पुरुष असताना केलेल्या बलात्कारात ट्रान्सवूमन दोषी, 'मी नाही-नाही म्हणत होते पण....'

आयला ब्रायसन

न्यायालयात ज्युरींसमोर सुरू असलेल्या खटल्यात बलात्कार पीडितेचा जबाब व्हीडिओद्वारे चालवण्यात आला. त्यात ती सांगत होती, त्याने माझ्यावर जबरदस्ती केली. आपल्यासोबत काय घडलंय हे सांगत असताना आरोपी कसा होता याचं वर्णन पीडितेने 'मस्क्युलर' असं केलं होतं.

त्याच्या देहयष्टीसमोर आपल्याला प्रतिकारच करता आला नाही, 'त्याला मी सातत्याने नाही-नाही म्हणत होते, पण त्याने माझं काही एक ऐकलं नाही आणि अॅडमने माझ्यावर जबरदस्ती केली.'

या घटनेच्या तीन वर्षांनंतर, म्हणजेच 2019 ला दुसरी एक घटना घडली. त्यात याच अॅडमने एका 34 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. बिगो नावाच्या सोशल मीडिया अॅपवर दोघांची ओळख झाली होती, असं बीबीसी न्यूज स्कॉटलंडने सांगितले.

दोघे मिळून फ्लॅटमध्ये चित्रपट पाहणार होते, त्याच रात्री ही घटना घडल्याची नोंद कोर्टाने जबाबावेळी घेतली. संशयिताने मला पूर्णपणे चिरडून टाकत जबरदस्ती केली असं त्या पीडितेनी जबाबात सांगितलं.

मी त्याला सांगत होते की थांब-थांब. पण तो थांबला नाही. त्याची कृती सुरूच होती. त्या वेळी मी माझे डोळे बंद केले आणि त्याला जे करायचं आहे ते करू दिलं.

या दोन्ही घटनेतील संशयित न्यायालयात हजर होता तेव्हा अनेकांना त्यावर विश्वासच बसला नसेल. कारण ज्या पद्धतीचं वर्णन त्या संशयिताचे होते त्यानुसार तो एक धिप्पाड पुरुष होता आणि पण न्यायालयात हजर असलेली संशयित एक ट्रान्सवूमन होती.

त्या ट्रान्स वूमनचे नाव आयला ब्रायसन. लिंग परिवर्तन करून आयला ब्रायसन होण्यापूर्वी त्या व्यक्तीची ओळख ही अॅडम ग्राहम अशी होती. अॅडम हा पुरुष होता लिंग परिवर्तन केले आणि ट्रान्सवूमन झाला. पण जेव्हा तो पुरुष होता तेव्हा त्याने दोन महिलांवर बलात्कार केला होता.

हे प्रकरण न्यायालयात गेलं. ज्यावेळी न्यायालयात हे प्रकरण आलं त्यावेळी अॅडमचं परिवर्तन आयला ब्रायसनमध्ये झालं होतं. गुन्हा अॅडमने केला होता पण सुनावणीच्या वेळी आयला ब्रायसन होती.

त्यामुळे गुन्हा करणारा पुरुष तर ज्या व्यक्तीला बलात्काराची शिक्षा सुनावली जाणार ती व्यक्ती ट्रान्सवूमन अशी परिस्थिती निर्माण झाली.

ज्युरींनी सर्वांचं म्हणणं ऐकलं. यात आढळलं की अॅडमने दोन महिलांवर बलात्कार केले आहेत. त्यामुळे अॅडम शिक्षेस पात्र आहे. पण आता अॅडम ही ओळख कुणाचीही राहिलेली नसून ती व्यक्ती आयला ब्रायसन आहे.

तेव्हा आता ब्रायसनच शिक्षेस पात्र आहे. त्यानुसार ब्रायसनला शिक्षा सुनावली गेली. पण आता एक नवा पेच समोर आला. तो म्हणजे आयला ब्रायसनला कोणत्या तुरुंगात पाठवायचे. महिलांच्या की पुरुषांच्या.

हे नेमकं प्रकरण काय आहे आणि शेवटी हा पेचप्रसंग कसा सुटला ते आपण या लेखातून पाहू.

बलात्कार कधी झाले?

16 सप्टेंबर 2016 रोजी आरोपीने दरवाजा लावून घेतला आणि तो पीडितेच्या बाजूला येऊन झोपला आणि त्याने बलात्कार केला. पहिला बलात्कार स्कॉटलॅंडमधील क्लायडबॅंक येथे झाला.

27 जून 2019 रोजी दुसरा बलात्कार झाला. अॅडमची आणि पीडितेची ओळख बिगो नावाच्या सोशल मीडिया अॅपवरून झाली होती. दुसरा बलात्कार ग्लासगो येथे झाला.

