You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डॉ. संग्राम पाटील यांना लंडनला परतताना अडवल्यानंतर ते काय म्हणाले? BBC सोबत केली खास मुलाखत
सोशल मीडियावरून राजकीय-सामाजिक घटनांसंदर्भात व्यक्त होणारे लंडनस्थित डॉ. संग्राम पाटील यांना पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं चौकशीसाठी बोलावलं आहे.
10 जानेवारीला डॉ. संग्राम पाटील जेव्हा लंडनमधून भारतात त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आले, तेव्हा मुंबई विमानतळावरच एका सायबर गुन्ह्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर अनेक तास चौकशी करण्यात आली. यासंदर्भातील बातमी तुम्ही इथे वाचू शकता.
त्यानंतर परवा (19 जानेवारी) लंडनला परत जात असातनाही डॉ. संग्राम पाटील यांना पुन्हा मुंबई विमानतळावर अडवण्यात आलं. डॉ. संग्राम पाटील यांच्या नावावर काढण्यात आलेलं लुकआऊट सर्क्युलर अद्याप कायम असल्यानं, त्यांना देश सोडून जाता येणार नाही, असं इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सांगितल्याचंही त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, डॉ. संग्राम पाटील यांच्यावरील कारवाईबात बीबीसी मराठीनं मुंबई पोलिसांकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप कुठलाच प्रतिसाद देण्यात आला नाहीय. मुंबई पोलिसांकडून प्रतिक्रिया मिळाल्यास इथे अपडेट करण्यात येईल.
यानंतर बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे यांनी संग्राम पाटील यांच्याशी सविस्तर बातचित केली. या मुलाखतीत डॉ. पाटील यांनी त्यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत, त्यांनी लिहिलेल्या पोस्टबाबत आणि एकंदरित या संपूर्ण घटनाक्रमावर भाष्य केलं आहे.
प्रश्न : सध्या तुम्ही मुंबईत आहात. मागील दोन दिवसांपासून तुम्हाला लंडनला जायचं आहे. पण तुम्ही जाऊ शकलेला नाहीत. मागील 15 दिवसांत नेमकं काय घडलं हे आम्हाला सांगा.
डॉ. संग्राम पाटील : मी माझ्या पत्नीसह 10 जानेवारीला मुंबई विमानतळावर आलो. मला इमिग्रेशनमध्ये सांगण्यात आलं की, माझ्याविरोधात मुंबई पोलिसांत एक केस आहे. सोशल मीडियावर मी हेट स्पीच केलं असं मला सांगण्यात आलं. त्यांनी मला मुंबई पोलीस अटक करून पुढची प्रक्रिया करतील असं सांगितलं.
आम्ही 5 तास विमानतळावरच होतो. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँच युनिट 3 ने नंतर आम्हाला लोअर परेलला नेलं. त्यांनी आम्हाला तुमची सोशल मीडिया पोस्ट आहे, तुमच्यावर भारतीय न्याय संहितेचं 353 (2) असं कलम लावण्यात आलं आहे. त्यामुळे तुमच्यावर हा गुन्हा आहे. म्हणून आम्ही तुम्हाला इथं आणलं आहे, असं स्पष्ट केलं. मुंबई पोलीस आणि इमिग्रेशनमधील वेळ असे एकूण 15 तास आम्ही मुंबईतच होतो.
जेव्हा मला त्यांनी मला पोस्ट दाखवली तेव्हा मला धक्काच बसला. अशाप्रकारच्या पोस्टवर 353 (2) चं कलम लावलं. या कलमानुसार अफवा पसरवणं, खोटी बातमी पसरवणं आणि दोन समाजांमध्ये द्वेष निर्माण करणं, ज्यामुळे वेगवेगळ्या पातळीवर त्यांच्यात शत्रुत्व निर्माण होईल, या गोष्टींचा समावेश होतो.
आणि तसं तर माझ्या पोस्टमुळे कुठलीही अफवा पसरलेली नाही. सध्याच्या चालू घडामोडींवर आधारित मी प्रश्न त्यात केलेला आहे. मी कुठल्याही दोन समाजांबद्दल बोललेलोही नाही. आणि त्या पोस्टमधून कुठले दोन समाजही निर्माण होत नाहीत. समाजाचाच प्रश्न नाहीतर कोणामध्ये द्वेष पसरेल. याचंही स्पष्टीकरण नाही.
