युलिया नवेलनाया : रशियन विरोधी पक्षनेते ॲलेक्सी नवालनी यांची 'तत्त्वनिष्ठ आणि निर्भय' पत्नी

फोटो स्रोत, AFP
- Author, रॉबर्ट ग्रीनॉल
- Role, बीबीसी न्यूज
ॲलेक्सी नवालनी यांच्या पत्नी युलिया नवेलनाया नेहमीच सामान्य माणसांसारखा राहताना दिसतात. त्या नेहमीच एक आई आणि पत्नीच्या भूमिकेत असल्याचं सांगतात.
मात्र शुक्रवारी पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी भावनिक आवाहन केलंय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या विरोधकांच्या यादीत त्या एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून पुढे येत असल्याचं दिसतंय.
राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील त्या त्यांच्या पतीच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. 2020 मध्ये नवालनी यांना उपचारासाठी रशियाबाहेर घेऊन जाण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
त्यावेळी नवालनी यांना नोविचोक नर्व एजंट नावाचं विष देण्यात आलं होतं. आणि आपला जीव वाचावा यासाठी त्यांची धडपड सुरू होती.
नवेलनाया यांना रशियन विरोधी पक्षाच्या फर्स्ट लेडी असं देखील म्हटलं जातं. युलिया नवेलनाया माझ्या सोबत नसेल तर रशियन सत्तेविरुद्धचे एकतर्फी युद्ध आपण लढू शकत नाही, असं ॲलेक्सी नवालनी यांनी स्वतः सांगितलं होतं.
या दोघांची प्रेमकथा आणि कौटुंबिक जीवन त्यांच्या समर्थकांसाठी प्रेरणादायी राहिलं आहे. त्यांना दोन मुलं आहेत.
तुर्की मध्ये झाली पहिली भेट
युलिया नवेलनाया यांचा जन्म 1976 मध्ये मॉस्को येथे झाला. त्या एक प्रतिष्ठित रशियन शास्त्रज्ञ बोरिस एम्ब्रोसिमोव्ह यांच्या कन्या आहेत.
अर्थशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर, त्यांनी बँकिंगमध्ये करिअर करणं निवडलं. जेव्हा त्यांचे पती ॲलेक्सी नवालनी राजकारणाच्या पायऱ्या चढत होते तेव्हा युलिया यांनी आपल्या दोन मुलांचा सांभाळ केला.
दोघांची भेट 1998 मध्ये तुर्की येथे झाली होती. त्यावेळी दोघेही सुट्टीसाठी गेले होते. त्यावेळी दोघांनाही ॲलेक्सी यांच्या भावी कारकिर्दीची कल्पना नव्हती.
2020 मध्ये युलियाने रशियन साप्ताहिक मासिक सोबेसेडनिकशी बोलताना सांगितलं की, "मी कोणत्याही प्रसिद्ध वकील किंवा विरोधी नेत्याशी लग्न केलेलं नाही. मी ॲलेक्सी नावाच्या तरुणाशी लग्न केलंय."
असं दिसतं की, युलिया आणि ॲलेक्सी यांना अगदी तरुण वयातच राजकारणाचं आकर्षण होतं. या दोघांनी 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला रशियाच्या याब्लोको या उदारमतवादी पक्षाचं सदस्यत्व घेतलं होतं.
विषबाधेची घटना आणि जर्मनीतील उपचार
2020 मध्ये ॲलेक्सी यांना विषबाधा होईपर्यंत युलिया एक अनामिक जीवन जगत होत्या. त्यानंतर त्यांनी जाहीर सभांना उपस्थित राहून भाषणं द्यायला सुरुवात केली.
सायबेरियात असताना ॲलेक्सी आजारी पडल्यावर युलिया यांनी थेट राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना पत्र लिहून उपचारासाठी जर्मनीला नेण्याची विनंती केली.
युलिया यांनी रशियन डॉक्युमेंटरी निर्माता युरी डडला सांगितलं की, "ॲलेक्सीला इथून बाहेर कसं काढता येईल याचाच विचार प्रत्येक क्षणी माझ्या मनात यायचा."
त्यानंतर जर्मन संस्थेच्या मदतीने नवालनी यांना रशिया सोडण्याची परवानगी देण्यात आली.
तेथे अनेक महिने उपचार केल्यानंतर युलिया मॉस्कोला परतल्या. मात्र इथे येताच त्यांना पुन्हा एकदा अटक करण्यात आली.
त्यानंतर त्यांचं संपूर्ण आयुष्य तुरुंगात गेलं.
रशियामध्ये अमेरिकेचे राजदूत राहिलेले मायकेल मॅकफॉल म्हणतात, युलिया एक निर्भय व्यक्ती आहे.
आता युलियावर सार्वजनिक जीवनात येऊन अधिक महत्त्वाची भूमिका निभावण्यासाठी दबाव असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकन नेटवर्क एनबीसीशी बोलताना मॅकफॉल म्हणाले, "ॲलेक्सीला युलियापेक्षा चांगला जीवनसाथी मिळू शकला नसता. ती ॲलेक्सी सारखीच दृढनिश्चयी, शूर आणि निर्भय आहे."
बेलारूसच्या स्वेतलाना तिखानोव्स्काया यांच्या पतीला तुरुंगात टाकल्यानंतर 2020 मध्ये त्यांनी बेलारूसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. मात्र आपल्याला असं काही करायचं नसल्याचं युलिया यांनी सांगितलं.
असं म्हणतात की, स्वेतलाना यांनी निवडणुकीत विजय मिळवला होता. पण हेराफेरी करून अलेक्झांडर लुकाशेन्को यांना सत्ता मिळाली.
पतीच्या निधनानंतर युलिया यांनी सोशल मीडियावर आपल्या समर्थकांना म्युनिकमधून भाषण दिलं. या भाषणावरून त्या राजकारणात येऊ शकतात असं दिसतंय.
त्या म्हणाल्या, "आम्हाला मुक्त, शांत आणि आनंदी रशिया हवा आहे. एक असा रशिया ज्याचं स्वप्न माझ्या पतीने पाहिलं होतं."
"मला तुम्हा लोकांसोबत असा देश घडवायचा आहे ज्याची कल्पना ॲलेक्सीने केली होती."
"हा एकमेव मार्ग आहे. ज्यांनी यासाठी बलिदान दिलंय ते व्यर्थ जाता कामा नये."