आयला ब्रायसनने हे दोन्ही आरोप फेटाळले होते. दोन्हीवेळा सहमतीने संबंध झाल्याची भूमिका आयला ब्रायसनने घेतली.

मी हे एखाद्या महिलेसोबत कधीच हे करणार नाही. माझ्या लैंगिक समस्यांबाबतची कल्पना मी आधीच पीडितेला दिली होती.

मी असं कधीच करणार नाही. एखाद्या महिलेला इजा होईल असं मी कधीच वागणार नाही, असं ब्रायसनने आपल्यावरील आरोप फेटाळताना म्हटलं होतं.

अॅडम ग्राहम
फोटो कॅप्शन, अॅडम ग्राहम
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दोन्ही बलात्कार केल्यानंतर अॅडमने लिंग परिवर्तनाची प्रक्रिया सुरू केली. निकालापूर्वी प्रक्रिया पूर्ण झालेली होती.

2016 मध्ये पाहिला बलात्कार झाल्यावर पीडितेनी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता पण सुनावणीपर्यंत त्या गोष्टीचा पाठपुरावा झाला नाही, अशी नोंद न्यायालयाने घेतली.

शिक्षा सुनावताना न्यायाधिशांनी म्हटले होते की 'तुझ्यावर दोन अतिशय गंभीर आरोप आहेत. ते सिद्ध झाले आहेत. त्याचा विचार करता दीर्घकालीन तुरुंगवास होणं निश्चित आहे.'

याआधीची सुनावणी मध्येच सोडून देण्यात आली होती. ब्रायसन जेव्हा न्यायालयात पोहोचली तेव्हा तिचे फोटो घेण्यात आले. तेव्हा ब्रायसनने म्हटलं की माझे फोटो काढल्यामुळे मला अस्वस्थ वाटलं, त्यामुळे ही सुनावणी अर्ध्यातूनच थांबली होती.

अॅडमचे लग्न देखील झाले होते. त्याची विभक्त झालेली पत्नी शोना ग्राहमने तिच्या या केसबाबत काय भावना आहेत हे डेली मेलला सांगितले होते.

बीबीसी न्यूज स्कॉटलंडने ने या मुलाखतीच्या आधारे सांगितले, "मी फक्त त्याला एक पुरुष म्हणूनच ओळखते. त्याने कोर्टाला फसवण्यासाठीच लिंग परिवर्तन केल्याचं तिने म्हटलं होतं. तिने स्पष्ट केलं होतं की ती इतर ट्रान्सवूमनबद्दल संवेदनशील आहे. पण जेव्हा मी अॅडमला गुलाबी विग आणि लेगिंग्समध्ये पाहिले तेव्हा मला मात्र हसू आलं."

तिने म्हटलं होतं की अॅडमने तिला असं कधीच सांगितलं नाही की त्याला लिंग परिवर्तन करावे वाटते किंवा तशा भावना आहेत. किंवा माझं मन एखाद्या चुकीच्या शरीरात आहे असं देखील तो कधी म्हटला नव्हता असं तिने सांगितलं.

सुनावणी दरम्यान ब्रायसनने सांगितले होते की चौथ्या वर्षापासूनच आपण ट्रान्सजेंडर असल्याची भावना मनात येत होती पण 29 वर्षाचा होईपर्यंत आपण ही प्रक्रिया सुरू केली नाही.

ब्रायसनने कोर्टाला सांगितले की 2016 मध्ये मी माझ्या लैंगिकतेबाबत संघर्ष करत होते आणि भावनिक समस्यांना देखील सामोरं जात होते.

ब्रायसनला कुणाच्या तुरुंगात पाठवायचं, पुरुषांच्या की महिलांच्या?

आयला ब्रायसनला स्टर्लिंग येथील कॉर्नटन वेल महिला तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. नंतर यावर भरपूर चर्चा झाली.

ब्रायसनला आधी महिलांच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. नंतर ब्रायसनला HMP एडिनबर्ग येथील पुरुषांच्या तुरुंगात ठेवण्यात आले.

पहिल्यांदाच स्कॉटलॅंडमध्ये एखादी ट्रान्स वूमन बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरली.

हायकोर्ट

येथील समाज दोन मतांमध्ये विभागला गेला. काही लोकांचं म्हणणं होतं की गुन्हेगार व्यक्तीने गुन्हा पुरुष असताना केलाय त्यामुळे पुरुषांच्या तुरुंगात पाठवायला हवं. तर काहीचं म्हणणं होतं की शिक्षेवेळी ती व्यक्ती एक ट्रान्स वूमन आहे त्यामुळे त्या व्यक्तीला महिलांच्या तुरुंगात पाठवयाला हवं.

