You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'अपंग आहे म्हणून लोक मला उपकार केल्यासारखी सेक्सची ऑफर देतात'
- Author, जेम्मा डंस्टन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
होली अवघ्या 16 वर्षांची होती जेव्हा तिला एका व्यक्तीने विचारलं की, 'तुला अपंग असल्यामुळे लैंगिक संबंध ठेवता येतात का?'
गेल्या अनेक वर्षांपासून इतरही बरेच प्रश्न तिला विचारले गेले आहेत. या प्रश्नांमध्ये 'ती योग्य प्रकारे लैंगिक संबंध ठेऊ शकते का?' किंवा 'लैंगिक संबंध ठेवताना व्हीलचेअरवर बसणे आवश्यक आहे का?' अशाही काही प्रश्नांचा समावेश आहे.
"लोकांना वाटतं की, ते लैंगिक संबंधांची ऑफर देऊन उपकार करत आहेत किंवा अपंग व्यक्तीसाठी त्याग वगैरे करत आहेत. मात्र, आता मी अशा प्रश्नांवर आश्चर्यचकित होत नाही किंवा नाराजही होत नाही," असं होली सांगते.
होली आता 26 वर्षांची आहे. तिला क्रोनिक पेन आणि हायपरमोबिलिटी सिंड्रोम आहे. ती अशा अपंग महिलांपैकी एक आहे ज्यांनी नातेसंबंधांवर बोलताना नकारात्मक साचेबद्ध विचारांना आव्हान दिले.
अपंग व्यक्तींच्या आनंदी नातेसंबंधांची उदाहरणं समोर येणं खूप महत्त्वाचं आहे, असं होली ग्रेडर म्हणते.
होलीने किशोरवयात असताना तिचा सध्याचा जोडीदार (नवरा) जेम्सला डेट करायला सुरुवात केली होती. 9 वर्षे नात्यात राहिल्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांनी लग्न केलं आहे.
जोडीदाराकडून तिला नेहमीच पाठिंबा मिळतो. मात्र, इतरांकडून पूर्वग्रहदुषित अनुभव येतात, असं ती सांगते.
"अनेकदा माध्यमांमध्ये अपंग लोकांचं जीवन दयनीय असल्याचं आणि आम्ही फक्त दुःखद जीवन जगतो असं दाखवण्यात आलेलं असतं," असंही ती नमूद करते.
जेम्ससोबतच्या नात्यावर बोलताना होली म्हणाली की, “आम्ही सुरुवातीला एकत्र आलो तेव्हा मला लोकांनी सांगितलं होतं की, तुझी तब्येत बिघडली, तर तो तुला सोडून जाईल."
"एक ओझं असल्याची भावना"
लोकांच्या मनात तिच्याबद्दल असलेल्या विचारांवर बोलताना होली म्हणाली, "शाळेत माझ्याबद्दल लोकांची काही गृहितकं होती. काही लोकांनी त्याबद्दल मला थेटही विचारलं होतं."
"अपंग व्यक्ती लैंगिक संबंध ठेऊ शकते का, हा पहिला प्रश्न नेहमीच विचारला जातो," असं होलीने सांगितलं.
ती म्हणाली "शाळेत तिच्या वर्गातील मुले वैयक्तिक आणि अनाहूत प्रश्न विचारायचे."
"तुला केवळ व्हीलचेअरवरच लैंगिक संबंध ठेवता येतात का? लैंगिक संबंध ठेवताना तुझे सांधे दुखतील का?" असे प्रश्न विचारले गेल्याचं तिने सांगितलं.
लोक लैंगिक संबंधांबाबत तिला सोशल प्लॅटफॉर्म्सवरही मेसेज करतात आणि तिनं स्वतःला नशिबवान समजायला हवं अशा अविर्भावात 'ऑफर'ही देतात.
माध्यमांमध्ये अपंगांचं अधिक चांगलं प्रतिनिधित्व दिसायला हवं, असं सांगताना होलीने 'सेक्स एज्युकेशन' या वेब सीरिजमधील आयझॅक गुडविन या व्यक्तिरेखेचा दाखला दिला. तसेच तिला अलीकडे तेवढं एकच उदाहरण दिसल्याचंही तिनं म्हटलं.
