शिर्डीच्या 'बॉम्बे ब्लड ग्रुप'च्या व्यक्तीने इंदूर गाठून रक्तदान करत वाचवला महिलेचा जीव

रवींद्र आष्टेकर

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन, रवींद्र आष्टेकर
    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

'बाँबे' रक्तगट हा एक दुर्मिळ रक्तगट आहे. भारतात दर 10 हजार लोकांमागे एकाचा बाँबे रक्तगट आहे.

गेल्या आठवड्यात बाँम्बे ब्लड या रक्तगटाची गरज इंदूरच्या एका महिलेला लागली. तिच्यावर एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

तिच्या जीवन-मरणाची प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा रवींद्र आष्टेकर यांनी शिर्डी ते इंदूर असा तब्बल 440 किलोमीटरचा प्रवास केला. त्यांनी चार युनिट रक्तदान केलं आणि पवनबाई यांचा जीव वाचवला.

रवींद्र आष्टेकर हे शिर्डीत फुलांचा व्यवसाय करतात. त्यांना व्हॉट्सअपवर बाँम्बे ब्लड ग्रुपची निनांत गरज असल्याचं कळलं. तेव्हा त्यांनी मित्राच्या कारने इंदूरला जायचं ठरवलं.

"मला व्हॉट्सॲपवर या महिलेच्या गंभीर स्थितीबद्दल कळलं, तेव्हा मी एका मित्राच्या कारने इंदूरला 440 किलोमीटरचा प्रवास करून पोहोचलो. माझ्या रक्तदानामुळे त्या महिलेचा जीव वाचला यात मी समाधानी आहे,” असे आष्टेकर यांनी मंगळवारी (28 मे) पीटीआयला सांगितलं.

25 मे रोजी आष्टेकर यांनी इंदूरमध्ये जाऊन रक्तदान केल्यावर महिलची तब्येत सुधारली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

ते म्हणाले की, पवनबाई यांना वेळेवर दुर्मिळ रक्तगट मिळाला नसता, तर त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असता.

यातली गंभीर गोष्ट म्हणजे पवनबाई यांना याआधी चुकीच्या रक्तगटाचे रक्त चढवले होते. त्यामुळे त्यांची तब्येत ढासळू लागली होती. रक्तातील हिमोग्लोबिनही कमी झालं होतं. पण आष्टेकर यांच्यामुळे त्यांना जीवनदान मिळाल्याचं म्हटलं जात आहे.

त्यांनी याआधीही गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांत जाऊन गरजू रुग्णांना एकूण आठवेळा बाँम्बे रक्तगटाचे युनिट दिले आहेत.

बाँबे रक्तगट काय आहे?

बाँबे रक्तगट हा सामान्य चाचणीने ओळखता येत नाही.

हा दुर्मिळ असल्याने तो अधिक काळ सुरक्षित ठेवावा लागतो. या गटाचं रक्त अत्यंत कमी तापमानात ठेवावं लागतं.

1952 साली बाँबे रक्तगटाचा मुंबईमध्ये शोध लागला. या रक्तगटाचे सर्वाधिक लोक मुंबईत असल्याचं म्हटलं जातं.

'बाँबे' रक्तगटामध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असे प्रकार असतात.

याबाबत बीबीसी हिंदीशी याआधी माहिती देताना संकल्प इंडिया फाऊंडेशनच्या कुमारी अंकिता सांगतात, "हा रक्तगट मिळणे खूप अवघड आहे. भारतात 10 हजार लोकांपैकी एक व्यक्ती या रक्तगटाचा आढळतो. दुसरं कारण म्हणजे या गटातील लोक शोधण्यात अडचण अशी आहे की, सामान्य रक्तगट चाचणीतही हा रक्तगट आढळत नाही.

प्रातिनिधिक

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक

हा 'O' रक्तगटाशी संबंधित असल्यामुळे तो अनेकदा O पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह मानला जातो.

अशा परिस्थितीत आपण बाँबे रक्तगटाचे आहोत हेच अनेकांना कळत नाही. जेव्हा O रक्तगट रुग्णाच्या रक्ताशी जुळत नाही तेव्हाच हा रक्तगट वेगळा असल्याचं त्यांचा लक्षात येतं, असं अंकिता सांगतात.

पण या अडचणीवर मात करण्यासाठी मुंबईतील संकल्प इंडिया फाऊंडेशन काम करत आहे.

