रशिया : पुतिन यांनी नव्या वर्षानिमित्त केलेल्या भाषणाची इतकी चर्चा का होतेय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, स्टीव्ह रोजनबर्ग
- Role, संपादक, बीबीसी रशियन सर्व्हिस
- Reporting from, मॉस्को
दरवर्षीप्रमाणे यंदाही 12 वाजता क्रेमलिनच्या ‘स्पाकी टॉवर’वर लावण्यात आलेल्या घड्याळाची घंटा वाजली. ही घंटा वाजताच रशियाचं राष्ट्रगीत सुरू झालं.
त्यानंतर रशियन टीव्ही चॅनल असलेल्या ‘चॅनल वन’वर 2023 च्या स्वागतासाठी एक पॉप साँगही वाजवण्यास सुरुवात झाली. या गाण्याचा अर्थ होता - ‘मी रशियन आहे आणि कुठल्याही स्थितीत पुढेच जाईन.’
त्यानंतर दुसरं देशभक्तीपर गाणं वाजवलं गेलं – ‘मी सेव्हियत संघात जन्मलो, यूएसएसआरमध्ये वाढलो.’
टीव्हीवर चॅनल बदलताना मी ‘रशिया वन’वर थांबलो. तिथं चॅनलचे प्रसिद्ध ‘वॉर कन्स्पाँडन्ट’ शँपेनचं ग्लास घेऊन 2023 या नव्या वर्षाचं स्वागत करत होता आणि युद्धभूमीवरून चांगले वृत्त येवोत, अशी इच्छाही व्यक्त केली.
त्याच्यासोबत लष्करी गणवेशात काही लोकही बसले होते. त्यात एक अशीही व्यक्ती होती, ज्यांच्याकडे युक्रेनमध्ये रशियानं कब्जा केलेल्या भागाची जबाबदारी होती.
त्याने घोषणा द्यावी अशा आवाजात म्हटलं की, “आम्ही रशियन लोकांसाठी शांततेचं आवाहन करतो. मात्र, ही शांतता आपल्याला विजयाशिवाय मिळणार नाही.”
यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की, रशियन टीव्हीवर नव्या वर्षाचं सेलिब्रेशन कसं बदललं होतं. रशियात सेलिब्रेशन, पार्टी अशा गोष्टींचं वातावरण तर आहेच, मात्र युद्धभूमीवरील विजयाची इच्छाही स्पष्टपणे दिसून येते.
व्लादिमीर पुतिन यांचं भाषण
नव्या वर्षाच्या आगमनानिमित्त रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देशवासियांना संबोधून भाषणही केलं.
मात्र, त्यांच्या भाषणात आधीसारखा उत्साह नव्हता. पूर्वी नव्या वर्षानिमित्त त्यांची भाषणं व्हायची, तेव्हा क्रेमलिनबाहेर ते एकटेच असायचे. यंदा त्यांच्या भोवती लष्करी गणवेशात सैनिक उभे होते.
गेल्यावर्षी आपल्या भाषणात पुतिन यांनी नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला ‘उत्साह आणि आनंदाचा क्षण’ असं म्हटलं होतं. मात्र, यावर्षी उत्साह, आनंद हे शब्दच भाषणातून गायब झाल्याचे दिसते.
यंदा पुतिन यांच्या भाषणाचा जोर रशियाला नायक आणि युक्रेनला खलनायक सिद्ध करण्यावरच अधिक होता.
या भाषणात एकेठिकाणी पुतिन म्हणतात की, “बऱ्याच वर्षांपासून पाश्चिमात्य देश आपल्या शांततापूर्ण उद्देशांच्या गोष्टी करायचे आणि आपल्याला फसवत. मात्र, त्यांचा तो दुटप्पीपणा होता. त्यांची भूमिका ‘नव-नाझीं’ना प्रोत्साहन देणारी होती.”

“आपल्या मातृभूमीचं रक्षण करणं, हे आपल्या पूर्वज आणि येणाऱ्या पिढ्यांसाठीचं आपलं कर्तव्य आहे,” असं ते या भाषणात म्हणाले.
जेव्हा पुतिन ‘आपल्या मातृभूमीचं रक्षण करण्या’बाबत बोलतात, तेव्हा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की, रशियावर कुणीही हल्ला केलेला नाही, उलटपक्षी रशियानं युक्रेनमध्ये घुसखोरी केलीय.
एवढंच नव्हे, पुतिन युद्धाचे फायदेही भाषणातून सांगत होते.
“हे वर्ष रशियाचं संपूर्ण सार्वभौमत्व मिळवण्याच्या दिशेनं महत्त्वाच्या निर्णयांचं वर्ष होतं,” असं पुतिन म्हणाले.
पुतिन असेही म्हणाले की, आपण आपल्या खऱ्या स्वातंत्र्याचा पाया रचला आहे.
पुतिन यांनी युक्रेनमधील घुसखोरीला ‘सार्वभौमत्वाची लढाई’ म्हणणं हैराण करणारी गोष्ट आहे.
जगाला माहित आहे की, रशिया मोठ्या कालावधीपासून सार्वभौम आणि स्वतंत्र देश आहे. असं असतानाही, जरी पुतिन यांचं म्हणणं आपण मानलं की, रशिया ‘संपूर्ण सार्वभौम’ नाही, तरी पहिला प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे, ‘संपूर्ण सार्वभौम’ नाही म्हणजे नेमकं कसा नाही? सर रशिया सार्वभौम नसेल, तर पुतिन गेल्या 23 वर्षांपासून रशियात सत्तेत कसे आहेत? हा कालखंडच पुतिन यांचा दावा फेटाळतो.

फोटो स्रोत, Getty Images
आपल्या वार्षिक भाषणात पुतिन आणखी एका गोष्टीवर लक्ष वेधतात, ती म्हणजे – “ते जगाला ‘आम्ही’ आणि ‘ते’ असं वागतात. ‘आम्ही’ म्हणजे रशियाचे ‘लष्करी ऑपरेशन’ आणि ‘ते’ म्हणजे रशियाच्या कारवाईचं विरोध करणारे होय.”
याचसोबत पुतिन यांनी म्हटलं की, “2022 मध्ये अनेक गोष्टी पहिल्यापेक्षा अधिक स्पष्ट झाल्यात. एक अशी रेष ओढलीय, जिच्या एका बाजूला नायकत्व आणि आशावाद आहे, दुसऱ्या बाजूला धोका आणि डरपोकपणा आहे.”
2023 मध्ये रशिया या रेषेला आणखी गडद करण्याची शक्यता आहे. स्पेशल मिलिट्री ऑपरेशनच्या नावाखाली देशातील सर्व संपत्ती पुतिन यांनी पणाला लावलीय. पण यावर चर्चा होताना दिसत नाही.
सरकार हे मानून चाललंय की, रशियातील सर्व नागरिकांचं या मिशनला समर्थन आहे आणि पुतिन यांच्या निर्णयांचं नागरिक समर्थन करत राहतील. जे असं करणार नाही, त्यांना सांगितलं जाईल की, ते कशा पद्धतीने मातृभूमीला धोका देत आहेत.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