हे आम्ही उपायुक्त, सगळे चौकशी अधिकारी, परेल 3 चे लोक सर्वांना विचारलं की या पोस्टमुळे कोणत्या दोन गटांमध्ये द्वेष निर्माण झाला आहे, हे तुम्ही आम्हाला स्पष्ट करा. यात कुठली वस्तुस्थिती खोटी आहे, ज्याच्यासाठी तुम्ही हे कलम लावलं आहे, असा प्रश्न केला. पण आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही. महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्याच दिवशी सर्व गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. माझा प्रवास कसा आहे, परतीचा प्लॅन काय आहे. हे सर्व त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं.
त्यांनी पहिल्याच दिवशी म्हणजे 10 तारखेला सांगितलं, तुमची एलओसी रिव्हर्स करण्याची प्रक्रिया आहे. त्याच्यावर सही करा. त्यांनी माझा पासपोर्ट फोटो घेतला आणि ती प्रक्रिया पूर्ण केली. तो फॉर्म त्यांनी बऱ्याचवेळेला एडिट केला. तो आम्ही आता पाठवत आहोत, असंही मला त्यांनी सांगितलं.
नंतर त्यांनी 16 तारखेला मला पुन्हा बोलावलं. 16 तारखेला मी पुन्हा परेल ब्रँचला जळगावहून आलो. त्या दिवशीही मी सर्वांना भेटून विनंती केली की, मी 19 तारखेला सकाळी लवकर प्रवास करतोय. तेव्हा मला माझ्या एलओसीवर निर्बंध आहेत, तू जाऊ शकत नाही, असं कोणीही सांगितलं नाही. मला अधिकृतरित्या कोणीच काही कळवलेलं नाही. माझा ई-मेल, फोन सर्व त्यांच्याकडे आहे.
19 ला सकाळी लवकर जेव्हा मी विमानतळावर गेलो तेव्हा मला थांबवलं गेलं. विमानतळावर तुम्ही जाऊ शकत नाही, असं सांगत मला परत पाठवलं.
आता त्यांनी मला प्रश्नोत्तरासाठी पुन्हा बोलावलेलं आहे. मी त्यांना निर्बंध हटवा म्हणून पुन्हा विनंत करणार आहे. माझा ट्रॅव्हल बॅन केला आहे, मी ब्रिटिश नागरिक आहे. माझं घर तिकडं आहे, मुलं तिकडे आहेत, माझ्या एम्प्लॉयरने तिथलं काम बुडतंय, पेशंटचं नुकसान होतंय, मी कधी जॉइन होतोय, असं विचारलं आहे. इथे मी चौकशीसाठी पूर्ण सहकार्यही केलं आहे.
फेसबुकवरची पोस्ट मीच टाकली आहे, हेही मी मान्यही केलं आहे. त्यात आता चौकशीचं फार काही उरलेलं नाही. तरी मी एकूण 20 ते 21 तास त्यांच्या चौकशीसाठी दिले आहेत. आज पुन्हा त्यांच्याकडे जाणार आहे. त्यांना पुन्हा विनंती करणार आहे की, प्रवासावरील बंदी काढा म्हणजे मला लवकरात लवकर परत जाता येईल. माझी मुलं तिकडे तणावात आहेत. माझी पत्नी माझ्यासोबतच आहे. तिचंही काम बुडत आहे. आणि एम्प्लॉयर आम्हाला तुमची लिव्ह संपलीय परत कधी येताय असं विचारत आहेत.
मी आता विचित्र परिस्थितीत आलोय. एक साधी फेसबुक पोस्ट ज्यात सरकार समर्थकांना काही प्रश्न विचारलेत. पण माध्यमांमध्ये सांगितलं जातंय की, आम्ही सरकारमधील नेत्यांना, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची मानहानी केलीय.
त्या पोस्टमध्ये कुठल्याही नेत्याची मानहानी केलेली नाही. त्यांना तेही विचारलं. पण कोणी स्पष्टीकरण द्यायला तयार नाही. त्यामुळे मला आता येथून बाहेर निघण्यासाठी विनंती करणार आहे.
प्रश्न : मला यावर विचारायचं आहे की, तुम्ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असता. आणि अत्यंत स्पष्टपणे तुम्ही तुमच्या भूमिका मांडत आला आहात. तुम्हाला असं वाटतंय का, की स्पष्टपणे भूमिका मांडणं अडचणीचं ठरतंय म्हणून आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडताहेत.