याविषयी अंकिता सांगतात, "आमच्याकडे एक नेटवर्क आहे ज्यामध्ये रक्तदाते आणि रक्तपेढ्या जोडल्या गेल्या आहेत. सुमारे बाँबे रक्तटाटे एकूण 250 देणगीदार आमच्याशी संबंधित आहेत, जे स्वयंसेवकांसारखे आहेत. जेव्हा रक्तपेढीतून रक्त उपलब्ध होत नाही तेव्हा आम्ही रक्तदात्यांची मदत घेतो. त्यानंतर रक्तदाता फाउंडेशन सेंटरमध्ये येतो आणि रक्त देतो. तिथून रुग्णाचे नातेवाईक रक्त घेतात."

बाँबे रक्तगट इतरांपेक्षा वेगळा कसा?

बाँबे रक्तगट इतर रक्तगटांपेक्षा वेगळा असण्याची काही खास कारणे आहेत. याचा तपास करण्यासाठी नेहमीपेक्षा वेगळी पद्धत अवलंबावी लागते.

याबाबत बीबीसी हिंदीशी बोलताना दिल्लीतील गंगाराम हॉस्पिटलमधील ब्लड बँक इनचार्ज डॉ. विवेक रंजन सांगतात, "आपल्या रक्तातील लाल रक्तपेशींमध्ये काही रेणू असतात, जे एखाद्या व्यक्तीचा रक्तगट कोणता असेल हे ठरवतात. या रेणूंमधूनच कॅपिटल एच प्रतिजन (H antigen) तयार होतो. त्यापासून उर्वरित प्रतिजन A आणि B तयार होतात. अशाप्रकारे सर्व रक्तगट ओळखले जातात"

प्रातिनिधिक

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक

पण बाँबे रक्तगटाच्या लोकांमध्ये साखरेचे रेणू तयार होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कॅपिटल एच प्रतिजन नसते आणि ते कोणत्याही रक्तगटात येत नाहीत.

असं असलं तरी या रक्तगटाच्या लोकांचे आयुष्य अगदी सामान्य असते. त्यांना कोणतीही शारीरिक समस्या यामुळे निर्माण होत नाही.

बाँबे रक्तगट O रक्तगटाशी कसा संबंधित आहे याविषयी, दिल्लीतील डॉ. अभिनव कुमार सांगतात की, "बाँबे रक्तगट असलेल्या लोकांमध्ये A, B, H प्रतिजन (antigen) नसतात. त्यामुळे चाचणीतही A,B,AB रक्तगट समोर येत नाही. या मर्यादेमुळे हा O गट असल्याचं अनेकांना वाटू शकतं. पण, रक्तगटाची चाचणी सविस्तर केल्यास या रक्तगटाची ओळख होऊ शकते.

ग्राफिक्स

बाँबे रक्तगट दीर्घकाळ जतन करता येतो?

बाँबे रक्तगट दुर्मिळ असल्यामुळे तो दीर्घकाळ जतन करता येईल का?

यावर डॉ.अभिनव यांनी सांगितले की, क्रायोप्रिझर्वेशन नावाचे एक तंत्र आहे ज्यामध्ये रक्त एक वर्षासाठी सुरक्षित ठेवता येते. यामध्ये रक्त अत्यंत कमी तापमानात ठेवले जाते. पण, भारतात त्याचा वापर फारच कमी होतो.

'बॉम्बे' नाव कसे पडले?

सर्व रक्तगटांना इंग्रजी वर्णमाला A, B आणि O वरून नावे देण्यात आली आहेत. परंतु या रक्तगटाचे नाव शहराच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.

यामागील कारण म्हणजे त्याचा प्रथम शोध मुंबईमध्ये (तेव्हाचं बाँबे) लागला. डॉ. वाय.एम. भेंडे यांनी 1952 साली या रक्तगटाचा शोध लावला आहे.

प्रातिनिधिक

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक

आताही या गटातील बहुतांश लोक फक्त मुंबईतच आढळतात. याचे कारण असे की ते अनुवांशिक असते आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. मात्र, बदलीमुळे आता बाँबे रक्तगटाचे लोक देशभरात आणि इतर देशातही आढळून येत आहेत.

साधारणपणे, जेव्हा रक्ताची गरज असते तेव्हा इतर देशांशी संपर्क साधण्याची गरज नसते. रक्तपेढीत किंवा जवळपासच्या ठिकाणी कोणीही रक्तदाते आढळू शकतात. पण, बाँबे रक्तगटाच्या बाबतीत याउलट आहे. एकदा म्यानमारमध्ये आजारी असलेल्या एका रुग्णासाठी भारतातून बाँबे रक्तगटाचे युनिट पाठवले होते.