या बातम्याही वाचा:
निकोला थॉमस ही केरफिलीमधील 38 वर्षीय अंध महिला आहे.
निकोला म्हणाली, "लोक मला सामान्यपणे विचारतात तो प्रश्न म्हणजे, तुम्ही लैंगिक संबंध कसे ठेवता? हा इतका वैयक्तिक प्रश्न आहे की, त्यामुळे मनात अस्वस्थता तयार होते."
निकोलाला न्यूरोमायलिटिस ऑप्टिका नावाचा आजार आहे. तिच्या एका डोळ्याची दृष्टी 15 वर्षांपूर्वी गेली आणि पाच वर्षांपूर्वी तिच्या दुसऱ्या डोळ्याची दृष्टीही गेली आहे.
"अनेक लोकांना अंधत्व असल्याने खूप अडथळे येतात असं वाटतं आणि तो समज मला नक्कीच तोडायचा आहे."
निकोलाला नौकायन, पॅडलबोर्डिंग आणि प्रवास करण्याचा छंद आहे. तिची पुढील सहल हाँगकाँगची आहे.
डोळ्यांची दृष्टी गेली तेव्हा निकोलाचा एक प्रियकर होता, पण नंतर हे नातं तुटलं.
"मी ओझं असल्यासारखं मला वागवलं गेलं. तुला कुणी काळजी घेणारं मिळणार नाही, असंही लोक म्हणाले. मात्र, मला काळजी घेणाऱ्याची गरज नाही," असं निकोला ठामपणे सांगते.
आता निकोलाला एक बॉयफ्रेंड आहे. तोही दृष्टीहीन आहे.
"आम्ही दोघेही दृष्टीहीन असलो, तरीही आम्ही आमच्या पद्धतीने शहर फिरू किंवा स्वतःच डेटवर जाऊ. कोणतीही गोष्ट आम्हाला यापासून दूर ठेऊ शकत नाही."
जेव्हा लोक तिच्यात रस दाखवतात तेव्हा तिला पूर्वग्रहदुषितपणा जाणवतो, असंही निकोलाने सांगितलं.
"सोशल मीडियावर लोक मेसेज करून भेटण्यासाठी विचारतात. त्यावर मी त्यांना दृष्टीहीन असल्याचं सांगितलं की, ते विचित्र पद्धतीने वागतात आणि टाळतात."
"ते उपकार करत असल्यासारखं वागतात. त्यामुळे अशांपासून लगेच दूर रहावं वाटतं."
निकोला पुढे म्हणते, "लोक आम्हाला वेगळा घटक असल्यासारखं वागवतात. मला हा समज संपवायचा आहे."
'अॅक्सेस टू पॉलिटिक्स'च्या प्रकल्प अधिकारी कॅट वॅटकिन्स म्हणाल्या की, अपंग व्यक्तींना त्यांची लैंगिक ओळख शोधण्याचा आणि इतरांप्रमाणेच नातेसंबंध तयार करण्याचा अधिकार आहे.
"अपंग लोकांसाठी नातेसंबंध आणि लैंगिक संबंध निषिद्ध का आहेत? आपल्यासाठी खाणे आणि डोक्यावर छप्पर असण्यापलीकडेही बरेच मुद्दे महत्त्वाचे आहेत."
"तुमचं जीवन जगणं आणि आनंद घेणं हा जीवनाचा एक भाग आहे. मात्र, अपंग लोकांबाबत हे पुरेसं अधोरेखित होताना दिसत नाही."
लोक अपंग महिलांना ज्या पद्धतीचे मेसेज पाठवतात, त्याचं सामान्यीकरण झालं आहे. त्याची उदाहरणं ऐकू येतात, असं कॅट यांनी सांगितलं.
अपंगांसाठीचे सेक्स टॉय त्यांना आत्मविश्वास देण्यास मदत करू शकतात. हे सर्व मुख्य प्रवाहातील सेक्स साइट्स आणि आउटलेटवर दिसावं, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
"तुम्ही आधी स्वतःशी सहज व्हायला हवं. तुमचं शरीर समजून घेणं आवश्यक आहे. तसं झालं तरंच तुम्ही इतरांना सांगू शकाल. स्वतःवर प्रेम करणं देखील महत्त्वाचं आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)