You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नातीचा वाढदिवस साजरा करून परतताना गाडीचा अपघात, सांगलीत एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू
- Author, सरफराज सनदी
- Role, बीबीसी मराठीसाठी, सांगलीमधून
मुलीच्या मुलीचा म्हणजे नातीचा वाढदिवस साजरा करायला गेलेल्या आजोबांसह त्यांच्या कुटुंबाचा अपघात झाला आणि या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झालाय. सांगली जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडलीय.
नातीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तासगाव इथले राजेंद्र पाटील हे आपल्या कुटुंबासह मुलीच्या कवठेमहांकाळमधील कोकळे या गावी गेले होते. वाढदिवस साजरा करून नात आणि मुलीला घेऊन पाटील कुटुंब आपल्या गावी परतत होते. तेव्हा पाटील यांची गाडी चिंचणी येथील कालव्यात कोसळली.
यामध्ये पाटील कुटुंबीयांतील सहाजणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये पाटील यांची मुलगी बचावली आहे.
चिंचणी इथल्या ताकारी सिंचन योजनेच्या कालव्यामध्ये राजेंद्र पाटील यांची अल्टो कार कोसळून हा भीषण अपघात झाला आहे.
यामध्ये राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय 60 वर्षे), सुजाता राजेंद्र पाटील (वय 55 वर्षे), त्यांची मुलगी प्रियांका अवधूत खराडे (वय 30 वर्षे), नात ध्रुवा (वय 3 वर्षे), राजवी किरण भोसले (वय 2 वर्षे), कार्तिकी (वय 1 वर्षे) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
तर स्वप्नाली किरण भोसले (वय 30 वर्षे) या गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सांगलीमध्ये एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.
तासगाव पोलिसांच्याकडून मिळालेली माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास राजेंद्र पाटील हे आपली स्वतःची चारचाकी गाडी चालवत कुटुंबासह तासगावकडे निघाले होते. ताकारी कालव्याजवळ येताच त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट 20 ते 25 फूट खाली जाऊन कोसळली. हा कालवा कोरडा होता.
यात गाडीतील राजेंद्र पाटील, त्यांची पत्नी सुजाता पाटील, मुलगी प्रियांका खराडे यासह नात आणि नातू असे सहा जण जागीच ठार झाले. मात्र, या भीषण अपघातात मुलगी स्वप्नाली ही जखमी झाली होती.
रात्रभर ती जखमी अवस्थेतच गाडीत पडून होती. गावाच्या बाहेर हा कालवा असल्याने या ठिकाणी फारशी रहदारी नसल्याने आणि अंधार असल्याने या मार्गावर अपघात झाल्याची कल्पना कोणालाच नव्हती.
दरम्यान, सकाळी काही लोक फिण्यासाठी गेले असता, त्यांना कालव्यात गाडी कोसळल्याचे निदर्शनास आलं. त्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली.
राजेंद्र पाटील यांची मुलगी स्वप्नाली भोसले हिचे सासर हे कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे आहे. स्वप्नाली यांची मुलगी राजवी हिचा मंगळवारी (28 मे) वाढदिवस होता.
त्यानिमित्ताने राजेंद्र पाटील आपल्या कुटुंबासह कोकळे या ठिकाणी गेले होते आणि नात राजवीचा वाढदिवस साजरा केला.
राजेंद्र पाटील हे तासगावमधील रहिवाशी असून ते अभियंता म्हणून काम करत होते. त्यांच्या कुटुंबातल्या सहा जणांच्या या मृत्यूच्या घटनेनंतर तासगाव शहरावर शोककळा पसरली आहे.
या अपघाताची नोंद तासगाव पोलीस ठाण्यामध्ये झाली असून तासगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन प्रक्रियेसाठी पाठवले आहेत.