चंद्रावरच्या जागांना नाव कसं दिलं जातं? ‘शिवशक्ती’ आणि ‘तिरंगा पॉईंट’ ही नावं IAU स्वीकारेल?

फोटो स्रोत, NASA
- Author, संकेत सबनीस
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
चंद्रयान-3 मोहिमेअंतर्गत इस्रोने पाठवलेलं लँडर आणि रोव्हर आता चंद्राच्या भूमीवर यशस्वीरित्या उतरले असून त्यांनी संशोधनालाही सुरुवात केलीय.
हे लँडर उतरलेल्या ठिकाणाला ‘शिवशक्ती’ तर, चंद्रयान – 2चं लँडर चंद्रावर कोसळलेल्या ठिकाणाला ‘तिरंगा पॉईंट’ अशी नावं दिल्याची बंगळुरूमध्ये 26 ऑगस्टला घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलीय.
मात्र, यावरून देशात नव्या वादाला तोंड फुटलंय. विरोधकांनी या नावांनाच थेट आक्षेप घेतलाय. इस्रोच्या वैज्ञानिक मोहिमेवरून राजकारण होऊ नये असं विरोधकांचं म्हणणं आहे. तर, चंद्रयान – 1 मोहिमेतला मून इम्पॅक्ट प्रोब कोसळल्याच्या जागेला ‘जवाहर पॉईंट’ नाव देण्याची मागणी तत्कालिन काँग्रेस सरकारने केल्याचा दाखला भाजपने दिलाय.
चंद्राच्या पृष्ठभागांना विशिष्ठ नावं देण्याच्या या वादावरून काही प्रश्न उपस्थित होतायत. तो म्हणजे चंद्रावरच्या जागेला नावं कशी दिली जातात? या नावांवर कोण शिक्कामोर्तब करतं? धार्मिक, राजकीय नावं चंद्रावरच्या जागेला देता येतात का? आपण या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.
ग्रहांवरील नावांना मान्यता कोण देतं?
चंद्रावर 1969 पासून मानवी आणि मानवरहित मोहिमा झाल्या आहेत. तेव्हापासूनच या मोहिमांमधलं यान, प्रोब, लँडर उतरण्याच्या ठिकाणांना आणि आजूबाजूच्या भौगोलिक प्रदेशांना (डोंगर, दऱ्या, विवर इ.) नावं देण्याची प्रथा सुरू झाली. मात्र, या नावांना मान्यता आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटना (International Astronomical Union) म्हणजेच IAU देते.
यात चंद्रासह सूर्यमालेतील इतर ग्रहांचाही समावेश आहे. ग्रहांवरील ठिकाणांना अधिकृत नावे देण्याचे काम आयएयूचा ‘वर्किंग ग्रुप ऑफ प्लॅनेटरी सिस्टीम नॉमेनक्लेचर’ हा विभाग करतो. या विभागाने जारी केलेल्या ठिकाणांच्या यादीमध्ये 2021 पर्यंतच्या 85 नावांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, USGS/IAU
या संस्थेकडे अंतराळ मोहीम आखणाऱ्या देशाने अर्ज करावा लागतो. त्यांचा अर्ज ही संस्था त्यांचे नियम आणि मोहिमेची वस्तुस्थिती पाहून मंजुरी देते.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर इस्रोचं लँडर आणि रोव्हर उतरलंय. या दक्षिण ध्रुवावरच्या अनेक भौगोलिक पृष्ठभागांना (डोंगर, विवर इ.) यापूर्वीच नावं देण्यात आली आहेत.
IAU ने जर शिवशक्ती, तिरंगा पॉईंट या नावांना मंजुरी दिली तरच ती अधिकृत नावं म्हणून गृहित धरली जातील.
ग्रहांवरील जागांना नावं देण्याचे नियम काय?
चंद्र तसेच सूर्यमालेतील ग्रहांवरील भूरचनांना नावं देण्यासाठी ‘IAU’ने नियमावली प्रसिद्ध केली आहे.
IAU च्या ‘गॅझेटीअर ऑफ प्लॅनेटरी नॉमनक्लेचर’ या वेबसाईटवर याबद्दलचे 14 नियम दिले आहेत. त्यांपैकी 7 प्रमुख नियमांची आपण थोडक्यात माहिती घेऊयात.
- नावं लहान आणि सोपी असावीत.
- नावं देण्यासाठी अधिकृत संस्थेनं अर्ज करावा.
- या नावांमधून वैज्ञानिक, सांस्कृतिक अर्थाचा बोध व्हावा.
- या नावांमध्ये राजकीय, लष्करी आणि धार्मिक संकल्पना नसाव्यात. एकोणिसाव्या शतकानंतरच्या कोणत्याही राजकीय व्यक्तीचं नाव देता येणार नाही.
- ग्रहांवरच्या भौगोलिक वैशिष्ट्यांसाठी नावं देताना त्या वैशिष्ट्यांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रकारांनुसार दिली जावीत.
- ग्रहांना व्यक्तींचं नाव देण्यामागे स्वतःचं असं वेगळं ध्येय असू नये. सर्वोच्च ख्यातीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्तींच्या नावाचा सकारात्मक विचार केला जाईल. अशा व्यक्तींचा प्रस्ताव सादर होण्यापूर्वी त्यांचा किमान तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला असावा.
- नावाच्या इंग्रजी शब्दांमधलं व्याकरण, रचना यांच्यात गल्लत असू नये. तसंच त्यांच्या अर्थांचं भाषांतर प्रत्येक भाषेत उपलब्ध करून द्यावं.
नावं दिसतात कुठे?
या नावांचा उल्लेख चंद्रावरच्या एका नकाशामध्ये येतो. हा नकाशा IAU च्या प्लॅनेटरी नेम्स या वेबसाईटवर पाहायला मिळतो. इथे चंद्राचा दूरवरचा भाग, जवळचा भाग, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव असे चार वेगवेगळे नकाशे आहेत. यावर चंद्राच्या वेगवेगळ्या भागांना दिलेली नावं दिसतात.
तसंच, या नावांची यादी, ती कुणी आणि का दिली? याची माहिती गॅझेटीअर ऑफ प्लॅनेटरी नॉमेनक्लेचरच्या वेबाईटवर पाहता येईल. यात प्रत्येक नाव आणि त्याबद्दलची सगळी माहिती उपलब्ध आहे.
चंद्रावर लँडिंगचे ठिकाण म्हणजे ‘स्टेशिओ’
महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रात यासंदर्भात आलेल्या बातमीनुसार, चंद्रावर यानाचे लँडिंग झालेली ठिकाणे ‘स्टेशिओ’ म्हणून नमूद करण्यात आली आहेत. हा शब्द लॅटिन असून याचा अर्थ ठिकाण अशा अर्थाने होतो. त्यामुळे अमेरिकेच्या अपोलो-11 मोहिमेच्या लँडिंगचे ठिकाण स्टेशिओ ट्रँक्विलिटायटिस (1973मध्ये मान्यता मिळाली) नावाने ओळखलं जातं.

