विदेशातील उच्च शिक्षण आणि शिष्यवृत्तीच्या संधींविषयी माहिती कुठे मिळवायची?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सुधाकर पिचाईमुथू
    • Role, .

आम्ही एक एप्रिलला तपशीलवार असा एक लेख प्रसिद्ध केला होता. "तमिळनाडूचे विद्यार्थी शिक्षणासाठी विदेशात का जातात?" असं त्याचं शीर्षक होतं.

या लेखामध्ये लेखकानं अनेक पैलूंवर सखोल चर्चा केली. उच्च शिक्षणासाठी मुलं विदेशात का जातात? त्याठिकाणी खरंच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवीसाठी अनेक संधी असतात का? त्या मिळवण्यासाठी मुलांनी कशी तयारी करायला हवी? अशा अनेक मुद्द्यांचा त्यात समावेश होता.

हा लेख त्याच लेखाचा पुढील भाग आहे. विदेशात उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी कशा संधी आहेत? त्या संधींबाबत माहिती कशी मिळवावी? मुलांना विदेशात उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी शिष्यवृत्ती मिळू शकते का? अशा प्रश्नांच्या उत्तरावर यात चर्चा करण्यात आलीय.

संशोधनाला प्राधान्य देणारे देश

औद्योगिक विकासात सुधारणा व्हावी यासाठी प्रत्येक देश वेगळ्या धोरणाचा अवलंब करत असतो. पाश्चिमात्य देश आणि दक्षिण कोरिया, तैवान आणि जपानसारखे पूर्व आशियाई देश हे विद्यापीठांच्या माध्यमातून मनुष्यबळ विकास करण्याला औद्योगिक विकासाची गुरुकिल्ली मानतात.

संशोधन श्रेत्रातील नवीन कल्पना आणि शोध हे उत्पादन आणि सेवा क्षेत्राच्या बाजारपेठेसाठी आवश्यक असलेल्या उपकरण आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी भांडवल प्रदान करत असतात. प्रत्येक देश त्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP)पैकी ठरावीक रक्कम ही संशोधन आणि विकास यासाठी गुंतवत असतो. ही गुंतवणूक विद्यापीठांच्या संशोधन विभागामध्ये मनुष्यबळ विकास करण्यासाठी वापरता येऊ शकते.

तसंच ही गुंतवणूक पीएचडीचे विद्यार्थी आणि त्यानंतर संशोधन करणाऱ्यांना शिष्यवृत्ती आणि विद्यावेतन (फेलोशिप) पुरवण्यासाठीही वापरता येऊ शकते.

आकडेवारीचा विचार करता भारत जीडीपीच्या केवळ 0.6% रक्कम संशोधन आणि विकास (R&D)क्षेत्रात गुंतवतो. तर चीन 2.2% आणि इस्रायल यासाठी 5% एवढी गुंतवणूक करतो.

भारतातील R&DPPMI निर्देशांक (The Research and Development Personnel Per Million Inhabitants-10 लाख रहिवाशांमागे असलेल्या संशोधकांचे प्रमाण) अत्यंत कमी म्हणजे केवळ 409 आहे.

जवळपास आपल्या एवढ्याच लोकसंख्येच्या देशात म्हणजे चीनमध्ये हा निर्देशांक 3069 आहे. UNESCO च्या 2018 अहवालानुसार सर्वाधिक निर्देशांक दक्षिण कोरियाचा 9794 एवढा आहे.

पण दक्षिण कोरियासारख्या विकसित देशांमध्ये प्रामुख्यानं विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवीधर हे औद्योगिक क्षेत्राकडं वळतात. त्यामुळं या क्षेत्रातील उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या संधींसाठी ते विदेशी विद्यार्थ्यांवर अवलंबून असतात. भारतीय विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यायला हवा.

उच्च शिक्षण आणि संशोधन हे पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणापेक्षा बरंच वेगळं असतं. कारण यात आपल्याला संधी मिळवण्यासाठी अधिकचे परिश्रम करावे लागत असतात.

विदेशी शिक्षण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक

विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी शिष्यवृत्ती मिळू शकते का?

विकसित आणि विकसनशील देश पीएचडीच्या संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुरवत असतात. विदेशी विद्यार्थी दोन मार्गाने या शिष्यवृत्ती मिळवू शकतात :

1. सरकारी संस्था किंवा खासगी ट्रस्टमार्फत आयोजित संशोधन शिष्यवृत्तीसाठीच्या स्पर्धात्मक कार्यक्रमांत सहभागी होऊन.

