अर्जेंटिनाची टीम फाईव्हस्टार हॉटेलऐवजी होस्टेल कॅम्पसवर का राहतेय?

विश्वविजेतेपदापासून अर्जेंटिनाचा संघ एक विजय दूर आहे. रविवारी रात्री जेतेपदासाठीच्या मुकाबल्यात त्यांचा मुकाबला फ्रान्सशी होणार आहे.

कतारने वर्ल्डकपमध्ये सहभागी संघांसाठी आलिशान अशा पंचतारांकित हॉटेलात राहायची व्यवस्था केली होती. पण अर्जेंटिनाच्या संघाने महालासदृश हॉटेलात राहण्याऐवजी एका विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये राहणं पसंत केलं आहे.

बरोबर महिनाभरापूर्वी लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वातील अर्जेंटिना संघाचं कतारमध्ये आगमन झालं. विमानतळावरून अर्जेंटिनाचा संघ थेट कतार युनिव्हिर्सिटी कॅम्पसकडे रवाना झाला. अर्जेंटिनाच्या संस्कृतीत बीफ बार्बेक्यू तयार केले जातात. त्याला असाडो असं म्हटलं जातं. बार्बेक्यूसाठी मोकळी जागा आवश्यक असते कारण मांस चुलीवरच्या निखाऱ्यांवर खरपूस भाजलं जातं.

आगीचा आणि खरपूस भाजण्याचा स्वाद मांसाला येतो. मायदेशी जसे बार्बेक्यू तयार केले जातात तसेच्या तसे कतारमध्ये करता यावेत यासाठी अर्जेंटिनाने हॉटेलमधील वास्तव्याला नकार देत विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये राहणं पसंत केलं. मायदेशी बार्बेक्यू जसेच्या तसे तयार करता यावेत यासाठी अर्जेंटिनाच्या संघाने दोन शेफनाही आणलं आहे.

“असाडो हा अर्जेंटिनाच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. कतारमध्ये महिनाभर खेळत असताना घरच्याप्रमाणेच वाटावं, तसंच खायलाप्यायला मिळावं असा आमचा प्रयत्न आहे. फुटबॉलसारख्या वेगवान आणि शारीरिकदृष्ट्या दमवणारा खेळ खेळल्यानंतर सर्वोत्तम दर्जाचं आणि घरचं खायला देण्याचा आमचा प्रयत्न आहे”, अर्जेंटिना फुटबॉल संघटनेच्या अधिकाऱ्याने डेली मेलशी बोलताना सांगितलं होतं.

“आम्ही युनिव्हर्सिटी कॅम्पसला अनेकदा भेट दिली आणि मगच त्याची निवड केली. कॅम्पसमध्ये सरावाच्या तसंच राहण्याच्या उत्तम सोयीसुविधा आहेत. याव्यतिरिक्त असाडोस तयार करण्यासाठी भरपूर मोकळी जागाही आहे. अर्जेंटिनाच्या खेळाडूंसाठी, सपोर्ट स्टाफसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. मायदेशी जसे हे खेळाडू खातात पितात तसं त्यांना इथे कॅम्पसमध्ये खायला प्यायला मिळत आहे”, असं त्याने सांगितलं.

आयोजकांनी अर्जेंटिनाचा संघ दाखल होण्यापूर्वी त्यांच्या गरजेप्रमाणे विशिष्ट बार्बेक्यूची यंत्रणा कार्यान्वित केली होती. असोडा म्हणजे बार्बेक्यू केलेलं मटण. थोडंसं मीठात घोळवलं जातं. त्यानंतर सॅलड आणि वाइनबरोबर या खरपूस मांसाचा आस्वाद घेतला जातो.

अरब देशांमध्ये ‘कतार युनिव्हर्सिटी कॅम्पस’ सर्वोत्तम समजला जातो. अभ्यासाच्या बरोबरीने खेळाच्या अत्याधुनिक आणि तंत्रस्नेही सोयीसुविधा कॅम्पसमध्ये उपलब्ध आहेत. या कॅम्पसमध्ये 10,000 क्षमतेचं स्टेडियम आहे. याबरोबरीने ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निकष असलेल्या आकाराचा जलतरण तलावही आहे.

अर्जेंटिनाने याआधी दोनदा वर्ल्डकप जिंकला आहे. लिओनेल मेस्सीने अर्जेंटिना आणि बार्सिलोना क्लबला असंख्य स्पर्धांची जेतेपदं जिंकून दिली आहेत. पण वर्ल्डकपची ट्रॉफी अजूनही त्याच्याकडे नाही. ही ट्रॉफी त्याला खुणावते आहे. मेस्सीने स्वत: जाहीर केल्याप्रमाणे हा त्याचा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे.

अर्जेंटिना संघातील सहकाऱ्यांनाही मेस्सीला जेतेपदासह निरोप द्यायचा आहे. हे सगळं जुळवून आणायचं असेल तर पोटोबा तृप्त असणं आवश्यक आहे कारण यशाचा मार्ग पोटातून जातो असं म्हणतात. अर्जेंटिनाच्या टीमने नेमकं हे सूत्र तंतोतंत अंगीकारलं आहे.

पंचतारांकित हॉटेल, त्यामध्ये उपलब्ध उंची सोयीसुविधा, आरामदायी आयुष्य याला छेद देत अर्जेंटिनाने आपल्या संस्कृतीचा भाग असणाऱ्या एका पदार्थाला महत्त्व देत वेगळा मार्ग चोखाळला.

हे वाचलंत का?