भारतीय महिला हॉकी टीमची माजी कर्णधार राणी रामपालकडून निवृत्तीची घोषणा

फोटो स्रोत, ANI
- Author, सौरभ दुग्गल
- Role, बीबीसी पंजाबीसाठी
भारतीय महिला हॉकी टीमची माजी कर्णधार राणी रामपालने गुरुवारी (24 ऑक्टोबर) निवृत्तीची घोषणा केली.
हरियाणातील एका छोट्या शहरातून आलेल्या राणी रामपालचं करियर 16 वर्षांचं राहिलं. तिचे वडील हातगाडी ओढण्याचं काम करायचे.
29 वर्षीय राणी रामपाल भारताच्या सर्वोत्तम हॉकी खेळाडूंपैकी एक आहे. तिने ऑलिंपिक 2021 मध्ये भारतीय टीमचं प्रतिनिधित्व केलं होतं. यावेळी ऑलिंपिकमध्ये भारतीय संघ चौथ्या स्थानावर राहिला.
राणी रामपालने एका पत्रकार परिषदेत तिच्या निवृत्तीची घोषणा केली. यावेळी ती म्हणाली, “हा खूपच चांगला प्रवास राहिला. मी इतका काळ भारतासाठी खेळू शकेन याचा मी कधीही विचार केला नव्हता.”
तिने पुढे म्हटलं, “मी लहानपणापासून खूप गरिबी पाहिली आहे. मात्र, माझं लक्ष कायम काही तरी करण्यावर होतं, देशाचं प्रतिनिधित्व करण्यावर होतं.”
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना राणी रामपाल म्हणाली, "15-16 वर्षांचा हा मोठा प्रवास होता. त्यामुळे अनेक सुंदर आठवणी आहेत. पहिल्यांदा जेव्हा भारताची जर्सी मिळाली होती, तेव्हाचा क्षण खूपच अविस्मरणीय होता. कारण याच क्षणासाठी मी लहानपणापासून खूप कष्ट केले होते. मला खेल रत्न आणि पद्मश्री पुरस्कार मिळाला, दोनदा ऑलिंपिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करता आलं. हे खूप कमी लोकांच्या नशिबात येतं, असं मला वाटतं."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
"एशियन गेम्समध्ये पदक जिंकणं, एशिया कपमध्ये पदक जिंकणं, ऑलिंपिकमध्ये चौथ्या स्थानावर राहणं, सेमीफायनल खेळणं, 14 वर्षांच्या वयात वर्ल्ड इलेवन टीममध्ये सहभागी होणं, असे अनेक सुंदर क्षण अविस्मरणीय राहतील."
"जेव्हा मी 7 वर्षांची असताना खेळायला सुरुवात केली तेव्हा कोणत्याही मुलाला मी येथपर्यंत खेळू शकेल असं वाटलं नव्हतं. मीही असा विचार केला नव्हता. मात्र, जसजसं आयुष्य पुढे जातं, तुम्ही कष्ट करता, छोट्या छोट्या गोष्टी मिळवता, तसतसं तुम्हाला विश्वास वाटतो. कारण या यशामुळे प्रेरणाही मिळते."
राणी रामपाल म्हणाली, "इतक्या गरीब घरातून येणं, कच्च्या घरात राहणं, आपण कधी चांगलं घर उभं करू शकू की नाही असं वाटायचं. एकवेळ जेवण मिळालं, तर दुसऱ्या वेळी जेवण मिळेल की नाही असं वाटायचं. हे सगळं बदलण्याचं हॉकी एक माध्यम आहे, असं वाटायचं. हॉकीच्या माध्यमातूनच आपण कष्ट घेऊन आयुष्यात काही करू शकतो, असंही वाटायचं."


