तौक्ते: निसर्ग चक्रीवादळानंतर धोक्यात आलेली श्रीवर्धनची रोठा सुपारी वाचवण्यासाठी कसे प्रयत्न सुरू आहेत?

फोटो स्रोत, Salim Mahaldar
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
निळसर करड्या रंगाचा अथांग समुद्र, किनाऱ्यावर पांढुरक्या वाळूची चादर आणि कडेला डुलणाऱ्या नारळी-पोफळीच्या हिरव्यागार वाड्या.
श्रीवर्धन म्हटलं की एरवी डोळ्यासमोर हेच चित्र उभं राहतं. पण गेल्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळानं या परिसराचा चेहरामोहरा बराच बदलला आहे.
इथल्या बागायतींचं त्या वादळात इतकं नुकसान झालं, की प्रसिद्ध श्रीवर्धनी रोठा सुपारीची प्रजातीच नामशेष होण्याची भीती निर्माण झाली.
वर्षभरानंतर अजूनही रोठा सुपारी वाचवण्याचे आणि त्यासाठी नव्या रोपांची लागवड करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत.
काय आहे रोठा सुपारी?
भारतात सुपारीचा वापर प्रामुख्यानं मुखवास म्हणून केला जातो. काही आयुर्वेदिक औषधांत आणि धार्मिक कार्यातही सुपारीचा वापर केला जातो. त्यात कोकणातील सुपारीचा मोठा वाटा आहे.
कोकणात जवळपास सगळीकडे सुपारीची लागवड होते. पण अलिबागपासून खाली तळकोकणापर्यंत नारळ आणि सुपारी हीच किनारी प्रदेशातली मुख्य नगदी पिकं आहेत. त्यातही श्रीवर्धन परिसरात मोठ्या प्रमाणात बागायतदार सुपारीवर अवलंबून आहेत.
इथली 'श्रीवर्धनी' नावाची प्रजाती सर्वांत प्रसिद्ध आहे. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं स्थानिक श्रीवर्धनच्या स्थानिक रोठा प्रजातीपासून ती विकसित केली होती.

फोटो स्रोत, Wakankar
श्रीवर्धनच्या सुपारी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी सलीम महालदार त्याविषयी आणखी माहिती देतात. "एरवी सुपारी फोडली, की आत पांढऱ्या भागावर तपकीरी रंगाच्या रेषा दिसतात. श्रीवर्धनी सुपारीत पांढऱ्या गराचं प्रमाण जास्त असतं. या सुपारीचा गर मऊ असतो आणि त्यात साखरेचं प्रमाण 2-3 टक्के असल्यानं ती चवीला गोड लागते."
श्रीवर्धनी सुपारीमध्ये आर्कोलिन या कॅन्सरकारक रसायनाचं प्रमाण कमी असल्यानं ती तुलनेनं कमी घातक मानली जाते. तसंच सुपारीचा आकारही जास्त आकर्षक असल्यानं तिला दर चांगला मिळतो, असंही महालदार नमूद करतात.
विशेषतः गुजरात आणि बंगालमध्ये या सुपारीला मोठी मागणी आहे. तसंच परदेशातही तिची निर्यात होते.
पण या सुपारीची लागवड सोपी नाही.
रोठा सुपारीच्या लागवडीतील अडचणी
एकतर सुपारीचं बी पेरल्यापासून रोप तयार होईपर्यंतच वर्षभराचा काळ जातो. त्यानंतर पुढे चार पाच वर्षांनीच उत्पन्न सुरू होतं आणि पुढची तीस पस्तीस वर्ष उत्पन्न सुरू राहू शकतं.
Please wait...
सलीम महालदार सांगतात, "सुपारींचं म्हणजे पोफळीचं झाड परागीभवनावर अवलंबून असतं. त्यामुळे दर्जा टिकवून ठेवायचा, तर सगळी झाडं एकाच प्रजातीची असणं गरजेचं असतं. नाहीतर प्रजातींची सरमिसळ होऊन उत्पन्नावरही परिणाम होऊ शकतो."
श्रीवर्धनची सुपारी इतकी वर्ष म्हणूनच आपला दर्जा टिकवून होती आणि इथल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार बनली होती. या प्रजातीला जीआय मानांकन मिळवण्याचेही प्रयत्न सुरू होते.
पण वादळानंतर बागाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आणि ही सुपारीची प्रजातीच नष्ट होते की काय अशी भीती निर्माण झाली.
सुपारीवर संकट आणि रोपांची कमतरता
3 जून 2020 च्या दुपारी निसर्ग चक्रीवादळ श्रीवर्धन तालुक्यातल्या दिवे आगरजवळच किनाऱ्याला धडकलं. ताशी 110 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांनी अख्ख्या तालुक्यातच नाही तर अगदी अलिबागपासून खाली दापोलीपर्यंत सुपारीच्या बागा भुईसपाट झाल्या.
वादळानं इथे 343 हेक्टरवरील सुपारीच्या फळभागांचं नुकसान झालं, अशी माहिती श्रीवर्धनचे तालुका कृषी अधिकारी सुनील निंबाळकर देतात.

