बारसू : तळपत्या उन्हामध्ये उभे ठाकलेले गावकरी आणि लाठीचार्जचं सत्य

बारसू येथील आंदोलक

फोटो स्रोत, mushtaq khan

फोटो कॅप्शन, बारसू येथील आंदोलक
    • Author, मुश्ताक खान
    • Role, बीबीसी मराठीसाठी
    • Reporting from, बारसू, रत्नागिरीहून

बारसू रिफायनरीविरोधातील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आलं आहे. आंदोलकांनी प्रशासनाशी चर्चा करण्याची भूमिका घेतली आहे.

पुढील तीन दिवस माती परिक्षण थांबवण्याचं आवाहन त्यांनी प्रशासनाला केलं आहे. चर्चेतून प्रश्न सुटतो का याची चाचपणी सर्व आंदोलक करत आहेत.

आंदोलकांवर आयपीसीचे कलम 353 दाखल होणार नसल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

बारसू परिसरात शासकीय अधिकाऱ्यांच्या जमिनींची चौकशी होणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

कालचा (28 जानेवारी) आंदोलनाचा पाचवा दिवस आणि माती परिक्षणाचा चौथा दिवस होता. आदल्या दिवसी राजापूर प्रांताधिकारी कार्यालयातील चर्चा विफल झाल्यानं रिफायनरी विरोधक आंदोलक शुक्रवारी, 28 एप्रिल 2023 रोजी आंदोलन करणार याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली होती.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 1

गुरूवारी रात्रीच आंदोलक माती परिक्षण बंद पाडणार अशी माहिती धडकत होती. पण खात्रीशीर माहिती उपलब्ध होत नव्ही. सगळेच अलर्ट मोडवर होते. खासदार विनायक राऊत देखील आंदोलनात सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आंदोलन तीव्र होईल हे आता निश्चित होत होतं.

सहा वाजता उठून नाष्टा करून आम्ही थेट राजापूर शासकीय विश्रामगृहात पोहचलो. एक दोन गाड्या आधीपासून होत्या. खासदार विनायक राऊत हे आधीपासूनच तिथे होते. काही वेळातच पोलीस देखील पोहोचू लागले. विनायक राऊत यांनी बाहेर येत पत्रकारांशी संवाद साधला.

आज आंदोलक आंदोलनस्थळी आंदोलन करणार असल्यानं मी त्यामध्ये सहभागी होणार आहे, असं त्यांनी अधिकृतपणे सांगितलं. राऊत पुन्हा आपल्या कक्षात निघून गेल्यावर आम्ही आंदोलनस्थळी पोहण्याबाबत आखणी करू लागले. पोलिसांना हुलकावणी देत बारसू साड्यावर कसं पाहोचता येईल यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा पर्याय शोधू लागलो.

आमची गाडी बारसूच्या दिशेनं धावू लागली. पोलीस चेकपोस्ट चुकवत धोपेश्वर, शिवणे पार करत आम्ही पोहोचलो बारसू सड्याच्या पायाथ्याशी. पुढे जाण्यासाठी लाल मातीचा कच्चा रस्ता होता. गाडी जाईल की नाही शंकाच. पण रिस्क घेत गाडी चढ असलेल्या कच्च्या रस्त्यावर घातली गेली.

टायरचा घरघरणारा आवाज, धुळ, दगडी उडवत गाडी चढाच्या मध्ये थांबली. एक क्षण काळजाचा ठोकाच थांबला. आम्ही भरभर गाडीतून खाली उतरो. बाकी पत्रकार मित्रांना हाक मारून गाडीला थक्का घेत गाडी पुढे सरकली.

बराच वेळ चाललेल्या या कसरतीनंतर आम्ही सड्यावर पोहोचलो. आता तीन ते चार किलोमीटर या सड्यावरील खडबडीत रस्त्यावरून गाडी घेवून जावी लागली. एका ठिकाणी गाडी पार्क करून पुढे मग आपल्या बॅगा घेवून चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

सगळे पत्रकार, त्यांचे कॅमेरामन हाता कॅमेरा, लाईव्ह युनीट, ट्रायपॉड घेवून अर्धातास चालल्यावर आंदोलनस्थळी म्हणजेच बारसू सड्यावर पोहोचलो. महिला आंदोलक देखील आसपासच्या बारसू, सोलगाव, शिवणे खूर्द, गोवळ, देवाचे गोठणे या गावांमधून पोहचत होते.

