जळगावमध्ये भीषण ट्रक अपघातात, 16 जणांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात 16 मजुरांचा मृत्यू झाला आहे. किनगावजवळ हा अपघात झालाय. पपई वाहून नेणारा ट्रक उलटल्याने हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी सांगितलं जात आहे.

या ट्रकमधून मजूरही प्रवास करत होते. एकूण 21 मजूर होते. यापैकी 16 मजुरांचा मृत्यू झाला असून इतर गंभीर जखमी आहेत. पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी याप्रकरणी माहिती दिली आहे.

ते म्हणाले, "किनगावजवळ पपईने भरलेला ट्रक उलटला आणि ट्रकमध्ये बसलेल्या मजुरांचा मृत्यू झाला आहे. यात सहा महिला, सात पुरुष आणि दोन लहान मुलं आहेत. यावल-बऱ्हाणपूर राज्यमार्गावरून हा पपईचा ट्रक जात होता. रात्री 1 वाजता रस्त्याच्याकडेला ट्रक उलटला."

प्राथमिक माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील नेर इथून एक ट्रक पपई भरून रावेरच्या दिशेने येत होता. यावल तालुक्‍यातील किनगावजवळील मनूदेवी मंदिराच्या परिसरात हा ट्रक अचानक उलटला.

स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. अपघातात मृत्यू झालेले मजूर रावेर तालुक्यातील आभोडा, केऱ्हाळा तसंच रावेर शहरातील आहेत.

या अपघातात आभोडा येथील 12 , केऱ्हाळामधील 2 आणि रावेरमधील 2 असे 16 जण मृत्यूमुखी पडले आहेत तर 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)