2. अर्थसहाय्य असलेल्या प्रकल्पांमध्ये संशोधन सहाय्यक किंवा संशोधक फेलो हे पद मिळवून. या दोन्ही पद्धतींसाठी विद्यार्थ्यांना आधी त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक संस्थेमधील प्राध्यापकांना संपर्क साधावा लागेल. तसंच त्यांच्या संशोधकांच्या टीममध्ये काम करण्यासाठीचं त्यांचं संमतीपत्र त्यांना मिळवावं लागेल.

ई-मेल करण्यापूर्वी...

प्राध्यापकांशी चांगल्याप्रकारे चर्चा व्हावी म्हणून त्यांना ई-मेल करण्यापूर्वी खालील कागदपत्रे आधीच तयार करून ठेवावी असा सल्ला दिला जातो.

1. रेझ्यूमे (Resume) : यामध्ये तुमची शैत्रणिक पात्रता, केलेले संशोधन, शोधनिबंध, सहभाग घेतलेल्या कार्यशाळा, संमेलनं, परिषदा, संशोधनाबाबतची आवड आणि तुमचे पदव्युत्तर प्रबंध याचं थोडक्यात वर्णन असावं. तसंच त्यात तुमच्या वैयक्तिक माहितीसह संपर्कासाठी मोबाईल नंबर आणि ईमेल देखील असायला हवा.

2. संदर्भ पत्र : तुमची चांगली ओळख असलेल्या प्राध्यापकांकडून तुम्हाला संदर्भ पत्र घ्यावे लागतील. या पत्रांमध्ये तुमची शैत्रणिक पात्रता, तुमची शिकण्याची आणि शिवकवण्याबाबतची आवड, तुमच्या जीवनात संशोधनाचे महत्त्व, टीममध्ये काम करण्याची तुमची क्षमता आणि तुमच्या संशोधनाच्या दृष्टीनं पुढचा टप्पा गाठण्यासाठी शिष्यवृत्तीचं महत्त्वं याचा तपशील असावा.

रोजगार

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

3. गोषवारा : यात प्रामुख्यानं तुमच्या संशोधनाचा उद्देश, त्यातील वेगळेपणा आणि त्याचा प्रभाव याचा समावेश असावा. हे अगदी एका पानाचं छोटंसं डॉक्युमेंटदेखील असू शकतं. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन करणारे विद्यार्थी ग्राफिक्सचा वापर करून गोषवारा तयार करू शकतात.

तुमच्या संशोधनामुळं अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर प्राध्यापकांकडून सुरू असलेल्या अभ्यासामध्ये कशाप्रकारे नवीन मूल्यं समाविष्ट होऊ शकतात, याचा उल्लेख करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. जर तुमच्या संशोधनामध्ये दोन्ही बाजूनं ज्ञानाच्या आदान प्रदानाची शक्यता असेल तर तुम्ही शिष्टवृत्तीची ही स्पर्धा पूर्ण करू शकता.

4. कव्हर लेटर : प्राध्यापकांना ई मेल करताना तुम्ही त्यांचं नाव आदरानं लिहायला हवं. नेहमीचे मॅडम सर हे शब्द टाळून त्यांच्या नावापुढं डॉ. किंवा प्रा. लिहावं. ई मेलमध्ये तुमचा संक्षिप्त परिचय आणि त्यांच्या टीमची निवड का केली याचे स्पष्ट कारण असावे. त्यांच्या संशोधकांच्या टीमच्या कामात तुम्ही कशाप्रकारे योगदान देऊ शकाल, हे स्पष्ट करायला हवे.

प्रत्येक प्राध्यापक त्यांच्या टीममध्ये काहीतरी नावीण्य आणतील अशा विद्यार्थ्यांच्या शोधात असतात. प्राध्यापकांच्या प्रकाशित झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखांचा उल्लेख करून त्यांचं लक्ष वेधून घेता येऊ शकतं. त्याचबरोबर शिष्टवृत्तीचे नाव, शिष्यवृत्तीची रक्कम, नियम व अटी आणि अर्जाची मुदत याचा उल्लेख करणंही महत्त्वाचं असतं.

ई मेलबाबत खालील गोष्टी लक्षात ठेवा :

• प्राध्यापकांना रोज अंदाजे 20 ते 100 मेल येत असतात. त्यामुळं मेलमध्ये आवश्यक ती संपूर्ण माहिती असल्यास संवाद करणं सोपं ठरतं.