बारसू, रिफायनरी, कोकण
फोटो कॅप्शन, महिला आंदोलक

दरम्यान, आंदोलन स्थळी येण्यासाठी विनायक राऊत यांना रानतळे इथं ठिय्या आंदोलन करावं लागलं. मग पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ दिलं. पण बारसू आंदोलन स्थळावर पोहोचण्यापूर्वीच त्यांना बारसू इथूनच पोलिसांनी ताब्यात घेवून राजापूर पोलीस स्टेशनमध्ये नेलं. ज्या ठिकाणी आंदोलक बसले होते तिथे पोलिसांनी आधीच संचारबंदीचे बॅनर लावून ठेवले होते. त्यावर लिहीलं होतं की,

"महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील ड्रिलींग कामकाजाचे क्षेत्राच्या 1 कि.मी. परिघामध्ये जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांच्या आदेशान्वये पोलीस व प्रशासकीय यंत्रणांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त इतर व्यक्तींना कलम 144 फौजदारी प्रक्रिया संहिता अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

"तरी सदर क्षेत्रामध्ये प्रवेश करू नये. वरील आदेशाचे उल्लंघन करून या क्षेत्रात प्रवेश केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल."

बारसू, रिफायनरी, कोकण
फोटो कॅप्शन, रिफायनरीला ग्रामस्थांचा विरोध

आंदोलन स्थळापासून थोड्याच आंतरावर माती परिक्षणाचं काम सुरू होतं. आंदोलक या ठिकाणी घुसू नये म्हणून पोलिसांनी ज्यादा कुमक मागवून ठेवली होती. आंदोलन नक्की कसं असेल? याची कोणालाही कल्पना नव्हती.

दुपारी 12 वाजेपर्यंत आंदोलक आंदोलनस्थळी पहोचत होते. हळूहळू आंदोलकांनी संख्या वाढत होती. तळपत्या उन्हात 'एकच जिद्द, रिफायनरी रद्द'च्या घोषणा दूमदूमत होत्या. आंदोलन कधी सुरू होईल याची पत्रकार आणि पोलिस वाट पाहत होते.

आंदोलक आणि पोलिसांमधील अंतर 500 मीटरचं होतं. दुपारी 2च्या आसपास आंदोलन स्थळी काय सुरू आहे याची चाचपणी करण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचा वापर केला. ड्रोनच्या सहाय्याने ते आंदोलकांवर नजर ठेवून होते. आंदोलनाची दिशा काय असेल याबाबत कमालीची गुप्तता पाळली गेली होती.

बारसू येथे तैनात पोलिस
फोटो कॅप्शन, बारसू येथे तैनात पोलिस
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दुपारी साडे बारा वाजता आंदोलकांपैकीच काहींनी आंदोलनकांना मार्गदर्शन केलं. पोलीस अश्रूधूर सोडू शकतात, याची बहुदा त्यांना कल्पना असावी, म्हणून त्यासाठी काय खबरदारी घ्यावी याबाबतही आधीच सांगितलं गेलं.

आता आंदोलन सुरू होईल म्हणून आम्ही कॅमेरे घेवून तयार झालो. पण आता आम्ही जेवणार असल्याचं त्यांनी सागितलं. सव्वा वाजता सर्वांनी जेवण केलं. तांदळाची, नाचणीची भाकरी, चपाती आणि चटणी याचा जेवणात समावेश होता.

जेवण झाल्यावर मात्र आंदोलनस्थळी हालचाली वाढू लागल्या. 1 वाजून 50 मिनिटांनी सर्व आंदोलक बाजूला पसरू लागले. त्यांच्या आंदोलनामधील पक्कं नियोजन जाणवत होतं. पलीकडे पोलिसांच्या हालचाली वाढल्या. जोरदार शिट्या वाजू लागल्या. एकाच बाजूने घुसण्यापेक्षा चारही बाजूने माती परिक्षणाच्या ठिकाणी जाण्याचा आंदोलकांनी निर्णय घेतला.

या आंदोलनामध्ये महिला, पुरूष, तरुण, तरुणी, वृद्ध सगळेच होते. काही वेळातच पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापटी सुरू झाल्या. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडायला सुरूवात केली. आंदोलक इतडे तिकडे पळू लागले. काही ठिकाणी पोलिसांनी लाठचार्चही केला. धरपडकही सुरू केली.

आंदोलक आरडा ओरडा करत होते. ओ पत्रकार हे बघा पोलीस मारतायत, शुटींग करा, असे आवाज येत होते. आंदोलकही पोलिसांना, त्यांच्या काठ्यांना, अश्रुधुराला न जुमानता पुढे सरकत होते. नियोजनबद्दल आखणी करून काही आंदोलकांनी पोलिसांना आंदोलन स्थळाभोवती अडकवून ठेवलं. तर काही जण माती परिक्षणाच्या ठिकाणापर्यंत पोहोचलेच.

बारसू

इथं पोलीस अश्रुधुराच्या नळकांड्या फोडतच होते. आम्ही त्यांच्या मागे-मागे शुटींग करत होते. फोटो काढत होतो. सड्यावर गवत खूप असल्यामुळे या धुराच्या नळकांड्यामुळे त्यांना आग लागत होती. पोलिसांनी fire extinguisherच्या सहाय्याने आग विजवत होते.

मग मात्र पोलीसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फेकणं कमी केलं. दरम्यान हळूहळू आंदोलन शांत होऊ लागलं. बऱ्याच आंदोलकांना हुसकावून लावण्यास पोलिस यशस्वी झाले.

