Fifa World Cup : 'अत्यंत अविश्वसनीय सामना...अशी फायनल मॅच कधी पाहिली नाही, पुन्हा पाहू शकेन असं वाटत नाही'

    • Author, वात्सल्य राय
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

लिओनेल मेस्सी फुटबॉल वर्ल्ड कपच्या जवळ गेला, थोडंसं झुकला आणि हळूवारपणे ट्रॉफीचं चुंबन घेतलं.

वर्ल्ड कप हातात घेतल्यावर मेस्सीनं म्हटलं, “मला खूप मनापासून ही गोष्ट हवी होती. देव मला ती देईल असं मला वाटत होतं. हा माझा क्षण आहे.”

कतारमधील लुसैल स्टेडिअममध्ये रविवारी (18 डिसेंबर) जे घडलं, तो केवळ एक सामना नव्हता...एखाद्या परीकथेसारखी वाटणारी गोष्ट होती.

पण ही परीकथा केवळ मेस्सीची नव्हती. या गोष्टीतल्या अनेक घटकांच्या वाट्याला यश, नाव आणि आनंद आला...कोणाच्या वाट्याला कमी, तर कोणाच्या अधिक...

मेस्सीनं स्वतः म्हटल्याप्रमाणे, “ही मॅच वेड लावणारी होती.”

खेळाडू किंवा अर्जेंटिना आणि फ्रान्सच्या फॅन्ससाठीच नाही तर फुटबॉलचा आनंद घेणाऱ्या शेकडो रसिकांचीही हीच भावना असेल.

आमचा श्वास रोखला गेला होता

इंग्लंडचा माजी खेळाडू अलन शिअररने म्हटलं, “आमचा श्वास रोखला गेला होता. हा अत्यंत अविश्वसनीय असा अंतिम सामना होता. अशी मॅच मी आधी पाहिली नव्हती आणि भविष्यातही पाहू शकेन असं वाटत नाही. स्तिमित करणारा हा सामना होता.”

हे त्या सामन्याबद्दल बोललं जातंय, ज्या सामन्याची सुरूवातीची 70 मिनटं ही एकतर्फीच होती. अर्जेंटिनाचं सामन्यावर इतकं वर्चस्व होतं की, सोशल मीडियावर अनेक युजर्स हा सामना स्क्रिप्टेड, फिक्स्ड असल्याचा आरोपही करायला लागले होते.

सगळं काही मेस्सी आणि अर्जेंटिनाच्या टीमच्या हिशोबाने सुरू होतं. जणूकाही नियतीही या सर्वांत ‘प्रसिद्ध फुटबॉलपटूला’ कतारमधून रिकाम्या हाताने पाठवायला तयार नव्हती.

तोपर्यंत फ्रान्सची टीम अर्जेंटिनाच्या समोर निष्प्रभ दिसत होती. फ्रान्सला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकून ब्राझीलच्या 60 वर्षं जुन्या रेकॉर्डची बरोबरी करायची होती, पण त्यांची लढण्याची तयारीच दिसत नव्हती.

त्या एकतर्फी लढतीत अर्जेंटिनाला विजय मिळाला असता तरी मेस्सी, अर्जेंटिना आणि त्यांचे समर्थक खूश झाले असते. पण तो सामना अशापद्धतीने ‘अजरामर’ झाला नसता.

सर्वांत रंजक फायनल

पण हा सामना ऐतिहासिक ठरणार होता... 79 व्या मिनिटाला पहिला, दोनच मिनिटांनी दुसरा आणि एक्स्ट्रा टाइममध्ये तिसरा गोल करून अंतिम सामन्यात हॅट्रिक करणाऱ्या एम्बापेच्या जादुई खेळामुळे फ्रान्सचं आव्हान कायम राहिलं आणि मॅच एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचली.

एकतर्फी आणि जवळपास कंटाळवाण्या पद्धतीने सुरू असलेल्या या सामन्यात एकापाठोपाठ एक ट्विस्ट येऊ लागले.

इंग्लंडचा माजी खेळाडू रिओ फर्डिनांडने म्हटलं, “जे झालं त्याची कल्पनाही करू शकत नाही.”

अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनॉस आयर्सच्या रस्त्यांवर एवढे लोक होते, की मोजदाद करणं कठीण होतं...त्याहून कठीण होतं 10 नंबरची जर्सी घातलेल्या फॅन्सची संख्या सांगणं...ही त्याच क्रमांकाची जर्सी होती, जी घालून मेस्सी आपला वर्ल्ड कपमधला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार होता.

चाहत्यांचा उत्साह पॅरिसमध्येही कमी नव्हता. 10 नंबरच्या जर्सीची क्रेझ तिथेही होती, पण तिथे ही जर्सी फ्रान्सचा मेगास्टार किलियान एम्बापे घालतो.

अंतिम सामन्याकडे मेस्सी विरुद्ध एम्बापे असंही पाहिलं जात होतं.

स्टेडिअममध्ये अर्जेंटिनाच्या फॅन्सची संख्या जास्त होती. त्यामधे काही जण निकोलस सारखेही होते.