• मेल पाठवण्यापूर्वी स्पेलिंग म्हणजे शुद्धलेखन आणि टायपिंगमधील चुका तपासून घ्या.

• तुमचा रेझ्यूमे, गोषवारा आणि संदर्भ पत्र जोडायला विसरू नका.

• सतत, वारंवार आठवण करुन देणं टाळा, त्यामुळं प्राध्यापकांवर अतिरिक्त दबाव निर्माण होत असतो.

• सर्व प्राध्यापकांसाठी सारखेच पत्र वापरू नका. त्यामुळं यश मिळण्याची शक्यता कमी होते. शक्य तेवढे एकाच विद्यापीठातील वेगवेगळ्या प्राध्यापकांशी एकाच वेळी संपर्क करणे टाळा.

• जर तुम्ही एकसारखी माहिती 10 पेक्षा अधिक जणांना एका तासाभराच्या वेळेत पाठवली तर तो मेल स्पॅम फोल्डरमध्ये जाण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं ईमेल मॅनेजमेंटबद्दल बारीक सारीक माहिती शिकण्याचा प्रयत्न करा.

• जर प्राध्यापकांनी काही शंका उपस्थित करत प्रतिसाद दिला तर, लवकरात लवकर त्या शंकांची उत्तरं पाठवण्याचा प्रयत्न करा. किमान तुम्ही केव्हा उत्तर देणार याबाबत त्यांना कळवा. त्यामुळं तुमची चांगली प्रतिमा तयार होते. बहुतांश प्राध्यापकांना संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेच्या मर्यादेत काम पूर्ण केलेले हवे असते.

• शिष्यवृत्तीसाठी संदर्भ पत्रे आणि इतर माहिती आधीच तयार ठेवायला हवी.

सर्वांत प्रसिद्ध शिष्यवृत्ती उपक्रम

जगभरातील सरकारं, विद्यापीठं आणि ट्रस्ट फंड संशोधनासाठी शिष्यवृत्ती देतात. हे सर्वांत प्रसिद्ध शिष्यवृत्ती उपक्रम आहेत.

या सर्वांसाठी दरवर्षी एकाचवेळी अर्जप्रक्रिया सुरू होत असते, त्यामुळं विद्यार्थी त्यासाठी आधीच तयारी करू शकतात.

- जर्मनी : DAAD पीएचडी शिष्यवृत्ती (जर्मन अॅकेडेमिक एक्सचेंड सर्व्हीस)

- दक्षिण कोरिया : ग्लोबल कोरिया स्कॉलरशिप

- जपान : जपान सरकार (MEXT) पदव्युत्तर शिष्यवृत्ती

- ऑस्ट्रेलिया : पीएच डी टॉप अप शिष्यवृत्ती/संशोधन प्रशिक्षण कार्यक्रम

- तैवान : तैवान आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती कार्यक्रम 2022

- चीन : चीन सरकार शिष्यवृत्ती

- कॅनडा : राणी एलिजाबेथ शिष्यवृत्ती/व्हॅनियर कॅनडा ग्रॅज्युएट स्कॉलरशिप(Vanier CGS)

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

भारतातील पीएचडी करणाऱ्या संशोधकांना विदेशात जाण्याची संधी आहे का?

भारतात पीएचडी करणारे संशोधक वर्षातून एकदा दोन महिन्यांसाठी विदेशात जाऊ शकतात. त्यासाठी ते व्हिजिटिंग रिसर्च स्टुडंटशिपचा वापर करू शकतात. ही शिष्यवृत्ती पुरवण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच जैवतंत्रज्ञान विभागानं इतर देशांबरोबर सामंजस्य करार केलेले आहेत.

उदाहरण द्यायचं झाल्यास, न्यूटन-भाभा पीएचडी प्लेसमेंट प्रोग्राम अंतर्गत ब्रिटीश काऊन्सिल आणि भारताच्या डीएसटी/डीबीटी यांच्या सहयोगातून भारतीय विद्यार्थी ब्रिटीश विद्यापीठांमध्ये 4 महिन्यांसाठी संशोधनासाठी जाऊ शकतात.

त्याचप्रमाणे कॉमनवेल्थ स्प्लिट साईट स्कॉलरशिप, DAAD पीएचडी व्हिजिटिंग स्कॉलरशिप, SERB - ओव्हरसीज व्हिजिटिंग डॉक्टोरल फेलोशिप प्रोग्राम अशा योजनांच्या माध्यमातून भारतीय विद्यार्थ्यांना मदत केली जाते.