"मला एक चांगले प्रशिक्षक मिळाले. त्यांच्याकडून खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं. त्यांनी केवळ एक हॉकी खेळाडू तयार केला नाही, तर आयुष्यात अशा गोष्टी शिकवल्या ज्या आजपर्यंत सोबत आहेत."
नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर भारत-जर्मनी द्विपक्षीय कसोटी मालिकेनंतर राणी रामपालने आंतरराष्ट्रीय हॉकीतून निवृत्तीची घोषणा केली. राणी रामपाल अशा प्रकारे खेळाच्या मैदानावरच निवृत्तीची घोषणा करणारी पहिली भारतीय महिला हॉकी खेळाडू ठरली.
आतापर्यंत 254 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या राणी रामपालने निवृत्ती जाहीर करताना यापुढील काळात उद्योन्मुख खेळाडूंना मार्गदर्शन करणार असल्याचंही नमूद केलं.
राणी रामपालला जेएसडब्ल्यूने त्यांच्या सूराम हॉकी क्लबसाठी साइन केले आहे. सूराम हॉकी क्लब आगामी हॉकी इंडिया लीगमध्ये सहभागी होणार आहे. भारतात पहिल्यांदाच महिला व्यावसायिक हॉकी लीग होणार आहे.
शाहबाद ते ऑलिंपिकमधील देदिप्यमान कामगिरी
हातगाडी चालकाची मुलगी असलेल्या राणी रामपालने तिच्या करियरची सुरुवात द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक बलदेव सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली शाहबाद येथे सुरू केली.
अर्जुन पुरस्कार विजेत्या राणी रामपालने आठवण सांगितली, "मी जेव्हा 2002 मध्ये शाहबाद येथील हॉकी अकादमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेले होते, तेव्हा बलदेव सरांनी सुरुवातीला मला प्रशिक्षण देण्यास नकार दिला होता."
"मला वाटलं की, आता मी हॉकी शिकू शकणार नाही आणि मैदानाचे दरवाजे कायमचे बंद झाले. मात्र, ही बहुतेक सर्व नव्या खेळाडूंना द्यावी लागायची अशी सरांची चाचणी होती. यातून ते प्रशिक्षण घ्यायला येणाऱ्यांना खरोखर खेळात रस आहे का आणि ते दीर्घकाळ खेळू शकतात की फक्त उन्हाळ्यातील छंद म्हणून खेळू पाहत आहेत हे तपासायचे.”

फोटो स्रोत, ANI
अगदी सामान्य पार्श्वभूमी असलेल्या राणी रामपालला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला. तिने सांगितलेलं, “मला अजूनही आठवतं, जेव्हा मी शेवटी हॉकी अकादमीत प्रवेश घेतला, तेव्हा मला सर्वाधिक काळजी आमच्या गरिबीची होती. हातगाडी चालकाची मुलगी असल्यानं आमची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळं हॉकी स्टिक विकत घेणं, प्रथिनयुक्त आहार घेणं यासाठी खर्च करणं हे माझ्यासाठी एक दूरचं स्वप्न होतं. मात्र बलदेव सर माझ्यासाठी तारणहार बनले.”
2002 ला शाहबाद येथून हॉकीच्या करियरची सुरुवात केल्यापासून 2004 पर्यंत राणी एका ज्येष्ठ खेळाडूने वापरलेल्या हॉकी स्टिकने खेळली. “नंतरच्या काळात माझ्या खेळाने प्रभावित झाल्यानंतर सरांनी मला एक नवीन हॉकी स्टिक दिली. माझ्या हॉकी कारकिर्दीचा तो टर्निंग पॉइंट होता. सरांच्या या कृतीने मला इतके प्रेरित केले की माझी यशाची भूक अनेक पटींनी वाढली,” असंही राणी रामपालने नमूद केलं.
राणी रामपालने सब-ज्युनियर स्तरापासून कनिष्ठ आणि वरिष्ठ राष्ट्रीय संघांपर्यंत प्रवास केला. या प्रवासात तिच्या अगणित तासांचं कठोर प्रशिक्षण आणि असंख्य त्यागांचा समावेश होता.

