ब्लड मनी म्हणजे काय? हे पैसे दिल्यामुळे सुटका कशी होते? निमिषा प्रिया प्रकरणी काय होणार?

गेले काही दिवस निमिषा प्रिया हे नाव चर्चेमध्ये आहे. निमिषा प्रिया या मूळच्या केरळच्या पण येमेनमध्ये कार्यरत असणाऱ्या नर्स आहेत. 2008 साली वयाच्या 19 व्या वर्षी त्या येमेनला गेल्या होत्या. कुटुंबाची गरिबी दूर व्हावी म्हणून येमेनला गेल्या खऱ्या पण त्या एका वेगळ्याच संकटात सापडल्या.
निमिषा सध्या येमेनच्या तुरुंगात आहेत. त्यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. एका व्यक्तीचा खून केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
आता निमिषा यांना जिवंत राहायचं असेल तर त्यांच्याकडे एकच पर्याय शिल्लक आहे. हा पर्याय म्हणजे त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना 'ब्लड मनी' हा निधी देणं आणि त्याबदल्यात त्या कुटुंबीयांनी निमिषा यांना माफ करणं.
पण हा 'ब्लड मनी' निधी काय असतो? हा निधी दिल्यावर कोणताही खुनी खटल्यातून सुटू शकतो का? निमिषा प्रियाची गोष्ट आहे तरी काय? हे आपण इथं पाहू.
ब्लड मनी म्हणजे काय?
बीबीसी अफ्रिकाच्या एका बातमीनुसार ब्लड मनीला 'दिया' असा शब्द वापरला जातो. इस्लामिक कायदेपद्धती शरीयानुसार तो एक न्यायाचा प्रकार आहे. तो हत्या, दुखापत करणं, संपत्तीचं नुकसान करणं यासारख्या अनेक गुन्ह्यांत वापरला जातो.
यामुळे संबंधित आरोपीला पूर्ण माफीही मिळू शकते. ही पद्धती मध्य पूर्व आणि अफ्रिकेतील 20 देशांमध्ये आहे.
नायजेरियातले इस्लाम अभ्यासक शेख हुसेन झकेरिया यांच्या मते, "कुराणातही ब्लड मनीला आधार सापडतो. प्रेषित महंमदांनी हत्येच्या बदल्यात 100 उंट दिले जाऊ शकतात", असं म्हटल्याचं ते सांगतात.
आता मात्र हा निधी किंवा दंड रोख रक्कमेच्या रुपात दिला जातो त्यास दिया असं म्हटलं जातं.
त्याची रक्कम त्या हत्येच्या गुन्ह्यानुसार आणि संबंधित देशाच्या कायद्यानुसार बदलते.
त्याचप्रमाणे ब्लड मनी कोणाला द्यायचा हे ठरवलं जातं. ब्लड मनी मिळण्यास एकापेक्षा जास्त लोक पात्र असतील तर तो कसा विभागून द्यायचा याचेही नियम आहेत.
निमिषा प्रियाचा खटला काय आहे?
बीबीसी प्रतिनिधी गीता पांडे यांच्या डिसेंबर 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, प्रशिक्षित नर्स असलेल्या निमिषा प्रिया 2008 मध्ये केरळहून येमेनला गेल्या होत्या. येमेनची राजधानी असलेल्या सना मधील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांना काम मिळालं होतं.
टॉमी थॉमस यांच्याशी लग्न करण्यासाठी 2011 मध्ये निमिषा केरळला आल्या होत्या. लग्नानंतर ते दोघेही येमेनला गेले. डिसेंबर 2012 मध्ये त्यांना एक मुलगी झाली.
थॉमस यांनी बीबीसीला सांगितलं होतं की, त्यांना कोणतीही चांगली नोकरी न मिळाल्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या. त्यामुळे 2014 मध्ये ते आपल्या मुलीसह कोचीला परत आले.
त्याच वर्षी निमिषानं कमी पगाराची नोकरी सोडून एक क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. येमेनमधील कायद्यानुसार असं करण्यासाठी एक स्थानिक भागीदार असणं आवश्यक आहे. तेव्हाच महदी यांची या कहाणीत एंट्री झाली.
महदी यांचं एक कपड्याचं दुकान होतं. निमिषा ज्या क्लिनिकमध्ये काम करायच्या त्याच क्लिनिकमध्ये त्यांच्या पत्नीनं मुलीला जन्म दिला होता. जानेवारी 2015 मध्ये निमिषा भारतात आल्या होत्या, तेव्हा महदी देखील त्यांच्यासोबत आले होते.

निमिषा आणि त्यांच्या पतीनं आपले मित्र आणि कुटुंबीय यांच्याकडून आर्थिक मदत घेत जवळपास 50 लाख रुपये जमवले होते. त्यानंतर एक महिन्यानं निमिषा स्वत:चं क्लिनिक सुरू करण्यासाठी येमेनला परतल्या.
त्याचे पती थॉमस आणि मुलीला येमेनला आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. तेव्हाच येमेनमध्ये यादवी युद्धाची सुरुवात झाली.
त्यादरम्यान भारतानं येमेनमधून आपल्या 4,600 नागरिकांना आणि 1,000 परदेशी नागरिकांना बाहेर काढलं होतं. मात्र त्यावेळेस निमिषा भारतात परतल्या नाहीत.
मात्र, निमिषा यांची परिस्थिती लवकरच खराब होण्यास सुरूवात झाली. त्यांनी महदीविरोधात तक्रार करण्यास सुरूवात केली.