फोटो स्रोत, USGS/IAU
चीनच्या स्टेशिओ तियानहे (2019मध्ये मान्यता मिळाली) नावाने ओळखलं जातं. तर, स्टेशिओ तियानशुआन (2021मध्ये मान्यता) या यानांच्या लँडिंगच्या ठिकाणांचा समावेश आहे.
‘अपोलो 13’ मोहीम वगळता ‘अपोलो 11’ ते ‘अपोलो 17’ या मोहिमांमध्ये अंतराळवीरांकडून चंद्राच्या ज्या भागावर त्यांचे यान उतरले होते त्या भागांचा समावेश IAU च्या यादीत करण्यात आला आहे.
‘शिवशक्ती’ आणि ‘तिरंगा पॉईंट’वरून वाद का?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रशीद अल्वी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चंद्राच्या पृष्ठभागाला शिवशक्ती किंवा तिरंगा पॉईंट हे नाव देण्याचा अधिकार नाही. यामुळे संपूर्ण जग हसेल. चंद्रावर एका बिंदूचे नाव ठेवण्याचा अधिकार पंतप्रधान मोदींना कोणी दिला? चंद्रावर सुरक्षित लँडिंग झाले, ही चांगली गोष्ट आहे. परंतु हे चंद्र किंवा त्या जागेचे मालक नाहीत.”

फोटो स्रोत, ANI
अल्वी यांच्या विधानाला भाजपने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं की, “काँग्रेस केवळ आपलं हिंदुविरोधी चरित्र उघड करत आहे. प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हाच पक्ष आहे. राम मंदिराला विरोध करतो आणि हिंदूंना शिव्या देतो. 'शिवशक्ती पॉइंट' आणि 'तिरंगा पॉइंट' ही दोन्ही नावे देशाशी जोडलेली आहेत. चंद्रयान-1 मोहिमेत चंद्रावर आदळलेल्या इम्पॅक्ट प्रोबच्या जागेला काँग्रेसनेच जवाहर पॉईंट नाव देण्याची मागणी केली होती.”
दरम्यान, या वादावर बोलताना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी त्यांचं मत माध्यमांकडे मांडलं. ते यावर बोलताना म्हणाले की, “पंतप्रधान मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्याकडे विशेषाधिकार आहेत. त्यामुळे ते असं नाव ठेवू शकतात. पंतप्रधानांनी याचा अर्थ जेव्हा आम्हाला सांगितला तेव्हा तो कसा उपयोगी ठरेल हे देखील आम्हाला स्पष्ट केलं. यात काहीच चूक असल्याचं आम्हाला वाटत नाही.”
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