डॉ. संग्राम पाटील : मला थोडा तोच प्रकार वाटतो आहे. हे भाजपच्या आयटी सेलच्या एका कर्मचाऱ्याने ती तक्रार केलेली आहे. या तक्रारीत दुसऱ्या एका प्लॅटफॉर्मवरची पोस्ट घेतली आहे त्यांनी. कुठली तरी शहर विकास आघाडी, ज्याचा माझा काहीही संबंध नाही.
सोशल मीडियावर त्यांच्या पोस्ट कधीतरी पाहिल्या असतील-नसतील, मला आठवत देखील नाही. जी पोस्ट आहे ती एफआयआरमध्ये मुख्य तक्रार आहे. त्याला जोडून त्यांनी माझी पण पोस्ट दिलेली आहे.
मला टार्गेट करण्यासाठी मला एका मोठ्या प्रकरणाशी क्लब केलेलं आहे आणि माझ्यावर एफआयआर केलेलं आहे, असं मला दिसतंय. शहर विकास आघाडीची जी पोस्ट होती, ती मात्र डिलीट झाली आहे. ती उपलब्ध देखील नाहीय. आणि मला मात्र विमानतळावर एलओसी लावून आक्रमक कारवाई केली आहे.
सोशल मीडियासाठी मला कुठली नोटीस दिलेली नाही, माझी प्राथमिक चौकशी केलेली नाही. माझ्याशी संपर्क साधण्यात आला नाही. माझे सर्व संपर्क भारतीय व्यवस्थेत आहेत. काही न करता मोठी अशी आक्रमक कारवाई करायची, विमानतळावर ताब्यात घ्यायचं, आणि जाण्यासाठी मला अडचण निर्माण करायची. मी पुन्हा प्रश्न विचारू नये, सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करू नये, यासाठी हे आहे का?
प्रश्न : या सगळ्या गोष्टींकडे कायदेशीर बाजूने तुम्ही कसं पाहता?
डॉ. संग्राम पाटील : मुळातच हा जो प्रकार झालेला आहे. तो माझ्या पोस्टला लागूच होत नाही. हेच बेकायदा आहे. त्यामुळे मग त्याच्यातून ज्या प्रक्रिया चालल्यात या देखील तशाच आहेत. इतका वेळ एक सोशल मीडिया पोस्टसाठी आणि तेही मी आधीच मान्य केलं आहे. मी त्यांना परत येण्याची ग्वाहीही दिलीय.
न्यायालयात बोलवल्यास त्यावेळीही येईन. माझे सर्व नातेवाईक इकडे आहेत. मी वर्षाला तीन ते चार वेळेला भारतात येत असतो. मी सगळी ग्वाही दिली आहे. तरी माझ्यावर निर्बंध लावणे, हे मला तेवढं संयुक्तिक वाटत नाही.
आणि खरं म्हणजे एफआयआरच्या कलमातच माझी पोस्ट बसत नाही. हाच मुळात मुद्दा आहे. म्हणजे तो एफआयआरच मला मुळात मान्य नाही.
प्रश्न : तुम्ही ब्रिटिश नागरिक आहात तर, तुम्हाला याबाबत ब्रिटिश सरकारकडून काही पाठिंबा मिळतोय का? त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आहेत?
डॉ. संग्राम पाटील : मला ब्रिटिश सरकारकडून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. मी त्यांचे खूप धन्यवाद देतो. ब्रिटिश हायकमिशन मुंबईचे अधिकारी दररोज माझ्याशी बोलत आहेत. मला ई-मेल किंवा फोन करून विचारणा करतात. पोलीस अधिकाऱ्यांना देखील ते फोन करून विचारत आहेत, प्रक्रिया जाणून घेत आहेत.
माझे ब्रिटनमधील स्थानिक खासदारही ब्रिटिश परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात आहेत. कारण मी त्यांना देखील ई-मेल लिहिला होता. माझ्यावर बेकायदा पद्धतीने एफआयआर करण्यात आलेला आहे, त्याबद्दल तुम्ही हस्तक्षेप करा अशी विनंती मी त्यांना केली होती. त्याप्रमाणे त्यांनी देखील यात लक्ष घातलेलं आहे.