या योजनांसाठी अर्ज करायचा असल्यास विद्यार्थ्यांना त्यासाठी संबंधित विद्यापीठातील संबंधित प्राध्यापकाशी बोलून त्यांच्या टीममध्ये काम करण्यासाठीचे संमतीपत्र मिळवावे लागते.

मुलाखतीची तयारी कशी करावी?

तुम्हाला एकदा मुलाखतीसाठी पत्र मिळालं की, त्यासाठी तयारी करावी. ही मुलाखत 20 ते 30 मिनिटांचीच असते. काही दिवस सराव केल्यास तुम्ही मुलाखतीत होणाऱ्या अस्वस्थतेपासून दूर राहू शकता.

राष्ट्रकुल देशांमधील विद्यार्थ्यांना ब्रिटीश विद्यापीठांमध्ये कॉमनवेल्थ पीएचडी स्कॉलरशिप कार्यक्रमांतर्गत डॉक्टोरल रिसर्च करण्याची संधी मिळू शकते. पण त्यासाठी या देशांमधील हजारो विद्यार्थी अर्ज करतात. त्यामुळं तुमची मुलाखतीतील कामगिरी हीच यशाचा मार्ग दाखवू शकते.

या प्रश्नांची आधीच तयारी करून ठेवा :

1. तुमच्या पदव्युत्तर प्रबंधातील महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती देणारं 5 मिनिटांचं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करा. एक मिनिटही वेळ वाढला तर तुम्ही गुण गमावण्याची शक्यता असते.

2. ध्येय, उद्दीष्टे, कार्यपद्धती, संशोधनातील निष्कर्ष, मैलाचा दगड आणि परिणाम याची माहिती देणारं 2-3 पानांचं डॉक्युमेंट तयार करा. प्रेझेंटेशन स्लाईड्समध्ये मोठी वाक्यं टाळा. तुमच्या कल्पना अगदी सुवाच्छपणे वेगवेगळ्या बुलेट पॉइंट्समध्ये मांडा.

3. या स्कॉलरशिप किंवा संशोधन योजनेसाठी तुम्ही अर्ज करण्याचे कारण याबाबत तुमच्याकडं तार्किक अशी माहिती असायला हवी.

4. टीममध्ये काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला उदाहरणासह पटवून देता यायला हवी.

5. संशोधन क्षेत्रातील तुमचं नियोजन कौशल्य उदाहरणासह स्पष्ट करावे. कामादरम्यान तुमची मंथली टाईमलाईन शेअर करावी लागेल. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, संशोधसाठीचे बजेट ब्रेकडाऊन तुम्हाला द्यावं लागेल. बजेट देताना शिष्यवृत्तीचे दिशानिर्देश पाळावे लागतील.

6. तुम्हाला भविष्यातील योजना किंवा आगामी पाच वर्षात तुम्ही स्वतःला कुठे पाहता, या प्रश्नाची उत्तर देता यायला हवी.

7. सध्याच्या काळातील तंत्रज्ञानासंबंधी माहिती आणि सोबतच ज्या टीममध्ये जायचे आहे, त्या टीमच्या संशोधनाच्या कामासंदर्भात माहिती मिळवा. तसंच तुमच्या आवडीशी किंवा क्षेत्राशी निगडीत असलेल्या जगातील इतर देशांच्या संशोधकांबाबतही तुम्हाला सखोल माहिती असायला हवी.

8. तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात किंवा सामाजिकदृष्ट्या होणारे तुमच्या संशोधनाचे परिणाम हे तुम्हाला आवश्यक आकडेवारीसह मांडता यायला हवे.

9. मुलाखत घेणाऱ्यांनी काही शंका विचारण्याची परवानगी दिल्यास तुम्ही प्रश्न विचारू शकता. निकाल कधी लागणार, संशोधनासाठीची उपकरणे, टीम किंवा असे सकारात्मक प्रश्न विचारावे. शिष्यवृत्ती किंवा वेतन यासंबंधीचे प्रश्न विचारणे टाळावे.

10. वेळ येईपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत कागदपत्रं तयार करणं पुढं ढकलत राहू नका. बहुतांश विदेशी संस्था ओव्हरसीज रिसर्च अँड स्टुडंट डिपार्टमेंटच्या अर्जदारांना त्यांची कागदपत्रं आणि गोषवारा किमान दोन आठवडे आधी जमा करण्यास सांगतात. त्यामुळं कागदपत्रं आधी तयार करणंच उत्तम ठरतं.