याच दरम्यान आमच्या डोक्यावरून अश्रुधुराच्या नळकांड्या जात होत्या. मलाही या धुराचा त्रास होऊ लागले. डोळे चुरचुरू लागले. पण अगदीच थोडावेळ. एका आंदोलकाने तर कमालच केली.

पोलिसांनी टाकलेली पण न फुटलेली अश्रुधुराची नळकांडी उचलून बगेत ठेवली. ज्याठिकाणी आपण बाहेर पाण्याची बॉटल ठेवतो त्या ठिकाणी ठेवून तो इकडे तिकडे फिरत होता. ही नळकांडी एका पोलिसानं पाहिली आणि त्याच्याकडून काढून घेतली.

बारसू, रिफायनरी, कोकण
फोटो कॅप्शन, कोकणात रिफायनरी- आतापर्यंतचा घटनाक्रम

पाऊण तासांच्या या झटापटीनंतर आंदोलक पुन्हा सड्यावर असलेल्या आंब्याच्या झाडाखाली जमू लागले. काहींना भोवळ आली होती, काहींना अश्रुधराचा प्रचंड त्रास झाला होता. काहींना पोलिसांचा मार बसला होता.

आंदोलक कमालीचे चिडले होते. पोलिसांवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत होते. आम्ही मेलो तरी चालेल पण रिफायनरी होऊ देणार नाही, अशा भावना व्यक्त करत होते.

आम्ही उभे असलेल्या ठिकाणी आंदोलकांना पांगवताना पोलिस त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करत होते. आंदोलकांना हुसकावून लावत होते.

या आंदोलनामध्ये सर्वात महात्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे की, लाठीचार्ज झाला की नाही? तर लाठीचार्ज हा झालाच. पोलिसांनीही हे स्पष्टपणे नाकारलं नाही. आंदोलकांनी तर यावर फारच गंभीर आरोप केले की, "पोलिसांनी महिलांना अशा ठिकाणी मारलं की, आम्हाला ते दाखवता येत नाही."

एका क्षणी आंदोलन शांत झालं तेव्हा माती परिक्षण आणि आंदोलन स्थळाच्यामध्ये भिंतीला टेकून पोलिस आणि आंदोलक उभे होते. पोलिसांनी काही आंदोलकांना पाणीही दिलं. त्यांच्या संवादही झाला. अर्थात हा वैयक्तिक संवाद होता. सामूहिक नव्हे. यादरम्यान काही पोलिसांनाही उन्हाचा थोडा फार त्रास झाला. रूग्णवाहिका तयार होती. काहींना त्यामधून रूग्णालयात नेलं जात होतं.

बारसू आंदोलनादरम्यान पोलिसांनी महिलाना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे.
फोटो कॅप्शन, बारसू आंदोलनादरम्यान पोलिसांनी महिलाना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे.

काही वेळानं पोलिसांनी भिंत ओलांडून आंदोलन स्थळाजवळ आले. याठिकाणी ते 144 कलम लागून आहे. याचं उल्लंघन करण्याऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी टेप वाजत होती. आंदोलकांचे नेते काशिनाथ गोरले यांनी साडेचार वाजण्याच्या आसपास आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली.

"आज आम्ही 100 जिंकलो आहोत. ही आमची परिक्षा होती. आज फक्त भूमिपुत्र होते. या आंदोलनात आमच्यासोबत अनेक संघटना आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत जर म्हणत असतील की आपण बोलणी करूया, तर बोलणी करण्याची आमची तयारी आहे. पण जर तीन दिवसात बोलणी केली नाही, माती परिक्षणाचं काम थांबलं नाही तर मात्र आमचा हा संघर्ष लोकशाही मार्गानं असाच सुरू राहिल," काशिनाथ गोरले बीबीसीशी बोलताना सांगत होते.

संध्याकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, कोकण परिक्षेत्राचे आयजी प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण जिल्हाधिकारी बोलायला लागल्याबरोबर आंदोलकांनी काढता पाय घेताला.

जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी आधी लाठीचार्ज झालाच नाही, असं सांगितलं. पत्रकारांनी या विषयी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर मात्र आमच्याकडे व्हीडिओ शुटिंग आहे, आम्ही त्याचा तपास करू असं त्यांनी सांगितलं.

कोकण परिक्षेत्राचे आयजी प्रवीण पवार यांनी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचं मान्य केलं. पण लाठीचार्ज झाला नाही, असं त्यांनी सांगितलं.

ज्या आंब्याखाली आंदोलक गेल्या 5 दिवसांपासून आंदोलन करत होते, त्या ठिकाणाहून आंदोलक निघून गेल्यावर तिथे नंतर पोलिसांनी ताबा मिळवला. तूर्तास बारसू येथील आंदोलन स्थगित आहे. आता या तीन दिवसांमध्ये सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)