निमिषा यांच्या आई, प्रेम कुमारी यांनी 2023 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका केली होती. त्यात म्हटलं आहे की, "महदी यांनी निमिषा यांच्या घरातून त्यांच्या लग्नाचे फोटो चोरले होते. नंतर त्या फोटोंना एडिट करून त्यांनी दावा केला की त्यांचं निमिषाशी लग्न झालं आहे."
यामध्ये असंही म्हटलं होतं की महदी यांनी अनेक वेळा निमिषा यांना धमक्या दिल्या. तसंच "त्यांचा पासपोर्ट देखील ताब्यात घेतला होता. निमिषा यांनी जेव्हा या गोष्टीची तक्रार पोलिसांत केल्यानंतर उलटं पोलिसांनीच त्यांना सहा दिवस अटक केली होती."
2017 मध्ये निमिषा यांचे पती थॉमस यांना महदी यांच्या हत्येची माहिती मिळाली होती.


थॉमस यांना येमेन मधून माहिती मिळाली की 'निमिषा यांना पतीच्या हत्येच्या' आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
थॉमस यांच्यासाठी ही गोष्ट खूपच धक्कादायक होती, कारण ते स्वत:च निमिषाचे पती आहेत. मात्र महदी यांनी निमिषा यांचे फोटो एडिट करून स्वत:चं लग्न निमिषाशी झाल्याचा दावा केला होता.
महदी यांचा छिन्नविछिन्न झालेला मृतदेह वॉटर टँकमध्ये मिळाला होता. त्यानंतर एक महिन्यानं निमिषा यांना येमेन-सौदी अरेबिया सीमेवरून अटक करण्यात आली होती.
बीबीसीच्या बातमीनुसार, 'दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटलं आहे की, महदी यांनी क्लिनिकच्या मालकी हक्काच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून ते क्लिनिक स्वत:च्या मालकीचं असल्याचा दावा केला होता. क्लिनिकमधून ते पैसेही घेत होते आणि निमिषा यांचा पासपोर्टदेखील त्यांनी ताब्यात घेतला होता.'
पुढे काय होणार?
ब्लड मनी दिल्यावर गुन्ह्यातून सुटका होईलच असे नाही.
येमेनचे राष्ट्राध्यक्ष रशद मुहम्मद अल-अलीमी यांनी सोमवारी (30 डिसेंबर) निमिषा प्रिया यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला मंजूरी दिली.
निमिषा यांची मृत्यूदंडाच्या शिक्षेतून सुटका करण्यासाठी केरळमधील त्यांच्या शहरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 'सेव्ह निमिषा इंटरनॅशनल अॅक्शन कमिटीच्या नावानं कॅम्पेन' किंवा मोहीम देखील चालवली जाते आहे.
या कॅम्पेनकडून भारत सरकारला या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांमध्ये म्हटलं आहे की, ज्या महदी नावाच्या व्यक्तीच्या हत्येसाठी निमिषा यांना शिक्षा झाली आहे, त्यांच्या कुटुंबाशी चर्चा करून निमिषा यांना माफी मिळवून देण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर ही स्थिती निर्माण झाली आहे.
काही प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे की, मध्यस्थी करण्याचे प्रयत्न करण्यासाठी आवश्यक असलेला निधी किंवा फंड गोळा करता आला नाही. आता निमिषा प्रिया यांना वाचवण्यासाठी फक्त एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे.
मनोरमा ऑनलाईननुसार, 'येमेनमध्ये निमिषा यांची सुटका व्हावी यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत, त्यासाठी सॅम्युएल जेरोम यांनी पुढाकार घेतला आहे. सॅम्युएल म्हणाले की मध्यस्थी करण्यासाठी टोळीवाल्यांच्या नेत्यांशी चर्चा करता यावी यासाठी आवश्यक असलेले पैसे गोळा करता आले नाहीत.'
सॅम्युएल जेरोम म्हणाले, "पैसे न दिल्यामुळे चर्चा थांबली. जर चर्चा सुरू राहिली असती तर आतापर्यंत निमिषा यांची सुटका झाली असती."
मात्र निमिषा यांच्या कुटुंबाचे वकील सुभाषचंद्रन यांनी दावा केला की येमेनमध्ये जी टीम मध्यस्थीचं काम करते आहे, त्या टीमनं जुलै 2024 मध्ये 20,000 डॉलरची (जवळपास 19 लाख रुपये) मागणी केली होती.
ते म्हणाले, "गेल्या आठवड्यात त्यांनी पुन्हा 20,000 डॉलरची मागणी केली. आम्ही तितके पैसे पाठवले. आम्ही भारतीय दूतावासामार्फत येमेनच्या वकिलांना एकूण 38 लाख रुपये ट्रान्सफर केले आहेत. मात्र दुर्दैवानं दोन दिवस आधी येमेनच्या राष्ट्राध्यक्षांनी निमिषा यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला मंजूरी दिल्याची बातमी आली आहे."
सुभाषचंद्रन असंही म्हणाले की, "मृताच्या (तलाल अब्दो महदी) कुटुंबांशी आतापर्यंत थेटपणे कोणतीही चर्चा किंवा संवाद झालेला नाही. येमेनमध्ये राजकीय संघर्षाची परिस्थिती असल्यामुळे ही चर्चा करणं आणखी कठीण झालं आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