शिष्यवृत्तीबद्दल तपशील कसा मिळवायचा?

पोस्ट डॉक्टरेट रिसर्च प्रोग्रामसाठी काम करणाऱ्या गटांशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करा.

• काही संकेतस्थळं विविध देशांमधील संशोधक आणि संशोधन सहायक अशा जागा आणि त्यासाठी मिळणारी शिष्यवृत्ती किंवा स्टायपेंड याबाबत माहिती देतात. उदाहरणार्थ, www.jobs.ac.uk , द्वारे ब्रिटीश शैक्षणिक संस्थांमधील संशोधन शिष्यवृत्तींबाबत माहिती मिळते.

https://euraxess.ec.europa.eu/jobs द्वारे युरोपातील शिष्यवृत्तींबाबत माहिती मिळते. अशी प्रत्येक देशाशी संबंधित अनेक संकेतस्थळं आहेत. त्याठिकाणी तुम्हाला माहिती मिळू शकते.

• scholarship-positions.com आणि findaphd.com अशा संकेतस्थळांचं सबस्क्रिप्शन घेऊनही तुम्ही रोज जगभरातील शिष्यवृतींच्या संदर्भातील माहिती मिळवू शकता.

• सध्याच्या काळात संशोधन क्षेत्रातील संधी, याबाबत माहिती देण्याचा विचार करता यात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. LinkedIn, Twitter आणि ResearchGate सारख्या व्यासपीठांवर प्राध्यापक, शैक्षणिक संस्था आणि निधी पुरवणाऱ्या संस्था अशा प्रकारच्या संधींची माहिती देत असतात. जर तुम्ही फेसबूकवरील अशा गटांमध्ये असाल तर तुम्हाला तिथंही माहिती मिळू शकते.

• तर तुम्ही तुमच्या LinkedIn च्या कव्हर पेजवर "Open for position" चा बॅज लावला, म्हणजे तुम्ही संधीच्या शोधात असल्याचं स्पष्ट होतं. सोशल मीडियातील अशा संधींचा वापर करायला हवा. जगभरातील प्रमुख संस्थांमधील संशोधन आणि शिष्यवृत्तीसाठीच्या जागांसाठी मोठी स्पर्धा असते. शेकडो, हजारो विद्यार्थी या एका जागेसाठी स्पर्धेत असतात. त्यामुळं यश मिळण्याची शक्यता ही केवळ 0.1 ते 1% एवढीच असते. त्यामुळं, तुम्हाला यश मिळालं नाही तरी निराश होऊ नका. मुलाखतीतील प्रश्नांसाठीच्या उत्तरांची तयारी करा आणि पुढच्या स्पर्धेसाठी तयारी करा. शक्य झाले तर एक मार्गदर्शक निवडा. तुमचे कॉलेजचे प्राध्यापक, शिक्षक किंवा हितचिंतक कोणीही असू शकते. प्रत्येक पायरीवर तुमच्या योजनांबाबत चर्चा करून त्यांच्याकडून सल्ला किंवा मार्गदर्शन घ्या.

(लेखक सुधाकर पिचाईमुथू हे सध्या ब्रिटनच्या हेरियट-वाट युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड फिजिकल सायन्समध्ये सहायक प्राध्यापक आहेत. सौर उर्जेद्वारे चालणाऱ्या नॅनो लो कंडक्टिंग कॅटलिस्टच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती आणि हायड्रोजन गॅस उत्पादनाची शक्यता याबाबत संशोधन करणाऱ्या टीमचे ते प्रमुख आहेत.

नॅनोटेक्नॉलॉजीच्या वापराद्वारे ऊर्जा उपकरणांच्या संदर्भात त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये शेकडो शोधनिबंध लिहिले आहेत. त्यांना जपान सरकारकडून JSPS फेलोशिप आणि युरोपियन युनियन फंड्सच्या माध्यमातून आणि वेल्स सरकारच्या वतीनं SER-Cymru II Rising Star पुरस्कारही मिळाला आहे. सोशल मीडियातील उच्च शिक्षणाच्या संधी आणि नॅनो टेक्नॉलॉजी याबाबत ते लिखाण करतात तसंच, शैक्षणिक संस्था आणि परिषदांमध्ये व्याख्यानही देतात.)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)