You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख..
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.
आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.
बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.
राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..
1. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आता दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा रद्द होणार?
येत्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
शालेय शिक्षणात नवीन शिक्षण धोरणानुसार बदल केले जातील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
आता जून महिन्यापासून शालेय शिक्षण व्यवस्थेत आणि अभ्यासक्रमात नेमके काय बदल होऊ शकतात? हे जाणून घेऊया,
तब्बल 34 वर्षांनंतर देशाचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात आलं आहे. या धोरणात अनेक मोठे बदल सुचवण्यात आले असून धोरणाला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे.
महाराष्ट्रात जून महिन्यापासून टप्प्याटप्याने धोरण अवलंबले जाणार असं मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.
2. लैंगिक छळाविषयी भारतीय महिला खेळाडू बोलत का नाहीत?
“आमचं जीवन, आमचा खेळ, आमचं कुटुंब... हे सगळं पणाला लावून आम्ही इथे आलो आहोत. खेळाडूंना न्याय मिळावा यासाठी तीन महिन्यांपासून एवढ्या मानसिक त्रासातून जातो आहोत. हा महिला खेळाडूंच्या सन्मानाचा प्रश्न आहे. आम्हीच सुरक्षित नसू तर बाकीच्या मुलींविषयी काय सांगणार?”
हा उद्विग्न प्रश्न विचारला आहे भारताची लोकप्रिय पैलवान विनेश फोगाटनं. तिच्यासह ऑलिंपिक पदकविजेते पैलवान साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी 23 एप्रिलला नवी दिल्लीत पुन्हा एकदा धरणं आंदोलन सुरू केलं.
खरंतर याआधी 18 जानेवारीला या तिघांनी आंदोलन केलं होतं आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप लावले होते. बृजभूषण यांच्याविषयी किमान 10 महिला पैलवानांनी आपल्याकडे केली असल्याचा आरोप विनेशनं केला होता.
पण बऱ्याच वेळा लैंगिक छळाविषयी भारतीय महिला खेळाडू बोलत नाहीत, असं निदर्शनास आलं आहे.
3. 'पोन्नियिन सेल्वन' कोणाचा इतिहास सांगतो? ही गोष्ट खरी आहे?
मणिरत्नम दिग्दर्शित तामिळ चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन' या सिनेमाचा दुसरा भाग आज (28 एप्रिल) प्रदर्शित होत आहे.
या सिनेमाचा पहिला भाग गेल्या वर्षी 30 सप्टेंबर रोजी तामिळ, हिंदी, कन्नड, तेलुगु आणि मल्याळम या पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.
या चित्रपटात विक्रम, कार्ती, जयम रवी, त्रिशा, ऐश्वर्या राय-बच्चन, प्रकाश राज, पार्थिवन, ईश्वरा लक्ष्मी, प्रभू, सरथ कुमार, विक्रम प्रभू, जयराम, रघुमन आणि निझलगल रवी प्रमुख भूमिकेत आहेत.
ए.आर. रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिलंय. ज्येष्ठ तमिळ लेखक जयमोहन यांनी चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. रवी वर्मन यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे.
हा चित्रपट एक तामिळ कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ही लोकप्रिय कादंबरी काय आहे? ती किती खरी-किती काल्पनिक आहे? त्यानिमित्ताने या चित्रपटातली चोळ साम्राज्याची गोष्ट काय आहे हेही जाणून घेऊ.
4. आफ्रिकेतून भारतात आणलेल्या चित्त्यांच्या ‘रहस्यमय’ मृत्यूंच्या मागे कोणती कारणं आहेत?
28 फेब्रुवारी 2023 रोजी इराणमध्ये ‘पिरोज’ हे नाव ट्रेंड होत होतं. सोशल मिडीयावर लोक #RIPPirouz लिहून त्याला निरोप देत होते.
सगळे प्रयत्न करुनही पिरोजला वाचवण्यात यश आलं नाही. पिरोजची किडनी फेल झाली होती.
पिरोज 10 महिन्यांचा होण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक होते. पण त्याच्या किडनी फेल होत गेल्या. त्याला इराणच्या सेंट्रल वेटरिनरी हाॅस्पिटलमध्ये डायलेसिसवर ठेवलं होतं.
मागच्या वर्षी पिरोजच्या आईने बंदिस्त वातावरणातच तीन चित्त्यांना जन्म दिला होता. आपल्या तीन भावांमध्ये फक्त पिरोजच एकटा एवढा काळ जगू शकला.
विशेष म्हणजे एकेकाळी इराणमध्ये हजारोंच्या संख्येने चित्ते होते. पण आता चित्त्यांना परत आपल्याकडे वसवण्याचा इराणचा आणखी एक प्रयत्न असफल ठरला.
इराणमधल्या या घटनेच्या साधारणपणे महिनाभरानंतर 27 मार्च रोजी भारतातल्या एका चित्त्याचा मृत्यू झाला. कुनो राष्ट्रीय उद्यानातल्या साशा नावाच्या चित्त्याचा किडनी फेल झाल्यामुळे मृत्यू झाला.
सप्टेंबर 2022 मध्ये आठ चित्ते नामिबियामधून कुनोतल्या राष्ट्रीय उद्यानात आणले होते. साशा त्यांच्यापैकीच एक होती.
5. ही बाहुली थोडी वेगळी दिसते, पण त्यामागे आहे एक खास कारण..
डाऊनसिंड्रोमने ग्रस्त असलेल्या व्यक्तीसदृश असलेली बार्बी बाहुली मॅटेल कंपनीने तयार केली आहे. समाजातील विविध स्तरातील लोकांना सामावून घेण्यासाठी मॅटेल कंपनीने हे पाऊल उचललं आहे.
बार्बी बाहुलीचं मूळ रुप खऱ्या महिलेचं, मुलीचं प्रतिनिधित्व करत नाही, अशी टीका पहिल्या बार्बीवर झाली होती. त्यानंतर मॅटेल कंपनीने विविध गटांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या बाहुल्या आणण्याचं धोरण हाती घेतलेलं आहे.
गेल्या काही वर्षात ऐकण्यासाठी कानाला उपकरण लावलेली, कृत्रिम अवयवरोपण झालेली, व्हीलचेअरवर बसलेली अशा विविध स्वरुपातल्या बार्बी तयार केल्या होत्या.
समाजातल्या सर्व स्तरातल्या मुलींना बार्बीत आपलं रुप पाहता यायला हवं, असं मॅटेल कंपनीचं उद्दिष्ट आहे. त्यांच्यासारख्या न दिसणाऱ्या बाहुलीशीही त्यांनी खेळावं असाही कंपनीचा प्रयत्न आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)