फोटो स्रोत, ANI
ती 2013 मध्ये झालेल्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाचाही भाग होती.
“मी 2008 मध्ये बीजिंग ऑलिंपिकसाठी पात्रता फेरीदरम्यान माझे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यावेळी मला ऑलिंपिकचं खेळाडूसाठी काय महत्त्व असतं याची कल्पना नव्हती. मात्र जेव्हा आम्ही पात्रता फेरीत हरलो आणि माझ्या वरिष्ठांचे उदास चेहरे मला दिसले, तेव्हा आम्ही काय गमावले होते हे मला कळले. तेव्हा मी ऑलिंपिकमध्ये भाग घेण्याचे माझे पुढील लक्ष्य निश्चित केले,” असं राणी रामपाल सांगते.
असं असलं तरी राणीला तिचे ऑलिंपिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणखी 8 वर्षे लागली. 2016 च्या रिओ ऑलिंपिकमध्ये भारतीय संघाच्या पात्रतेचं महत्त्व अधोरेखित करताना ती पुढे म्हणाली, “भारतीय महिला हॉकी संघ ऑलिंपिकमध्ये शेवटच्या वेळी 1980 च्या मॉस्को गेम्समध्ये खेळला होता."
“कोणत्याही प्रशिक्षकाला त्याच्या विद्यार्थ्याच्या यशापेक्षा आणखी काय हवे असते? राणी ही भारतीय महिला हॉकी संघाची स्टार आहे आणि मला आशा आहे की, ती एक मार्गदर्शक म्हणून तिच्या नवीन भूमिकेत यशस्वी होईल. तिने कठोर परिश्रमाने आणि शिस्तीने मैदानावर आणि मैदानाबाहेरही नाव कमावले आहे,” अशी भावना शेकडो महिला हॉकीपटूंच्या कारकीर्दीला आकार देणाऱ्या प्रशिक्षक बलदेव सिंग यांनी व्यक्त केली.
भारतीय महिला हॉकीची 'पोस्टर गर्ल'
राणी रामपालचा प्रवास एखादे परीकथेपेक्षा कमी नाही. खेळताना दुखापत झाल्यामुळे तिला ज्युनियर राष्ट्रीय शिबिरातून बाहेर जावं लागलं होतं पण पुढे ती भारतीय महिला हॉकीची 'पोस्टर गर्ल' बनली आणि देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान, खेलरत्न मिळवणारी पहिली महिला हॉकीपटू ठरली.
राणी एका अत्यंत सामान्य कुटुंबातून आली. रोजचे जेवण मिळवण्यासाठी देखील तिच्या कुटुंबाला संघर्ष करावा लागत होता. ती ज्या परिस्थितीतून आली त्या परिस्थितील अनेकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉकी खेळण्याचं स्वप्न अशक्य वाटलं असतं. असं असलं तरी, राणीने तिच्या कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे तिचा भविष्यातील संपन्नतेकडे जाणारा प्रवास थांबू दिला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
झोपडीत राहण्यापासून पालकांना आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज दुमजली घर भेट देण्यापर्यंतचा राणीचा प्रवास तिच्या मेहनतीचा आणि चिकाटीचा दाखला आहे. सकाळच्या प्रशिक्षणासाठी लवकर उठण्यासाठी आकाशातील ताऱ्यांचा वापर करणारी ती आता अॅपल घड्याळ आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स वापरते.
खराब तंदुरुस्तीमुळे पहिल्या ज्युनियर राष्ट्रीय शिबिरातून बाहेर जाण्यापासून ते प्रतिष्ठित राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला हॉकीपटू बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास एक प्रेरणादायी गोष्ट आहे. तिच्या दीड दशकाच्या कारकिर्दीत राणी केवळ भारतीय महिला हॉकीचा चेहरा बनली नाही, तर तिने तिच्या कुटुंबालाही गरिबीतून बाहेर काढले.
राणी म्हणते, “माझ्यासाठी माझा हॉकीचा प्रवास एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. "2007 मध्ये माझ्या पहिल्याच ज्युनियर राष्ट्रीय शिबिरात मी खराब फिटनेसमुळे बाहेर फेकले गेले. प्रशिक्षकाने मला सर्वांसमोर सांगितले की मी माझ्या आयुष्यात कधीही भारतासाठी खेळणार नाही," अशी आठवण राणीने सांगितली.

फोटो स्रोत, Getty Images
"त्यावेळी आमच्याकडे मर्यादित साधनसंपत्ती होती आणि माझा आहार अगदी साधा होता. खेळाडूसाठी आवश्यक असलेल्या पौष्टिक आहाराच्या तुलनेत, मी कुपोषित होते. त्यावेळी माझे वजन फक्त 36 किलो होते. त्याचा परिणाम म्हणून मी शिबिरातून बाहेर पडले. त्यानंतर मी खूप मेहनत केली आणि प्रशिक्षक बलदेव सरांच्या पाठिंब्यामुळे आशिया इलेव्हन आणि वर्ल्ड इलेव्हनमध्ये स्थान मिळाले."
राणी रामपालच्या कारकिर्दीचे ठळक मुद्दे काही कमी नाहीत. तिने 2018 आशियाई खेळांमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिले आणि ओडिशामधील ऑलिंपिक पात्रता फेरीत अमेरिकेविरुद्ध शेवटच्या क्षणी महत्त्वपूर्ण गोल केला. यामुळे 2020 टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताचे स्थान निश्चित केले. ही भारताची प्रतिष्ठित स्पर्धेसाठी सलग दुसरी पात्रता होती.
राणीची गोष्ट जिद्द आणि दृढनिश्चयाची आहे आणि ती हॉकीपटूंच्या पुढील पिढीला कायम प्रेरणा देत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