त्याने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, 2400 डॉलर्स म्हणजे जवळपास दोन लाख रुपये खर्च केल्यानंतर त्याला एक तिकिट मिळालं होतं.

पण त्याला पैसे खर्च झाल्याचं वाईट वाटत नव्हतं. त्याचं म्हणणं होतं की, मेस्सीला वर्ल्ड कप उंचावताना पाहणं माझ्यासाठी जास्त मौल्यवान आहे.

दुसरीकडे एम्बापेला प्रोत्साहन देण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅनुअर मॅक्राँ स्वतः लुसैल स्टेडिअममध्ये उपस्थित होते. चार दिवसांत ते दुसऱ्यांदा कतारला आले होते.

उपांत्य फेरीत मोरक्कोवर मिळवलेल्या विजयानंतर त्यांना फ्रान्सच्या संघाचा 'लकी मस्कट' समजलं जात होतं.

प्रत्येकाच्या आपापल्या धारणा...

मॅचच्या 80 व्या मिनिटाला एम्बापेची जादू दिसली. तोपर्यंत स्टेडिअममध्ये मेस्सीचाच प्रभाव दिसत होता. मात्र, एम्बापेनं फ्रान्ससाठी पहिला गोल केला आणि पुढची 40 मिनिटं सामन्याच्या कथेच्या केंद्रस्थानी तो दिसत राहिला.

10 नंबरची जर्सी घालणारे दोन स्टार खेळाडू आपापल्या फॉर्ममध्ये आले होते आणि प्रेक्षकांसाठी त्यांना पाहणं हा आनंददायी अनुभव होता.

पेनल्टी शूटआउटचा हीरो

मॅचमध्ये अजून बरंच काही व्हायचं होतं. एक्स्ट्रा टाइममध्ये झालेल्या बरोबरीनंतर सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआउटने लागणार हे नक्की झालं. अंतिम सामन्याच्या आधीच मेस्सीसाठी हा वर्ल्ड कप जिंकण्याचा निर्धार करणाऱ्या गोलकीपर एमिलियानो मार्टिनेजने पुढची धुरा सांभाळली.

फ्रान्स आणि वर्ल्ड कपदरम्यान मार्टिनेज नावाची भिंत उभी राहिली. फ्रान्सला गोल करण्याच्या चार संधी मिळाल्या. त्यांपैकी दोन गोल मार्टिनेजने रोखले. विजयानंतर त्याने म्हटलं, “मी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. माझ्याकडे शब्द नाहीत. पेनल्टी शूट आउटदरम्यान मी शांत होतो. आम्हाला जे हवं होतं, तसंच घडलं. ”

'हृदयद्रावक पराभव'

एमिलियानोच्या प्रयत्नाने एम्बापेची मेहनत वाया गेली. सौदी अरेबियाविरुद्धच्या पराभवाने मोहिमेची सुरुवात करणारा अर्जेंटिना संघ विश्वचषक विजेता ठरला.

पराभवामुळे निराश झालेल्या एम्बापेनं चेहरा टी-शर्टनं झाकून घेतला. जणू काही त्याला त्याच्या तुमच्या भावना लपवायच्या होत्या. त्याला शांत करण्यासाठी मॅक्रॉन यांना स्वतः मैदानात यावं लागलं.

मॅक्रॉन म्हणाले, "आम्ही सर्वजण खूप दु:खी आहोत. विशेषत: पराभव कसा झाला हे पाहून. आम्ही विजयाच्या जवळ पोहोचलो होतो. मी ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना सांगितलं की, आम्हा सगळ्यांना त्यांचा खूप अभिमान आहे. माझ्या मते, मी पाहिलेली ही सर्वोत्तम विश्वचषक फायनल आहे."

हा पराभव हृदयद्रावक आहे, असे फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिए देशाँ यांनी म्हटलं.

मात्र पराभवानंतरही एम्बापे रिकाम्या हातानं परतला नाही.

पाणावलेले डोळे आणि स्वप्नपूर्ती

सगळी वळणं घेऊन झाल्यानंतर फुटबॉल विश्वचषक फायनलची कहाणी शेवटच्या वळणावर आली.

फ्रेंच खेळाडूंचे डोळे पाणावले होते. अर्जेंटिनाच्या खेळाडूंचेही डोळे ओले झाले होते. कुठे दु:खाचे अश्रू तर कुठे सुखाचे क्षण दिसत होते.

आपल्या सहकाऱ्यांसोबत आनंदोत्सव साजरा केल्यानंतर मेस्सीच्या नजरा विश्वचषकावर खिळल्या होत्या. टी-शर्टवर अरब जगाच्या शैलीतील पोशाख परिधान करून मेस्सीने फिफा अध्यक्ष जियानी इन्फेंटीनो आणि कतारच्या शेख तमीम यांच्याशी हस्तांदोलन केलं आणि त्यानंतर आतापर्यंत केवळ त्याच्या स्वप्नात आलेली ट्रॉफी हातात घेतली. कतारमध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषकाची कहाणी पूर्ण झाली आहे. मेस्सी आणि अर्जेंटिनासाठी ही एक परिकथा होती आणि जेव्हा कतारलाही कथा आठवेल तेव्हा त्यांनाही ही परिकथाच वाटेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)