि मुलाला कोव्हिडच्या भीतीने कोंडून घेतले होते. आपला नवरा बाहेर कामाला जातो म्हणून त्याला वेगळ्या घराची व्यवस्था करुन तिकडेच राहायला सांगितले होते. तो तिला बाहेरुन पैसे आणि किराणा सामान पाठवत असे., असं सोळंकी यांनी सांगितलं.
त्या महिलेची मानसिक स्थिती तपासली जाईल असं सोळंकी यांनी सांगितलं.
महिला व तिचा मुलगा यांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात नेलं आहे असं त्या म्हणाल्या. हा मुलगा 11 वर्षांचा असून त्याचीही मानसिक स्थिती तपासली जाईल असं त्या म्हणाल्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