माझा छळ केला जात आहे. मला घरी जाण्यापासून रोखलं जातंय, आणि मोठमोठ्या तासन्तासाच्या चौकशा लावल्या जात आहेत तेही एका फेसबुक पोस्टसाठी. ती पोस्ट मी केलीय हे मी मान्यही केलं आहे. तरीही मला वेगवेगळ्या कारणांनी थांबवलं गेलं आहे. हे बेकायदा आहे आणि माझा छळ केला जात आहे. हा ठरवून केलेला छळ आहे.
प्रश्न : तुम्ही भारतात असल्यासून राजकीय, सामाजिक कार्यात सक्रिय राहिलेले आहात. तुमचा ग्रामीण भागामध्ये टच आहे, तिथे गेल्यानंतरही भारतातील गोष्टींबद्दल सजग असणे, भाष्य करणे हे तुम्ही चालू ठेवलेलं आहे. या सगळ्या गोष्टींवर तुम्ही सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. तर तुम्हाला हे का करावसं वाटतं?
डॉ. संग्राम पाटील : कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त जरी मी भारतातून बाहेर गेलो असलो तरीही मी मूळ जळगावचाच आहे. माझे वडील आजही शेती करतात. ही माझी नाळ कशी सुटणार. भारत माझा देश आहे, जनगण म्हणत, वंदे मातरम म्हणत मोठा झालो आहे. तर हे सुटणार नाही.
तिथे जरी मी काही कारणास्तव गेलो आणि तांत्रिक कारणांसाठी ब्रिटिश नागरिकत्व घ्यावं लागलं आहे. कारण इकडे-तिकडे प्रवास करणं, कुठे काही अडचणी येतात, त्यामुळे तसं केलं आहे. पण हे देखील मी अनिच्छेने केलेलं आहे. भारतीय नागरिकत्व सोडून असं काही करायची माझी अजिबात इच्छा नव्हती. माझ्या इतर कारणांसाठी ते मी केलं. पण ही नाळ सुटत नाही आणि ती सुटणारही नाही. माझ्यावर कारवाया जरी झाल्या तरी मी देशाविषयी, देशाच्या लोकशाहीविषयी बोलणं थांबवणार नाही. ते चालूच ठेवेल.
प्रश्न : या सर्व गोष्टींचा तुमच्या कुटुंबावर काय परिणाम होतोय. त्यांची काय प्रतिक्रिया आहे?
डॉ. संग्राम पाटील : सर्वांना ताण येणार हे साहजिकच आहे. त्यांना काळजी वाटते, त्यांना वाटतं की, बाबा तू तिकडेच सुखाने जा. एरवी आई-बाबांना वाटतं की मुलांनी यावं भेटायला. आता त्यांना असं वाटतंय की सुखाने जा. उलटी प्रक्रिया झाली आहे. ही देखील एक भावनिक गोष्ट आहे. इथं सुरक्षा नाही, तू तिकडं सुरक्षित राहा, असं त्यांना वाटतं.
माझी मुलं चिंतेत आहेत. पत्नी माझ्यासोबत आहे. आम्ही मनाने ठाम आहोत. हे चुकीचं चाललंय, आणि का चाललंय तेही आम्हाला कळतंय. माझा आवाज दाबण्यासाठी हा छळ चालला आहे, हेही कळतंय.
त्यामुळे आम्ही ते स्वीकारलं आहे, आणि आम्ही त्यासाठी तयार आहोत. मी आणि माझी पत्नी ठीक आहोत. बाकीच्यांना चिंता असणं हे नैसर्गिकच आहे.
प्रश्न : याचा काही परिणाम तुमच्या सोशल मीडियावर, लिहिण्यावर होईल, असं वाटतंय का?
डॉ. संग्राम पाटील : सोशल मीडियावर काही परिणाम होणार नाही. आहे त्याच पद्धतीने कुठलंही असंसदीय, असभ्य सोशल मीडियावर लिहित नाही. त्यामुळे मी ते लिहित राहणार. आता सध्या मला बरं नव्हतं. त्याचबरोबर मी व्यस्तही आहे, त्यामुळे मी सध्या फारसं लिहित, बोलत नाही. यातून बाहेर पडल्यावर मी पुन्हा चालू करेन. मी जे सामाजिक, सांस्कृतिक आणि काही राजकीय विषय मांडत होतो, ते मी मांडतच राहीन, या घटननंतर मी राजकारणावर जास्त बोलेन किंवा कमी बोलेन असं काही नाही. मी यापुढेही रास्तच भूमिका घेईन.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)