कोल्हापूरचा कबनूर दर्गा : सौहार्दाचा उरूस, सलोख्याचा मलिदा; जिगरी दोस्तांची मैत्री परंपरा कशी बनली?

    • Author, प्राची कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"या दर्ग्याचा उरूस हा मराठी महिन्याप्रमाणे फाल्गून महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी सुरू होतो. तो कधीही बदलत नाही. याच महिन्यात उरूस साजरा करण्याची परंपरा आहे," कबनूरच्या उरुसाच्या परंपरेविषयी दर्ग्याच्या ट्रस्टचे माजी अध्यक्ष नजीरुद्दीन मुजावर सांगतात.

उरूसाच्या दिवशी लिगाडे कुटुंबातले सगळेच नवे कपडे घालून तयार होतात. स्वयंपाक घरात गोडाचा मोठा डबा भरून मलिदा तयार केलेला असतो. सगळं कुटुंब सकाळी हॉलमध्ये जमतं.

घरातल्या गणपतीच्या फोटोखाली पाटावर गिलाफ ठेवून तयारी केली जाते. मग गावातले मुजावर गिलाफाला वेगवेगळ्या गोष्टी वाहून फातीहा वाचतात आणि पाठोपाठ संपूर्ण कुटुंबाला नमस्कार करायला सांगतात.

यानंतर मुजावरांकडून लिगाडेंच्या घरातल्या तरुणाला डोक्यावर टोपी घालून डोक्यावर गिलाफ दिला जातो आणि मग बॅण्डच्या तालावर वाजत गाजत मिरवणुकीला सुरुवात होते. लिगाडे जैन आहेत तर मुजावर मुस्लीम.

कबनूरच्या जंदीसॉ ब्रानसॉ दर्ग्याच्या उरुसाच्या दिवशी हेच दृश्य जवळपास सर्वधर्मीय घरातून दिसतं.

लिगाडे घराण्याने नदीवरून पाणी आणल्यानंतरच उरुसाला सुरुवात होते. हे पाणी उरुसाच्या दोन दिवस आधी रात्रीचं आणलं जातं. याच वेळी दर्ग्यावर मंडपही घातला जातो.

उरुसाला सुरुवात होते त्या रात्री लिगाडेंनी आणलेल्या पाण्यात गावातल्या मगदूमांकडून गंध उगाळलं जातं. या गंधाचा लेप नंतर वापरला जातो. लिगाडेंच्या घरात ही परंपरा जवळपास 100 ते 125 वर्षांपासून आहे.

गावचे उपसरपंच सुधीर लिगाडे सांगतात, "कबनूरच्या दर्ग्याला हिंदू-मुस्लीम एकतेची परंपरा आहे. जंदीसॉ आणि ब्रानसॉ हे दोन संत होते. यातले जंगीसाहेब हे जैन समाजाचे आणि ब्रॉनसाहेब हे मुस्लीम समाजाचे. हे दोन्ही संत कबनूरमध्ये आल्यानंतर आमचे पुर्वज त्यांची सेवा करत होते."

"पूर्वज वारल्यानंतर त्यांचं थडगंही या दोघांच्या शेजारीच बांधलं गेलं. पुढे आम्ही ते मळ्यात नेलं. तेव्हापासून आमच्या घराण्यात ही पाणी आणण्याची परंपरा आहे."

हा जंदिसॉ ब्रानसॉ दर्गा कबनूरचं ग्रामदैवत आहे. ग्रामदैवत म्हणून मान्यता असलेला बहुदा एकमेव दर्गा असावा.

सुफी संत असलेले ब्रॉनसॉ आणि जैन परंपरेतल्या जंदीसॉ हे दोघं एकमेकांचे घट्ट मित्र. ही मैत्री इतकी पक्की की जंदीसॉ यांच्या मैत्रीसाठी ब्रॉनसॉ यांनी मांसाहार वर्ज्य केल्याची आख्यायिका इथं सांगितली जाते. त्यामुळे दर गुरुवारी आणि त्याचबरोबर उरुसाचा संपूर्ण काळ ग्रामस्थ मांसाहार करत नाहीत.

फाल्गून महिन्यातल्या गुरुवारी उरुसाला सुरुवात होते. त्यानंतर गुढीपाडव्यापर्यंत हा उरूस सुरू असतो. सुरुवात होते त्या रात्री आधी लिगाडे घराण्यातले लोक आणि पाठोपाठ गावातले जवळपास सगळेच तरुण इथं पाणी घालायला येतात.

खांद्यावर हंडे कळशा घेऊन संपूर्ण गावच पाणी घालायला लोटतो. पुरुष पाणी घेऊन तर बहुतांश महिला दंडवत घालत दर्ग्यात प्रवेश करतात. दंडवत म्हणजे हातात काठी घेत त्या काठी इतक्या अंतर मोजून प्रत्येक ठिकाणी जमिनीवर लोळण घ्यायची. घरापासून दर्ग्यापर्यंत लोक दंडवत घालत येतात. मग रात्री गंध उगाळायला सुरुवात होते.