"तेवढ्या बागा पुन्हा लावायच्या, तर किमान दोन लाख रोपांची गरज आहे. सुपारी संशोधन केद्रात नव्या रोपांची निर्मिती करण्यात आली, पण ते पंधरा हजारच रोपं देऊ शकतात."
सुपारी संशोधन केंद्रालाही फटका बसला आणि त्यांच्या रोपवाटिकेतली जवळपास नव्वद टक्के झाडं नष्ट झाली. त्यामुळे नवी रोपं तयार करणंही मोठं आव्हान बनलं होतं. फारशी रोपंही शिल्लक नव्हती आणि स्थानिक प्रजाती सोडून दुसरीकडून रोपं आणण्याचा प्रश्नच नव्हता.
"बागायतदारांना आम्ही सल्ला दिला, दुसरीकडची रोपं आणण्यानं या प्रजातीवर परिणाम होऊ शकतो. त्यांनीही ऐकलं. ज्यांच्याकडे स्वतःची रोपं होती, त्यांनी थोडीफार लागवड केली. पण बाकी अनेक बागांमध्ये अजूनही नवी लागवड करता आलली नाही," असं निंबाळकर सांगतात.
कृषी विभागानं आता काही शेतकऱ्यांना रोपवाटिकेसाठी परवाने दिले आहेत आणि सत्तर हजार रोपं यंदा सप्टेंबरपर्यंत लागवडीसाठी उपलब्ध होतील अशी आशा आहे.
पण लगेचच सगळं पूर्वीसारखं होणार नाही, याकडे निंबाळकर लक्ष वेधून घेतात. "सगळ्या बागांमध्ये पुन्हा लागवड करायची तर दोन ते अडीच वर्षं जातील. त्यानंतर चार पाच वर्षांनी उत्पन्न सुरू होऊ शकतं."
म्हणजेच पुढची सहा ते आठ वर्षं इथल्या रोठा सुपारी बागायतदारांना उत्पन्नाची खात्री देता येणार नाही. कोकणातला बागायतदार वादळामुळे आर्थिक बाबतीत आठ-दहा वर्ष मागे गेला आहे, असं म्हणतात ते याचसाठी.

फोटो स्रोत, Salim Mahaldar
रोठा सुपारीच्या नव्या रोपांची निर्मिती करतानाच श्रीवर्धनमध्ये पुन्हा संशोधनही सुरू झालं आहे. इथलं सुपारी संशोधन केंद्र कमी उंचीच्या आणि लवकर उत्पन्न देणाऱ्या प्रजाती विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
कोकणात बागायतींवर वाढती संकटं
वादळ येतं, नुकसान करून जातं, पण त्याच्या जखमा बागांवर आणि शेतकऱ्यांच्या मनावर बराच काळ टिकून राहतात.
2009 सालच्या फयान वादळाच्या तडाख्यातून कोकण सावरत होतं, तोच निसर्ग चक्रीवादळ थेट किनाऱ्यावरच येऊन धडकलं. पाठोपाठ यंदा तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला.
गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळानंतर सुपारीची रोपं लगेच मिळत नसल्यानं काही बागायतदारांनी मधल्या काळात केळी, अननस अशा लगेच उत्पन्न देणाऱ्या झाडांची लागवड केली होती. पण यंदाच्या वादळात त्यांचंही नुकसान झालं आहे.
त्यामुळेच काही बागायतदार पुन्हा सुपारीची लागवडच न करण्याच्या विचारात असल्याचं निरीक्षण हरेश्वरचे कृषी सहाय्यक सचिन जाधव नोंदवतात.

फोटो स्रोत, Wakankar
तसं कोकणात जवळपास प्रत्येक बागायतदार काही ना काही जोडधंदा करत असतो. श्रीवर्धनमध्ये हरिहरेश्वर, दिवे आगरचे किनारे प्रसिद्ध असल्यानं पर्यटकांची इथे वर्दळ असायची. त्यामुळं अनेक सुपारी बागायतदार संबंधित व्यवसायात उतरले होते.
मात्र कोव्हिडच्या साथीमुळे पर्यटन व्यवसाय बंद आहे आणि बागायतदारांना दुहेरी फटका बसला आहे. हरेश्वरचे रहिवासी किरण वाकणकर त्यापैकीच एक आहेत.
वाकणकर यांच्या पाच एकरांच्या वाडीत सुपारीची साडेचार हजार झाडं होती. गेल्या वर्षी त्यातली तीन हजारांहून अधिक झाडं पडली. त्यांच्या 271 माडांपैकी केवळ 91 उभे आहेत.
"आधी या बागेतून आठ दे दहा लाखांपर्यंत उत्पन्न मिळायचं. पुन्हा तेवढी लागवड करून, ती मोठी होऊन फळं येईपर्यंत सुपारीला पाच-सहा आणि नारळाला दहा-पंधरा वर्ष जातील. तोवरचं उत्पन्न गेलंच शिवाय लागवडीचा, मशागतीचा खर्च आहेच."
तरीही पुन्हा आपल्या बागा उभ्या करण्याचा निर्धार वाकणकर व्यक्त करतात.
"निसर्ग वादळानंतर केंद्राच्या निकषांनुसार आधी मिळालेली मदत कमी होती. पण नंतर स्थानिक नेत्यांच्या प्रयत्नांनंतर वाढीव मदत मिळाली. ती मिळण्याआधीच लोक कामाला लागले होते. वादळानंतर दुसऱ्या दिवशीच वाड्या साफ करायाला सुरुवात झाली होती. आम्हीही पुन्हा वाडी उभी करूच. कोकणातला माणूस मदतीची वाट पाहात नाही आणि सहज हार मानत नाही."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








