टी 20 पुरुष विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; शुभमन गिलला वगळले, असा आहे संघ

भारत आणि श्रीलंकेत संयुक्तपणे होणाऱ्या आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्डकप 2026 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

सूर्यकुमार यादव या संघाचा कर्णधार असेल. अक्षर पटेल विश्वचषकासाठी उपकर्णधार असणार आहे. या संघामध्ये शुभमन गिल याचा समावेश करण्यात आलेला नाही. तर रिंकू सिंग आणि इशान किशन यांना संधी मिळाली आहे.

टी ट्वेंटी वर्ल्डकप पूर्वी न्यूझीलंडविरोधात होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठीही हाच संघ असणार आहे.

अशी आहे टीम

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार) , रिंकू सिंग, इशान किशन, संजू सॅमसन(यष्टीरक्षक) , वॉशिंग्टन सुंदर, जसप्रित बुमरा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती

शुभमनबाबत काय सांगितलं?

शुभमन संघात नसल्यानं कुणीतरी उपकर्णधार होणारच होतं, अक्षरने यापूर्वी ती जबाबदारी सांभाळली आहे, त्यामुळं त्याला उपकर्णधार केल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.

शुभमनचा दर्जा काय आहे त्याबाबत कुणालाही शंका नाही. पण संघाचं कॉम्बिनेशन काय असेल त्यासाठी कुणालातरी बाहेर राहावं लागणार आहे. यावेळी तो खेळाडू गिल आहे, असं मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले.

तर कर्णधार सूर्यकुमार यादवनंही गिलला फॉर्ममुळं नव्हे तर कॉम्बिनेशनसाठी वगळलं असल्याचं सांगितलं.

"आम्हाला वरच्या क्रमांकावर फलंदाजी करणारा विकेटकिपर हवा होता. त्यामुळं संघाला दोन तीन वेगवेगळे कॉम्बिनेशन वापरता येऊ शकतात, त्यामुळं हा निर्णय घेण्यात आला", असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

भारत-पाकिस्तान एकाच गटात

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 20 संघांना चार गटात विभागण्यात आलं आहे. त्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ 'अ' गटात आहेत.

भारताचा पहिला सामना 7 फेब्रुवारी रोजी अमेरिकेशी होणार आहे. त्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी नामिबिया, 15 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान आणि 18 फेब्रुवारीला नेदरलँड्सशी सामना होईल.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोलंबोत होणार आहे. या स्पर्धेतले पाकिस्तानचे सर्व सामने कोलंबोमध्ये होतील.

स्पर्धेत सहभागी 20 संघ

गट अ

भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स, नामिबिया

गट ब

ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे, ओमान

गट क

इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ, इटली

गट ड

न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, युएई

स्पर्धेत 7 ते 20 फेब्रुवारी दरम्यान एकूण 40 गट फेरीतले सामने खेळवले जातील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ 21 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या सुपर 8 फेरीत प्रवेश करतील.

सुपर 8 मधील अव्वल चार संघ स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करतील.

उपांत्य फेरीचे सामने कोलकाता किंवा कोलंबो आणि मुंबईत होतील. तर अंतिम सामना 8 मार्च रोजी अहमदाबाद किंवा कोलंबो येथे होईल. म्हणजे पाकिस्तान उपांत्य फेरीत किंवा फायनलमध्ये असल्यास त्यांचा सामना कोलंबोमध्ये होईल.

'फायर अँड फायर'

माजी गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांसह क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांनी टीम सिलेक्शनवर प्रतिक्रिया दिली आहे.

वेंकटेश प्रसाद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर लिहिले, "टीम खूप चांगली दिसत आहे. ईशान किशन आणि अक्षर पटेलला टीममध्ये पाहून आनंद झाला. अक्षर पटेलने 2024 वर्ल्ड कपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमचे अभिनंदन."

इरफान पठान यांनी टीम निवडीबद्दल लिहिले, "जितेश शर्मा विचार करत असेल की त्यानं असे काय चुकीचे केले की टीममध्ये जागा मिळाली नाही. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये असणे आवश्यक आहे. मला आशा आहे की ते न्यूझीलंडविरुद्ध धावा करतील, जेणेकरून वर्ल्ड कपपर्यंत ते आणखी धावा करू शकतील."

जाणते समालोचक हर्षा भोगले यांनी टीम सिलेक्शनबद्दल 'एक्स'वर लिहिले, "निवडलेली टीम मला खरोखरच आवडली आहे. गिलला बाहेर ठेवणे हा मोठा निर्णय आहे आणि यावरून स्पष्ट संकेत मिळतो की 'फायर अँड आइस'ची जागा आता 'फायर अँड फायर'ने घेतली आहे."

ते पुढे लिहितात, "ईशान किशन जे पर्याय देतात त्याकडे दुर्लक्ष करणे कठीण होते, विशेषतः त्यांच्या सध्याच्या फॉर्मकडे पाहता. दुर्दैवाने याचा अर्थ असा झाला की जितेशला बाहेर जावे लागले आणि त्यांच्यासाठी वाईट वाटते, पण रिंकू उत्कृष्ट खेळाडू आहे. त्यामुळे टीमची भिस्त डावखुऱ्या फलंदाजांवर अधिक होते, पण हा एखाद्या धाडसी निर्णयाचा नैसर्गिक परिणाम आहे."

समालोचक आणि क्रीडा विश्लेषक आकाश चोप्रा यांनी लिहिले, "वर्ल्ड कप येण्याआधी टीममध्ये बरेच बदल झाले आहेत. जितेश शर्मा यांना हेही कळलं नसेल की त्यांनी नक्की काय चूक केली. रिंकू जिथं होता तिथंच परत आला आहे. ईशानला टीममध्ये पाहून आनंद झाला. दोन्ही विकेटकिपर बॅटिंग स्लॉटसाठी योग्य आहेत. अक्षरचं उप-कर्णधार म्हणून पुनरागमन झालं आहे. गिलबाबत चाललेले प्रयोग आता संपले असे दिसत आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.