मोठ्या मोठ्या भांड्यांमध्ये गंध उगाळलं जातं आणि त्याचा लेप जंदीसॉ आणि ब्रॉनसॉ यांच्या तुरबतींवर लावला जातो. जवळपास पहाटेपर्यंत हा सगळा विधी सुरू असतो. या दर्ग्याचे ट्रस्टी म्हणून मुजावरांचा सहभाग असतोच शिवाय लिगाडेंकडून पाणी, मगदूमांकडून गंध आणि चव्हाणांकडून सरकारी गिलाफ आणला जातो.

ही परंपरा अनेक वर्ष अशीच सुरू असल्याचं स्थानिक सांगतात. कबनूरचा हा दर्गा अदिलशहानं बांधल्याचं सांगितलं जातं. पण तशी कागदोपत्री नोंद मात्र मिळत नाही. असं असलं तरी, 1946 मधल्या ब्रिटीशांनी केलेल्या दर्ग्याच्या नोंदींची कागदपत्रं मात्र लोकांकडे आहेत. यात दर्ग्याची वास्तू कशी आहे याबरोबरच इथे रहायला येणारे फकीर, त्याचं व्यवस्थापन याच्या नोंदी आहेत.

उरुसाच्या या परंपरेविषयी बोलताना दर्ग्याच्या ट्रस्टचे माजी अध्यक्ष नजीरुद्दीन मुजावर सांगतात, " या दर्ग्याचा उरूस हा मराठी महिन्याप्रमाणे फाल्गून महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी सुरू होतो. तो कधीही बदलत नाही. याच महिन्यात उरूस साजरा करण्याची परंपरा आहे."

"हरजत जंदीसाहेब ब्रॉनसाहेब हे बगदादहून विजापूरला आले. विजापूरहून या पूर्वजांच्या सांगण्यावरून त्यांच्या विनंतीला मान देऊन ते कबनूर गावाचं भ्रमण करत इथं आले. त्यांचं आगमन झालं आणि त्यांचं इथंच वास्तव्य झालं."

"सत्य, अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारी दोघांची अद्भूत मैत्री. या मैत्रीमुळे त्यांनी गुरुवारच्या दिवशी मांसाहार करणं बंद केलं. त्या दिवशीपासून आजपर्यंत दर गुरुवारी आणि उरुसचा मंडप चढवल्यापासून कोणी नॉनव्हेज खात नाही. या काळात नॉनव्हेजचे हॉटेल सुद्धा बंद असतात."

मांसाहार वर्ज्य असणाऱ्या या गावात गोडाचीही वेगळी परंपरा आहे. सगळ्या गावातल्या प्रत्येक घरातून उरुसासाठी गोडाचा म्हणून मलिदा बनवला जातो.

भाजी भाकरी किंवा पोळी याबरोबर गोडाचा म्हणून हा मलिदा. मलिदा म्हणजे पोळीचा कुस्करा करुन त्यात काजू बदाम खोबरं टाकून त्यावर प्रक्रिया करुन तयार केला गेलेला पदार्थ.

हा दूध आणि तुपासह खायला दिला जातो. हा मलिदा तयार करण्याची प्रक्रियाही घराघरातून उरुसाच्या तीन चार दिवस आधीच सुरू होते.

मलिदा कसा तयार होतो याचं वर्णन करताना कबनूरच्या रहिवासी कलमाबी मन्सूर मुलाणी सांगतात, "आमच्या इकडं खपली गहू असतात. खपली गहू दळून आणायचे. नंतर त्याची चपाती बनवायची. तूप लावा किंवा तेल लावा. कुठल्यापण पद्धतीने करा."

"त्यानंतर ते वाळायला ठेवायचं आणि मोडून चक्कीमधून दळून आणायचं. आधी घरीच करत होतो, पण आता सुविधा निघाल्या आहेत. आणल्यानंतर असं मोकळं करुन ठेवायचं. नंतर खोबरं खीस, काजू, बदाम, वेलदोडे पूड, जायफळ हे सगळं घालायचं. तूप लावायचं मलिद्याला आणि व्यवस्थित हे सगळं असं कालवून घ्यायचं."

तर खाण्याच्या परंपरेचं वर्णन करताना सुमन महाडिक सांगतात, "मलिदा करण्याचं काम दोन तीन दिवस आधीच सुरू होतं. एक दिवस आधी गहू दळून आणायचे. आधी आम्ही हातावर करायचो. आता चक्कीत करून आणतो. आजच्या दिवशी भाज्या कोशिंबीर करतो. सगळं शाकाहारीच. पुरी, भाजी, कुर्मा असं."

एकात्मतेचं प्रतिक असणारा हा दर्गा आणि सर्व जातीधर्मांच्या लोकांच्या सहभागातून साजरा होणारा हा उरूस आजच्या काळात आजूबाजूच्या गावांना धार्मिक आणि सामाजिक सौहार्दाचा महत्त्वाचा संदेश देतोय.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)