जर आयलाला पुरुषांच्या तुरुंगात पाठवले, तर नवा पायंडा पडेल. मग भविष्यात ज्या ट्रान्स वूमन तुरुंगात जातील त्यांचे भवितव्य काय असेल? एक गट असं म्हणणारा होता की जर आयलाला महिलांच्या तुरुंगात पाठवले तर इतर महिला कैद्यांच्या सुरक्षेचे काय?

स्कॉटिश संसदेतही यावर चर्चा झाली आणि गेल्या महिन्यात संसदेनी कायदा जेंडर रिकगनिशन रिफॉर्म बिल ( लैंगिक ओळख सुधारणा विधेयक) मंजूर केला.

कायदेशीरदृष्ट्या जाहीर करण्यात आलेले लिंग परिवर्तित झाल्यानंतर आपली ओळख कशी असावी यासंदर्भात हा कायदा आहे.

हा कायदा मंजूर करताना स्कॉटलॅंडच्या फर्स्ट मिनिस्टर निकोला स्टर्जन यांनी सांगितले होते की या कायद्याचा परिणाम आयला ब्रायसन केसवर होणार नाही.

स्कॉटलॅंडमध्ये कायदे मंजूर झाल्यावर अंतिम मंजुरी युनायटेड किंगडम सरकारकडून मिळणे आवश्यक असते. या कायद्याचा परिणाम स्कॉटलंड, इंग्लंड आणि वेल्समधील लैंगिक समानता कायद्यांवर होईल असा अंदाज घेऊन युनायटेड किंगडमने या कायद्याला अंतिम मंजुरी दिली नाही.

या कायद्यासंबंधी संसदेत बोलताना स्टर्जन यांनी स्पष्ट केलं होतं की आयला ब्रायसनला महिलांच्या तुरुंगात ठेवता येणार नाही.

आयला ब्रायसन

स्टर्जन म्हणाल्या होत्या, असा एखादा कैदी तुरुंगात ठेवल्यामुळे इतर कैद्यांना लैंगिक अत्याचाराला बळी पडावे लागेल, अशा कैद्याला इतरांपासून वेगळे ठेवणे आवश्यक आहे.

पुढे त्या म्हणाल्या एखाद्या ट्रान्स वूमनवरील गुन्हा सिद्ध झाला तर त्या व्यक्तीला तत्काळ हक्क प्राप्त होऊ शकत नाही. त्या व्यक्तीपासून इतरांना व त्या व्यक्तीला काय धोके आहेत याची तपासणी केल्याशिवाय हा निर्णय घेता येऊ शकत नाही.

प्रत्येक प्रकरणात धोक्याची पातळी तपासणे आवश्यक आहे, इतर कैद्यांची सुरक्षा हे आमचे कर्तव्य आहे, असं स्टर्जन म्हणाल्या होत्या.

सरकारने स्कॉटिश तुरुंग प्राधिकरणाकडे याबाबतचे अधिकार सोपवले होते. आयला ब्रायसनपासून इतर कैद्यांना किती धोका आहे हे पाहावे आणि त्यानुसार त्यांनी निर्णय घ्यावा असे अधिकार त्यांना देण्यात आले होते.

त्यानुसार तुरुंग प्रशासनाने आयला ब्रायसनला पुरुषांच्या तुरुंगात पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आयला ब्रायसनची रवानगी पुरुषांच्या तुरुंगात झाली.

स्कॉटलॅंडमध्ये तुरुंगात किती ट्रान्सजेंडर्स आहेत?

स्कॉटिश प्रिझन सर्व्हिसच्या माहितीनुसार स्कॉटलॅंडमध्ये तुरुंगात एकूण 15 ट्रान्सजेंडर लोक आहेत. त्यापैकी 11 ट्रान्स वूमन आहेत आणि 4 ट्रान्स मॅन आहेत.

एक ट्रान्समॅन हा पुरुषांच्या तुरुंगात आहे आणि तीन ट्रान्समॅन हे महिलांच्या तुरुंगात आहेत.

सहा ट्रान्स वूमन या पुरुषांच्या तुरुंगात आहेत आणि पाच ट्रान्स वूमन या महिलांच्या तुरुंगात आहेत. कोणी कोणत्या तुरुंगात राहावे याचा निर्णय तुरुंग प्रशासन पडताळणीनंतर घेतं.

स्कॉटलॅंंडमध्ये पुरुष कैद्यांची संख्या 7,092 इतकी आहे आणि महिला कैद्यांची संख्या 280 इतकी आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)